SarjanSpandan

Search results

Saturday, May 29, 2021

हरवलेल्या डायरीतील 90कविता

 तो गूढ पक्षी 


नभ देठीची पालवी रंगहीन 

मेघतांडवी पैल गेला उन्मळून 

वसंतखुणा मातीओठी चुंबून 

हिरव्या रंगी पालवीत गेला फुलून 


शिशिर आला, पारवा पिंपळपानांतून 

पैलतिरी पुन्हा गेला हरवून 

वसंत नभदेठी, पालवी पुन्हा रंगहीन 

पैल डवरला पुन्हा 

स्थितप्रज्ञ होऊन 


चक्रपाऊली अक्षरयात्रा पैलतीर लंघून 

आकाश मातीत होऊन पालवी 

चाले तो गूढ पक्षी 

भान हरपून 

-विलास कुडके (अक्षर महाविद्यालयीन नियतकालिक १९८०-८१


रात्र काळोखी 


रात्र काळोखी आता 

पण गुत्त्यांच्या वाटा 

दिवे तिथेही नाही.. दिवे तिथेही नाही 


वाजत नाही भोंगा 

आता रात्रपाळीचाही 

करीत होतो आम्हीही 

कधी हाडाची काडे 

भोंगा तेव्हा गिरणीचा कर्णमधुर 

न कळे का रडे? 


आत होते मऊमिशाळ 

मांजर काळे 

रेकींगचेअरमधून 

धूर ओकतांना 

हपापलेले 

आणि चटावलेले 

रक्तासाठी 

बेरड 

वखवखलेले 

आमच्या स्पर्शासाठी 


वाजत नाही भोंगा 

आता गिरणीचाही 

कारण तोही पेशंट 

टिबीचा झालाय 

गिरणीत खोकून खोकून 


आता फक्त 

मारताय चकरा 

भंगारवाले 

त्याच्यासाठी! 

-विलास कुडके (१९८०)


चौकट 


इतके दिवस 

नक्षीदार चौकटीशिवाय 

राहीलोच नाही 

पाहिले पावसाळे 

रानभरल्या आभाळाचे 

हिरवाळीचे 

हरणीच्या काळ्याभोर डोळ्यातले 

वारयावर उडणाऱ्या पदरांचे 

राहिलो तृप्त 

पैंजणाच्या नादात. 

-त्याच गजांना धरुन! 


परवाच कोणीतरी म्हणाले 

उडविले की हो त्याने छप्पर 

अन विझवले वंशाचे दिवे 

ठेचाळलो आम्ही 

आणि चौकट नक्षीदार मोडून पडली 

-आणि आम्ही पाहिले आभाळ 

घामाळलेले 

ओझे मरेपर्यंत

 वाहताना! 

-विलास कुडके (१९८०)


हूरहूर 


सैरभैर शब्दांचे पक्षी 

आज ओठात कैद आहे 


आसमंत आहे वसंत जरी 

मौन माझ्या कंठात आहे 


कळेना माझे मला परी 

मीनाक्षी अनावर आसवांची आज पापण्यात कैद आहे 


हूरहूर जीवाला जाळीत आहे 

एकेक ऋतूला होरपळीत आहे 


थांबवेना हा वणवा जीवघेणा 

आतल्याआत मी बंदिस्त आहे 

-विलास कुडके (१९८०)



आलेख 


सांजवेळी पालापाचोळा 

उडतोय वारयावर 

माझ्यातल्या 'मी' चा दूरदूर कोठेतरी 

इतके दिवस त्याच्या अस्तित्वाचा 

उजेड नव्हता 

फक्त जाणिव काळोख्या रात्रीच्या 

अविरत प्रवाहाची.. 

कोणीतरी वाहून गेलेल्या दिव्यांना 

जपून ठेवणारी फक्त काळोखी थेंबातली रात्र! 

जाणिव स्पंदनांची.. 

अविरत पक्ष्याची आतल्याआत चौफेर 

जाणिव वासनेची.. 

प्रक्षोभाची.. 

मनाच्या वादळातही जाणिव शेक्सपियरची

..फक्त जाणिव 'I am not, what I am! '

चाचपडतांना फक्त काळोखात 

नचिकेत ' मी ' दक्षिणमार्गी जात होतो.. 

शोधीत पाऊलखुणा अस्तित्वाच्या, 

मृग ' मी ' माझ्यातला मृगजळामागे 

काळोखात.. 

बेफाम वासनेपोटी 

उधळून जातो ' मी ' ययाति! 

सप्तचक्रे चैतन्याची.. तो रथ त्याचा पार्थ 

नव्हतो ' मी '

सुप्त सारथी कुंडलिनीचा 

३. ५फेरयातला 

नव्हतो ' मी'

'मी ' नव्हतो जाणिव.. काळोखाची 

नव्हतो दु:खांचे भास 

नव्हतो सुखलोलुप कवडीचुंबकाचा ' मी ' 

नव्हतो  ' शापित 'न


 ' मी 'किडलेला, 

नव्हतो ' मी ' स्वरांच्या बनातले फूल निळे.. 

नव्हतो गंधाची धुंद मंतरलेली पाऊलवाट 

नव्हतो अस्तित्व, 

नव्हतो अहम ब्रह्मास्मी किंवा ' तो ' मी नव्हेच! 

I am not, what I am! 

सांजवेळी पालापाचोळा अद्याप उडतोय 

वारयावर माझ्यातल्या ' मी'चा 

दूरदूर कोठेतरी 

उजेडासाठी! 

-विलास कुडके 

(१९८१)


आठवण 


आलं उधाण उधाण 

माये डोळ्यात ओल्या 

न्हाल्या 

दु:खात पापण्या 

भारावलेल्या 


काळोखी प्याला 

त्यात तुझा 

पुनवेचा डोळा 


माये तुझं आसू 

झालं 

चांदण्यात गोळा 


तरळल्या पुन्हा पुन्हा 

तुझ्या चित्रसावल्या 

त्यातून माझ्या 

सुरु झाल्या शतपावल्या 

-विलास कुडके (१९८१)


भिती 


वीट न वीट आताशा 

मोकळी होऊ पाहतेय 

कधीतरी कोसळेल 

हीही भिंत अन 

इतक्या दिवसांचं 

आपलं घर 

होईल उध्वस्त 

अन 

कोसळलेल्या 

छपराखाली 

होतील पाखरं 

बेघर! 

-विलास कुडके (१९८१)



बहाणे 


उजळमाथी 

शुभ्रधवल 

प्राजक्तांच्या 

पहाटेस बहाल 

हे दवांचे 

नजराणे 

कि कालच्याच 

आसवांचे 

हे नवेच बहाणे! 

-विलास कुडके (१९८१)


संदर्भ 


तू जेव्हा 

पहिल्यांदाच आलीस 

आणि येतच राहिलीस 

आणि जेव्हा आणलीस 

इवल्याशा चोचीतून 

पहिलीच काडी - 

तेव्हा मात्र 

माझी फांदी न फांदी 

अशी बहरुन आली 

तुझे घरटे 

जपावे म्हणून! 

-विलास कुडके (१९८१)


यावेस तू 


यावेस तू अलगद 

पापण्यांवर माझ्या पहाटे पहाटे 

थेट यावेस तू शोधीत मला 

उरातल्या धुंद धुंद गंधित पाकळ्यांतून.. 


कावरी होता बावरी तू 

अलगुजाच्या सुरावर.. 

पैंजणे तुझी थरारता क्षणभर.. 

थांबवून अलगूज 

उसासे नाजूक तुझे 

हुंगीत रहावे दुरुन मी 

अन 

तव धक्क्याने दव पाकळ्यांवरील 

येता खाली ओघळून, 

झेलीत रहावे येथून मी! 

झोक अचानक तुझा गेलेला पाहून 

अलगूज द्यावा दूर फेकून, 

बाह्या वर सरसावून 

अन 

इथे काट्याच्या सुक्ष्माग्रावर 

पाय घट्ट रोवून 

झेलावे मी तुलाही अलगद 

कवेत माझ्या, 


क्षण दोन क्षण होता 

अखेर आपुले मिलन, 

जावे तोच तू 

पापण्यापल्याडच्या 

प्रदेशात 

भुर्रकन 

उडून! 

-विलास कुडके

 (१८/१२/१९८१)



किमया 


तरारुन यावे 

काट्यातून वर 

फुल कोवळे मलाही, 


रुजावे माझ्यातही 

माणूस अखेर 

फुटावा पाझर मलाही, 


फुटावा अंकूर 

जून माझ्या बुंध्याला 

स्पर्श ऐसा व्हावा देवा 

तुझ्या परिसाचा 


स्फुरावा अभंग 

तुझाच कोवळा 

मलाही! 

-विलास कुडके (१९८१)



तरल तरंग मी 


तरल तरंग मी माझ्यातला 

गवसता कधी चांदण्यातला 

शिवला मलाही अखेर शिवारात गार गार वारा झोंबरा 


सूर मी पोरका 

हळूच कुणी 

वारयावर छेडलेला 

बापडा माझाही मला 

आता न राहिलेला.. 


फौजेत कावळ्यांच्या 

टाकला मीही पैस पिसारा 

विसरुन शिरीचा भरजरी तुरा 

दिला मीही जाता जाता 

कर्कश्श एक इथलाच नारा 


वणव्यात माझ्या दग्ध मीही 

रोमारोमातून पेटून उठतांना 

पक्षी फडफडून तडफडतांना 

उरलो मीही अखेर 

राखच जरा! 

-विलास कुडके (१९८२)



खरेच का? 


अनावर तरीही 

का दुरावलेली 

ही तुझी साथ आहे 


खरेच का 

वसंताची 

ही अशी सुरुवात आहे 


घन गर्जताहे दाटूर दूर 

सखे मन आतूर 

तरीही तूषार्थ आहे 


मन तरुण माझे उमलते 

हे असे बहरात आहे 

ओघळात पण हाय कसे हे 

साचलेले काठ आहे 


निशिगंध वयातले जणू 

रान घोंगावत आहे 

कळेना कुणाला हा हुंदकाही 

का दरवळत वाट पहात आहे 


खरेच का उमललेल्या 

हरेक पापणीला जागणारी 

अजून एकांत रात आहे 

-विलास कुडके (१९८२)


चंद्र माझे ग्रासलेले 


चंद्र माझे ग्रासलेले 

शरदातले तरीही 

मन माझे भरातले 

तरीही वाहून गेले 


रेंगाळून कालचे

 ते उन्ह गेले 

रान पाचोळ्यातले 

तरीही राहून गेले 


आले गेले तेच असे 

तुडवून गेले 

तारा इतस्ततः अन 

सूर राहून गेले 


वाटा त्याही कशा 

परक्याच होत्या 

राहता राहता काळजाला 

व्रण राहून गेले 


माझ्याच फुलांचे ते 

सौदे करुन गेले 

हिरावल्या पाकळ्यांचे 

भान राहून गेले 

-विलास कुडके (१९८२)



खिडकी 


नेहमीपेक्षा आजचा मूड 

काहीसा वेगळा आहे 

माझ्या दृष्टीने decent mood! 

मला आठवतं 

जेव्हा हा decent mood येतो 

माझे शब्द 

असे तरुण व्हायला लागतात 

अन कुठलीसी कविता 

माझ्या नकळत त्यातून 

मला शोधत येते.. 

ह्या decent mood नं 

काही आठवणीचं 

काही कल्पनांचं 

अत्तर करुन टाकलंय 

अन त्याच दरवरळत्या गंधात 

मी लिहितोय 

अस्सं वाटतं लिहिणं कधीच संपवू नये 


हा मूड कधी ओसरुच नये 

हा गंध कधी संपूच नये 

मन असंच हुरळलेलं रहावं 

अन जणू सारा आनंद 

गोळा करकरुन 

त्याचं मनातल्या 

मधुमक्षिकांनी 

जो पुनवेचा चंद्र 

माझ्या क्षितिजावर 

कोरलाय 

त्या चंदेरी रसानं 

असं सारखं 

न्हाऊन निघावं 

तो चंद्र कधी 

मावळूच नये 

असंच वाटतं 


आज काही negatives 

मन:पटलावर 

positive उमटलेल्या 

पाहतांना 

मी हरखून गेलोय 

ती चित्रे 

माझ्या आठवणीत 

सजीव झालीय 


हळूहळू चाकात वाजणारी 

नादवतीची धून 

मन गुणगुणायला लागतं 

अन पाठोपाठ एक खिडकी 

त्या खिडकीशी 

स्थिर नजरेनं 

बसलेला मी 

मुक्त निसर्गाच्या 

निसंदर्भ ओळी 

वाचत असलेला.. 


सारा दिवस 

इतर दिवसांच्यापेक्षा 

वेगळा 

कात टाकल्यागत 

माझ्या आठवणींत 

सळसळणारा.. 

फुलं वेचत रहावं 

तसा मी तो दिवस 

वेचित होतो 

त्या दिवसाचा गंध 

मी आठवणीच्या कुपीत 

साठवित होतो... 


.. खुल्या माळरानांची 

खुल्या आभाळाला टेकलेली 

पळती ओळ 

कुठेतरी नुक्तीच पावसाला 

झालेली सुरुवात 

कुठेतरी अवचित थांबलेला 

पाऊस अन 

निथळ निथळ उजळलेली 

साळींच्या शेतातली हिरवी कुरणं 

कुठेतरी अधांतरी पाणथळीत 

स्थिरावलेला बगळ्याचा 

पांढराशुभ्र ठिपका 

तर कुठेतरी 

खास पोज देऊन उभे राहिलेल्या झाडांची 

स्थिरावलेली रांग.. 


तो दिवस तेवढाच होता 

अन तरीही 

कितीतरी लांबलचक 

उंचच उंच.. 

मोकळा 

ऐसपैस! 


आज हा दिवस 

कितीतरी दिवसांनी 

दूरदूर 

गेल्यागत 


आज मी पुन्हा 

त्याच त्या चारभिंतीच्या 

खुराडयातील 

छताखालच्या 

दिवसात गुरफटलोय 

पण mood मात्र 

अजूनही त्या दिवसाचा 

वारंवार तरळतोय 

माझ्या मनात 

-विलास कुडके 

(१९८२)



मोरपंखी पहाट 


मोरपंखी स्वप्नांची 

काल खैरात होती 

मी रिता मला पहाट हवी होती 


मश्गुल काल होती 

मैफीलीत रात्र त्यांची 

मी न मश्गुल मला वाट हवी होती 


कुहरात काळोखाच्या 

गर्द एक दर्या होता 

किनारा कुठे गर्जणारी मला लाट हवी होती 


न्हात होतो कुठे मी 

चांदण्यात गाफील 

अंधार झुगारणारी मला जात हवी होती 


झूठ सारेच होते स्वप्नातले ते काफिले घामओल्या दिवसांची मला सुरवात हवी होती 


पाहिले तिला मी अंधारात 

लकाकतांना

 धारदार विजांची मला खैरात हवी होती 

-(१९८३)



अँश ट्रे 


जेव्हा जेव्हा तुझी आठवण होते 

मन उदास होत जातं 

कसं सांगू तुला 

या मनाला मी फार जाळलंय 

हा विरह मी विषासारखा पिलोय 

अन त्यानं सारं मन आग आग होतय 

वरवर सारे वसंत मी सजवले 

वरवर पांघरल्या मी रेशीमशाली 

अन हिरवाळी 

पण मन जळतच राहिले 

जळतच राहिले 

आतल्याआत 


-अन आख्या आयुष्याचाच 

पुढ्यात मी करुन टाकलाय 

अँश ट्रे! 

-विलास कुडके (19/9/1983)


छंद 


नाद येईना नाद येईना गाभाऱ्याचा 

बिथरला अंधार दिवा राहिना गाभाऱ्याचा 

कळी कळी इथे भेगाळली अंधाराने 

रेषारेषा आरपार बधरली पाकळीपाकळी 

अंतस्थाला अंथरून अंधार कलंडला 

उशाला क्षीणक्षीण सरके चंद्रकोर 

नाद फुलेना नाद झुलेना गाभाऱ्याचा 

ऐकू येईना अंतर्गाज धुमसेना छंद गाभाऱ्याचा! 

-विलास कुडके

 (3/2/1984)


निर्माल्य 


सारे आदर्श 

सारी जीवनमुल्यें 

त्यांचं केव्हाच 

झालय निर्माल्य 


आता काळ्या कातळाच्या पोकळीत एकेक लाट

 फुटता फुटता 

हिंदकळतोय आत्मा 


कुठल्याशा गळफास लागलेल्या कैद्यासारखा अधांतरी! 


एकेक प्रेत मात्र जिवंत होतय 

अन सगळा इतिहास रद्दीसारखा विकून आपल्या अतृप्त वासना शमवित आहे 

-विलास कुडके 

(9/2/1984)


वेडे आभाळ 


उंचावरल्या आभाळाला 

दु:ख एकच आजवर सलतेय 

वर्षावे लाखदा जिच्यावरुन तिच्याच वर्षावात का भिजू नये? 


उलगडतात जिच्यापुढे अंतरीचे इंद्रधनु 

रंगात तिच्याच का न्हावू नये? 


वेडे आभाळ अन क्षणिक वर्षाव त्याचा 

असे कैक वर्षाव ती जपतेय कधीपासूनच 

खोलवर अंत:करणात अन  पाझरतेय ती अखंड कधीपासूनच पण भिजवित नाही म्हणून तिचा कळला नाही वर्षाव कधी आभाळाला 

(विलास कुडके)



रानटी सत्य 


उंचच उंच दाट वाढलेल्या या जंगलात जेव्हा सूर्य उगवतो 

तेव्हा हिरवा स्वच्छ प्रकाश तेवढा दिवसभर तरळत राहतो 


ओहळाच्या काठाकाठानं पांढरीशुभ्र बदकं पुढेमागे हलत राहतात अन खळाळत्या प्रवाहाच्या संगीतावर जणू ताल धरीत दिवस घालवतात 


वरवर सारेकाही मनोहर 

रम्य वाटणाऱ्या या विश्वाच्या बुडाच्या हालचाली तितक्याशा रम्य नाही 


निट निरखून पाहिलं तर कित्येक खुरटी न वाढलेली वठलेली जळालेली छोटी छोटी रोपं इथं दिसतील 


इथल्या हिरवाळीतून सरपटत असतात कित्येक विषारी जनावरं अन दूरवर पसरलेल्या गवताचे पट्टेही करपून गेल्यागत पिवळे करडे झाले आहेत 


-आणि इतकं असूनही काही झाडं अद्यापही भोगताहेत हिरवाई 

फक्त त्यांचेच येतात दिवस पालवण्याचे बहरण्याचे.. 

त्यांच्या सावलीत कित्येक पाखरांची घरटी 


कित्येक वाटा त्यांच्या आसपास विसावलेल्या सारंकाही वर वर रम्य अन मनोहर! 


-पण केव्हातरी कुठलेतरी 

यापैकी हिरवाईतील एखादे डौलदार उंच झाड उन्मळून पडेल 

(कुठल्याशा वादळात म्हणा किंवा वठल्यामुळे म्हणा किंवा त्यांची तोड सुरु झाल्यामुळे म्हणा) तेव्हा हिरव्या स्वच्छ प्रकाशात उघडकीस येईल एक सत्य इथल्या मातीवर पोसल्या गेलेल्या माजलेल्या रानटी पाळंमूळांच्या समुहांचे सत्य अन हा हिरवास्वच्छ प्रकाश तेव्हातरी जाणवू लागेल तात्पुरता केव्हातरी.. कुठेतरी! 

(विलास कुडके)



हिंदोळ 


आज सोबतीला एकांत आणि तुझी प्रसन्न अशी आठवण आणि मंदसा टेबललॅम्पचा उजेड आणि मुक्त मनाचे सैरभैर पक्षी.. 


साद येते आतून नि:शब्दसी तुझ्यासाठी.. तुझ्या भोवती माझ्या मनाची आकारत आहे पानाफुलांची मनोहर नक्षी.. 


विरहाच्या अन मिलनाच्या मध्यात आहे आज मन आठवणींचे झोके

 कधी कवळे कोमल पाकळी कधी काट्याने विध्द 

कधी आसवांच्या तळ्यात 

कधी हिरवाईच्या वनात हिंदोळे हिंदोळे असीम क्षणापर्यंत तुझ्यासाठी! 

(विलास कुडके)

 30/11/1985


भैरवी 


गळाल्या का आज पाकळ्या 

अश्रूभरल्या मूक फुलातून 


विरले श्वास सुरकुतल्या रेषा 

रंग हरवल्या कोवळीकतेतून 


ही कोणती व्याकूळ भावना 

हरवल्या ऋतूची थरथरे देठातून 


अंधारले हे कोणते सूर आज आभाळाच्या सायंकाळीन ओठातून! 

(विलास कुडके) 

15/3/1988


माझ्या उदासवाण्या रात्रीची.. 


माझ्या उदासवाण्या रात्रींची तू पहाट होऊन आलीस आणि उदास अंधार मात्र आवरीत राहिलीस 


बेसूर होते गाणे तू सूर होऊन आलीस आणि इथल्या तारा तेवढ्या जुळवित राहिलीस 


तुझे स्वप्नांचे मोहक रंग माझ्या उदास पोर्टेटमध्ये भरीत राहिलीस आणि धूसर होत चाललेले काही उदास ओघळ ओठांनी रिचवित राहिलीस 


तुझ्या ओंजळीत तू आणलेले काही तुझ्या पालवीचे नुक्ते ओले क्षण निष्पर्ण माझ्या आयुष्याच्या उरात पेरीत राहिलीस आणि सर्वत्र माझा पाचोळा मात्र आवरीत राहिलीस 


तुझ्या पंखांनी माझे झाकोळलेले उदास आभाळ पेलीत कुठेतरी निर्जीव झालेल्या माझ्या बुबुळात कुठेतरी धुसर झालेल्या क्षितिजांच्या रेषा हळूवार कोरीत राहिलीस 


माझ्या उदास आसवांत तुझे भावूक चंद्र झिरपित राहिलीस आणि अनावर अशा स्पर्शांच्या कैक पिसांतून बरसणाऱ्या मेघांनी तू माझ्या गात्रात केकांचे रान उठवित राहिलीस! 

(विलास कुडके)

 12/12/1987


तसा मी 


तसा मी एकटाच आहे इथे 

आणि आपल्या आठवणींच्या डोहात सांडलेल्या असंख्य सावल्याही आहेत सोबतीला 

.. काही विरहाच्या 

काही रेश्मी जखमांच्या 

काही तुझ्या माझ्या आर्त यातनांच्या 

काही अनावर 

तर काही व्याकुळ अशा भावूक सावल्या 


कधी कधी मन एकटंच भटकत राहतं बांबूच्या वनातून उडणाऱ्या घायाळ पाखरागत आणि कुठल्याशा आठवणींच्या कुशीत दमून भागून विसावतं - -, मात्र इथे कधीही उजाडत नसतं 

इथल्या रात्रींच्या पापणीत तरळत नसते कुठलीच पहाट, 

त्या घायाळ पाखरालातरी अजून कुठे गवसतेय बांबूचे फूल 

ते भाबडं भटकत राहतं एकटंच आणि अधिकच घायाळ होत राहतं 

-तसंच माझंही मन! 


तसं पाहिलं तर फारकाळ कुठल्याच आठवणींच्या कुशीत त्याला राहता येत नाही म्हणून पुन्हा पुन्हा ते असे भटकत राहते 


कधी कधी असंख्य तुकड्यांत हिंदकळतो आशेचा चंद्र त्याच्याही डोहात पण फेर धरून नाचणार्‍या असंख्य सावल्यात मात्र कुठलाच तुकडा त्याला आधार देत नसतो 


-आणि म्हणूनच ते एकटेच असे कासावीस आपल्या पंखात फडफडत राहते 

सावल्यांच्या बनात पुन्हा पुन्हा भटकत राहते! 

(विलास कुडके) 16/12/1987



२६.


क्षितिजस्वप्न 


ते क्षितिज आम्ही कधी पाहिलेच नाही 

जे उजळलेले नभी लक्ष तारकांत कधी 


होते मानेवर जोखड अन अंगावरती झुली 

अंधारलेल्या खोपट्यात तीन दगडांच्या चुली 


पोटात खपाटलेल्या चाकोरी भाकरीची गरगरे


कुर्वाळतो आभाळ वेदनेचे जरी तळहातांना चरे 


घामात डवरलेले दिवस अन गुत्यात विझल्या रात्री 

गर्भार वेदना पोटुशी व्यथा शृंगार विकण्यात गेल्या रात्री 


सरणात सरतील एकदा आमच्या सगळ्याच वाटा 

तरळेल तेव्हातरी क्षितिजस्वप्न फुटतील जेव्हा ज्वाळांच्या लाटा! 

(विलास कुडके) 26/12/1987



२७. 


अत्तर 


अत्तर यातनांचं 

दर्वळात त्याच्या 

आहे सगळ्याच सुखाचे 

अमृतमय उत्तर! 

(विलास कुडके)


२८.


तूच लावलेला अंकूर वेदनेला 


तूच लावलेला अंकूर वेदनेला 

तूच घाव घातलेला उरात माझ्या 


सांग तू सांगू कशी रेश्मी या घावाशी 

घायाळ मी अशी स्वरात माझ्या 


तूच होत्या माळल्या तूच त्या तोडल्या 

चांदण्या त्या मी जपल्या मनात माझ्या 


तूच गुंफलेला तूच तोडलेला 

पूल दोघांतला जपला उरात माझ्या 


तुझाच मोहोर तुझाच शिशिर 

रिचवला विखार ओठात माझ्या 


तुझेच सुगंधी श्वास झाले आयुष्याला दुस्वास 

येतो आठवणींना वास दारात माझ्या.. 

(विलास कुडके) 27/12/1987


२९. 

तिच्यासाठी 


चोचीत तुझ्या तू आणलेस गुपित 

रुपेरी चांदण्यांचे तिच्यासाठी 

कुर्वाळून हळूवार तू चंद्र सावल्यांना 

स्पर्श कित्येक आणलेस तिच्यासाठी 


आता रात्रींस तिच्या दर्वळ आहे 

पापणीत तिच्या झाकोळलेल्या स्वप्नांची मख्मली हिरवळ आहे 

कदाचित आता असेलही ओठात तिच्या थरथरणारी तू दाद द्यावी अशी माझ्या कवितेची ओळ! 

कदाचित असेलही इथल्या प्रत्येक सोलून निघालेल्या आत्म्याला पुरणारी अशी तिच्या पालवीची खोळ! 


वेड्या पिंगा थांबव आता 

थांबव तुझ्या पंखांची इवलीशी उघडझाप - तू कोवळा आहेस आणि ती बाहू पसरुन औतन देतेय तिच्या आभाळाला 

कदाचित तुला ठाऊक नसेल त्या आभाळाचा अनावर असा ओठातील जाळून टाकणारा आगीचा लोळ! 


तेव्हा वेड्या माझ्या सारखेच तूही पंख मिटवून ठेव तिच्यासाठी! 

(विलास कुडके) 4/1/1988



३०. 


पुनर्जन्म 


काही तारा फक्त छेडायच्या असतात 

तोडायच्या नसतात आणि तुटल्याच तर जपायच्या नसतात बदलायच्या असतात 

कारण राजा तारा ह्या तुटल्या तरी बदलता येतात पण सूर जर पारखे झाले तर आलेले ओकेबोकेपण तुला बदलता येणार नाही तू बदलला तरीही! 

असं बघ पक्षी झाडे बदलतात 

झाडे पाने बदलतात 

पाने ऋतू बदलतात 

ऋतू गाणे बदलतात 

वठल्या झाडांना गळाल्या पानांना झडल्या गाण्यांना तुटल्या तारांना स्वरांचे पुनर्जन्म सांभाळायचे असतात 

प्रत्येकाची तार वेगळी आहे 

प्रत्येकाचे सूर वेगळे आहे 

फक्त त्यांचा पुनर्जन्म एक आहे कुठल्याशा तुटलेल्या तारा बदलून.. 

(विलास कुडके) 6/1/1988



अनामिका 


तारात तू अशी वेदना आज पेरुन जा 

धारांत अश्रूंच्या बरसताना तू झंकारुन जा 


 जाता जाता रानास या साक्ष तुझी ठेवून जा 

जख्मी वारयास माझ्या तुझ्यात गुरफटून जा 


होरपळल्या फुलांचे श्वास दाहक पिवून जा 

बांधून जखम एकेक प्राण असे चेतवून जा 


माळरान आहे आयुष्य तू धून पावसाची होऊन जा 

खोलगेल्या डोळ्यात माझ्या स्वप्न काही मंतरुन जा! 

(विलास कुडके) 4/1/1988


३२.


नियती 


वणवेपेटण झाली अशी अचानक 

तुझ्या फुलांना, 

अशावेळी माझा ओशाळलेला वारा करपल्या गंधात एकटाच सैरभैर दिशाहीन.. 


अंधारले आभाळआयुष्य हेही जेव्हा ज्वाळांच्या करांनी रानोरानी कुर्वाळले तुझे मोर आणि होरपळले तुझे अखेरचे टाहो अशावेळी माझे ओशाळलेले आभाळ 

एकटेच निरभ्र रंगहीन.. 


आता जेव्हा तुझ्या मोरपिसांचा विषय निघतो तेव्हा ओशाळल्यागत पाऊस पडत राहतो माझ्या आठवणीत एकटाच.. 

तुला झालेले काही मृत्यूचे स्पर्श माझ्यावरुन रिते करीत असा कळाहीन पाऊस.. 

आता भिरभिरते माझी नजर किनार्‍याकिनारयाने किनारा होऊन! 

तोच प्रश्न पुन्हा पुन्हा - 

असेल का तुझा अखेरचा श्वास त्या तिथे चंद्रप्रतिबिंबात चकाकत.. 

.. त्या उधाणलेल्या भयाण हिंस्र लाटांच्या विळख्यात! 


निरुत्तर पापणीत अशावेळी फक्त थिजलेले चंद्रास्त आणि लाटांवर नियतीचे विकटहास्य पुन्हा पुन्हा फक्त! 

(विलास कुडके) 23/1/1988




३३ 


प्याला 


पुढ्यात रीतेपणाच्या रीताच मांडलाय प्याला 

त्यातून निशब्दसा झरणारा आहे झरा अनंत क्षणांचा.. 'क्षणभंगुर ss क्षणभंगुर ss' असे क्षणाक्षणाने किनकिनत आतल्याआत आपटून पडसादणारा.. 

एकेक पडसादात आहे युगायुगांचे महदांतर आणि त्याच्या अंतर्यामात आहे सरपटणारया इतिहासाच्या सरड्यांचे रंगपालटाचे स्थित्यंतर.. वारंवार घडून येणारे.. प्याल्याच्याच साक्षीने 


एकेक रंगपालटाचे स्थित्यंतर म्हणजे रीतेपणाच्या समुद्रावर गर्जत राहणारी सर्व साक्षीत्वाची एकेक चिरंतन लाट आणि तिच्या अंतर्यामात होत राहणारे कित्येक कायापालट महापुरुषांचे.. महात्म्यांचे आणि महायोग्यांचे.. प्याल्याच्याच साक्षीने! 


पुढ्यात रीतेपणाच्या रीताच मांडलाय प्याला 

प्याल्याच्या कडेने.. कुठूनतरी.. कुठेतरी सरकत राहणारी आणि सरकतच राहणारी 

क्षुद्र मुंग्यांची रांगच रांग 

प्रत्येक मुंगीचा महाकाय प्रवेश प्याल्याच्या पारदर्शकत्वातून भासमान होत राहणारा आणि पुन्हा आपल्याच क्षुद्रपणाच्या शुन्यात विरत जाणारा शुन्यातच सामावत जाणारा अंतही.. प्याल्याच्याच साक्षीने! 


पुढ्यात रीतेपणाच्या रीताच मांडलाय प्याला 

प्याल्याच्या कडेने वाजणारा भोवताली अदृश्य पाचोळा 

कधीची पाने? कधी पालवली? आणि कधी गळाली? 

त्याच त्या प्रश्नांचे स्वत:भोवतीच गरगरणारे आवर्तन आणि पुन्हा नव्याने गळून पडणाऱ्या पानांची त्यात भर.. 

प्याल्याच्याच साक्षीने! 


प्याला मात्र आपल्याच मौनात गप्प गप्प 

चिरंतन झरणारया झरयांचे पडसाद कुठेतरी आतल्याआत आपल्या रितेपणात रिचवित रिचवित.. सरकत्या मुंग्यांच्या रांगेकडे आणि गळणारया एकेक पानाकडे पहात पहात प्रत्येक मुंगीचा आपल्या अपारदर्शक अस्तित्वापल्याड होणारा भासमान महाकाय प्रवेश आणि पाहता पाहता क्षुद्रपणात शुन्यात तिचा होणारा अटळ अंतही.. सारख्याच तंद्रीत न्याहाळणारा अवलिया प्याला! 


वाजणारा अदृश्य पाचोळा आणि देठातून खुडलेली आवर्तनात उडालेली पाने यातून पाचोळा तुडवित पाने खुडून भिरकावित अविरत चालत राहणारे आपलेच मायावी अस्तित्व पुन्हा त्रयस्थाच्याच नजरेने निरखित प्याला मात्र आपल्याच मौनात गप्प गप्प! 


अंतराळ आपल्यात सामावून आणि तरीही त्यात स्वत:ला न सामावून विलग राहणारा.. 

तारांगणांच्या वलयातून धुसर आपले अपारदर्शक अस्तित्वाच भासमान आकृतिबंध कुठेही तडा न पडू देता रीतेपणातच सांभाळणारा प्याला! 


केव्हापासून? कधीपासून? कोणी 

आणि का मांडून ठेवलाय प्याला पुढ्यात रीतेपणाच्या कदाचित प्रश्नचिन्हही अस्तित्वात नसतील तेव्हापासून - कदाचित कुठलीच चिन्हे अस्तित्वात नसतील तेव्हापासून निश्चिन्ह क्षणांच्या साक्षीने! 

कदाचित कोणीच अस्तित्वात नसतील तेव्हापासून स्वत :शीच स्वयंभू उभा प्याला आणि त्याच्या तंद्रीतून स्फुरलेले अंतराळ.. तारांगण.. ऋतू.. रांग.. नक्षत्रे!.. दिवस आणि रात्र जीवन आणि मृत्यू.. प्रकाश आणि काळोख 

-आणि - 

-आणि - 

की सर्व भासमान त्याच्या स्वप्नात तरळणारी मायास्वप्ने? 

प्रश्नचिन्हे..प्रश्नचिन्हे.. प्रश्नचिन्हे 

प्याल्याच्याच साक्षीने! 

(विलास कुडके) 22/2/1988



३४.


अंतराय 


एक तार तुझी 

एक तार माझी 


तुझी तार मुक्त मैफलीत बेफिकीर 

विदेही तारुण्यात तिच्या 

आहे उमलत्या स्वरांचे झंकार 


माझी तार रिक्त पोकळीत प्रकाशगोलकाच्या 

संन्यस्त.. समाधिस्थ.. तंद्रीत तिच्या तरळत आहे प्रकाशाचा वलयांकित संचार.. 


तुझ्या तारेला मोरपंखी लौकिकाचे हळूवार छेडणारे स्पर्श.. 

अन त्यातून सांडणारे स्वरांचे आल्हादक शीतल चांदणे अन मैफलीला बहार.. 


माझ्या तारेला विजेरी अलौकिकाचे झेपावत्या लाटांनी होणारे स्पर्श नि त्या स्पर्शाने अंतस्थाच्या काळोखाला उजेडाचे प्रकाशमय दाहक संजीवने अन माझ्या प्रकाशगोलकाला भरमाध्यान्हीचे तळपते प्रहार.. 


एक तार गंधर्वलोकीच्या स्वरांची फेसाळती धार 

एक तार अलौकिकाच्या जाणिवेची तळपती धार 

भोगी अभोगी विदेही दोघी 

दोघीतील अंतरायाचे का व्हावे तुला मला प्रहार! 

(विलास कुडके) 6/3/1988



३५.


ओल्या खुणा 


आज पुन्हा कातळाच्या गर्द काळ्या विवरातून का झेपावल्या ग अवखळ रुपेरी सावल्या! 


आज पुन्हा का डोकावला ग पुनवेचा तुझा डोळा अन पाहता पाहता का पापण्यात चांदण्यांच्या अश्रू असे झाले गोळा? 


आज पुन्हा सुरु शतपावल्या कुणाच्या आठवणींच्या ओल्या वाळूवरुन? 


आज पुन्हा का उधाणल्या चित्रसावल्या तुझ्या विदेही किनार्‍यावरुन? 


पंखात आर्त फडफडता हे पाखरु अनावर तुझ्या दिशेने दिसेनाशी तू पुन्हा.. 

मात्र कातळावर आहे अजून तुझ्या तशाच ओल्या खुणा.. 

(विलास कुडके) 10/3/1988



३६. 


रिंगण 


गळाले नाही पान 

तोवर दिल्या देठाशी 

फांदीवर हालायचे 


फुंकरला नाही प्राण 

तोवर दिल्या कुडीत 

श्वासावर तेवायचे 


कसले नाते नभाशी 

कसले नाते मातीशी 

नाते नाही सांगायचे 


आखलेल्या रिंगणात 

पंख असून घुमायचे 

केव्हातरी झेपावून 

नक्षत्रांत निसटायचे 

(विलास कुडके) 14/3/1988


३७ 


जेव्हा स्पर्श नसतात 

तेव्हा स्वर असतात 

जेव्हा स्वरही नसतात

 तेव्हा मात्र शब्द create होतात


३८.


एका भाबड्या मुलास 


तुझ्यासारखाच माझाही पाऊस असतो निरागस मनसोक्त रिमझिमत हसणारा आपल्याच तालात नाचणारा! 


तुझ्यासारखेच माझेही झाड असते स्तब्ध निशब्द माध्यान्हीचे उन भाबडेपणात झेलणारे 

आपल्याच सावलीत गुरफटणारे 

मागू त्याला मुक्तपणे फांद्या पसरुन देणारे आणि फक्त देणारेच! 

तरीही स्तब्ध आपले भाबडे निरागसपण जपून! 


तुझ्यासारखाच माझाही एक पक्षी 

इथले अपराध गुन्हे कायदे इथली जमिन इथली नीति न जाणणारा असा चिरंतन बागडणारा.. स्वच्छंदी असा 

शब्दात न मावणारा 

ओळीत न वावरणारा 

अन तरीही 

आभाळाचा अर्थ गाणारा 

एकमेव असा तुझ्यासारखा! 


तुझेच निरागसपण असते माझ्या फुलात 

पाकळी पाकळीला नाही जाणिव कोमजण्याची 

ती फक्त दर्वळते हसते निरागस मुक्त 

'काळाचे भान तुम्हीच ठेवा 'असं हळूच सांगणारी अशी तीही तुझ्यासारखीच 

तुझ्यासारखीच! 

(विलास कुडके) 7/12/1987



३९.


आदित्यायण 


वय तेवढं तू विचारु नकोस 

वय मोजायला अद्याप आपण निवांत झालेलो नाही 

कितीतरी प्रश्न अजून हाताळायचे शिल्लक आहे 

कितीतरी वाटा शोधायच्या आहेत 

अजून बरयाच वाटचाली चालायच्या आहेत 

तूर्त तरी प्रश्न अनुत्तरीत ठेव.. 


पाठीला पाय लावून पळणारया वारयाला विचार 

विचार वर्षोंवर्ष न्हाऊ घालणाऱ्या आभाळाला अन पुन्हा पुन्हा पालवित रुजणारया मातीच्या प्रत्येक कणाला 

तुला ते हेच सांगतील 

वयच मोजायचे असते तर असलं अक्षरव्रत घेतलं कशाला असते? 

व्रतस्थाला अब्जांचा हिशेब कशाला? 


आज मी उजेडाचा असीम समुद्र आहे 

माझा कण न कण उजेडाचा आहे 

त्या प्रत्येक कणाला एकेक वाटचाल आहे 

अशा एकेक वाटचालींचा एकेक किरण 

अशी अब्जावधी किरणे 

कशाकशाचा म्हणून मी हिशेब मांडू.. 

सारं अंतराळ माझ्यात सामावून 

मी कितीतरी वाटचाली चालतोय व्रतस्थासारखा.. 


मला आठवतं केव्हातरी मीही उजेड विचारित निघालो होतो.. 

जंगलंजंगले हुंगत रानंरान तुडवित मी पळत होतो.. 

मागोमाग सावली जणू फरफटत येत होती त्या बेभान वाटचालीत तिने मात्र सतत साथ दिलेली मला आठवते जंगलाजंगलातून रानारानातून तिची सोबत होती 


मला आठवतं

 ती पावसाळी सायंकाळ 

विझू विझू पाहणाऱ्या दिव्यागत माझी काळीगर्द सावली थरथरत होती 

पायातले त्राणही जणू विझू विझू झालेले सावली आता पाठीत वाकलेली रेंगाळत चालणारी मी पहात होतो.. 

अचानक एका जोरदार वारयात ती तोल जावून कोसळली.. कायमचीच! 

पानंपान गळत होतं अन आभाळ निवळत चाललं होतं 

कुठल्याशा काळोखाच्या भोवर्‍यात खोलखोल मी रुतत चाललो होतो 

बस्स, त्यानंतर जी जाग आली तेव्हा सारं अंतराळ एकवटून मला आपल्यात ओढू पहात होतं 

क्षितिज मला उंचावत नेत होतं स्कायलार्क पक्षाची ती स्वर्गीय धून गुंजत होती तीही हळूहळू ऐकू येईनाशी झाली.. समुद्र गाजही दूर विरल्यागत! 


इतक्या दिवसांची जंगलाजंगलातून रानारानातून चाललेली वाटचाल ती दुनिया एखाद्या कणागत दिसू लागलेली तीही हळूहळू विरत गेली 


आता फक्त अंतराळ होतं.. असीम अथांग अन अनाकलनीय.. 

आताशा मीच उजेड झालेला होतो अन माझा प्रत्येक श्वास.. त्या उजेडाचा एकेक झोत.. मी आदित्य झालो होतो 

मी आदित्य झालो होतो उजेडाचा! 

(विलास कुडके)


४० 


तू 


तू अजूनही आहे तिथेच आहे 

मी मात्र झालोय अनोळखी 

तुझ्या नजरेने! 


तुझे प्रवाह आहे तसेच आजही वहात आहे 

तुझ्या शब्दांना अजूनही दाद देणारी 

ती मैफिल धुंद आहे! 

तू अजूनही नव नवोन्मेषशालिनी 

तू अजूनही आहे तशीच असीम, अनाकलनीय अनावर अशी अव्यक्त.. 

तुझ्या स्त्रोताने भारुन टाकलेली 

ही अनंतकालाची वाट, 

त्या वाटेवर फक्त चारच पाऊले चाललो असेन म्हणून मी - 

फक्त क्षणभर तू टाकलेला कटाक्ष तेवढा झेलला असेल पण आज ती वाटच हरवलीय! 


तू अजूनही आहे तिथेच आहे 

मीच तेवढा हरवलोय स्वत :शी माझ्या नजरेने कदाचित तुझ्याही नजरेने! 

(विलास कुडके)


४१ 


नैवेद्य 


बापा तुझ्या डोळ्यादेखत 

घाव पडला मानेवर नुक्ता 

तशी सुरु झाली कसायांची 

स्वार्थी आरती - तुझ्यापुढे. 


ठसठसाव्या मोहळाच्या 

जीवघेण्या माशा सर्वांगातून 

तशा रक्तबंबाळ घायाळ वेदनांची 

सुरु झाली घावाशी माझ्या 

अखेरची तडफड 

चारी पाय ताठारुन 

मान आपटून 

शेपटी फडफडून 

आणि तुझी करुणाही भाकून 


पण बापा तू आरती ऐकत असावा 

ताटातल्या तडफडणारया नैवेद्यापेक्षा ताट घेऊन उभे असलेल्या कसायांची 

आरती - 

तुला घावातील असंख्य वेदनांच्या हाकातरी कशा ऐकू जाव्यात? 

त्यांची तृप्ती त्यांच्या डोळ्यात जिभल्या चाटीत असेल पण तुला रे ही कसली तहान? 

तुझी तृप्ती कशात आहे काही आकळत नाही बापा - 

पालीने तोंडाशी आलेल्या 

भक्ष्याला मटकावून 

त्याची निसटती धडपड 

दातात दाबून धरावी तशी 

काळ्याभोर डोळ्याशी 

आलेल्या निसटत्या प्राणाला 

जपण्याची माझी अश्रूपूर्ण धडपड 

शेवटचीच 

पण तुला ती तरी कशी दिसावी? 


ज्या रक्ताने तुझे माखले डोळे 

ते रक्त तरी माझे म्हणण्याचा 

तसा मला काय अधिकार आहे? 

सगळं तुझंच 

असं असूनही बापा रक्तशिडकाव्याने तू तृप्त होवून डोळे मिटावे हे पटत नाही 

आता असं वाटू लागलंय 

की या कसायांच्या गर्दीत तुझ्यापुढे 

तुझ्या नावाने 

आजवर रक्तबंबाळ होत आलेल्या या मूक अगतिकतेचे घाव 

तुझ्या देवात्वाच्या वर्मी बसून 

तू केव्हाच तडफडून निर्वतला असावा 

तसे नसले तरी आज 

तू माझ्याहून अगतिक व्हावे 

मूक व्हावे - 

आणि शांत शांत गाभाऱ्यात 

शांतपणे तेवणारे स्मित 

पांघरलेल्या मुखवट्यापलिकडे 

तुझं अस्तित्वही असू नये 

या साक्षात्कारातच हा प्राण निसटलाय 

तरीही तुला हा नैवेद्य 

पोहचला असेल का? 

हीच एक तळमळ आहे 

सगळी तडफड विझली तरीही! 

(विलास कुडके) 8/4/1988


४२.


मृण्माया 


ज्या आभाळाचे रंग निराळे 

ढगही जयाचे जांभळे जांभळे 

त्या आभाळाला जावून बिल्गावे 

म्हणून हात हिरवे फांदीतून

 उंचावले.. उंचावले! 


हिरव्या देठात रंगेल ओठात 

कोवळ्या पानात गीत पालवीचे 

जुळले.. जुळले! 


आभाळ हरखले मागेच सरकले 

'ये, जवळ ये सरकत उंचच उंच '

खुणावले.. खुणावले! 


पंखातून उडू पाहता झाड पुन्हा अडखळले 

वेडी माया मातीची जणू पोर उराशी तिने कवटाळले.. कवटाळले! 

(विलास कुडके) 14/4/1988



४३. 


कधीतरी 


कधीतरी केव्हातरी एकदातरी 

येना सरी व्याकुळ मी मातीपरी 


येशील ना चिंब परी देशील ना गंधातरी 

दाह उरी छेड सतारी येना सरी आतातरी 

(विलास कुडके) 3/11/1988


४४.


साक्षी 


अखेर निसटेल जेव्हा चिमटीतून तुझ्या हे घडीभरचे धडपडते फुलपाखरु 

-असेल उमटलेला तेव्हा सोनेरी ठसा तुझ्या बोटांना तुला कधीही न पुसता येईल असा चिरंतन ठसा 


-मात्र तो असेल फक्त साक्षी माझ्या पंखावरील चिरंतन नक्षीचा आणि माझ्या जिवंत धडपडीचा आणि तुझ्या क्रूरतेचाही आणि तुझ्या डोळ्यात तरळलेल्या आसुरी आनंदाचाही! 

(विलास कुडके)


४५.


आहे अजूनही 


आहे अजूनही एक कविता खोलवर अंतर्मनात अमूर्ततेच्या तलम वस्त्राआड वाट पहात कुण्या एका शब्दाची - 


असा शब्द ज्याने अवघ्या सागराचे व्हावे मंथन 

असा शब्द ज्याच्या पंखावर अवघे आभाळ मंत्रमुग्ध 

असा शब्द ज्याच्या मायेत विश्व तल्लीन 

त्या शब्दाने चंद्र होऊन यावे आणि चंद्रिकेत अंधुकशा उजळलेल्या आभाळागत लक्ष लक्ष नक्षत्रांनी मूर्त झालेली माझी सुंदरता थक्क होऊन न्याहाळावी! 

(विलास कुडके)


४६.


दार 


मिटल्या पापणीत जाणिव काळ्याभोर डोळ्यातली अशी कोंडलेली 

श्वासांची सळसळही जिथे थांबलेली 

आणि मौनात ओठ गच्च केव्हाच मिटलेले 

अशात क्षितिजरेषेच्या उंबरठ्याला फक्त स्तब्धता 

आणि त्या स्तब्धतेत झेपावणारी.. भरारणारी असंख्य पाखरे पांढरीशुभ्र माझ्या जाणिवेची! 


बोधिसत्त्वाचं एकच पान जेव्हा क्षितिजाच्या उंबरठ्याशी घरंगळले तेव्हा करकरले नेणीवेच प्रचंड दार 

आणि हिरव्याकंच प्रखर प्रकाशाची लाटच्यालाट 

करकरत्या दाराच्या उभ्या सापटीतून बाहेर डोकावली.. झेपावली आणि इतकावेळ उंबरठ्याशीच अडखळणारी धडकणारी माझी पांढरीशुभ्र जाणिवेची पाखरे निमिषार्धात वाहून गेली नेणिवेच्या महापुरात कुठल्याकुठे सुवर्णमय प्रवाहात!

(विलास कुडके) 1/5/1988



४७.


सांगावा 


मनाला दिलासा देत देत इथवर आणलंय 

पुढचा प्रवास अजून पहायचा आहे 

तोवर निळ्या कागदाच्या अथांगतेत भावपक्षी पुन्हा पुन्हा तरंगू दे.. डुंबू दे 

निळ्या कागदाची ही अथांगता आणि त्यात बंदिस्त सारे माझे भावपक्षी ओलेचिंब तुला जपायचे आहे.. 


कुठल्याशा बेटावर या अथांगतेच्या सान्निध्यात जेव्हा असेल पहाट पण तोवर तरी हेच पक्षी आहेत.. 

त्यांच्यातच हरवायचे आहे.. 


तुझे आकाश हवय त्यांना उमललेले कमळागत.. 

निळेभोर आकाश.. त्यांच्या पंखांना चेतवणारे.. 


तुला काय हवय हे त्यांनाही कळतय 

नाही असं नाही पण त्यांना परतायचे आजवर भान नाही 


मी त्यांचीच वाट पहातोय 

आता पहाट होण्याच्या बेतात अजूनही ते परतले नाहीत तुझा सांगावा घेऊन! 

(विलास कुडके) 27/12/1988


४८.


प्रश्न 


एकाकी वारया 

तू एकाकी रे कसा राहतो? 

एकाकी झरया 

तू एकाकी रे कसा वाहतो? 


वारा कुजबुजला 

गंधाचा छंद मजला 

झरा खळखळला 

नादाचा नाद मला 


फुला रे फुला 

तूही एकाकी तुला रे कसला छंद 

सांग मला 


मुला रे मुला 

दवात न्हातो सोने न्हातो 

गंध देऊन वारयाला 

झरयाच्या काठी 

डुलत राहतो 


पण मुला रे मुला 

एकाकी तू का 

हिरमुसलेला! 

[विलास कुडके) 11/7/1989


४९.


रंग विरहाचा 


रंग विरहाचा गर्द काळा 

लागला आता निवळू 

दूर धुक्यात दिसू लागला 

चंद्र चेहरा हळूहळू! 


सैल होईल जराशी तार विरहवीणेची 

अन जुळतील लाख तारा नव्याने घेऊन नवी गाणी! 


सप्तसुरांच्या गंगेमध्ये आपण दोघे रंग उषेचे पुन्हा मिसळू हिरव्या रानी! 

(विलास कुडके)


५०.


पहाट 


पंखांसाठीच झालीय पहाट 

आता भावमग्नतेच्या फांदीवर रेंगाळू नको मात्र हीही फांदी विसरु नको 

कारण केव्हातरी याही फांदीवर

 तुला विसावयाचे आहे हे विसरु नको 

पण तूर्ततरी पंख पसरुन चाल आभाळवाट कारण पंखांसाठीच झालीय पहाट! 

(विलास कुडके) 13/1/1989


५१.


आभाळसाथ 


झोकून देईन गर्दीत स्वत:ला 

न हरवता कुठेही मात्र सांभाळीन स्वत:ला 

क्षणमात्र पापणीत मिटणारया आभाळाला याही गर्दीत धावता धावता मागेन एकतरी कवडसा एकतरी चेहरा तुझा! 

-कारण विरही दिवसांच्या काळोखात नुसतेच चाचपडत चालणे असह्य आहे 

असह्य होणार आहे 

-तेव्हा देशीलना मला आभाळसाथ! 

(विलास कुडके) 

14/1/1989


52


संसार 


आषाढ पावलांनी पाऊस येतो 

मातीला सुवास येतो 

श्रावणातल्या उन पाऊसानं माती हिरव्या मनानं शहारुन सुखावते 

पाऊसाच्या झडीने मात्र सगळंच वाहून जातं 

पहिला सुवास आणि हिरव्या मनाच्या सुखासीन लाटा.. 

मग मातीच्या नजरेत फक्त काळवंडलेले निर्दयी आभाळ आणि सगळीकडेच झालेला गाळ.. 


पुन्हा शिशिरातलं आभाळाचं हिव.. अंगभर 

ग्रिष्माचे ऊन जाळणारं.. 

शुष्क करणारं.. 

जीव नकोसे करणारे असे दारुण 


मग पुन्हा आषाढमेघांची वाट पहाणं 

.. आभाळमातीचा हा संसार 

आपल्या वाट्याला तर नाहीना आला? 

(विलास कुडके) 1/8/1989


५३.


वाट पाहूनही 


वाट पाहूनही 

झुळूक आली नाही 

एकाकी या अलगुजावर 

बोटे कुणाची हळूवार 

फिरली नाही 


वाट पाहूनही 

पालवले नाही पान 

एकाकी या नभावर 

चितारली नाही कोणी हळवी जांभळी सांज 


आताशा शब्दही झाले वैरी 

फिरकत नाही इथे 

एकाकी हे मन 

पिसे झडून गेल्या पाखरागत 

नुस्ते आर्त फडफडते 

(विलास कुडके) 10/7/1991


५४.


कहानी 


सूर नाही शब्द नाही 

अशी आपण गातोय गाणी 


रंग नाही रुप नाही 

साज नाही शृंगार नाही 

अशी आपण खोदतोय लेणी 


प्रश्नाचे चिन्ह नाही उत्तराची ओळ नाही 

पावसाच्या सरीला झेलणारी माती नाही 

मातीला चिंब करणारी सर नाही 

अशी अवघी कहानी केविलवाणी 

(विलास कुडके)


५५.


काही ओरखडे 


काही ओरखडे फुलांवरही 

काही तडे मनावरही 

तरीही का फुलातले मन 

नि मनातली फुले 

अशी अजून आहेत दर्वळून! 

(विलास कुडके) 16/2/1992


५६.


तुझ्या चरणांपाशी 


एका रात्री भरपावसात पावसाच्या भयाने आलो होतो शरण मी तुझ्या चरणांपाशी 

पण पाहिले मी मरण माझे डोळे भरुनी देवा दयाघना करुणामूर्ति तुझ्या चरणांपाशी 

सांग का निष्ठुर तू अन तुझे हे पुजारी 

का करुण मी करुणांत माझा तुझ्या चरणांपाशी 


सांग स्मरते का एकदा भरवादळात तुच जपलेस पाखरु भयग्रस्त देऊन घंटेचा आधार 

मग आज का मजवरी सांग हा तडीताघात का छिन्न विछिन्न करती मला हे दगडांचे प्रहार 


अरेरे! आज थिजली तुझीही करुणा माझ्या सावलीने 

हे करुणासिंधू नको झिडकारु ही करुण कृष्णसावली 

अरेरे! ज्या पायरीवरती वहावी श्रध्देची पावन फुले 

त्या पायरीवरती सांडली ही आर्ततेची रक्तफुले 


आता येतील ते पुजून पुन्हा त्याच रक्तलांछित पायरीला 

राहतील उभे ते जोडून हात तुझ्या आरतीला 


पण तू त्यांना कर क्षमा 

कर पखरण करुणेची 

कारण आरती त्यांची असेल त्यांच्या निराश्रिततेची तुझ्या चरणांपाशी 

(विलास कुडके) 30/8/1991


५७.


पण तरीही का वारंवार 


मला माहित आहे की तुझ्या अंगणात 

मला कधीही मोर होऊन नाचता येणार नाही, पण तरीही का वारंवार माझी नजर तुझ्याच अंगणात भिरभिरतेय सैरभैर 

... कळत नाही.. कळत नाही 


मला माहित आहे की तुझ्या रेशमी काळ्याभोर केसात माझं अबोलीचं फूल तू खोवणार नाही 

पण तरीही का वारंवार माझं अबोल हळवं मन तुझ्याच मोकळ्या केसांवरुन झुलतेय हळूवार.. कळत नाही.. कळत नाही 


मला माहित आहे की तुला कधी कळणारही नाही माझ्या पापणीतले सैरभैर मोर आणि काळजातले अबोलीचे फूल 

मला माहित आहे की मी ज्या वाटेवर तुझी तुझ्या आषाढमेघांची वाट पहात आहे, पहात असेल त्या वाटेवरुन तू कधीही येणारही नाही 

पण तरीही का वारंवार माझ्या प्राणांची ज्योत तुझ्याच श्वेतरुपात थरथरतेय अनावर.. कळत नाही.. कळत नाही 

(विलास कुडके) 1/9/1991


५८.


आर्जव 


वर आभाळात आहे चंद्राची साथ 

खाली एकाकी मी एकाकी नावेत 

वल्हवतो कुणासाठी नाही मला कळत 

का तेवते ही वात नाही तुलाही कळत 

कधी उदास लाटेत कधी नभ उल्हासित 

कधी पाणी डोळ्यात कधी गाणी गळ्यात 

कधी डौलात डौलात कधी वादळी हेलकावत 

मी वल्हवतो अविरत वाट तुझी पहात पहात 

दूर आभाळात होईल चंद्रास्त 

मिटण्या आधीतरी येई पापण्यात 

(विलास कुडके) 6/9/1991


५९.


अबोली 


हिंदोळे पूल हा रेशमी नभी 

श्वासात जणू परस्परांच्या 

कधी गुंफलेला परि 

नाही तुझ्या ध्यानी मनी 


रेंगाळली मेंदी तुझ्या हातांवरली 

थबकली सर पहिल्या पावसांतली 

अवखळ हरणी तूही स्तब्ध मंत्रमुग्ध उभी 

पाहुनी शुक्राची पुलावरील चांदणी 


स्वप्नसमिधा पूर्णाहुती माझी 

त्याभोवती सुरु असे तुझी सप्तपदी 

पायघड्या ताटव्यांच्या अंथरलेल्या 

वर टिपूर रांगोळी कधीमधी 


तुझ्या रवात थरथरती कमानी 

तुझ्या दवात न्हाती गाणी 

प्राचीवरली इमानी उषा परि 

नाही तुझ्या ध्यानी मनी 


प्रीत ती अजून बावरी मुकी 

ओठात अजून तिच्या आहे अबोली 

सादाप्रतिसादाचे दान मागत 

अजूनही ती खुळी थांबलेली परि नाही तुझ्या ध्यानी मनी 

(विलास कुडके) 9/9/1991



६० 


बत्थड 


कितीही झालं तरी अखेर मी आहे बत्थड 

तुम्ही खुशाल खा माझ्या टाळूवरील लोणी 

ठेवा पाठीवर जी जड असेल ती गोणी 

ठेवा मानेवर माझ्या जोखड 

करा मला बळीचा बोकड 

फक्त पाणावेल कधी माझी कड 

कितीही झालं तरी अखेर मी आहे बत्थड 


तसे माझे उघडे असतीलही डोळे 

पण म्हणून करुही नका अशी झाकाझाक 

करा खुशाल ती धूळफेक 

माझी पापणी आहे जड 

फक्त पाणावेल कधी माझी कड 

कितीही झालं तरी अखेर मी आहे बत्थड 


एका भाकरीसाठी माझी सारी धडपड 

तुम्ही मग खुशाल करा होळी माझ्या खळगीची 

भाजा पोळी त्या धगीवर 

करा अवमूल्यनही माझ्या दिवसभराच्या घामाचे 

माझ्या लक्तरातील संसाराचे 

करा श्वासही महाग नि जगणे असे अवघड 

फक्त पाणावेल कधी माझी कड 

कितीही झालं तरी अखेर मी आहे बत्थड 


होय मी आहे बत्थड 

माझ्या मनगटात नाही विजयाचा गड 

अजूनही गुलामगिरीचच मी पितोय पाणी 

नि गातोय माझी कर्मकहाणी 


नाही अंधारावर माझा कधीही रोष 

फक्त तळहातांवरील रेषात दडलेल्या 

नशीबला देतोय मी अधूनमधून दोष 

माझ्या डोळ्यांवर आहे अजूनही झापड 

कितीही झालं तरी अखेर मी आहे बत्थड 


जिकडे तिकडे किड तरीही मला येते न चिड 

बजावतो झाली जरी जड 

त्यात आयुष्याची पडझड 

गेली जरी आभाळाला तड 

फक्त आडोशाला दड नि झालीच जर 

जिवाची तडफड 

पंखांची फडफड आणि जीवच झाला अखेर जड तर बांधून घे गळ्याला पाण्यात दगड 

कारण कितीही झालं तरी अखेर मी आहे बत्थड 


फारतर माझा उभारा पुतळा चौकाचौकात 

माझेसारखेच अनेक त्याला घालतील फक्त हार 

जयंतीपुण्यतिथीला वर्षभर मात्र कावळ्यांचा घुबडांचा नि वटवाघुळांचा विष्टवण्याचा तो राहील दगड 

कारण कितीही झालं तरी अखेर तोही असेल बत्थड! 

(विलास कुडके) 19/9/1991


६१ 


जाण्यापूर्वी 


जाण्यापूर्वी मी भरुन जाईन ओंजळी 

रेखाटून जाईन रांगोळी अंगणात तुझ्या 


अधरावरती कोरुन जाईन मी ओळी 

आठवणींच्या सांजसकाळी गगनात तुझ्या 


काठावरती ठेवून जाईन फुले सोनसळी 

जी दर्वळतील कधीकाळी श्वासांत तुझ्या 


झरतील ओंजळी पुसेल रांगोळी 

क्षरतील ओळी सुकेल सोनसळी 

पण तरीही माझेपण मी पेरुन जाईन 

पांघरुन हिरवाळी गर्भात तुझ्या 

(विलास कुडके) 29/9/1991



६२.


निरोप 


जाईन जीवना मी घेऊन उरात जख्मा काही 

राहील तरीही गीत हे अधुरे अधरावरती काही 


नेईन जीवना मी अखेरच्या श्वासात दर्वळ आयुष्याचा 

राहील तरीही ऋचा ही प्राचीवरल्या गुलाबी उषेत माझी 


नको हा तुझा कोप नको हा तुझा आरोप 

सुकले जरि करपले जरि हे मुकरोप 

दे हिरवा निरोप दे हिरवा निरोप! 

(विलास कुडके) 30/9/1991



६३.


सनई 


दूरदूर तिथे खुणावती हिरवे रावे 

मुक्त नभात शीळ घालीत सैरभैर फिरावे 


आर्त ओठातून जसे सुरेल सूर स्फुरावे 

तसे हिरव्या दरीत शुभ्रमेघ तरावे 


तरल धुक्यात जसे उन्ह विरावे 

सुंदर साळीवरुन तसे मन लहरावे 


कुंपनापल्याड रहावे हेवेदावे कावे दुरावे 

सूर होऊन सनईत शिरावे नि ते विसरावे 


पाणथळीत जसे श्रावण निथरावे 

तसे आयुष्य उनपावसात सरावे 

(विलास कुडके) 7/10/1991


६४ 


एकतान 


भाळी जी चंद्रकोर विधीने तुझ्या रेखिली 

सांभाळीत तिला तू आजवर निमुट चालली.. 

वृत्ती तुझी एकतान.. एकतान तुझी गती 


ऋतू बदलती रंग सभोवती चित्तात परि असे एकच वाट ती.. 

वृत्ती तुझी एकतान.. एकतान तुझी गती 


विहंग विहरती उल्हासित तृणपाती परि त्या माजि तिळमात्र तुला नसे रती 

वृत्ती तुझी एकतान.. एकतान तुझी गती 


चंद्र ढळती तारे निखळती परि अढळ तुझी प्रीति चरणांवरती 

वृत्ती तुझी एकतान.. एकतान तुझी गती 


तू नादवती तू प्रभावती.. तू चक्रवर्ती 

काठावरल्या अंधारातील उजेडाची तू दृष्टी.. 

वृत्ती तुझी एकतान.. एकतान तुझी गती 

(विलास कुडके) 10/10/1991


६५. 


उत्तर 


जन्मभर दर्वळणारया फुला 

तुलातरि कळला का रे तुझा पहिला नि अखेरचा श्वास! 

.. एक नि:श्वास 

.. एक सुवास 


.. अजाणतेपणीच केलेला तो एक प्रवास 

प्रथम नि अंतिम पदन्यास 

प्राचीवरल्या उषेत प्रथम पदन्यासात जन्मला वर्तमान जन्माचा हव्यास नि संध्येमधील अंतिम पदन्यासात त्याच जन्माचा तरळला निरागस अनुप्रास! 

(विलास कुडके) 14/10/1991


६६ 


वारकरी 


सातशे वर्षांची ही दिंडी 

दिंडीतला मी वारकरी 

नाही नुस्ताच माळकरी 

नाही नुस्ताच टाळकरी 

आणि गजरात हाळकरी 

झेंडा नवा भगवा माझ्या खांद्यावरी 


जिथेजिथे अंधार तिथेतिथे विठ्ठलासंगे उभारीन पंढरी.. 

नुस्तेच माहेर नाही तर सासरही करीन मी पंढरी.. दारादारात मी नेईन माझ्या चंद्रभागेचा तीर 


जिथे जिथे उगारलेले कर 

तिथे तिथे मी वार करी 

सातशे वर्षांची ही दिंडी 

दिंडीतला मी वारकरी 

(विलास कुडके) 14/10/1991


६७.


कुंपणावरील पक्षाचे गिचमिड गाणे 


काळीज कोयरीतील कुंकवाला खराखुरा मान आहे 

आणि तसे नसेल तर अभागी कपाळा हा आख्या आभाळाचा अपमान आहे 


माफ करा पण तुमच्या मैफलीत मी मान नाही आणि अपमानही नाही 

तसं माझ्या असण्यानसण्याला तुमच्या नाजुक परिभाषेत कुठलेही परिमान नाही 


जाणवतं इतकंच मला की हिरव्याकंच शेंड्यावरती नवोदित पालवीचे मी पान आहे आणि एका आभाळाखेरीज अद्याप मला मातीचेही भान नाही 


तुमच्या गाण्यात मी ऐकतो पान रान वैरान स्मशान पण गड्याहो खरं सांगू 

अंधार जाळील असे आजवर स्मशान नाही नि उजेडच उगवेल असेही रान नाही 


रागावू नका असतील इथेतिथे चंदनही काही बनातले.. काही मनातले 

पण खरं सांगू कुणाच्याही देव्हारयात आज सहान नाही 

ते ज्ञानेशाचे पसायदान नाही 


निष्प्राण आहे जाणिव नि निष्पर्ण आहे दुपारचे ऊन 

अद्याप सावलीच्याही ओठात कुठलीच कृष्णतहान नाही 

ओवाळावे पंचप्राण असाही सध्या श्रावणात प्राण नाही 


कुठेतरी अंतराळात उडालेले अंतर्यान आहे आणि यमक अनुप्रासात मात्रा मोजीत बसलाय तुम्ही 

पण बाबाहो खरं सांगू त्यातही कुठे तुमचे सोपान नाही 


असे दचकू नका तसा मी तुमच्या कंपूतला नाही आणि बाहेरचाही नाही 

कुंपणावरच माझे वर्तमान आहे 

ज्याचा भूतकाळही अजाण आहे आणि भविष्यकाळ गिचमिड असे यक्षगान आहे 


माझी एकच व्यथा आहे ह्या तुमच्या कुंपणासकट कधीतरी मला उडून जाता येईल इतकेही आता माझ्या पायात त्राण नाही 

तूर्ततरी द्यावे अभयदान कारण अजूनतरी मी गतप्राण नाही आणि माझ्यातला मी माझ्यात अजून अंतर्धान नाही 


तेव्हा माफ करा (माफ करा हे पसायदान नाही किंबहुना कुठल्याही पसायदानातून चोरलेले हे पसायदान नाही) 

हे माझेच रक्त अधरावरुन रुधिरासंगे वर्तमानात ओघळणारे गिचमिड ऋतूगान आहे 


त्यातून तरारेल कदाचित रंगीबेरंगी फुलांची संध्या जिचे कुंपणावर शोभेल आवरण पण कुंपण नाही आयुष्याची शान जिचा मला अभिमान आहे आणि गाण्यात माझ्या असल्या कुंपणाला कुठलेही स्थान नाही 

(विलास कुडके) 14/10/1991



६८.


कवडसा 


जन्मभर रचलेल्या ओळींच्या सरणावर 

मरण पांघरुन मी जळणार आहे 

उडून लक्ष ठिणग्या अलक्ष आशयाच्या निरभ्र नभी चांदण्यात मी साठणार आहे 


कळेल गुपित अंतर्मनातील तरल तरुलतेचे तुलाही जेव्हा नक्षत्रांतून डोळ्यात तुझ्या काहीतरी बिंबणार आहे 


उडेल कापूर जीवनाचा मरणाच्या निरंजणातून आणि तरीही मरणाच्याच ओंजळीत जीवनाचे हे नीर वारंवार साठणार आहे 


मरणवीणेच्या तारांवरुनी दिडदा दिडदा जीवनाचे सूरपक्षी पुन्हा पुन्हा झेपावणार आहे 

त्यांच्याच पंखांनी आभाळ माझे मी पेलणार आहे 


मरणकाजळी रात्रीत जीवनाचे कवडसे 

मधूनमधून डोकावणार आहे 

त्यांच्याच प्रकाशात जीवनगाणे माझे उजळणार आहे नि एकेक ओळ अर्थपूर्ण मी रचणार आहे.. त्यांच्याच प्रकाशात मरणदेठावरती जीवनाचे एकेक पान नव्याने पुन्हा पुन्हा पालवणार आहे 


.. आणि सळसळणारया वारयालाहि ते कळणार आहे जाणवणार आहे चिरंतन! 

(विलास कुडके) 22/10/1991



६९.


अल्लड जाग 


सखे आज तू स्वप्नात आली 

परि नव्हती खुललेली तुझी कळी 

आणि गालावरती लाडिक खळी 

सांग मग तू का स्वप्नात आली 


मंदमंद तारकात तू नुस्ती न्हाली 

परि नव्हती संध्यालाली तुझ्या गाली 

नजरानजरही नाही झाली 

सांग मज तू का स्वप्नात आली 


स्वप्नातही तू पाठमोरी रुसली 

नाही विचारलीस तू ख्यालीखुशाली 

पाहता पाहता स्वप्नात पहाट झाली 

सांग मग तू का स्वप्नात आली 


खुलली तुझी कळी नि गाली पुन्हा खळी 

हळूच तू पाहून गालात हसली 

काहीतरी सांगावया तू वळली 

आणि जाग अल्लड पहाटेस आली 

(विलास कुडके) 23/10/1991



७०.


प्रार्थना 


तुझ्या राऊळी कळस सोन्याचा 

झळके वर्ख त्यावरि आकाशाचा 

प्रांत तुझा आहे नक्षत्रांचा 

त्यापुढे जळावा देह कापुराचा 


व्हावा स्पर्श कृतार्थ हातांचा 

मनी ध्यास हा परिसाचा 

यावा ओंजळीत अभंग तुकयाचा 

चिपळीसंगे अर्थ मी गावा त्याचा 


स्निग्ध सावलीत मृद् गंध ज्याचा 

ओजस्वी मुखावर विलसे ऋचा 

मनी ध्यास अशा पावसाचा 

अंगणात त्या जन्म जावा तुळशीचा 


तुझ्या वाटेवरि सडा पारिजातकाचा 

आसमंत दर्वळे गोदातीरीचा 

भाव जाणावा हा सुमनांचा 

स्वीकार व्हावा चरणी नमनांचा 

(विलास कुडके) 25/10/1991



७१.


प्रतिसाद 


पाडसापरि पहाट आली 

वाळूवरुन एक लाट फेसाळली 


केतकीगौर सकाळ आली 

वाळूवरुन एक लाट फेसाळली 


रखरखीत चेहर्‍याची दुपार आली 

वाळूवरुन एक लाट फेसाळली 


काळसर गुलाबी गूढगर्भ संध्या आली 

वाळूवरुन एक लाट फेसाळली 


किनार्‍यावरि एकाकी रात्र उरली 

वाळूवरुन तरि एक लाट फेसाळली 

(विलास कुडके) 30/10/1991




७२.


कसा हा प्रवास 


कसा हा प्रवास नाही दिव्य सहवास 

जगण्याचा आभास नुस्ताच 


मनाचा र्हास भार वाही श्वास 

व्यर्थ हा ध्यास नुस्ताच 


मोहाचा हा दास होई भ्रमनिरास 

मरुस्थळी जलाभास नुस्ताच 


जख्मी ह्दयास जखमांचीच आस 

कसा हा विरोधाभास नुस्ताच 


रंग नाही रंगास गंध नाही गंधास 

जर थांबलाच श्वास नुस्ताच 


आळवित अभंगास रंगात यावा रास 

सरावा हा प्रवास तू दिसताच 

(विलास कुडके) 31/10/1991



७३.


तुझे जाणे 


सरले संचित सरले संगित 

फुलांचेहि गीत झाले आज आर्तवाणे 


विझल्या ज्योती सर्व सभोवती 

गावे किती आता आर्त स्वराने 


कशी सावरु मी कोसळले झुंबर 

झाकोळले अंबर एका प्रहराने 


देई विश्वंभर एक गंधार 

एकच आधार आर्द्र आसवाने 


राजसा तार अशी कुठली रे 

आज अचानक निखळली 


निखळला तारा थांबला वारा 

नि थांबले माझेहि गाणे 


ऐन रंगात रे आले गाणे 

तोच तुटल्या तारेतून तुझे जाणे 


तुझे अर्ध्यावरुन जाणे अर्ध्यात विरुन जाणे अन पाहता पाहता एक गाणे डोळ्यासमोरुन जाणे 


तुझे जाणे नि एक बहाणे माझ्या जगण्याचे 

असे तारांगणी विरुन जाणे 


जसे ऐलतीरावरुन वसंताने 

निरोप न देता निघून जाणे 


राजसा तुझे जाणे तुझ्याविन माझे जीवनगाणे केविलवाणे 


जलाविन तळमळणे चंद्राविन काळोखणे 

नि संगिताविन गीत हे केविलवाणे असे अनावर आसवात ओघळून रहाणे 


तुझे जाणे एकच गाणे एकच गाणे तुझे जाणे 


स्मृतीचित्रांची हळवी पाने सळसळता ती त्यातच माझे हरवून जाणे 


यावे पैलतीरावरुन कधीतरी राजसा तुझे बोलावणे तोवर तरी स्पंदेल माझे करुण गाणे हळवे दिवाणे हळवे दिवाणे 

(विलास कुडके) 4/11/1991


७४.

हात 


उन्हातान्हात राबतात तुझेच हात 

घामाजल्या फुलात दर्वळते तिच साथ 


संसारात मी नाथ आहे फुलात 

जशी झुले झोकात नथ नाकात 


वाट पहात पहात आली सांज होत 

असेल तू परतत कुजबूज रानावनात 


नजरेच्या निरंजनात स्थिरावेल सुखात 

माझी फुलवात पाहताच तुझी मूर्त 


उन्हातान्हात राबणारे हात 

त्यांच्याच मायेत बैसले मी न्हात 


हळूहळू चांदण्यात सुखाची बरसात 

भिजले मी ग त्याच रसात 


तृप्तीची पहाट पुन्हा उन्हातान्हात 

ग जातील चंदनाचे हात 


जीव तल्खलीत फिरेल मन पुन्हा 

रानावनात ग त्यांच्याच शोधात 

(विलास कुडके) 14/11/1991



७५.


सल 


जन्म दिल्या आईचे ते ऋणाईत नाही 

कुठल्याही आईच्या गळ्यातील ते ताईत नाही 


खूळ त्यांचे विनाशाचे साध्य परि ईप्सित नाही 

तुडवून श्वास जाळून सर्वकाही कोण ते माहित नाही 


कोणती ही तल्खली जी स्वत:ला करपित नाही 

करपून हिरवेकंच श्रावण जी स्वत:ला साळीत नाही 


स्वप्न त्यांचे अभद्र भयावह जे काहीही पेरीत नाही 

फक्त नांगरली काळिजे त्यांनी जी काळही मोजित नाही 


अधर्माची पिलावळ ही धर्म त्यांना जोजवित नाही 

बिनचेहरयांची भूतावळ ही धर्म त्यांना शापित नाही 


व्यर्थ राऊळे व्यर्थ घुमट ज्योत आज समईत नाही 

शस्त्र कोणी परजित नाही जिहाद कुणी पुकारित नाही 


धर्मग्रंथांची निर्जीव पाने अर्थ आज निळाईत नाही 

नाहक जे ठरले बळी गंधवार्ता त्यांची आमराईत नाही 


जन्म दिल्या आईचे कोणीही ऋणाईत नाही 

मुर्दाड सारे प्राण त्यांचे काळ्या आईत नाही 

(विलास कुडके) 14/11/1991



७६.


तद्रुप 


जाणवते मला तू 

अंतस्थातील चंद्र मी अन माझी कला तू 

अंतस्थातील मेघ मी अन चपला तू 

जशी अबोध फुलात तू अबोध ऋतू 


तूच जाणवते दोन स्पंदनातील दरीत निस्पंद 

परि ही स्पंदने स्पंदीत बैसलेली उत्कला तू 

तूच जाणवते दोन शब्दांमधील अध्याहृत गुहेत निशब्द 

परि शब्दास शब्द हे जुळवित अन ओळीत त्यांना ओवीत बैसलेली मुग्धबाला तू 


तुझेच नि:श्वास दर्वळतात दोन श्वासांमधील मरणमौनात अन श्वासात श्वास जुळवित बैसली आळवित जीवनाला तू 


निर्झराच्या कंठात बैसली गात हरवल्या ऋतूंचा त्रिताल तू 

आता ऋतू हरवल्या झाडांच्याही हातातली वसंताची जपमाळ तू 

तव स्पर्शाने दग्ध मी तरीही मंत्रमुग्ध तुझ्याच अस्तित्वात बध्द परि नाही शृंखला तू.. मुक्त वनातील मुक्त वनमाला तू.. 


कोण मी अन कोण तू 

आता मी पण तूच तू 

मूलाधार मी अन सहस्त्रार तू 

तुझ्या नि माझ्यात जन्मोजन्मी सुषुम्नेला सांधलेला सुप्त सेतू.. 

जाणिवेत तू जाणवते मला तू 

नेणिवेची मेखला तू अन जन्मोजन्मीच्या सारसंचिताची उर्जस्वला तू 

जाणवते मला तू तूर्येत अर्धोंन्मिलित श्वेतकमला तू अन जन्मोजन्मीच्या पंखात स्पंदणारी उस्फूर्त उर्मिला तू.. 


तद्रुप मी तुझ्यात अन माझ्यात तू 

तुझ्याच अलौकिकाच्या मोरपिसांचा आता मीही एक स्पर्शतंतू 

कधीतरी अंतर्यामी पालवीत माझ्या बहरलेला असेल ह्या मोरपिसांनी तुझाच सातवा ब्रह्मऋतू.. 

तोवर तरी आरतीत ह्या येणार 'मी' 'तू 'अन सर्व जाणिवेचा कापूर जळून जात नाही तोवर निरंजनात ह्या तेवतील तद्रुप

' मी''तू'! 

(विलास कुडके) 23/11/1991



७७.


अंतर्गाज 


वेगळ्याच अंतराळातून कधीकधी मन तरळतांना गवसते अवचित अशी धून 

अन शब्द पांघराया पुन्हा तिची सुरु होते तगमग.. इथल्या गर्भार मातीतून 


कधीकधी काळ्या अंधारातून थव्याथव्यांनी काजवे जातात डोळे मिचकावून अन उगाचच मग नंतर त्या आठवणींनी डोळे मिटून राहतो अंधार थरथरुन 


फुलतात फुले दाहक चितेतून 

कधीकधी ऋतूही अवचित जळून जातांना 

फडफडतो दिठीतून पक्षी 

उगाचच मग नंतर लाटांवर जेव्हा ऐकू येईनाशी होते अंतर्गाजही आतून 

(विलास कुडके) 5/1/1992


७८.


हळूच निरोप देता देता 


काही क्षण हिरवे ओले सळसळण्याचे 

हिरव्या हिरव्या पानांतून नि एक क्षण मात्र हळवा हळूच देठातून गळण्याचा नि गिरक्या गिरक्यांनी निसटता निसटता पुन्हा पुन्हा देठाशी वळण्याचा 


काही क्षण विहंगम विहरण्याचे उत्तुंग शिखराशिखरावरुन नि एक क्षण मात्र पंख मिटून परण्याचा नि मावळतांना हळव्या हळदी उन्हातून पानापानांवर रेंगाळण्याचा 


काही क्षण निरभ्र निळे नि एक क्षण मात्र अवघे आभाळ झाकळण्याचा नि सरी मागून सरी वळवाच्या अवचित कोसळण्याचा 


क्षण हळवा ओल्या फुलांचा गहिवर दवात साकळण्याचा आणि तरीही ताटव्यांच्या तळव्यांनी हळूच निरोप देता देता हळहळण्याचा आणि पुसट झालेल्या क्षणांचे काही ठसे पुन्हा पुन्हा उजळण्याचा 

(विलास कुडके) 29/1/1992


७९.


सावळ्या मेघांच्या प्रतिक्षेत 


कुठलेसे सुखस्वप्न हिरवे मखमली 

पाहता पाहता अवचित जळून गेलेले रान 

नि करपून गेलेली इवलाली गवतातली काही फुले.. 


समोरच्या स्मशानातल्या निष्पर्ण चाफ्यालाही आताशा नुक्ताच पांढरयाशुभ्र फुलांचा लगडलेला बहार.. 

इतस्ततः रुसणारा हाच का चाफा? 

प्रश्नचिन्ह डोळ्यात घेऊन तापल्या तारांवर अबोल झालेली काही पाखरे नि उगाचच जळक्या रानात चाचपडत चरत राहणारी काही वासरे.. 


आजच्या या रखरखीत उन्हाच्या तल्खलीत फक्त एक दिलासा - 

तुझी पोपटी टवटवीत पालवी 

कुठल्याशा झाडांच्या फांद्यांवर उमटलेली नि कुठल्याशा निष्पर्ण झाडांवरली मांगल्याची लालजर्द लगडलेली काही फुले.. नि अनुरुप त्यांना फांदी फांदीवरती स्थिरावलेले काही काळे काळे कावळे 


आता त्या सावळ्या मेघांच्या प्रतिक्षेत मीहि मनाच्या डोहातून काही ओंजळी पसरुन कारण तुझं आजचं दिलासा देत उभं असलेलं रुप पूर्णतः प्रतिबिंबून घ्यावसं वाटतय काही काळ तुच भरलेल्या ओंजळीतील जळात! 

(विलास कुडके) 25/2/1992


८०.


बैल 


भर उन्हात दाहीदिशा भकास 

पोटातून झाला कासावीस बैल 

चारयापाण्यावीन नाही राहिले त्राण 

बांधातल्या वावरालाही वाण डोळ्यांतील आसवांची 

कशासाठी कुणासाठी हाडांचा हा उन्हात डोलारा चालला फरफटत कसायाच्या दारा सुटकेसाठी 

सुटकेच्या क्षणी म्होरं रडतो धाकला धनी 

नको आणू डोळा पाणी म्हून पाणावल्या डोळ्यांनी झूल घालतो अंगावर अखेरची 

(विलास कुडके) 20/5/1992



८१.


निजरुप 


कधी न्हाऊन निघेल मन 

चांदण्यात मनसोक्त 

जाईल कधी निथरुन 

मनावरलं मळभ 

कधी तरारुन येईल 

बन चांदण्यात लख्ख 


झिळमिळ स्वप्नांची पांघरुन 

चाले चांदण्यात कुणाशी 

निर्झराचे हितगुज 

छेडतो कोण मनाच्या 

संतुरीवर आत्म्याची 

हलकी कुजबूज 


कुणी पाझरविले दरीतून 

खोलखोल चांदणे 

घुसळीत मनातल्या मनाला 

कोण वाजवित आहे धून 

कुणा हाती आहे अलगूज 


चौफेर अंधाराला बिल्गुन 

आहे कुणाचे धूसर निजरुप 

थर्थरत्या ओठावरी कुणाच्या 

आहे का ओठांगून अजूनही काही गुज 

(विलास कुडके) 7/12/1992


८२.


म्हातारी 


फुटली एकदाची तिच्या वक्षांमधली गाठ कर्काची.. 

गाठ कधीची? केव्हा वाढली? कुणा न कळली ठसठसही जिची.. 


चिघळली अखेर तिच्या वक्षांमधली गाठ कर्काची अन उसळली लाट आतल्याआत मरणाची.. 

गेले पसरत पेशीपेशीतून गाठीमधले विष 

अन घनदाट यातनांनी अंधाराला म्हातारीचा दिस 


कर्कग्रस्त म्हातारी डोळ्यात तिच्या व्याकुळ प्रश्न 

कधी आवरता खाट 

आता फुटली आहे वक्षांमधली गाठ.. 

गाठी उराशी कवटाळून म्हातारी अजूनही अंधारात 

पहातेय कुणाचीतरी वाट 

(विलास कुडके) 10/12/1992


८३.


हिरवे गाणे 


हिरव्या हिरव्या पानांमधुनी 

गाऊ हिरवे गाणे 

फुलाफळांतून बहरुन येईल 

जीवन आनंदाने 


यंत्रवत हे जीवन कसले 

तरुछायेवीन सुरकुतलेले 

रुक्ष शुष्क या उजाड रानी 

चला उभारु मरुद्याने 


नंदनवन हे फुलवू भुवनी 

गजमेघ अंबरी झुलवू 

शतधारांंनी सुधा वर्षता 

मोरपिसारा फुलवू 


या झाडांच्या फांदीवरती 

घरकुल आपुले पाहू 

या झाडांच्या छायेखाली 

झोके उंच उंच घेऊ 


वाहतील निर्झर करतील पक्षी 

कुजन मधु रवाने 

उद्याच्याहि ओठी असेल 

त्यांचेच अक्षय मंगलगाणे 


वसुंधरेच्या उदरामधलें 

रंग पाचूचे पाहू निरखून 

हीच आरती हीच पूजा 

परब्रह्म हिरवे पाहू हर्षाने 


झाडे लावू झाडे जगवू 

जगवू जीवनगाणे 

मंगल अपुले जगताचे 

हे जीवनफळ रक्षू स्वकराने 


रोप आजचे इवले इवले 

ठरेल उद्याचे हिरवे गाणे 

करु उदघोष या मंत्राने 

एक मुखाने एक दिलाने 

(विलास कुडके) 27/2/1992


८४.


कधी? 


हे आभाळ आज झाकोळलेले 

लोपलेला प्रकाश दिशादिशातून 

अशा या खिन्न क्षणी का वाहतो श्वास निरर्थ 

का वाहतो प्रवाह संथ.. नसानसातून.. 

हरवला प्राण तरीही कलेवराचे जणू भुरभुरताय केस व्यर्थ 

हरवला ऋतू तरीही झाडाच्या फांदीवरल्या वाळक्या पानांसारखे 

शुन्य अस्तित्व जिथे तिथे ठेवलेले टांगून 


पुन्हा कोवळी ती सकाळ.. पालवी.. फुले 

अंगभर सजवायचे मनातले अंकूरही जणू ठेवलेले जाळून.. 


कधी निवळेल हा झाकोळ 

कधी गळेल हे वाळेल पान 

कोवळी ती सकाळ कधी तरळेल डोळ्यांतून.. कधी? 

नि कधी अंकुरेल एक मन 

त्या सकाळच्या कोवळ्या श्वासातून.. कधी? 

(विलास कुडके) 10/5/1992



८५.


विनंती 


कळत नकळत उजळते प्राची अन स्फुरतात ऋचा 

अशावेळी झडावा चौघडा 

आळवित अरुणा 

जाग पापणीला यावी 


कळत नकळत कुणाच्या आर्त 

ओळीही उमटत राहतात 

ओठांवर आपुल्या 

ती आर्तता जणू आपुली म्हणून 

आपुल्या अंगणातली शब्दही पांघरतात 


ह्या आर्ततेलाही सांभाळून घ्यावे 

उडून जाण्याआधी अशा पाखरांना 

आता तुमचेच आंगण द्यावे अन आभाळही 


कळत नकळत काही झाडे फुलत राहतात 

आतल्याआत वाढत राहतात 

अशा अंतस्थातील झाडांवरली ही काही फुले 

उमलली आहे तोवर असू द्यावी त्यांची सोबत 


कळत नकळत काही चित्रे 

मनावर रेंगाळत राहतात 

रेखाटने अशा चित्रांची.. 

काही स्वप्नांची.. 

धुसर होण्याआधी 

असू द्यावी त्यांची सोबत 

(विलास कुडके) 25/7/1993



८६.


शब्दकळ्या 


उदास डोहातल्या जळात झिळमिळती आनंदाच्या मासोळ्या 

डोळ्यात मिटल्या अश्रूआड तरळती पुन्हा पुन्हा रंगीत सावल्या 


सरीवर सरी आल्या हिरव्या गंधित 

येती आठवणी पहिल्या पावसातल्या गहिरया ओल्या रंगात निथळती जणू आभाळाच्या पागोळ्या 


सांद्र धुक्यातल्या दवात 

तरळती पहाटे सोनसळ्या 

घाटमाथ्यावरल्या ओल्या उन्हात 

शब्दकळ्या ताटव्यांनी ओथंबल्या 

(विलास कुडके) 8/8/1993


८७.


तळघर 


गूढरम्य गहन अंधार दाटून आहे 

अंतर्यामी तळघरात 

तळघर हे जन्माआधी होते निरंतर अन मरणोत्तरही राहील साठवित जन्मोजन्मीचे सारसंचित 

एकेक स्वप्न मिटल्या पापणीत तरळून गेलेले 

एकेक दव कोमल मनाच्या पाकळ्यांवर रेंगाळून गेलेले 

एकेक चांदणे पहाटे पहाटे जाग येत असलेल्या झुंजूमुंजू मनात पुसट झालेले 

एकेक चेहरा धुक्यात धुसर झालेला 

एकेक सय अन ऋतूऋतूमधून कधी मोहरलेले अन कधी सुखावलेले मन 

त्या मनाची एकेक धून 

सर्वकाही राहील साठवित अंतर्यामी तळघर 


एकेक पायरी उतरुन येई एकेक आठवण अन अद्भुत तळ्याकाठी राही ओथंबून गडद जळात झिळमिळत राहे मासोळी अन फुलत राही सहस्रदलांचे ब्रह्मकमळ 

जणू तुझ्या चेहऱ्यावरील वसंत 

तुझ्या डोळ्यातील नितळ भाव 

अन हळूवार अनिवारपण अलगद अंतर्यामी होत राही तरुण तळघरात.. 


गूढरम्य गहन अंधार दाटून आहे अंतर्यामी तळघरात! 

(विलास कुडके) 15/2/1994



88.


डियर, 


हे डायरीचे एक पान 

डायरीतून तुझ्यासाठी सुटे केलेले 

अजून खूप खूप पाने आहेत 

एकेक शब्द अवतीर्ण होतोय सुटा होऊन 

तुझ्यासाठी 

अजून खूप खूप शब्दही आहेत 


पाने संपू नये शब्द संपू नये 

मात्र संपू नयेत दिवसही यातच 

अशा पानांत अशा शब्दांमध्येच 

कारण 

शब्दांपल्याड जगावं 

असं कधी कधी खूप वाटतं 


कधी कधी वाटतं 

त्यागानेच बांधली गेलेली 

आपली आयुष्यं एकत्र 

पण 

वियोगाच्या धाग्याने 

एकमेकांवरील विश्वासाच्या आभाळात 

अधांतरी बांधलेली 

त्याच आभाळाची शुध्द सत्वशील 

शुभ्र सावली पांघरुन 

एकेक चंद्र नजरेआड होण्याआधी 

क्षितिजापार होण्याआधी 

पाणवलेल्या पापणीत 

साठवतोय मी.. कारण 

या अंधारात 

चाचपडत अडखळतांना 

तेवढाच आधार.. तुझ्या दिशेने चाललेल्या या प्रवासात! 


कधी कधी खूप खूप 

भावूक होत असतांना 

आणि एकही कोपरा नसतांना 

अडखळतात येऊ पाहणारी आसवे 

डोळ्यांच्या काठांवर 

आणि अशावेळी एकही किनारा नसतांना 

अडखळतात येऊ पाहणारे काही हुंदके 

आतल्याआत काळजाला पडतात घरे.. 


आणि मग 

शब्दांच्या देहात 

अवतीर्ण होते आसवांची आर्द्रता 

नि हुंदक्यांची नादमयता 

वाटते तिथे तू आणि इथे कविता 

तू कोपरा तू किनारा 

माझ्या भावूक होण्याचा 

पण दूरदूर असलेला 

मला डियर इरिक म्हणणाऱ्या 

म्हातरया माणसाच्या पाणावलेल्या डोळ्यात अगतिकपणे साकळलेली आर्तता या क्षणी तीव्रतेने आठवतेय 

हा 'ए डेड मँनस् लेटर' मधला म्हातारा 

आणि मी.. 

दोन्हीही सूर जणू अर्ध्यात थांबलेले 

तुटलेले 

कुठल्याशा विलक्षण पोकळीत स्तब्ध 

पण दोन्हीतही एकच एक काहूर 

एकचएक हुरहुर 

'डियर इरिक '

' डियर.. '

(१९९४)विलास कुडके


८९ 


अंतरीच्या पारिजातकाला 

फुले ही लगडून आली 

की गोदातीरावरुनी मी 

निरांजने ही वाहिली 

ही ह्रदगते मी मांडली 

कुरवाळो कुणी वा तुडवोत पायंदळी 


अंतरीचे वाहती निर्झर 

धुक्यात हिरवळ मी मांडली 

सरी आनंदाच्या ह्या 

न्हाऊन मने थबथबली 

(विलास कुडके) 4/8/1993



, ९० 


पूर 


पिसाळलेल्या पावसाला 

पुरे पुरे म्हणता म्हणता 

अवचित आला पूर 

अन वाहून गेले नुपूर 

अवचित आला पूर 

अन् हरवून गेले सूर 


धुंडाळले सारे भेसूर विशाल कोरडे पात्र 

कोरयाकरकरीत डोहात उतरले ओघळ आसवांचे कुठेकुठे खडकाळ बोडक्या काठांवर 


धुंडाळले कानेकोपरे कोसळलेल्या भिंतीत 

वाहून आलेल्या छप्परांत 

उताण्या निष्प्राण म्हशींच्या गोठ्यात 


खेळकर चिमण्यांच्या विस्कळीत तारांच्या गुंडाळीत 

पिकांनाही परक्या उरलेल्या ओल्या मातीत 


नाही नुपूर नाही सूर 

नाही नूर नुस्तीच हुरहुर 

पापणीत (जणू) दाटे पूर 


इतस्ततः विखुरलेल्या संसारखुणा 

श्वास हरवलेली भांडीकुंडी 

दिशाहीन दारे खिडक्या 

कलंडलेल्या सुखासीन आभाळात मात्र 

चांदणे टिपूर, त्यात हळूच न्हातय गोपूर 

दूरदूर! (विलास कुडके) 5/11/2005

बहिणीची वेडी माया

 बहिण म्हटली की ती प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक हळवा कोपरा असतो. मग बहिण सख्खी असो की मानलेली. बहिणीची मायाच अशी असते की सगळ्या नात्याहून हे नाते अगदी वेगळे आणि नाजूक रेशमी असते.

*'सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती ओवाळीते रे भाऊराया, वेड्या बहिणीची रे वेडी माया*' हे भाऊबीज चित्रपटातील गीत कानावर पडले की ज्याला बहिण नाही तो देखिल भावूक होऊन जातो. द्रोपदीने कृष्णाला आपला पदर फाडून चिंधी बांधली आणि तो भाऊरायाही तिच्या हाकेला धावून आला आणि वस्त्र पुरवून तिची लाज राखली हा दाखला बहिण भावातील नाते स्पष्ट करायला पुरेसा आहे. पाताळातल्या बळिराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता जो आपण राखी पौर्णिमा म्हणून साजरा करतो. या दिवशी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधायची असते. भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे रक्षण करावे अशी भावना त्यामागे असते. तांदूळ, सोने व पांढर्‍या मोहर्‍या एकत्र पुरचुंडीत बांधून त्याची रक्षा प्राचीनकाळी बांधली जायची. आता आपण रेशमाची चांदीची राखी बांधतो. भावना मात्र तिच असते. बहिणीने औक्षण केले की भावाने ओवाळणीरुपी भेट देणे म्हणजे हक्काचा एक प्रेमळ व्यवहार असतो ज्यातून भाऊबहिणीतील प्रेम वाढतच असते. राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे दोन सण आपल्या हिंदू संस्कृतीने खास भाऊबहिणीतील प्रेम साजरे व्हावे यासाठी योजिले आहेत. 

            बहिण ज्या काळजीने भावांचा सांभाळ करते तसे दुसरे कोणीच करत नाही. कदाचित यामुळेच काळजी घेणार्‍या नर्सला आपण सिस्टर म्हणत असतो. 

       एक फार सुंदर कविता वाचण्यात आली होती. कवी कोण ते माहित नाही पण भाऊ बहिणीच्या नात्यातील सुंदर वीण या कवितेतून उलगडते. 

        *कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात आहे ओढ*

         *म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतन गोड आहे*

           *कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी*

           *कधी हक्काने रागवणारी तर कधी लाडाने जवळ घेणारी*

           *दु:खाच्या डोहावरील आधाराचा सेतू*

             *निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू*

              *कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल*

             *ममतेचं रान ओलेचिंब पाण्यातील आपलंच प्रतिबिंब*

          *मायेचं साजूक रुप आईचं दुसरं रुप*

          *काळजी रुपी धाक प्रेमळ तिची हाक*

          दुसरी एक कविता अशीच आहे सई नावाच्या कवयित्रीची 

 *बहिण भाऊ म्हणजे एकाच ताटातला वरण भात मऊ*

*भावाचं दूडूदूडू पळणं बहिणीचं त्याला सांभाळणं*

*स्वत:चा खाऊ फक्त एकमेकांसाठी जपून ठेवणं*

*वय वाढलं तरी भावना बदलत नाहीत*

*लुटूपुटूची भांडणं तीच पण प्रेमात फरक नाही*

*बहिण भाऊ म्हणजे एकमेकांचे मित्र*

*किती ते विषय आणि न संपणारं चर्चासत्र*

*आई बाबांपासून लपवलेलं पण बहिणीला सांगितलेलं*

*भावानेही बहिणीचं मन फुलासारखं जपलेलं*

*बहिणीला कळतच नाही छोटासा भाऊ कधी मोठा होतो*

*भावातल्या बाळपणालाही बहिणीचं मन प्रेमानं कुरवाळतं*


     ममतेच्या धाग्याने बांधणारी बहिण असते. तुटत जाते सारे काही तेव्हा सांधणारी बहिण असते. तोंडावर भांडत असलो ना तरी मनात खूप प्रेम असते. आईसारखी माया असलेले ताई हे दुसरे रुप असते. बहिणीविषयी कितीही लिहले तरी ते थोडेच आहे. 

          शाळेत सहावीला असताना अक्का नावाचा एक हृदयस्पर्शी धडा होता. काका कालेलकर यांनी आपल्या एकुलत्या एक वडिल बहिणीच्या हद्य आठवणी त्यात सांगितल्या आहेत. कळायला लागण्यापूर्वीच आपली वडिल बहिण गेली आणि   तो एक कोपरा कायमचाच शून्यवत झाला अशी खंत त्यांनी या धडयात व्यक्त केली आहे. आई नंतर जर कोणाचे आपल्यावर भावनिक संस्कार होत असतील तर ते बहिणीचेच.इतक्या दिवसानंतर आजही हा धडा माझ्या स्मरणात आहे. पाडवा गोड झाला याही धड्यात अशी बहिण आठवते जी तिच्या वाटच्या पोळ्या पितळी डब्यात साठवून ठेवते आणि पाडव्याला त्या पोळ्या गुळाबरोबर कुस्करुन आपल्या भावांना लाडू करुन खाऊ घालते व पाडवा गोड करते. किती गोड नाते असते बहिणीचे. शेवग्याच्या शेंगा या य. गो. जोशी यांच्या कथेत भावाभावांमध्ये निर्माण झालेला दुरावा बहिणच दूर करते. अशा कितीतरी गोष्टी बहिणीची माया म्हणून आठवत राहतात.

       एकतरी बहिण असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. ज्याला बहिण लाभते तो खरोखर भाग्यवान म्हणावा लागेल. ज्याला बहिण नसते तो मानलेल्या बहिणीवर जीव ओवाळून आयुष्यातील हा रिकामा कोपरा भरुन काढतो. बहिणीकडे लक्ष देता यावे म्हणून आजन्म अविवाहित राहिलेले भाऊ  मी पाहिले आहेत तर कोणी भाऊ म्हणू नये राखी बांधू नये म्हणून लपणारे व चुकून भाऊ म्हटले की राग येणारेही मी पाहिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आपल्या पुढे आदर्श आहे. *भले शत्रुची माय कांता बहीण*

*तिला मानतो जन्मत:माय बहिण*

        बहिण लाभणे भाग्याचे पण बहिण नसली तरी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेत घरातीलच नव्हे तर समाजातील आपल्या बहिणींच्या सन्मानाची जपवणूक व रक्षा करण्याची जबाबदारी प्रत्येक भावाने उचलली पाहिजे.

@विलास आनंदा कुडके

हनुमान जन्मोत्सव

 आयुष्यभर ज्या दैवताने पाठ राखली ते म्हणजे हनुमान. त्या दैवताला जन्मोत्सवानिमित्ताने कोटी कोटी साष्टांग दंडवत..

       अगदी कालपर्यंत हनुमान जयंती म्हटले जायचे पण या चिरंजीव दैवताची जयंती नव्हे तर जन्मोत्सव म्हणावे लागेल. खरा उत्साह या दिवशी असतो. ते लहानगे दिवस आठवतात. सुतळीला पताके चिकटवून रात्रभर पंचवटीतील घराजवळील मारुती मंदिराचे छत गल्लीतील पोरं उत्साहात सजवायची. मारुतीला नव्याने शेंदूर लावायची. चंदेरी चमकीच्या रंगात भुवई व डोळे रेखाटायची. सूर्योदयापूर्वी आंघोळ करुन मंदिराकडे नारळ फोडण्यासाठी जो तो लगबग करायचा. त्यांच्या लागोपाठ दर्शन व घंटानाद यांनी मंदिर कसे चैतन्यमय होऊन जायचे. तो उत्साह काही औरच असायचा.ते मंदिर म्हणजे आम्हा पोरांचे लपाछपी खेळण्याचे खास ठिकाणही होते. मारुती मागे लपायची गंमतही औरच होती. मंदिर दिवसभर गजबजलेले तर असायचेच पण रात्रीही किमान 10-11पर्यंत तेथे गल्लीतील पंचमंडळी आणि इतर वयस्कर मंडळी महाभारतकालीन द्युतपट मांडून डाव टाकित राहायचे आणि पौ बारा म्हणत नारद गारद करायचे. मंदिरात आतल्या बाजूला पश्चिमेला उंचावर एक छोट्या कोनाडावजा खिडकी होती. आईच्या माराच्या भीतीने कितीदा तरी मी त्या खिडकीत चढून बसायचो. तिथे बसल्यावर अगदी सुरक्षित झाल्यासारखे वाटायचे. त्या खिडकीतून उतरताना अंदाजाने खुंटीवर पाय देऊन अलगद लोंबकळत उतरण्याचा देखील त्या बालवयात मला बर्‍यापैकी सरावही झालेला होता. बालवयात पहिला पाठिराखा सखा मिळाला तो हनुमान असे मला आज वाटते. 

        हनुमान नंतर काळाराम मंदिरातील सभागृहात श्रीरामापुढे अखंड हात जोडून उभ्याने भेटला. कळायला लागले तेव्हा कळले की तो दास मारुती आहे. पंचवटीतील भोईरवाड्यात आजीच्या घरी आतल्या खोलीच्या दारावर गदा घेतलेल्या वीर मारुतीचा फोटो होता. बहुतेक राजा रवी वर्मा यांनी तो रेखाटलेला असावा. शाळेत हनुमान जयंती साजरी करायला फोटो घेऊन या म्हणून शिक्षकांनी सांगितल्यावर मी आजीकडे हा फोटो मागीतला होता. पण माझी उंची आणि फोटोचे वजन मला झेपेल की नाही याचा विचार करुन तेव्हा आजीला माझी मागणी पूर्ण करता आली नव्हती. 

       नंदूरबार येथे आई मला आजींकडे घेऊन गेली तेव्हा तिथे तापी नदीकडे जातानाही मला शेंदूरचर्चित मोठे हनुमान भेटले. जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे हनुमान भेटले. नगरसूलला तर सकडे आजीच्या घराजवळच मारुतीचे मंदिर होते आणि विशेष म्हणजे त्याच्यापुढे दगडी वानर बसवून ठेवलेले होते. नगरसूलला नाशिक - नांदगाव एस टी गावातून जिथे थांबायची त्या स्थानकावर हनुमानाचे मंदिर मला आठवते. गावाच्या वेशीवर. जवळच नारदी नदी. तिथे दशक्रिया करुन लोक मारुतीच्या दर्शनाला यायची. तिथेच मंदिरात टावेलटोपीचा कार्यक्रम व्हायचा. 

        तर अशा या आठवणी. सेवेत रहावे तर हनुमानासारखे दास होऊन या सूत्राने माझी आयुष्यभर साथ केली. या सूत्राने आयुष्यातील अनेक चढउतारात साथ दिली. हनुमान जन्मोत्सवानिमित्त या दैवताप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. जय श्रीराम.. जय हनुमान.. 

    @विलास आनंदा कुडके

शुभेच्छा

 #शुभेच्छा


      दाहीदिशांनी जेव्हा शुभेच्छा येऊ लागतात तेव्हा सारा आसमंत कसा सकारात्मक ऊर्जेने भरुन वाहू लागल्यासारखा वाटू लागतो. मला आठवते माझ्या लहानपणी पोस्टमन दिवाळीच्या आसपास १५ पैशांच्या कार्डावर लक्ष्मी गणपती सरस्वती यांची चित्रे असलेली शुभेच्छापत्रे देऊन जायचा तेव्हा काय आनंद व्हायचा. कितीतरी वेळ कितीतरी दिवस ते कार्ड न्याहाळण्यात जायचा. या दिवसात पोस्टमनवर अशी पोस्टकार्ड घरोघरी वाटण्याचे किती काम येऊन पडायचे पण ते आवर्जून सगळे कार्ड ज्याला त्याला पोहोचवायचे. त्यांना मग घरोघर फराळाचा आग्रह व्हायचा. प्रेमाने पोस्त दिली जायची.

 दूरवर कोठेतरी रहात असलेली मामा मावशी काका यांची ती शुभेच्छापत्रे असायची. ती नात्याची माणसे या कार्डातून अगदी जवळ आल्यासारखी वाटायची.

          आता ती पोस्टकार्डावरील शुभेच्छा दुर्मीळ झाली आहेत. ती आतुरता ती हुरहुर ते खंतावणे आता राहिलेले नाही. समाजमाध्यमांनी हे काम अगदी सोपे आणि आकर्षक करुन टाकले आहे. वाॅटसअॅप फेसबुकवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत राहतो.

           सुंदर शब्दांच्या पखरणी करुन, सुंदर सुंदर ओळींतून शुभेच्छा नखशिखांत नटून येत आहेत. काही पदरच्या तर काही एका ठिकाणाहून आलेल्या पुढे पाठवल्या जात आहे. एकामागून एक इतक्या शुभेच्छा येत आहेत की आपल्या नातेवाईक मित्रपरिवाराच्या या भरभरुन प्रेमात जणू चिंब भिजायला होत आहे.

        शुभेच्छा इतक्या येत आहेत की त्यांना जागा करुन देण्यासाठी जुन्या शुभेच्छा पुसून टाकाव्या लागत आहे. जसे एक रांगोळ्या पुसून दुसरी रांगोळी तितक्याच आवडीने घालावी तसे होत आहे.

       बरयाचदा त्याच त्या शुभेच्छा पुन्हा पुन्हा वर्षानुवर्षे वाचायची वेळ येत आहे. मग म्हणावेसे वाटते 'नेमीच येतो सणवार नेमीच शुभेच्छा अनावर!' मला आठवते अशा सणांचे औचित्य साधून मी एका अधिकारयाकडे हात मिळवून शुभेच्छा द्यायला जायचो तेव्हा ते म्हणायचे 'नुस्त्याच कोरड्या शुभेच्छा काय कामाच्या' आणि ते खरेही असायचे. सणावाराला शुभेच्छांचे भरभरुन वाहणारे आपले प्रेम इतरवेळी कुठे दडी मारुन बसते कुणास ठाऊक. ते अधिकारी नेहमी सांगायचे 'तुम्ही तुमचे काम आत्मियतेने चोखपणे केले, तुमच्या कामातून अन्याय दूर झाला, कोणाला न्याय मिळाला, कोणाचा उध्वस्त होणारा संसार वाचला, कोणाचे अश्रू पुसले गेले, कोणाच्या विवंचना मिटल्या तर त्या खरया शुभेच्छा ठरतील. महागडी नक्षीदार सुंदर ओळींची शुभेच्छापत्रे देण्यापेक्षा तुमचा मदतीचा हात द्या, काही नाही तर ख्यालीखुशाली विचारा, सुखदु:खे जाणून घ्या, खरया अर्थाने मैत्रभाव जागवा.. तरच तुमची शुभेच्छा खरया अर्थाने प्रवाही होऊन दुसर्‍याच्या अंतःकरणात समाधानाचे नंदनवन फुलविल.

       तुम्ही पाठवलेली शुभेच्छा उद्या कचरयात रुपांतरीत होऊन पुसून टाकायची वेळ यायला नको. किंवा तुम्ही पाठवलेली शुभेच्छा तुमच्या आधीच कोणीतरी पाठवलेली नसावी. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शुभेच्छा पाठवणे हा केवळ उपचार म्हणून होता कामा नये.

खरया शुभेच्छा रोजच्या सहदय संवादात नकळत रुजल्या पाहिजे.. वाढल्या पाहिजे आणि फुलून मैत्रीच्या सुगंधात दर्वळल्या पाहिजेत!!!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा आत्मियता असलेला हसतमुख चेहरा आणि मदतीचे प्रेमाचे सौहार्द भाव हे कुठल्याही शुभेच्छा पत्रापेक्षा अधिक प्रभावी व खरे ठरणार आहेत!!! 

#विलास कुडके

पुस्तक माझे मित्र

 #पुस्तक दिनानिमित्त 


             'भेट म्हणून पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक द्या' असे आज म्हटले जाते. भिलार येथे पुस्तकांचे गाव उभे राहिले आहे. एका पाश्चात्य शौकिनाने पुस्तकांचेच घर बांधले आहे. म्हणजे भिंतींमध्ये पुस्तकेच पुस्तके. पावसाच्या पहिल्या थेंबाने मातीला गंध यावा तशा कोरया पुस्तकांचा मोहवून टाकणारा गंध आवडणार नाही असा माणूस विरळा आहे. पूर्वी न शिकलेली माणसंही 'किती बुकं शिकलास?' असे विचारुन विद्वत्ता पडताळायचे. पूर्वीच्या सिनेमांमध्ये नायक नायिका धक्का लागून खाली पडलेली पुस्तके उचलून देता देता आणि पुस्तकांची देवाणघेवाण करीत करीत एकमेकांच्या प्रेमात पडायची. पुस्तकात लपवलेला फोटो चोरुन काढून पहायचे. पुस्तकात मिळालेला गुलाब जपून ठेवायचे. शाळेतील पोरं पिंपळाची पाने पुस्तकात ठेवून ती जाळीदार करायचे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

      आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे आणि एकेक पान पलटत जायचे आहे असे कितीतरी जनांना वाटत असते. एका शायरने फार सुंदर म्हटले आहे'समय मिलनेपर मुझे पढना जरुर हकीकत ऐ जिंदगी की मुकम्मल किताब हूँ मै'. अलिकडे वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनासाठी स्टाॅलवर मोफत वाचनासाठी उपलब्ध करुन दिलेली पुस्तके वाचनप्रेमींनी अक्षरशः दसरयाचे सोने लुटावे तशी लुटून काखोटीला मारुन नेली आणि दुपारपर्यंत केवळ रिकामे स्टाॅल राहिले. तर असे हे पुस्तकप्रेम.

     तसं पाहिलं तर पुस्तकांचे वेड सगळ्यांनाच नसते. फार थोडी शहाणी माणसे पुस्तकात रमतांना दिसतात. बरीचशी शहाणी माणसं दिवाणखान्यात शोभून दिसतील अशी महागडी पुस्तके नुस्ती गोळा करीत असतात. पुस्तके वाचणे जमा करणे ही पुस्तकांसाठी बेचैन होणाऱ्या माणसांसाठी चैनीची गोष्ट असते.

    अशा या पुस्तकांचा मला लळा लागला तो आई बुधवारच्या बाजरासोबत सांड्यावरच्या सप्तशृंगी देवीपुढील पेपरस्टाॅलवरुन हमखास विकत आणणारया 'चांदोबा' मासिकामुळे. आई स्वयपाक घरात उतरत्या छपराखालील भिंतीतील गजांच्या खिडकीजवळ चांदोबा वाचायची. तेव्हा मला त्यातील अक्षरे अजिबात कळायची नाहीत. पण त्यातील रंगीबिरंगी चित्रांनी मी अगदी हरखून आईभोवती पिंगा  घालत रहायचो. पाहू पाहू म्हणून आईला वाचता वाचता थांबवत रहायचो. आई मला नगरसूलला सकडे आजीकडे घेऊन जायची तेव्हा तेथील छोट्या मातीच्या घरामध्ये कोनाड्यात दत्तुमामाचे 'मराठी वाचनमाला' पुस्तक मला खूप आवडायचे. मुखपृष्ठावर एक शाळा. मैदान. झाडाखाली एक मुलगा व एक मुलगी अभ्यास करीत आहे असे सुंदर चित्र माझ्या अगदी स्मरणात आहे. त्यातील चित्रे कृष्णधवल होती तरी ती पाहता पाहता मी जणूकाही ती खरीच आहे अशा कल्पनेत रंगून जायचो. चिंगीचा पराक्रम या धड्यात चिंगी रेल्वे डब्यात बुरखाधारीचा बुरखा वर करुन पहात मिशीवाल्या चोराला पकडून देते असे चित्र होते. वीर बापू गायधनी धड्यात आग लागलेल्या वाड्याचे चित्र होते. आजीचे घड्याळ कवितेत आजी सावली पाहून वेळेचा अंदाज घेत आहे असे चित्र होते. डोंबारयाचे चित्र होते. नंतर एका मुद्रणालयाच्या अंधारया खोलीत भरणाऱ्या बालवाडीत मी जायला लागलो तेव्हा अंकलिपी (अंकल्पी) त्यातील बाराखडी धडे गोष्टी यातील कृष्णधवल चित्रे मला खूप खूप आवडायची. भाऊबीजेला भावाला ओवळणारी बहिण. तुळशीवृंदावनासमोर हात जोडून प्रार्थना करणारी मुलगी. बुड बुड घागरी मधील पाण्यातील मडक्यावर लटलटत उभी मांजर कितीतरी चित्रे. इयत्ता पहिलीत गेलो तेव्हा मला आठवते एका पावसाळी सायंकाळी मोठ्या दांडीच्या बंद ओल्या छत्रीला दारामागे ठेवून वडीलांनी 'मराठी वाचनमाला' पुस्तक माझ्यासाठी आणून 'बघ, तुझ्यासाठी काय आणले?' म्हणून माझ्यापुढे ठेवले तेव्हा मला किती आनंद झाला होता. नगरसूलला पाहिले अगदी तसेच पुस्तक पाहून मी अगदी हरखून गेलो. आईने मग स्वयंपाक घरातील चुलीजवळ ओट्यावर बसून एकेक धडा वाचून दाखवला. आई चौथी पास होती. मला तेव्हा कुठे वाचता येत होते. पण त्यातील चित्रांनी माझे मन आकर्षित करुन घेतले होते.

     तिसरीला असतांना मोठीच गंमत झाली. लाटेवाड्यातील पहिलीच्या मुलांच्या हातात बालभारतीची रंगीत चित्रे असलेली पुस्तके आलेली होती आणि ती सगळीकडे दाखवत मुले उड्या मारत होती. तुझ्या पुस्तकात काळी चित्र अशीही चिडवत होती. पुढे बालभारतीच्या पुस्तकांनी मला त्यातील लेखक कवींची आणखी पुस्तके वाचण्यास उद्युक्त केले. मेजर साळवींच्या धड्यामुळे मी त्यांचे 'स्वाधीन की दैवाधीन' हे पुस्तक मिळवून वाचले आणि हरखून गेलो. मंगेश पाडगांवकर सुरेश भट यांचे कितीतरी गजलसंग्रह मिळवून वाचले.

       तेव्हा मी रहायचो ते घर पहिल्या मजल्यावर होते. स्वयंपाक घराला लागून मधली अंधारी खोली होती. त्या खोलीत दाराजवळ उंचावरील कोनाड्यात वडीलांची पुस्तके असायची. अनेकदा डब्यावर डबे चढवून त्यावर मी चढून कोनाड्यापर्यंत हात न्यायचा प्रयत्न करायचो पण काही केल्या हात पोहचायचा नाही. त्या कोनाड्यात त्याकाळातील कितीतरी पुस्तके होती. नाशिक डिरेक्टरी परशुरामाच्या लावण्या, स्टुडंट इंग्लिश. त्याच दरम्यान कळाले की वाड्यातील मुले मारुती मंदिराजवळील टपरीवरुन पाच पैशात गोष्टींची पुस्तके आणून वाचतात तेव्हा मी पण आईकडे पाच पाच पैशांचा हट्ट करुन एकेक गोष्टींची छोटी छोटी पुस्तके आणून वाचायला लागलो. आणि मग गोष्टी वाचण्याचा छंदच लागला. कितीतरी गोष्टी होत्या. बुटका जादूगार, शापित राजकन्या, हिम गौरी आणि सात बुटके, सिंदबादच्या सफरी, कितीतरी. जादू, परया, राक्षस असं सगळं ते अद्भुत विश्व होते. भोईरवाड्यात मी खेळायला जायचो तेव्हा वृंदा मावशीच्या हातात सुमती पायगावकरांनी मराठीत १६ भागात संपादित केलेल्या हंस अंडरसनच्या परिकथा माझ्या पाहण्यात आल्या होत्या. श्रीराम विद्यालयात पाचवी सहावीला असताना गोष्टी सांगायच्या स्पर्धेत मला आठवते बक्षिस म्हणून पुस्तकच मिळाले होते. सरदार चौकात वाचनालय आहे. तिथे मी सुरुवातीला वृत्तपत्रे वाचण्याच्या निमित्ताने जाऊ लागलो. तेथील घारया डोळ्यांच्या व शरीराने किडकिडीत असलेल्या ग्रंथपालाने एक दिवस मला बोलावून 'तुला वाचण्याची आवड आहे का?' म्हणून विचारले. मी मान डोलावली. तेव्हा त्याने तेथील कपाटातून एकेक पुस्तक घेऊन तिथल्या तिथे वाचायची परवानगी दिली. ते ग्रंथपाल माझ्या नेहमी स्मरणात राहतील. कारण त्यांनीच पुस्तकांचा खजिना माझ्यासाठी उघडून दिला. मला किती वाचू अन किती नाही असे झाले. मी त्या गंथालयाचा सदस्य झालो. वर्गणी माफक होती. मी एकेक पुस्तक घरी घेऊन यायचो. त्यामध्ये अनुवादित विज्ञान कथा, स्वामी विवेकानंद यांचे खंड असायचे. वाचून त्याचे टिपण मी वहीत घ्यायचो. नगरसूलला 'विज्ञान परिचय' हे पुस्तक त्याच दरम्यान माझ्या पाहण्यात आलेले होते त्यामुळे विज्ञान शास्त्रज्ञ शोधकथा यावर माझा भर असायचा. एकदा Complete Shakespeare 'या पुस्तकाने इतकी मोहिनी घातली की त्याच्या बदल्यात मी ग्रंथालयास माझ्या जवळील १०८उपनिषिदे'हे पुस्तक देऊन ते मिळवले. नियमात तसे नव्हते तरी माझे पुस्तक प्रेम पाहून ग्रंथपालाने मला आनंदाने तो ग्रंथ दिला.

       

         हळूहळू माझ्या वाचनाच्या भौगोलिक कक्षा रुंदावल्या. सरदार चौकातील वाचनालय मला लहान वाटू लागले म्हणून की काय मी गोदावरी पलिकडे सार्वजनिक वाचनालयाचा सदस्य झालो. तिथे तर विषयवार पुस्तकांचे इतके भांडार होते की मोठा खजिनाच हाती यावा तसे मला झाले. माझे वाचनाचे प्रेम पाहून मला थेट आत कपाटांच्या रांगांमध्ये जाऊन पुस्तक शोधून आणण्याची परवानगी मिळाली. मग काय ज्या कपाटांकडे फारसे कोणी फिरकत नसायचे त्या त्या कपाटातील पुस्तकांवरील धूळ झटकून मी एकेक पुस्तक निवडून वाचू लागलो. साहित्याचे मोठे दालनच माझ्यासाठी खुले झाले. माझ्या वाचनालयाच्या फेरया वाढल्या. चुकला फकीर मशिदीत तसा मी वाचनालयात सापडू लागलो. मधल्या होळीत एक वाचनालय होते. तेथेही मी जाऊ लागलो. एके दिवशी हेमलता टाॅकीजला सिनेमा पहायला गेलो तेव्हा तेथे जवळच ग्रंथालयाचा शोध लागला.

 तिथेही मी सदस्य झालो. एकदा 'रसचिंतामणी' नावाचा जुना ग्रंथ मी तेथून घरी आणला. रोग आणि त्यावरील आयुर्वेदिक औषधावरील श्लोकबद्ध ग्रंथ मी अक्षरशः एका वहीत उतरवून घेतला. अशाप्रकारे सार्वजनिक वाचनालयातून आणलेल्या Fairy tales मी वहीत सुंदर कोरीव अक्षरात उतरवून घेतल्या होत्या. तर रसचिंतामणी उतरवता उतरवता ग्रंथपाल माझा पत्ता शोधत शोधत घरी आला. तेव्हा मी लाटे वाड्यात रहायचो. तो काकुळतीला येऊन म्हणाला 'ग्रंथालयाबाहेर देता येत नाही असा ग्रंथ मी तुम्हाला चुकून दिला तो ताबडतोब द्या नाहीतर माझी नोकरी जाईल.' त्याची ती अवस्था पाहून मी तो ग्रंथ लगेच परत केला.

      दहावीला असताना मराठीच्या लवेकर बाईंनी एकदा वि. स. खांडेकर अत्यवस्थ असल्याचे डोळ्यात पाणी आणून सांगितले. मागील वर्षीच त्यांच्या ययाती कादंबरीला  ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. मी लगेच वाचनालयातून वि. स. खांडेकरांची एकेक पुस्तके आणून वाचली. श्रीकांत सिनकरांच्या पोलिसी चातुर्य कथा, द. मा. मिरासदार यांच्या विनोदी कथा, शेरलॉक होम्सच्या गुप्तहेर कथा, सोळा खंडातील अरेबियन नाईट्स, स्वामी, झुंज, शहेनशाह, श्रीमान योगी अशा कितीतरी पुस्तकांनी माझ्यावर भुरळ घातली. बहुधा मी रहात असलेल्या वाड्यात, गल्लीत हातात नेहमी पुस्तक असलेला केवळ मीच असावा. एकाच खोलीत काॅट चूल होती. काॅटला लागूनच आईच्या काळातील पितळी भांड्यांची रॅक मी पुस्तकांसाठी ठोकून ठेवली होती. त्या काळात रघुवीर जादूगार प्रसिद्ध होते. त्यांच्या जादूची पुस्तके सुद्धा मी हौशीने घेतली. त्यांच्या 'प्रवासी जादूगार' पुस्तकाने तर मला आणखी प्रवास वर्णन वाचायला प्रेरित केले.

       दहावीनंतर अकरावी विज्ञानला काही महिने महाविद्यालयात गेलो नंतर शिक्षण सोडून मेनरोडला रेडिमेड कपड्यांच्या दुकानात कामाला लागलो. तेव्हा पगार अगदी तुटपुंजा होता. असे असले तरी कुठे पुस्तक प्रदर्शन असले की मी पाच रुपयांपर्यंतची पुस्तके घ्यायचोच घ्यायचो. ग्रेस यांच्या 'सायंकालीन कविता', ना. धों. महानोर यांच्या 'रानातल्या कविता' , नारायण सुर्वे यांचा 'जाहिरनामा' असे तेव्हा प्रकाशित काव्यसंग्रह मी घेतले होते. अशाच प्रदर्शनात एकदा मला 'विश्वकोश' दिसले. एकेक खंडाची किंमत शंभर रुपये होती. दरमहा एक याप्रमाणे मी पैसे साठवून ९ खंड घरी आणले. माझ्या घरातील पुस्तकांची रॅक हळूहळू पुस्तकांनी भरु लागलेली होती. गावाकडची मंडळी घरी आली की मी तेव्हा कुठले ना कुठले पुस्तक वाचत बसलेला असायचो. तेव्हा ती मंडळी माझ्याकडे अशी काही पहायची की जणू काही पुस्तक वाचून काही उपयोग नाही. पुस्तकांचा नाद म्हणजे वेड्या माणसांचे काम असेच ती त्यांच्या पाहण्यातून सुचवायची. पुस्तकांचे वेड काही कामाचे नाही असा व्यवहारिक सल्लाही मग मिळायचा. एवढ्याने माझे पुस्तक प्रेम काही कमी झाले नाही. मेनरोडवरुन कामावरुन परतण्याचा माझा मार्ग रामसेतूवरुन असायचा. भांडी बाजारात माझा मित्र विजय सातपुते रहायचा. तोही माझ्या सारखाच पुस्तक प्रेमी. रशियन पुस्तकांच्या प्रदर्शनात मी आणि त्याने डोटोवस्की, अलेक्झांडर पुश्किन लिओ टाॅलस्टाय यांची कितीतरी पुस्तके 'अॅना करीना' पुनरुत्थान गुलाबी आयाळीचा घोडा'इत्यादी अगदी स्वस्तात म्हणजे १०-१२ रुपयात म्हणून घेतली होती. भांडी बाजारातच एक दुकान होते. तिथे रस्त्यावर नेहमी जुनी पुस्तके मांडून ठेवलेली असायची. तिथे मी नेहमी घुटमळायचो. जुन्या पुस्तकांवरील मूळ किंमत खोडून वाढीव किंमतीत ती विकत असे. रामसेतूवरुन नारोशंकराच्या मंदिराजवळ आले की तिथे एक 'प्रेमनगर पुस्तकालय' होते. तिथे हिंदी धार्मिक तंत्र मंत्राची पुस्तके असायची. अध्यात्मिक पुस्तके वाचण्याचा छंद त्यामुळेच लागला. एकदा असाच मेनरोडवरुन घरी जात होतो तेव्हा ज्योती स्टोअर्स च्या शोकेसमध्ये 'पु. ल. एक साठवण' पुस्तकाची प्रकाशनपूर्व सवलतीची आकर्षक जाहिरात पाहिली आणि मग पैसे साठवून मुदतीत भरुन नोंदणी केली.


      पु. ल वाचताना पी जी वुडहाऊस ची गोडी लागली. शनीचौकात एका पुस्तकाच्या दुकानात मला पी. जी. वुडहाऊस आणखी भेटला. लग्न झाले तरी पुस्तकप्रेम काही कमी झाले नाही. पंचवटीतून उपनगरला रहायला गेलो. तिथेही छोट्याशा खोलीत त्याच रॅकमध्ये पुस्तकांचा संसार मांडलेला होता.

         एक आईने वीस रुपयात घेतलेले लाकडी कपाट होते. रॅक फुल झाल्याने लाकडी कपाटातही पुस्तकांनी अधिक्रमण केलेले होते. कपाटाच्या जाळीतून बघणाऱ्याला अंदाज येत होता की आत पुस्तकेच पुस्तके आहेत. Grim brothers fairy tales चे हिरवे बाईंडगचे पुस्तक जाळीतून डोकवायचे. एक मेव्हणी पुस्तकप्रेमी. घरी आली की हक्काने जिजाजी जिजाजी करीत एकेक पुस्तक घेऊन जायची. ती माझी वाचून झालेली असायची त्यामुळे परत नाही आली तरी मला त्याचे काही वाटायचे नाही. एक मेव्हणाही असाच पुस्तकप्रेमी. त्याने पु. ल. साठवण नेले. रॅकमध्ये अशाप्रकारे कमी झालेल्या पुस्तकांची जागा नवीन पुस्तके घेई. एकदा शासकीय रुग्णालयाजवळ रस्त्यावर पुस्तके मांडलेली होती. त्यात पॅपिलान शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा सहा भाग, सिडने शेल्डान याच्या कादंबर्‍या पहायला मिळाल्या. ही पुस्तके मी एकेक करुन घेतली.

     संसारात राहून पुस्तकप्रेम जपणे तसे परवडण्यासारखे नसते. पुस्तके ही काही संसारोपयोगी गोष्ट नाही. तुटपुंज्या उत्पन्नात ही हौस भागवणे अवघड असते. पण एखादे पुस्तक संग्रहात असलेच पाहिजे असे जेव्हा वाटे तेव्हाच मी पुस्तक घेई. काही वेळा आधी विचारले तर महागड्या किमतीमुळे पुस्तक घ्यायला घरुन रुकार मिळेलच अशी खात्री नसायची. नंतर नंतर पुस्तकांच्याही किंमती वाढत गेल्या. अगदी आवडलेच तर पुस्तक घ्यायचे असे मी ठरवले.वसंत कानेटकरांची अश्रुंची झाली फुले, वेड्याचे घर उन्हात अशी काही नाटके, हेनरीक इब्सेनची नाटके, कुसुमाग्रजांचे प्रवासी पक्षी, छंदोमयी इ. कविता संग्रह, श्रीपाद कृष्ण कोल्हाटकरांचे सुदाम्याचे पोहे, पर्सी बी शेले यांचा कवितासंग्रह, समग्र गडकरी, समग्र बालकवी, रवींद्रनाथांचे वाङमय, अॅन्टॅन चेखेव मोपासा यांच्या कथा अशी कितीतरी पुस्तके माझ्या संग्रहात जमली. आपल्या काळातील बालभारतीची पुस्तक मी शोध घेऊन महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयातून मिळवली. त्या आधीच्या मराठीवाचनमालेचे दुसरे पुस्तक सासुबाईंनी त्यांच्या शाळेतून मिळवून दिलेले होते. तर याच मालिकेतील अक्षरशः वाळवीग्रस्त एक पुस्तक सुट्टीच्या दिवशी कसारा येथील श्री लोखंडे यांच्याकडून मिळवले होते. नवयुग वाचनमाला अशीच मी प्रकाशकाशी पत्रव्यवहार करुन मागवली होती. 

      मुंबईला सेवेत लागल्यावर मला नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयात जाता येईना. हळूहळू ते माझ्यासाठी दुरापास्तच झाले. मग मी मंत्रालय केंद्रिय ग्रंथालयात जावू लागलो. जवळच सचिवालय जिमखान्यातील ग्रंथालयाचा सदस्य झालो. कामानिमित्त गोव्याला गेलो तेव्हा तेथील कार्यालयात मला मेजर साळवींचे 'स्वाधीन की दैवाधीन' हे पुस्तक मिळाले. नवी दिल्लीला कामानिमित्त गेलो तेव्हा जवळच साहित्य अकादमीतून रवींद्रनाथ टागोर यांचे वाङमय घेऊन आलो. एका वाढदिवसाला मी गुच्छ ऐवजी पुस्तक द्या म्हटले तर सहकारयांनी ग्रेसचा कवितासंग्रह भेट म्हणून दिला.

     मध्यंतरी रिडर्स डायजेस्ट कडून आकर्षक गाडी जिंका म्हणून जाहिरात आली. त्यात अनेक इंग्रजी पुस्तके घरात आली. गाडी काही आली नाही. धार्मिक पोथ्या पुस्तकांचीही भर पडत गेली. एक लोखंडी कपाट भरुन पुस्तके झाली आहेत. जागेअभावी बरीचशी पुस्तके लाफ्टवर रॅकवरच आहेत. संग्रहातील पुस्तके जपणे हे मोठे आवश्यक काम असते. बरीचशी पुस्तके बाजारात बाहेर मिळत नाही अशी दुर्मीळ झालेली आहेत. या पुस्तकांसाठी काचेची दरवाजे असलेली मांडणी करुन घ्यावे असे माझे किती दिवसांचे स्वप्न आहे. ते कधी पूर्ण होईल कुणास ठाऊक.

     आजही मला कुठे पुस्तक प्रदर्शन दिसले की माझे पावले तिकडे वळतातच. चर्नीरोडला सुंदराबाई हाॅलमध्ये अशी प्रदर्शने मधून मधून भरतच असतात. तेथे मध्यंतरी अजब पुस्तकालयाने कोणतेही पुस्तक ५०रुपयात म्हणून प्रदर्शन भरवले होते. तेथून मी कितीतरी पुस्तके खरेदी केली होती.

        बरीचशी पुस्तके दुर्मीळ होतात तेव्हा आपल्याला माहित होतात. 'मीनाकुमारी की शायरी' हे असेच एक पुस्तक. कुठेच मिळेना. ते मला मंत्रालयात उपसचिव श्री सुरेश कळसकर यांनी वाचायला दिले. आॅनलाईन दुर्मीळ पुस्तके शोधली तर खूप मिळतात. अगदी अठराव्या एकोणिसाव्या विसाव्या शतकातील पुस्तके डाऊनलोड करता येतात. जुन्या पुस्तकांचे डिजिटलायझेशन करुन त्यांचे जतन करण्याचे आजकाल सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. मुद्रित पुस्तकांच्या तुलनेत ई बुक्स स्वस्तात उपलब्ध होत आहेत. पुस्तकांचे जगत अफाट आहेत. वाचलेल्या पुस्तकांच्या तुलनेत न वाचलेली पुस्तकेच अधिक आहेत आणि दिवसेंदिवस त्यात नव्याने भर पडतच आहे. कोणे एकेकाळी मी माझा या चारोळी संग्रहातील चारोळ्या मी वहीत उतरवली होती. वि. स. खांडेकर यांच्या पुस्तकातील सुंदर वाक्ये उतरवली होती. अलीकडेच मी आॅनलाईन जाॅन एलिया यांचे दोन गझलसंग्रह, श्री विकास शुक्ला यांनी मराठीत अनुवादीत केलेल्या मोपासा यांच्या कथा, वि. स. खांडेकर यांचे 'सहा भाषणे' आणि ना सी फडके यांचे गुजगोष्टी मागविले. आता नाशिकमध्ये पुन्हा नव्याने सदस्य होऊन 'मास्तरांची सावली' हे पहिले पुस्तक वाचावयास आणले आहे. पुस्तकांचे प्रेमच असे आहे की ते जराही कमी होत नाही. वाढतच राहते.फक्त हे प्रेम स्वतः पुस्तके मिळवून करावे. आपल्या संग्रहातील पुस्तक कोणी मागितले तर पुस्तक प्रेमी कोणालाही काळजाचा तुकडा मागितल्या सारखेच वाटेल यात काही शंका नाही. 

       🌷🌷🌷

@विलास आनंदा कुडके

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...