#अवघाची वेळ सुखाने घालवीन
वेळ घालवण्याचा प्रसंग तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपेक्षित बसगाडी येईपर्यंत, अपेक्षित व्यक्तीची वाट पाहताना वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. लहानपणी शाळा सुटायच्या आधी घंटा होण्याची वाट पाहताना वेळ जाता जात नाही याचा तुम्ही अनुभव घेतला असेल. एरव्ही भराभर सरणारा काळ त्यावेळी सरत कसा नाही या प्रश्नाने तुम्हाला भंडावून सोडलेले असते. उगाचच दोन्ही हातांच्या घड्या घालून वेगवेगळ्या कोनातून बदलून व कळ लागलेल्या पायांची अनावश्यक हालचाली करुन तुम्ही न जाणाऱ्या वेळेबद्दल बोटेही मोडून पाहिलेली असतील. उगाचच जांभाई दिलेली असेल. “श्या” या निरर्थक शब्दाने तुमच्या ओठांचा उंबरठा तुमच्या नकळत कितीदा ओलांडला असेल. हातात सैल पट्ट्याचे घड्याळ असेल तर उगाचच मनगट वर खाली करुन पाहिले असेल. हाताशी येईल ते गवत, फुल, पान उगाचच तोडून त्याच्याशी खेळून पाहिली असेल. इतकेच कशाला हाताशी एखादा दगड लागला असेल. तर तो जवळच्या जलाशयात फेकून सहज उठणाऱ्या गोल तरंगाकडे वेड्यासारखे पाहिले असेल. जलाशय नसेल तर हा हाताशी आलेला दगड कुठे भिरकवावा याही प्रश्नाने तुम्ही बुचकळ्यात पडला असाल.
वेळ जेव्हा भराभर सरतो तेव्हा कळत नाही. मात्र वेळ जाता जात नाही तेव्हा मात्र अगदी वेड्यासारखी अवस्था होऊन जाते. काहींना वेळ पुरत नाही तर काहींचा वेळ जाता जात नाही अशी विलक्षण परस्पर विरुध्द टोकाची विषमता सर्वत्र आहे. काहींना विनाकारण वेळ गमवावा लागतो. तर काही कमी वेळात उंच भरारी मारुन जातात. ज्यांनी कशाला तरी “वाहून” घेतले आहे. त्यांना वेळेचे भानही राहत नाही. प्रश्न पडतो तो ज्यांचा वेळ जाता जात नाही त्यांचा. तसे पाहिले तर आजकाल याही प्रश्नाची तीव्रता आंतरजाल, भ्रमणध्वनी इत्यादी वेगवान सुविधांमुळे कमी झाली आहे. तुमची कामे पूर्वी इतकी वेळखाऊ राहिलेली नसल्याने जास्तीत जास्त वेळ तुम्हाला घालवायला उपलब्ध झालेला आहे.
प्रदीर्घ प्रवास असेल तर लोक एकसारखे आडवे पडून झोपलेले तरी असतात. नाहीतर येईल ते वेफर्स, कुरकुरे, बिस्कीटे, चहा, कॉफी, आईस्क्रीम इत्यादीमध्ये आपल्या जीभेला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रवास वेळ घालवण्याचा मोठा प्रश्न असतो. काही एकसारखे एका जागी बसता येत नाही म्हणून सतरा वेळा दरवाजापर्यंत ये-जा करीत असतात. तिथे वेगळी हवा लागते का ते पाहत असतात. ज्यांना कुठेही कोणत्याही अवस्थेत झोप लागू शकते. त्यांना वेळ कसा घालवावा हा प्रश्न अजिबात पडत नाही. अगदी रंगलेल्या गप्पा ऐकता ऐकता हो हो म्हणता ते सहज निद्रिस्त होऊन स्वप्ननगरीचा फेरफटका मारुन पुन्हा पुढच्या संवादाला टाळी द्यायला डोळा उघडून हजर होऊ शकतात.
अचानक वीज गेल्यावर वेळ घालवणे अतिशय जिकरीचे असते. पंख्याने किंवा वातानुकूलित यंत्राने साथ देण्याचे सोडल्याने जी तडफडण्याची अवस्था असते ती अगदीच असह्य अशी असते. नैसर्गिक हवेची फारशी सवय नसलेल्यांची तर अशा वेळी हमखास पंचायत होऊन बसते. महागड्या अत्तराच्या वासात धर्मबिंदूंचा वास तसे सगळे विचित्र होऊन बसते. मग अशा वेळी उगाचच ती असेल तर ओढणीने पदाराने वारा घेत फेऱ्या मारणे किंवा तो असेल तेवढेच निमित्त साधून जागेवर पोबारा करणे असे चित्र हमखास पाहायला मिळते. जसे काही वीज गेली तर ती येईपर्यंत आपण जगूच शकत नाही असे किमानपक्षी ज्याला त्याला दाखवल्याशिवाय आपले समाधानच होत नाही. वीज गेलेली असूनही काहीच फरक न पडलेल्यांकडे मग सगळे अशा विचित्र नजरेने बघतात की तो माणूसही आपल्याला सहज मागील कित्येक शतकांपूर्वीचा मागासलेला वाटू लागेल.
