#आईच्या आठवणी
मला आठवते मी खूप लहान असेन. आईच्या सारखे मागे मागे असायचो. मला सोडून आईने काहीच करु नये असे वाटायचे. आईला कामही करता यायचे नाही. रडून रडून आईचा मी अगदी पिच्छा पुरवायचो मग ती वैतागून अस्सा काही रट्टा ठेवून द्यायची की मी मुसमुसत आईशी बोलायचेच नाही असे ठरवून खिडकीत जाऊन बसायचो. आई मग कामात लागे. कामाच्या नादात ती मला विसरुनही जायची. बरे कामेही खूप असायची. सकाळी खाली उतरुन सार्वजनिक नळावरुन हंडे कळशा भरुन आणायच्या असे. तांब्याचा बंब पेटवून पाणी गरम करायचे असे. दारावर आलेल्या मोळीवालीकडून लाकडाची मोळी घेणे. ती मधल्या अंधारया खोलीत बल्ब लावून रचून घेणे. सकाळची झाडझूड. दार लावून आंघोळ. नववारी नेसणे. घडीच्या आरसापेटीपुढे बसून केसांचा अंबाडा घालणे. कुंकू रेखणे. जर्मलच्या पातेल्यात धुणे आणि धोपाटणे घेऊन घरात मला ठेवून बाहेरुन कडी लावून 'आले बरका.. घरातच खेळ' सांगून गंगेवर (गोदाकाठी) धुणे धुवायला जाणे. बाजारातून पिशवीत गहू आणणे. निवडणे. कितीतरी कामे. एकदा मी असाच रुसून खिडकीत बसून राहिलो. बघत राहिलो. आई कधी कामातून माझ्याकडे बघते व समजूत काढते. पण कसचे काय. अगदी अंधार पडला तरी आईचा माझ्याकडे बघण्याचा पत्ताच नाही. दिवसभर आई कामात होती. घामाने तिचा चेहरा भरला होता. मी तिच्यावर रागावलो आहे हे तिच्या गावीही नव्हते. संध्याकाळी घासलेटची चिमणी पेटवून तिने चुलीजवळ ठेवली आणि मग तिचे माझ्याकडे लक्ष गेले. पण मी आपले लक्षच नाही या आविर्भावात खिडकीतून बाहेरच पहात राहिलो. 'अरे सकाळपासून पाहते खिडकीत गाडलाय. खेळायला जायचं नाही का' आईने आवाज दिला पण मी ऐकले नाही ऐकले केले. तसे आईने बाहेर खेचले. तोपर्यंत माझा चेहरा अगदी रडकुंडीला आलेला. तिला काय वाटले कुणास ठाऊक. तुला खाऊ खायचा का. खाऊ म्हटल्यावर माझा राग कुठल्याकुठे पळून गेला. मग आईने भरकन बाजार करुन आणलेल्या पिशव्या उचकून खाऊचा पुडा काढला. भेळभत्ता पाहून क्षणात आनंदी होऊन गेलो. रागाच्या भरात दिवसभरात काही खाल्ले नाही हेही विसरुन गेलो.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment