SarjanSpandan

Search results

Sunday, June 20, 2021

एका चंदनाची कहानी

 #एक चंदनाची कहानी

            खूप एकटे एकटे वाटले की आठवणी सोबतीला येतात आणि साथ देतात. आठवणी आल्या की पाठोपाठ घळाघळा अश्रू येतात. अंधार त्या अश्रूंवर मायेने पांघरुन घालतो. अन त्या पांघरुनात हुंदकेही येतच राहतात. डोळ्यात झोप येत नाही तेव्हा आठवणीच स्वप्नांसारख्या तरळत राहतात. दिसतात पण त्यांना स्पर्श करु शकत नाही म्हणून शब्दात त्या गुंफून ठेवाव्या लागतात. कोणी म्हणेल कशासाठी या आठवणी. आठवणी या पुढील पिढीसाठी लिहून ठेवायच्या असतात. वाडवडिलांनी कसा संघर्ष केला आणि आपण कोणत्या अनुभवांचे वारसदार आहोत हे जर जाणून घ्यायचे असेल तर याच आठवणींना चाचपडून पहावे लागेल

      ते जून १९७६ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर १७/११/२००२ पर्यंत त्यांचा तब्बल २६ वर्षांचा सहवास लाभला. सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन नव्हते. मला १९७८ ला नोकरी शोधावी लागली. १९८० ला मी ज्या रेडिमेड कपड्याच्या दुकानात कामाला होतो त्या दुकान मालकाची परवानगी घेऊन ११वी काॅमर्सला के टी एच एम काॅलेजला प्रवेश घेतला. सकाळी १०.३० पर्यंत पिरीएड अटेंड करुन मी दुकानात जायचो.

        ३० रुपये आठवड्याला उचल मिळायची. वडील त्यातून गहू तर गहूच आणायचे. पुन्हा दुसरा किराणा आणायचा तर पैसे नसायचे. कधी कधी आठवड्याचे ३० रुपये आणून मी मांडणीत पितळी बारीक डब्यात ठेवायचो तर कोणीतरी त्यावर हात मारायचे. मग आठवडाभर काय खावे अशी विवंचना असायची.

       तेव्हा काॅलेजला जायला मी मोठ्या हौसेने पांढरा सफारी शिवला होता. वडील पावसाळ्यात तो धुवून घरात वाळत घालायचे तर त्यावर कौलातून टपकणारया गढूळ पाण्याचे टिपके पडायचे.

          मला आठवते. त्या छोट्याशा खोलीत मी अब्राहम लिंकनचा छोटासा फोटो लावलेला होता. तसेच दाराशी हाताची घडी घातलेल्या स्वामी विवेकानंद यांची एक तसबीर होती. पुस्तकांची छोटी रॅक होती. एकदा मला मेनरोडवर एक पोस्टर आवडले ते मी पुस्तकांच्या रॅकजवळ लावले. एक वादळात एका स्त्रीचा तो चेहरा होता. डोळ्यातून अश्रू ओघळत असलेला. कलात्मक म्हणून तो मला आवडला. पण तो खाली पाणी भरता भरता खिडकीतून खाली दिसायचा. ते पोस्टर काढून टाकावे म्हणून एक वर माडीवर येऊन सांगायला लागले तेव्हा मी दुसरे पोस्टर आणून त्यावर चिकटवले. If you live right, ones is enough असे त्यावर वाक्य होते आणि उंचावरुन समुद्रात छलांग मारणारया युवकाची पोज होती.

          घरात चिमणी होती. तिचा काळा धुर निघत रहायचा. वडील कधी कधी पांढरया मातीने भिंती पोचारायचे. जमीन सारवायचे. पाणी खालून आणावे लागायचे. घरात मोरी नव्हती. खाली अंगणात कोपर्‍यात नळाजवळ आडोशाला जावून अंघोळ करावी लागायची. वडील नळावर जाऊन एका हाताने भांडी घासायची तेव्हा सगळे माझ्याकडे वर खाली पाहून कुजबुजायची 'किती दिवस म्हातारयाला भांडी घासायला लावतो' मी खालमानेने सकाळी काॅलेजला जायचो. तेथून दुकानात जायचो. रात्री नऊ वाजता घरी यायचो. सुट्टीच्या दिवशी परशुराम साईखेडकर नाट्यगृहाजवळील सार्वजनिक वाचनालयात जायचो.

        आठवड्याला नंतर नंतर १२५ रुपये उचल मिळायला लागल्यापासून मी पुस्तक प्रदर्शनातून एकेक पुस्तक घरी आणायचो. पाच दहा रुपये किंमत असायची पण त्या काळात त्यांना फार मोल होते. महानोर यांचा रानातल्या कविता, ग्रेस यांच्या सायंकाळच्या कविता हे संग्रह तेव्हा मी आणलेले आठवतात. एकदा विश्वकोश माझ्या नजरेस पडला तेव्हा मी दरमहा एक याप्रमाणे जवळ जवळ सगळेच खंड घरी आणले. पुस्तकांची रॅक तेव्हा कमी पडायला लागली. घरी येणारे नातेवाईक म्हणायचे हा छंद काही उपयोगाचा नाही. वडील तेव्हा रागवायचे नाही

        आई गेल्यावर त्यांनी मला आईची उणीव भासू दिली नाही. आईसारखी माया माझ्यावर केली. कधी मी आजारी पडून घरी राहिलो की माझी चिठ्ठी ते दुकानात नेऊन द्यायचे. माझ्या अंगावर पांघरुन घालून येताना फुटाणे वगैरे आणायचे

       मला आठवते. आई तेव्हा शालिमारजवळ सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होती. तेव्हा ते घरी स्वयंपाक करुन हाॅस्पिटलमध्ये जाऊन शाळेतही जायचे. परत घरी येऊन संध्याकाळी स्वयंपाक करायचे. हाॅस्पिटलमध्ये आई कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला होती. तिला ते संत्री मोसंबी सोलून खाऊ घालायचे. आई म्हणायची 'आता माझ्या विलासचे कसे होईल' तेव्हा ते तिला धीर द्यायचे. कॅन्सरवरील महागाचे उपचार करण्याइतपत त्यांची तेव्हा परिस्थिती नव्हती. मी शाळकरी वयाचा. पुरेशी समज न आलेला.

         त्यांची हतबलता तेव्हा मला समजण्यासारखी नव्हती. मी जरा जाऊन येतो असे म्हणून ते हाॅस्पिटलमध्ये जाऊन यायचे. एके दिवशी ते अक्षरशः हंबरडा फोडतच आले. 'आपली पमा आपल्याला सोडून गेली रे' असे म्हणून ते रडतच होते. मला काही समजत नव्हते. मी मनात तेव्हा म्हटले 'बरे झाले गेली. मारतच होती.' आज मला अगदी ओशाळल्यासारखे वाटते.

         तेव्हा आम्ही चरण पादुका रोडला बोराडे यांच्या सीता स्मृती वाड्यात पहिल्या मजल्यावर रहायचो. आईला वडीलांनी टॅक्सीत घालून आणले. तेव्हा नुकतेच जंबुसरवरुन मामा कंपनी घरी आली होती. त्यांनी आणलेला ब्रेड लाकडी कपाटात तसाच पडलेला होता.

         आईला हिरव्या लुगड्यात सजवण्यात आले. हिरवा चुडा भरण्यात आला. तोंडात पानाचा विडा ठेवण्यात आला. तिला घेऊन यात्रा निघाली तेव्हा वडील भाऊ पुढे विस्तव घेऊन चालत होता.

         आईला सरणावर ठेवण्यात आले तेव्हा मात्र मला वेगळीच जाणीव झाली. आई उठत का नाही म्हणून मला एकसारखे वाटायला लागले तोच वडील भावाने आईला अग्नी दिला. खांद्यावर पाण्याच्या मडक्याला दगडाने कोच पाडून पाण्याची धार सांडत सांडत प्रदक्षिणा घातल्या आणि पाठीमागून एके ठिकाणी मडके मागे सोडून दिले. ते फुटले तेव्हा आगीच्या ज्वाळांनी मला भडभडून आले.

          आई आता पुन्हा दिसणार नाही ही जाणीव मला त्या वयात झाली. आई गेल्याचा माझ्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून वडीलांनी पुढे मला फार जपले. ते सारखे माझ्याकडे लक्ष ठेवून असायचे.

            एकटाच खिडकीत बसलो की वडीलांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा डोळ्यापुढे तरळत राहतात. कधी ते अंगातली कोपरी खिडकीशी उन्हात बसून शिवत बसायचे. तर कधी गुडघ्यावर धोतर शिवत बसायचे. त्यांची लालबुंद गव्हाळ कांती उन्हाच्या तिरीपेत चमकत रहायची. कधी कागदाच्या कपट्यावर शिसपेन्शिलने माझ्या आईचा चेहरा रेखाटत बसायचे. गुडघ्यांसाठी त्यांनी रुमानार्थी आयुर्वेदिक औषधे आणून ठेवलेली असायची ती ते घ्यायचे आणि सकाळी किंवा सायंकाळी वरच्या पेठेपासून ते थेट खालच्या पेठेपर्यंत फेरफटका मारुन यायचे. मध्ये राममंदिर लागले की तेथील ओट्यावर भेळभत्ता घेऊन खायचे. कधी कधी निवृत्त लोक कट्ट्यावर जमायचे तिथे त्यांच्यात जाऊन बसायचे. एकदा त्यांच्या चष्म्याची एक काडी तुटली तर तिथे दोरा लावून तोच चष्मा त्यांनी शेवटपर्यंत वापरला. शेवटी एक काच फुटली तर उरलेल्या काचेतून ते पेपर वगैरे वाचायचे. तो चष्मा जपून ठेवायला हवा होता अशी हळहळ आज वाटते. प्रथेप्रमाणे त्यांच्या वस्तू गंगेत विसर्जित केल्या त्या करायला नको होत्या असे आज वाटते.

          सकाळी अंघोळ केली की ते एका हाताने देवपूजा करायचे आणि कपाळाला गंध लावायचे.

          मोठ्या मुश्किलीने मी त्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकरण त्यांचे सेवापुस्तक ज्या शाळेत होते तिथे जाऊन, त्यांचे सन १९५० ते १९७६ चे वेतनाचे तपशील मिळवून करवून घेतले होते. रु ६० निवृत्ती वेतन बसले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळलेले मी पाहिले होते. ते वाढत जाऊन शेवटी ते रु ७०० इतके निवृत्ती वेतन घ्यायचे. त्याचेही त्यांनी हिस्से ठरवलेले होते. माझ्या हिस्स्याचे पैसे ते घरात द्यायचे व नाशिकला जाऊन माझ्या भाऊ बहीणीला त्यांच्या हिश्श्याचे पैसे कनवटीला ठेवून देऊन यायचे. स्वतः साठी  तंबाखूची पुडी आणि भेळभत्ता एवढाच खर्च भागावता येईल एवढेच पैसे ते जवळ बाळगायचे. नवरात्रात पहाटे कोरा नेहरुशर्ट व कोरे धोतर घालून ते पायीच घाटनदेवीचे दर्शन घेऊन यायचे.

#एक चंदनाची कहानी

              शुभ्र नेहरुशर्ट . शुभ्र धोतर आणि शुभ्र टोपी याच वेशात ज्यांना मी आयुष्यभर पाहिले.ज्यांचे जीवन अगदी साधे सरळ भाबडे आणि तितकेच खडतरही होते.त्या माझ्या वडिलांनी माझ्या आयुष्यातील जवळ जवळ सगळाच भाग व्यापलेला आहे. माझे बालपण, किशोर आणि तरुण वय त्यांच्या सावलीत गेलेले आहे

        रविवार दि १५/४/१९१७ रोजी त्यांच्या जन्माने आनंद झाला म्हणून त्यांचे नाव 'आनंदा' ठेवण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ यमुना 'दगु' 'मुरलीधर' झाले. नगरसूल गावात शेती होती. लहानपणी आंब्याच्या झाडावरुन पडण्याचे निमित्त झाले आणि वडिल डाव्या हाताने अधू झाले. शेतीच्या कामासाठी कुचकामी ठरले. शेळ्या मेंढ्या सांभाळायच्या कामाचेच फक्त उरले.

        मालेगावच्या मामांनी त्यांना आपल्याकडे शिकायला घेऊन गेले. तिथे व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे सातवीपर्यंत शिकले. ते सांगायचे तेल्याच्या दुकानात ते दिवसभर तेल विकायचे. मोठे कष्टाचे ते दिवस होते.

      नंतर नाशिकमध्ये पीटीसी केली. खिर्डीसाठे इथे शाळा सुरु केली. पुढे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या बाल शिक्षण मंदिर, गोराराम गल्ली नाशिक येथे प्राथमिक शिक्षक म्हणून लागले.

        पहिली पत्नी हाडके घराण्यातील होती. वडील नाशिकमध्ये नोकरी करीत होते तरी ती नगरसूलला शेतीकाम करायची. बाळकृष्ण तीन वर्षाचा असताना व उषाचा नुकताच जन्म झाला तेव्हा ती त्यांना सोडून देवाघरी गेली

       तेव्हा ते पंचवटीत रहायचे. नगरसूलची सकडे आजी भोईरवाड्यात बहिणीकडे यायची. तिने वडीलांना पाहिले. माझी आई तिची भाची. तिच्यासाठी माझे वडील योग्य वाटले. तिने मग लग्न जुळवले.

       तुटपुंज्या पैशात संसार सुरु झाला. पहिल्या पत्नीची मुलं आई सांभाळणार नाही असा त्यांना त्यावेळी सल्ला मिळाल्याने त्यांना त्यांनी आपल्या बहिणीकडे ठेवले. आईला तिच गोष्ट मनस्वी लागली. वडील पगारातून त्या दोन मुलांचा संभाळ करण्यासाठी बहिणीला वरचेवर पैसे द्यायचे त्यामुळे घरात चणचण भासायची. त्यावरुन आई बाबा यांच्यात नेहमी खटके उडायचे.

       आई आणि बाबा यांच्या वयातही खूप अंतर होते. आई वयाने लहान सुंदर होती. सगळ्यांमध्ये उजवी होती. त्यामुळे तिचा सगळ्यांकडून दु:श्वास होत रहायचा. कोणी आईला चांगले पहायचे नाही. तिने खालुन वाहून आणलेल्या प्यायच्या पाण्यात आधीची मुलगी राख टाकून द्यायची. खणदूसपणे वागायची

        बाबांचा आईवर खूप जीव होता. तिचा संताप राग सहन करुन घ्यायचे. आई रागावली की बाबा घराबाहेर निघून जायचे.

             शुक्रवार दि १५फेब्रुवारी, १९७४ रोजी आई कॅन्सरने गेली तेव्हा वडील एकटे पडले. घरातला स्वयंपाक पाणी एका हाताने करुन ते शाळेत जायचे. घरातली भांडी ते एका हाताने घासायचे. मी तेव्हा आठवीला होतो. असमंजस आणि हट्टी होतो. एकदा दारावर लाकडी टेबल विकायला आले तर मला अभ्यासाला वडीलांनी घेऊन दिले. टेबलाला खुर्ची पाहिजे म्हणून मी हट्ट धरला तर वडीलांनी मला फर्निचरच्या दुकानात नेऊन माझ्या पसंतीने घडीची लाकडी खुर्ची घेऊन दिली. खुर्ची घेऊन आम्ही रामसेतू पुलावरुन येत होतो तेव्हा श्रीराम विद्यालयाचे तेव्हाचे मुख्याध्यापक श्री टेकाडे गुरुजी भेटले. ते माझ्याकडे पाहून म्हणाले गुरुजींना किती त्रास देतो.

        एकदा हट्ट करुन मी बाबांना किशोर मासिक घ्यायला लावले होते. दोन रुपये किंमत होती तरी तेव्हा ते महागच होते. तेवढ्या किमतीत तेव्हा दोन तीन किलो गहू मिळायचा.

        बाबा जून १९७६ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्या आधी फंडातून पैसे काढून उषाचं लग्न करुन दिले. सेवानिवृत्त झाले पण पेन्शन नाही. खासगी संस्थेत तेव्हा पेन्शन नव्हते. घरातले एकेक पितळी भांडे कुंडे विकून एकेक दिवस कसाबसा चालला होता. तेव्हा आम्ही दोघेच लाटेवाड्यातच पण आतेमामांच्या शेजारी रहायचो. आतेमामांनी आत्या गेल्यानंतर दुसरे गंधर्व लग्न केले होते. बाळकृष्ण आणि उषा तेव्हा आतेमामांकडेच रहायचे. उषाच्या लग्नात जेवण कमी पडले तर आतेमामाने आईच्या हातची मोठी पंचपात्री ठेवून घेतली व पैसे पुरवले तेव्हा पंगतीत वाढता आले.

            सणासुदीला इकडे आम्ही दोघे आज काय खायचे या विवंचनेत असायचो तर शेजारी मोठमोठ्याने मामा श्रीखंड काय मस्त आहे असे मुद्दाम आवाज यायचे. आतेमामाने बाळकृष्णाला मालविय चौकात रथ रस्त्याच्या कोपर्‍यावर पानपट्टी टाकून दिली होती. कधी कधी मीही त्या पानपट्टीवर बसायचो.                                                                    सेवानिवृत्त झाल्यावर उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. तेव्हा आतेमामाने पंचवटी कारंजावरील एक पानपट्टी बाबांना चालवायला दिली. तेव्हा मी दहावीत गेलेलो होतो. पानपट्टीच्या माळ्यावर व घरी रात्री आल्यावर रस्त्यावरील लाईटच्या उजेडात मी अभ्यास करायचो. घरात लाईट नव्हती. चिमणीच्या उजेडात आम्ही रहायचो.

           खूप जणांनी उधारी बुडवल्याने पानपट्टीही चालली नाही. मग बाबा चार रुपये रोजाने द्राक्षाच्या बागेत रात्री राखणदारी करायला तपोवनाकडे जायचे. येताना जाळण्यासाठी रानातून काड्याकुड्या गोळा करुन आणायचे. एकदा आतेमामाने त्यांच्याकडील कोरिया जपानची भारी पॅन्ट घालायला दिली आणि दुसरया दिवशी मागूनही घेतली होती. सकाळी गाणगापूरहून आणलेल्या सोन्याच्या साखळ्यांच्या गप्पाही कधी कधी ऐकू यायच्या.

         मी दहावीत गेलो तेव्हा एकमुखी दत्ताकडे रहात असलेल्या पिसोळकर सरांनी त्यांची जुनी खाकी फुलपॅन्ट जी मागे सीटवर विरली होती ती देऊन ठिगळ लावून वापर असे सांगितले होते.

        अशा एकेक आठवणी आज जाग्या होत आहेत.

४.

#एक चंदनाची कहानी

              तो काळच वेगळा होता. आज तो धूसर सोनेरी भासत आहे. पावसाळ्यात वडील घरी यायचे तेव्हा मोठी बंद छत्री ते दाराच्या पाठीमागे उभी करुन ठेवायचे. धोतर वर पोटरयांवर खोचलेले असायचे. 'काय शिळंदार पाऊस' असे अंगभर ओले कपडे झटकत म्हणायचे. 'जरा पल्याड जाऊन येतो' म्हणून टोपी चढवून ते निघायचे. एकदा मला त्यांनी गोदावरी पलिकडे यशवंतराव पटांगणातून चढ असलेल्या मार्गाने त्यांच्या शाळेत नेले होते. बाल शिक्षण मंदिर ही गोराराम गल्लीतील शाळा भरायची तो एक वाडाच होता. वर्गात मुलं जमीनीवर बसकर पट्ट्या टाकून बसायचे. दर शनिवारी वर्ग सारवायचे. वडील उत्तम चित्रकार होते. बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील रंगीत चित्रे त्यांनी हुबेहुब त्याच रंगात रंगवून वर्गात लावली होती. तेव्हाच्या लोकराज्य वगैरे मासिकातील चित्रे, पक्षांची पिसे, राजा रवीवर्माने काढलेल्या श्रीकृष्णाची चित्रे यांचा सुंदर चित्र संग्रह त्यांनी बनवलेला होता. इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील शिवाराची श्रीमंती, जत्रा, माझ्या मामाची रंगीत गाडी इत्यादी धडे कवितांची त्यांनी आपल्या वळणदार निळ्या अक्षरात काढलेली टिपणवही मी अजून जपून ठेवली आहे. त्यांचे अक्षर मोत्यासारखे टपोरे सुंदर होते. एका वहीत माकडा माकडा कान कर वाकडा सारख्या बडबड गीतांचा त्यांनी स्वअक्षरात केलेला संग्रह देखील मी जपून ठेवला आहे. मोडीमध्ये त्यांची आ गो कुडके ही स्वाक्षरी सर्वत्र असायची.

          शाळेतून सायंकाळी परतताना ते हमखास मालविय चौकातून मोठी बालुशाही घेऊन यायचे.

          मला घेऊन ते शाळेत जायचे तेव्हा दुपारच्या सुट्टीत सुंदरनारायण मंदिराजवळील त्यांच्याच एका विद्यार्थ्याच्या हाॅटेलमध्ये घेऊन जायचे व मस्त गोल भजी खाऊ घालायचे.वर्गात ते शिकवायचे तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा अगदी धाक होता. चुकले की त्यांच्याकडून जोरात गुद्दा मिळायचा. कधी कधी तर ते कानही अगदी लाल होईपर्यंत पिळायचे. पाढे बाराखडी धडे कविता ते अगदी घटवून घ्यायचे. मुलांचे पालक शाळेत आले की ते वडीलांशी अगदी घरच्यासारखे बोलायचे. वडील त्या शाळेचे कीर्द खतावणी सुद्धा लिहायचे. स्व. खासदार वसंत पवार हे त्यांचे विद्यार्थी होते. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तेव्हा वडील ८७ वयाचे होते. तेव्हा स्व. खासदार वसंत पवार त्यांना म्हणाले 'मला ओळखले का गुरुजी, मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही माझा कान पिळला होता.' वडीलांनी आठवून आठवून मग मान हलवली होती.

         बाल शिक्षण मंदिर या शाळेत मागील बाजूस एक दगडी चौक होता. तिथे सुतकताईचे चरखे असायचे. मोठ्या वर्गातील मुलांना ते सुतकताई सुद्धा शिकवायचे. अशा कितीतरी आठवणी जाग्या झाल्या आहेत.

@विलास आनंदा कुडके 

Wednesday, June 9, 2021

फजितीचे क्षण

 फजितीचे क्षण

    काही क्षण फजितीचे असतात. असे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी आलेलेच असतात. त्या क्षणापुरते आपल्याला वाटते आपली फजिती झालेली कोणीही पाहू नये. फजिती होत असतांनाचा क्षण युगासारखा वाटायला लागतो. कधी एकदाचा तो क्षण संपावा आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकावा असे होऊन जाते. असे क्षण आपण आयुष्यातून घाईघाईने पुसून टाकू पाहतो. आजवर लिहिल्या गेलेल्या आत्मचरित्रात कोणीही फजितीचे क्षण उल्लेखिलेले आढळत नाही. काही अपवाद असतीलही पण अशी आत्मचरित्रे अद्यापही वाचनात आलेली नाहीत.

    प्रत्येक जण आपले व्यक्त्तिमत्व अगदी रांगत असल्यापासून विकसित करीत असतो. आपलं रुपडं सजवित असतो. कोणावरही छाप पडेल अशी देहबोली, शैली आपण आत्मसात करीत असतो. आपल्याला पाहून कोणीही आकर्षित व्हावे, राजस, राजबिंडे, देखणे म्हणावे म्हणून सारी आपली धडपड असते. आवडत्या हिरोचे राहणीमानाचे आपण अनुकरण करतो. काही स्वत:च इतरांचे आदर्श बनू ठरू पाहतात. अशावेळी फजितीचे क्षण म्हणजे दुधात खडा! अशा फजितीच्या क्षणी त्रिफळा उडते तेव्हा आपला झालेला अवतार पाहण्यासारखा असतो पण आपण स्वत:ही आरशात तो कधी पहाण्याचे टाळतो. कोणीजर चुकून पाहिले तर जणू काही त्याने पाहिलेच नाही अशी मनाची खोटी समजूत करुन घेतो.

    कल्पना करा एखाद्या खास कार्यक्रमासाठी महागड्या सौंदर्यप्रसाधनगृहात नखशिखांत शृंगारलेली ललना ऐनवेळी तिच्या पायातील त्राणीचा अंगठा नाहीतर बंध तुटला तर कोण घोर प्रसंग उभा राहिल. अशा साजशृंगारलेल्या अवस्थेत दुरुस्तीच्या दुकानापुढे उभे राहायचे म्हणजे किती नामुष्कीचा प्रसंग. शत्रूस्त्रीवर सुद्धा असा प्रसंग नको यायला किंवा धरणीमाय पोटात घेईल तर बरे होईल असे तिला क्षणभर वाटल्याशिवाय राहणार नाही. बरं ती तुटकी पादत्राणी तशीच सोडून जावे तर कोमल पावले भूमीवर ठेवावी कशी? अशा पेचात ती बिचारी सापडते. बरे अशा ललनांकडे दुर्लक्ष कोण करणार आणि ही फजिती लपवणार तरी कोणाकोणापासून. मरुन मेल्यासारखी अवस्था म्हणतात ती हीच असते.