आणखी एक वेळ जाता जात नाही असे ठिकाण म्हणजे जिथे मारायला एकही माशी नसते. हातपाय न हलवता गिळायची सोय असलेल्यांना न जाणाऱ्या वेळेची समस्या अधिक भेडसावते. काही ठिकाणी तर कामच नाही तेव्हा तर भयाण परिस्थिती असते. काम नसतांना आपण कामात आहोत असे पाहणाऱ्याला एकसारखे भासवत राहणे वाटते तितके सोपे काम नाही. सतत घड्याळाच्या काट्यावर नजर ठेवणे, हाताने काहीतरी खालीवर करत राहणे, संधी मिळाली की आंतरजालावर फिरून येणे, आपल्याला पत्ते गेम खेळता येतात की नाही त्याची चाचणी घेणे मात्र हे सर्व करीत असताना नाकावर सोनेरी काड्यांचा चष्मा असा काही सरकवून ठेवायचा व वर गंभीर मुद्रा करुन बसायचे पाहणाऱ्याला असे वाटेल की, ते जणू काही देशाचा अर्थसंकल्पच तयार करीत आहेत. कोणाच्या लक्षात येणार नाही असा बेमालूम वेळ घालवणारा माणूस तुम्हाला कोठे दिसला तर त्याला गुरु मानले पाहिजे. कारण ज्याला वेळ घालवता आला तो जिंकला. नाहीतर मर-मर कितीही मेले तरी वेळ काही तुम्हाला हसायला, रडायला, गप्पा मारायला, चकाट्या पिटायला मोकळी संधी देणार नाही आणि तुम्ही त्या गोष्टींच्या अवर्णनीय आनंदापासून वंचितच राहाल. आपण या जगात येऊन काय केले हा प्रश्न ज्याला वेळ पुरत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे. पण “इतके करुनही शेवटी काय मिळवले” असा प्रश्न शेवटपर्यंत पडू नये म्हणून वेळ घालवण्याची कला आत्मसात केलीच पाहिजे !
वेळ घालवणे फारसे अवघड नसते. ज्यांचा अजिबात वेळ जात नाही असे मित्र तुम्ही जोडले पाहिजेत. त्यांच्याबरोबर शॉपिंगला, रेसला, क्लबमध्ये, जिममध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे बेत आखले पाहिजेत. त्यांच्यावर वाट्टेल तेवढा पैसा उडवण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कारण अशा मित्रांचा जर तुमच्यासोबत वेळ तऱ्हेने घालवला गेला नाही तर असे मित्र गमवण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. पुन्हा पैसा असून वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला भेडसावू लागेल आणि असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. यासाठी वेळ घालवण्याची कला जमल्यास जन्मजात आत्मसात करण्याची निकड आहे. कामाचा उपदेश करणाऱ्यांकडे तुम्ही सोयीस्कर दुर्लक्ष करुन अशा मित्रांसोबत खुशाल चकाट्या पिटल्या पाहिजे, टिवल्या बावल्या केल्या पाहिजे, उणी-दुणी काढायला आजू-बाजूला खुप उदाहरणे असतात. तीही हौस या मित्रांसोबत तुम्ही भागवून घेतली पाहिजे. स्वत:ला चमकवायचे असेल तर इतरांवर गर्द अंधार करायला शिका. त्यासाठी वाट्टेल ते करा. लावालाव्या करा, चहाड्या करायला शिका कदाचित तुम्हाला हे पटणार नाही. पण त्याशिवाय तुमचा वेळ चवी-चवीने आनंदात जाणार नाही. तुम्हाला गंभीर आणि प्रौढ बनवणाऱ्या, डोक्यावरचे केस कमी करणाऱ्या किंवा अकाली डोक्यावर चांदी पेरणाऱ्या “जबाबदारी” “कर्तव्य” यासारख्या जड जड शब्दांपासून तुम्ही चार हात लांब असले पाहिजे. तसेच खूप गंभीर उपदेश करणाऱ्या लोकांपासून तुम्ही कोसभर दूर राहिले पाहिजे. मुळात तुमचा वेळ हा आनंद उपभोगण्यासाठीच आहे. एरंडाकडे पहा त्यांच्यासारखे वाढत रहा. हत्तीकडे पहा त्यांच्यासारखे मस्तवाल बना. इतरांची काळजी करण्यापेक्षा इतरांनी तुमची काळजी घेतली पाहिजे असे तुमचे इप्सित असले पाहिजे. एवढी कला आत्मसात करायला मात्र तुम्हाला थोडा वेळ वाया घालवण्याशिवाय गत्यंतर नाही !
@विलास आनंदा कुडके
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment