बहिण म्हटली की ती प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक हळवा कोपरा असतो. मग बहिण सख्खी असो की मानलेली. बहिणीची मायाच अशी असते की सगळ्या नात्याहून हे नाते अगदी वेगळे आणि नाजूक रेशमी असते.
*'सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती ओवाळीते रे भाऊराया, वेड्या बहिणीची रे वेडी माया*' हे भाऊबीज चित्रपटातील गीत कानावर पडले की ज्याला बहिण नाही तो देखिल भावूक होऊन जातो. द्रोपदीने कृष्णाला आपला पदर फाडून चिंधी बांधली आणि तो भाऊरायाही तिच्या हाकेला धावून आला आणि वस्त्र पुरवून तिची लाज राखली हा दाखला बहिण भावातील नाते स्पष्ट करायला पुरेसा आहे. पाताळातल्या बळिराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता जो आपण राखी पौर्णिमा म्हणून साजरा करतो. या दिवशी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधायची असते. भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे रक्षण करावे अशी भावना त्यामागे असते. तांदूळ, सोने व पांढर्या मोहर्या एकत्र पुरचुंडीत बांधून त्याची रक्षा प्राचीनकाळी बांधली जायची. आता आपण रेशमाची चांदीची राखी बांधतो. भावना मात्र तिच असते. बहिणीने औक्षण केले की भावाने ओवाळणीरुपी भेट देणे म्हणजे हक्काचा एक प्रेमळ व्यवहार असतो ज्यातून भाऊबहिणीतील प्रेम वाढतच असते. राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे दोन सण आपल्या हिंदू संस्कृतीने खास भाऊबहिणीतील प्रेम साजरे व्हावे यासाठी योजिले आहेत.
बहिण ज्या काळजीने भावांचा सांभाळ करते तसे दुसरे कोणीच करत नाही. कदाचित यामुळेच काळजी घेणार्या नर्सला आपण सिस्टर म्हणत असतो.
एक फार सुंदर कविता वाचण्यात आली होती. कवी कोण ते माहित नाही पण भाऊ बहिणीच्या नात्यातील सुंदर वीण या कवितेतून उलगडते.
*कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात आहे ओढ*
*म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतन गोड आहे*
*कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी*
*कधी हक्काने रागवणारी तर कधी लाडाने जवळ घेणारी*
*दु:खाच्या डोहावरील आधाराचा सेतू*
*निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू*
*कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल*
*ममतेचं रान ओलेचिंब पाण्यातील आपलंच प्रतिबिंब*
*मायेचं साजूक रुप आईचं दुसरं रुप*
*काळजी रुपी धाक प्रेमळ तिची हाक*
दुसरी एक कविता अशीच आहे सई नावाच्या कवयित्रीची
*बहिण भाऊ म्हणजे एकाच ताटातला वरण भात मऊ*
*भावाचं दूडूदूडू पळणं बहिणीचं त्याला सांभाळणं*
*स्वत:चा खाऊ फक्त एकमेकांसाठी जपून ठेवणं*
*वय वाढलं तरी भावना बदलत नाहीत*
*लुटूपुटूची भांडणं तीच पण प्रेमात फरक नाही*
*बहिण भाऊ म्हणजे एकमेकांचे मित्र*
*किती ते विषय आणि न संपणारं चर्चासत्र*
*आई बाबांपासून लपवलेलं पण बहिणीला सांगितलेलं*
*भावानेही बहिणीचं मन फुलासारखं जपलेलं*
*बहिणीला कळतच नाही छोटासा भाऊ कधी मोठा होतो*
*भावातल्या बाळपणालाही बहिणीचं मन प्रेमानं कुरवाळतं*
ममतेच्या धाग्याने बांधणारी बहिण असते. तुटत जाते सारे काही तेव्हा सांधणारी बहिण असते. तोंडावर भांडत असलो ना तरी मनात खूप प्रेम असते. आईसारखी माया असलेले ताई हे दुसरे रुप असते. बहिणीविषयी कितीही लिहले तरी ते थोडेच आहे.
शाळेत सहावीला असताना अक्का नावाचा एक हृदयस्पर्शी धडा होता. काका कालेलकर यांनी आपल्या एकुलत्या एक वडिल बहिणीच्या हद्य आठवणी त्यात सांगितल्या आहेत. कळायला लागण्यापूर्वीच आपली वडिल बहिण गेली आणि तो एक कोपरा कायमचाच शून्यवत झाला अशी खंत त्यांनी या धडयात व्यक्त केली आहे. आई नंतर जर कोणाचे आपल्यावर भावनिक संस्कार होत असतील तर ते बहिणीचेच.इतक्या दिवसानंतर आजही हा धडा माझ्या स्मरणात आहे. पाडवा गोड झाला याही धड्यात अशी बहिण आठवते जी तिच्या वाटच्या पोळ्या पितळी डब्यात साठवून ठेवते आणि पाडव्याला त्या पोळ्या गुळाबरोबर कुस्करुन आपल्या भावांना लाडू करुन खाऊ घालते व पाडवा गोड करते. किती गोड नाते असते बहिणीचे. शेवग्याच्या शेंगा या य. गो. जोशी यांच्या कथेत भावाभावांमध्ये निर्माण झालेला दुरावा बहिणच दूर करते. अशा कितीतरी गोष्टी बहिणीची माया म्हणून आठवत राहतात.
एकतरी बहिण असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. ज्याला बहिण लाभते तो खरोखर भाग्यवान म्हणावा लागेल. ज्याला बहिण नसते तो मानलेल्या बहिणीवर जीव ओवाळून आयुष्यातील हा रिकामा कोपरा भरुन काढतो. बहिणीकडे लक्ष देता यावे म्हणून आजन्म अविवाहित राहिलेले भाऊ मी पाहिले आहेत तर कोणी भाऊ म्हणू नये राखी बांधू नये म्हणून लपणारे व चुकून भाऊ म्हटले की राग येणारेही मी पाहिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आपल्या पुढे आदर्श आहे. *भले शत्रुची माय कांता बहीण*
*तिला मानतो जन्मत:माय बहिण*
बहिण लाभणे भाग्याचे पण बहिण नसली तरी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेत घरातीलच नव्हे तर समाजातील आपल्या बहिणींच्या सन्मानाची जपवणूक व रक्षा करण्याची जबाबदारी प्रत्येक भावाने उचलली पाहिजे.
@विलास आनंदा कुडके
बहिणीच्या नात्याची वीण, ताकद व्यक्तीला आयुष्य जगताना भक्कम मानसिक आधार देऊन जाते मग सख्खी असो सहकारी , मानलेली. निसर्गाची अश्याप्रकरची व्यवस्था प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभूती देऊन जाते. स्री शक्ति चा अथांग व खोल प्रेममय, भक्तीमय परिचय होतो. मला बहीण भाऊ नाहीत त्यांचे कमतरता वेळोवेळी अनुभवतो. विलास सर आपण सुरुवातच मानवी जाणिवेच्या उच्च स्तरावरील भावनेला हात घालून केली. मनापासून आभार व कौतुक 🙏❤️
ReplyDeleteआपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
Delete