    असाच जीवघेणा क्षण धो धो पावसात अजिबात उघडत नसलेल्या छत्रीमुळे येतो. ऐरवी पाऊस नसताना किती छान उघडत होती आणि आताच हिला काय झाले म्हणून आपली किती झटापट होत रहाते. बरं अशा न उघडलेल्या छत्रीला त्यावेळी फेकताही येत नाही. वेडी आशा वेडी म्हणजे किती वेडी असते ते आपल्या अशी छत्री उघडण्याच्या निष्फळ प्रयत्नांवरुन आणि पूर्ण भिजलेल्या कपड्यांवरुन कोणाच्याही लक्षात येते. अशावेळी येणारा जाणारा जणुकाही आपल्याचकडे पाहून हसतोय असा भास होत राहतो आणि आपण त्याच्याकडे आपले जळजळते कटाक्ष टाकत राहतो. 

    ऐन पावसात वाऱ्याने छत्री उलटी होणे, काडी न काडी मोकळी होणे ही तर फटफजिती झाली. माणूस केळाच्या सालीवरुन पडला तर साधीच फजिती होते. किमान हसणारा माणूस हसू दाबून मदतीचा एक हात तरी पुढे करुन पडलेल्याला उठवतो आणि केळीचे साल टाकणाऱ्याचा उद्धार करीत शिव्याही घालू लागतो. फार पूर्वी अहो तुमचे पोस्ट ऑफिस उघडे आहे असे सांगून न कळत फजिती करायचा आणि आपला चेहरा गोरा करुन टाकायचा. अशावेळी थँक्सही म्हणायचे अगदी जीवावर येते. बरं, सांगणाऱ्याचा चेहरा न बोलता सांगत असतो की किती अजागळ! एक घडलेला प्रसंग. कार्यालय सुटल्यावर मागे बॅग अडकावून निघालेल्या एका सहकाऱ्याला एका सहकारिणीने मागून आवाज दिला सर तुमची चैन उघडी आहे . तिला बॅगची चैन अभिप्रेत होती. पण सहकारी बिचकले आणि कमाल आहे मागून पुढची चैन कशी दिसेल? असे म्हणून घाईघाईने पँटची चैन चाचपडून पाहली. चैन तर बरोबर आहे, यांना नेमकी कोणती चैन उघडी दिसली, या विचारात त्यांची अगदी घालमेल झाली. पुढे खुलासा झाला ती गोष्ट वेगळी. परंतु त्यावेळी त्यांची जी फजिती झाली ती विचारता सोय नाही. आजकाल ऐनवेळी न खुलणाऱ्या किंवा अजिबात न लागणाऱ्या चैनींमुळे फार मोठा घोटाळा होतो. जड बॅगेचा पट्टा तुटण्यासारखी फजितीच नाही. वरची गुंडीही गळ्यापर्यंत लावण्याची सवय असलेल्याला ऐनवेळी वरची गुंडी तुटल्यावर छातीवरचे केस वाऱ्यावर भुरभुरत उघडे ठेवताना ज्या मरणप्राय यातना होतात त्या तुम्हा आम्हा गुंड्या उघड्या ठेवणाऱ्यांना कळायच्या नाहीत. एवढेच कशाला रस्त्याने मिशी पिळत जायची सवय असलेल्याची मिशी चुकून भादरली गेली तर काय जीवघेणा अपमानास्पद, लांछनास्पद प्रसंग उभा राहतो त्याची तुम्हाला कल्पना येणार नाही. हवी तशी मिशा उगवायला वेळ लागतो, मेहनत लागते, तेवढे दिवस तोंडाला रुमाल बांधूनही वावरता येत नाही. फारच कठीण अवस्था असते. अशा छोट्यामोठ्या फजितीच्या क्षणांना आपण पावलंपावलं जपतच राहतो. रात्रंदिवस घोकंपट्टी करुन परीक्षेला जावं आणि येत असूनही वेळेवर उत्तरच न सुचणे किंवा मोठ्या तावातावाने भाषण करायला ध्वनीक्षेपक घेऊन उभे रहावे आणि ऐनवेळी काय बोलावे हेच न सुचणे... किती किती फजितीचे क्षण सांगावे. मोठ्या प्रेमाने मोठ्या हॉटेलात कोणाला घेऊन जावे आणि पैशाचे पाकीट एटीएम कार्डसकट कोणी मारावे यासारखा दैवदुर्विलास नाही! 

राष्ट्रीय कार्यक्रमाला कांजी लावून कडक इस्तरीत पांढरेशुभ्र होऊन जावे आणि खिशातील कलमानेच घात करावा, ही फजिती कोणती म्हणावी? किती वेळ शाईचा डाग हाताच्या पंजाने लपवून ठेवणार! बरं एवढ्याशा कारणावरुन कार्यक्रम सोडूनही जाता येत नाही. 

एखाद्याने मोठ्या त्वेषाने दातओंठ खावून यावे आणि त्यातच त्याचा पुढचा दात निखळून पडावा, असेही अप्रिय प्रसंग घडतात. दाढ उठलेल्या माणसाला नेमके हसवणारे इतके लोक येऊन भेटतात आणि हसायला भाग पाडतात की विचारु नका! त्यामुळे त्याची अक्षरश: हसून हसून पुरेवाट होते. 

फजिती ज्याची होते त्याला धड हसताही येत नाही आणि रडताही येत नाही. रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून काही पँटी घेतेवेळी बरोबर येतात आणि वापरायला सुरु केली त्याच दिवशी त्यांची नको तिथे शिलाई उसवल्यावर दे माय धरणी ठाय असे होऊन जाते. म्हणूनच आपण खात्रीशीर न उसवणारी शिलाई मारणाऱ्याकडूनच कपडे शिवत राहतो. बोटाने शिलाई उसवली तर जात नाही ना ते दहावेळा पाहतो. शिलाई उसवणे हे तर फजितीचे हमखास कारण. पूर्वी लोक टोपीमध्ये आतून सुई टोचून ठेवायचे. ती अनेकोपयोगी असायची म्हणजे पायात काटा घुसला, शिलाई उसवली, माळ ओवायची असेल किंवा संरक्षक छोटे शस्त्र म्हणूनही उपयोगी पडायची. 

शाळेत असतांना काही इब्लीस पोरं गुरुजी वर्गात यायच्या आधी त्यांच्या खुर्चीवर खाजकुहली पसरून ठेवायचे आणि मग गंभीर चेहऱ्याने शिकवता-शिकवता गुरुजींच्या ज्या हालचाली सुरु व्हायच्या त्या पाहून वर्ग खुसूखुसू न कळत हसत राहायचा. असली फजिती मात्र व्हायला नको आणि ती कोणी करायलाही नको. प्रवासात देखील मित्रमंडळींमध्ये गप्पांमध्ये रंगलेल्या एखाद्या मित्राला मागून शेपटी लावण्याचे प्रकार होतात किंवा मी गाढव आहे असे लेबल चिकटवले जाते आणि मग त्याच्याशी गंभीर चेहऱ्याने गप्पा मारल्या जातात. आजुबाजूचे लोक मात्र लोटपोट होऊन हसत असतात. अशावेळी हसण्याचे कारण कळाल्यावर जी फजिती होते ती कोणालाही विसरता न येणारी असते. 

चारचौघात जशी फजिती होत असेत तशी ती घरात काहीवेळा होत असते. म्हणतात ना शिंक्यावर झेप घ्यायच्या प्रयत्नात शिंकेच तुटावे आणि ज्याच्यासाठी जीव चालला होता, सगळा आटापीटा होता ते दही दूध सहज अंगावर अभिषेक होऊन मिळावे आणि हा आनंद म्हणायचा की दु:ख ते समजत नसताना अंगावरचेही घाईघाईने चाटून पुसून घ्यायची वेळ यावी आणि तोंडात ना ओठात पडता वाढून गेलेल्याकडे पाहून हळहळत बसावे तसे सगळे असते.

घरोघरी गॅसच्या शेगड्या तसे घरोघरी अडगळ, पसारा हा ठरलेलाच असतो. त्यात घरात वावरणारे आताशा भ्रमणध्वनीत व्यस्त असल्याने घरातील पसारा पूर्वीच्या मानाने खूप वाढला आहे आणि आवरणारे हात शोधावे लागत आहेत. पूर्वी हौसेने घर आवरले जायचे पण आज हौस जिरेल एवढा पसारा वाढला आहे कारण जीवनावश्यक गरजांबरोबर इतरही गरजाही वाढल्या आहेत. हे सर्वांना कळते पण जरा कुठे आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो की आपण तिथला पसारा पाहून डोळे विस्फारतो. तेच जर आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपल्या पायाखालची फरशीच सरकते. पसारा आणि तोही पाहुणे यायच्या आत आवरतांना आपली भंबेरीच उडते. भंबेरीवरुन एक गोष्ट आठवली. शाळा तपासायला दिपोटी अचानक आल्यावर आपल्याच नादात संजिवनी  मळणाऱ्या गुरुजींची बोबडी वळली. त्यांनी घाईघाईने संजिवनी टेबलाच्या ड्रावरमध्ये आणि टेबलावरची शाईची दौत खिडकीतून बाहेर फेकली, असा फजितीचा क्षण!

असेच एक विभागीय प्रमुख अधिकारी होते. त्यांच्याकडे अचानक विभागप्रमुख चक्क जिन्सची पॅन्ट आणि टी-शर्टवर एकट्याने भेट दिली. शिपायाने त्यांना अजिबात ओळखले नाही. त्यांना सरळ बाकड्यावर बसायला सांगून साहेब बिझी आहे असे सुनावले. झाले. विभागप्रमुख बराचवेळ बाकड्यावर साहेब कधी मोकळे होतात त्याची वाट पहात गाणे गुणगुणत बसले. त्यावरही शिपायांनी त्यांना शांतता पाळायला सांगितली. शेवटी त्यांनी विचारले, तुमचे साहेब कितीवेळ बिझी असतात  आणि तडक दालनाचा दरवाजा उघडून शिपाई अरे अरे  म्हणेपर्यंत आत शिरले तर विभागीय प्रमुख अधिकारी धुम्रपानात धुरांच्या वलयात पुढील पदोन्नतीचे स्वप्न पाहण्यात तल्लीन झालेले! काय रे विड्या ओढतोस का? या प्रश्नाने स्वप्नभंग झाला आणि डोळ्यासमोर साक्षात मृत्यू दिसावा अशा मुद्रेने क्षणात ते अधिकारी गलितगात्र झाले. हातातले सिगारेट केव्हा गळून पडले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. विभागप्रमुख निघून गेल्यानंतर जवळजवळ तासाभराने त्यांना आपण कोठे आहोत त्याची जाणीव झाली आणि मग या फजितीला कारणीभूत ठरलेल्या शिपायाला त्यांनी किती झापले असेल ते विचारायलाच नको!

@ विलास आनंदा  कुडके

Sunday, June 6, 2021

आईच्या आठवणी 21(7/4/2018)

 #आईच्या आठवणी 

              आठवणींनीच मनाला जाग यावी तसे अलिकडे होते. आईकडे पाच दहा पैसे मागणे म्हणजे दिव्य होते. मला आठवते तेव्हा शाळेत रक्षाबंधन होते. शिक्षकांनी आदल्या दिवशी सर्व मुलींना रक्षाबंधनसाठी वर्गात राख्या घेऊन यायला सांगितले होते. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी मुलामुलींना एकेक रांगेत उभे केले आणि जवळच्या मुलाला राखी बांधायला सांगितले. तोपर्यंत मी राखी कधी बांधली नव्हती. सावत्र बहिण भाऊ तेव्हा गाणगापूरला आत्याकडे होते. आईचा मी एकुलता एक होतो. मला बहिण नव्हती. एका मुलीने राखी बांधल्यावर मला वेगळीच हुरहुर जागवणारी जाणिव झाली. राखी बांधल्यावर बहिणीला काही द्यायचे असते हेही मला माहित नव्हते. सगळ्या मुलांनी त्यांना जवळच्या मुलींनी राखी बांधल्यावर खिशातून पाच दहा वीस पैसे काढून दिले. ती मुलगी मी काय देतो असे पाहू लागली. मला अगदी खजिल झाल्यासारखे वाटले. काही हरकत नाही असे म्हणून ती मुलगी शाळा सुटल्यावर घरी निघून गेली. मला चुटपुट लागून राहिली.

@विलास आनंदा कुडके 

Friday, June 4, 2021

आम्ही नासिककर

 *न्यूज स्टोरी टुडे*

*०४.०६.२०२१*


*-आम्ही नासिककर……* 

*✒️ विलास कुडके*  👇

http://www.marathi.newsstorytoday.com/आम्ही-नासिककर/


*आम्ही नासिककर*

  

           श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पावनभूमीत आपला जन्म व्हावा आणि गोदाकाठावर अवघे बालपण सरावे यासारखे भाग्य नाही. पंचवटीचा परिसर, काळाराम मंदिर, रामकुंड, तपोवन, व्हिक्टोरिया ब्रिज ( आजचा अहिल्याबाई होळकर पूल) यांची पार्श्वभूमी बालपणाला लाभावी यासारखे समृद्धपण नाही.

      कळत नव्हते त्या वयात आईने बोटाला धरुन कितीदा काळाराम मंदिरात सिन्नरकर बुवांच्या किर्तनाला नेले असेल. त्यामार्गात सीतागुंफा, पाच प्रचंड प्राचीन वटवृक्ष, सीतामाईचा संसार दर्शन घडवणारे मंदिर लागायचे. लाकडी खेळण्यांची दुकाने लागायची. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यालगत वटवृक्षाखाली शितला मातेचे मंदिर लागायचे जिथे लहानपणी गोवर कांजण्या निघाल्या की हमखास दहीभाताचा नैवेद्य दाखवला जायचा. काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला हळदी कुंकूचे दुकान आणि बाहेर घास घालण्यासाठी गाई बांधून ठेवलेल्या असायच्या. काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर काळभैरवाचे छोटे मंदिर आठवते. 

      काळाराम मंदिराच्या प्रांगणात हरिनाम सप्ताह व्हायचे. एकदा गीताभारती सुद्धा येऊन गेलेल्या होत्या. तेथील सभागृहात सिन्नरकर बुवांचे किर्तन रंगायचे.डोक्यावर लाल पगडी, गुडघ्यापर्यंत लांब पांढराशुभ्र कूर्ता, धोतर आणि खांद्यावरुन हातांपर्यंत लांब शेला अशी सिन्नरकर बुवांची मूर्ती कधी कमरेवर हात ठेवून तर कधी जागीच उडी मारुन आख्यान रंगवायचे. त्यांच्या रंगात बाजूचे मृदंगवाले आणखी रंग भरायचे. आई एकीकडे तल्लीन व्हायची आणि बसल्या जागी डुकल्या काढणार्‍या मला एका हाताने हलवून जागं करीत रहायची.

     काळाराम मंदिराकडून पुढे खाली गेले की सरदार चौक व त्यापुढे सांडव्यावरची देवी व पुढे नारोशंकर मंदिराची मागील बाजूस फोटोफ्रेमची रांगेत दुकाने. समोर उसाची गुर्‍हाळे, रामाचा रथ निघायचा तेव्हा इथेच जत्रेतील फोटो स्टुडिओ,रहाटपाळणे, जादूचे आरसे, मोटार सायकलचे चित्तथरारक खेळ, यम दरबार, बुढ्ढी के बाल, फुगे यांनी परिसर गजबजून जाई.

         रामनवमीनंतर निघणाऱ्या रामरथ गरुडरथ हनुमानरथ यांच्या यात्रा, तो उत्साह दरवर्षी पाहण्यासारखा असतो. पुढे गोदामाईच्या पूरामध्ये नारोशंकर मंदिराची एक दगडी छत्री वाहून गेलेली दिसेल. तिथून पुढे गेले की रामसेतू पूल लागेल. सतत गजबजलेला. येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा होणार नाही अशा बेताने तिथे हमखास गाई रवंंथ करतांना दिसतील. कुठे कुठे जडीबुटी घेऊन बसलेल्या मशेरी लावून लावून दाताच्या कडा काळ्या झालेल्या आदिवासी लेकुरवाळ्या दिसतील. तिथेच तुम्हाला जुन्या काळातील एक आणे दोन आणे यासारखी नाणीही फडक्यावर पसरुन दिसतील. रामसेतू पुलाचा आधार घेऊन पांडे मिठाईचे दुकान दिसेल. तिथून पुढे गेले की भांडी बाजार. बालाजी मंदिर. कुंकवाची दुकाने. मला आठवते आई भांडी बाजारातील एका मोडीच्या दुकानातून हमखास घसमर जुनी भांडी निवडून घ्यायची.

           रामसेतूवर उजव्या हाताला खाली उतारावर मोठमोठे आरसे लावलेले एक सलून होते. तिथे वडील मला केस कमी करायला घेऊन जायचे. केस किती कमी करायचे याच्या सूचना आईने आधीच दिलेल्या असायच्या. तशा सूचना देत देत वडील मागे बाकावर पेपर वाचत बसायचे आणि त्याप्रमाणे केस कमी करता करता न्हावी मला एकसारखे हाताने खाली वाकवायचे. तेवढे वाकून वाकून मान दुखून यायची. कानाजवळ मागून वस्तरा फिरताना हमखास गुदगुल्या व्हायच्या आणि हलू नको म्हणून सूचना यायच्या. केस कमी करताना समोरच्या मोठ्या आरशात नारोशंकर मंदिर आणि परिसर दिसत रहायचा. घरी गेल्यावर परत सांगितल्याप्रमाणे केस कमी झालेच नाही अशी आईची नाराजी वडीलांना ऐकून घ्यावी लागायची ते वेगळेच. 

         तेथून  खाली उतरुन गेले की पुढे यशवंत पटांगण लागायचे. देव मामलेदारांचे मंदिर पुरात वाहून गेल्यावर तिथे आता दुसरे मंदिर बांधले आहे. या पटांगणात उभे राहिले कि पश्चिमेस एकमुखी दत्ताचे मंदिर आहे व उजव्या बाजूला समोर व्हिक्टोरिया पूल दिसतो. व्हिक्टोरिया पूलाच्या शेवटी सुंदरनारायण मंदिर आहे.जवळच वडीलांच्या विद्यार्थ्याचे भज्याचे दुकान होते. तेथे वडील मला नेहमी घेऊन जायचे. यशवंत पटांगणात कित्येक वर्षापासुन वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असते. त्यात अनेक दिग्गज व्याख्याते येऊन गेलेले आहे.

           गोदाकाठी फिरायला येणाऱ्यांचे इथे एक आकर्षण म्हणजे कोंडाजी माधवजी चिवड्याची भेळभत्त्याची दुकाने. समोर गांधी ज्योत, रामकुंड, तशीच आणखी कुंडे, प्राचीन गोदावरी मंदिर, कपडे बदलण्याचे ठिकाण दिसेल. मुख्य म्हणजे दरवर्षी गोदावरीला पूर किती आला आहे याचा अंदाज बांधता येईल असा मोठ्ठा दुतोंडी मारुती दिसेल. पलिकडे उंचावर कपालेश्वर मंदिर दिसेल. गोदाकाठी अनेक मंदिरे दिसतील.याच मंदिरांच्या रांगांमधील सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ एक अहिल्याराम व्यायामशाळा होती. मला आठवते तेव्हा मी तिथे जिम्नॅस्टिकसाठी जायचो. मलखांबावरील प्रात्यक्षिके नंतर यशवंत व्यायाम शाळेत झाली तेव्हा त्यात मीही भाग घेतला होता. 

            रामकुंडाच्या दोन्ही किनार्‍यांवर दशक्रिया पिंडदान, श्राद्ध, अस्थिविसर्जन करण्यासाठी भारतभरातून येणाऱ्या भाविकांची रेलचेल दिसेल.गोदाकाठी वटपिंपळ वृक्षांवर कावळ्यांचे थवेच्या थवेही दिसतील. पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या पंडित ब्राह्मणांची सोवळ्यातील लगबग इथे दिसेल.

         गोदाकाठी एके ठिकाणी जुने बाड घेऊन पंडित यात्रेकरूंच्या नावाची गोत्राची नोंद करुन घेत असतात आणि यापूर्वी त्यांचे कोणते पूर्वज तिर्थयात्रेस येऊन गेले त्याच्या नोंदी काढून दाखवतात. पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या हस्तलिखित जुन्या दुर्मीळ पोथ्यासुद्धा या ठिकाणी पहावयास मिळू शकतात.

          गोदाकाठी रामकुंडावर गेलो की मला हमखास आठवतात ते दिवस जेव्हा माझ्याच वयाच्या मामाने मला पहिल्यांदा रामकुंडात हळूच ढकलले होते आणि मग पोहायला शिकवले होते. नंतर कितीतरी दिवस आम्ही रामकुंडावर पोहायला जायचो. 

            मला आठवते त्या वयात गोदावरीचा पूर पहायला आम्ही व्हिक्टोरिया पुलावर जायचो तेव्हा एक भरदार मिशांचा पहिलवान टायर घेऊन पुलाच्या कठड्यावरुन तेवढ्या पूरात उडी घ्यायचा व पोहत पोहत पलिकडे जायचा.ते पाहतांना अगदी छाती दडपून जायची. 

             गोदाकाठीच पलिकडे गोराराम गल्लीत वडिलांची बाल शिक्षण मंदिर ही शाळा होती. तिथे ते मला रामकुंडावरुनच न्यायचे. येतांना गोदाकाठी भरलेल्या भाजी बाजारातून भाजीपाला घ्यायचे. आईपण बुधवारी गोदाकाठी भरणाऱ्या बाजारातून मीठमसाले वगैरे बाजार करायची. 

         गोदाकाठी आणखी एक आकर्षण होते आणि ते म्हणजे सांड्यावरच्या देवीजवळ गुढीपाडव्याच्या आसपास लागणारी हारडे करड्यांची रंगीत दुकाने. आईबरोबर मी देवीच्या दर्शनाला आलो की त्या टांगून ठेवलेल्या हारडे करड्यांकडे अगदी आशाळभूत होऊन पहात राही.

         गोदाकाठावरील आणखी एक आठवण म्हणजे गोराराम गल्लीतील श्रीकृष्ण मंदिर. जन्माष्टमीच्या दरम्यान इथली श्रीकृष्णाची चल मूर्ती रोज वेगवेगळ्या रुपात सजवली जाते आणि तिच्या दर्शनासाठी अक्षरशः झुंबड उडते.

            माझे सगळे बालपणच जणू या गोदाकाठी बागडते रहाते. सिंहस्थ पर्वणीत कधी ते तपोवनातील विविध साधुंच्या जथ्यात रमत राहते. तेथे शिरापुरीच्या भंडार्‍यात रमत रहाते. राम लक्ष्मण सीता यांच्या वेषभूषेत आशीर्वाद गोळा करीत रहाते. तपोवनातील साधूंच्या शोधात कधी जनार्दन स्वामींचेही शिवमंदिर उभारताना अवचित दर्शन होते.बालपणी काळाराम मंदिराजवळ उत्तर भारतातून 'रामलीला' करणारी मंडळी यायची तेव्हा त्याचेही आकर्षण असायचेच.

        पंचवटीतील नाशिककर स्टुडिओ आठवतो. आई व तिच्या मैत्रिणी तिथे फोटो काढून घ्यायला जायच्या. मला आठवते पंडित नेहरु गेले तेव्हा त्यांची रक्षा हेलिकॉप्टराने रामकुंडात विसर्जित करण्यासाठी आणली होती तेव्हा नाशिककर फोटो स्टुडिओने काढलेल्या फोटोत आईचा रामकुंडावरील एक फोटो आलेला होता. त्याकाळी फोटो मात्र अगदी अभावानेच काढले जाई त्यामुळे त्याकाळातील बालपणातील एकही फोटो आज नाही याची खंत वाटत रहाते. पण तो काळ मात्र सतत डोळ्यासमोर तरळत रहातो. 

        गोदाकाठीच रथाजवळच्या शाळेत मी अंकुष या बालमित्राबरोबर एकटाच पहिलीला प्रवेश घ्यायला गेलो होतो हे आज आठवले की हसू येते. नंतर सोनूबाई हिरालाल केलाची नवीन शाळा व त्यादरम्यान गांधीजींची जन्मशताब्दी निमित्ताने शाळेत वाटलेले स्मृतीचिन्ह पुस्तके आठवतात. नंतर पाचवीला जवळच श्रीराम विद्यालयात गेल्याचे व त्या दरम्यान सर्वात मोठा आलेला 1969 चा पूर व नंतर 1971च्या युद्ध प्रसंगी बेंचखाली बसणे आठवते. तिथेच शनिचौकात रंगपंचमीला खोदलेले रंगांचे रहाड छातीत धडधड वाढवायचे. जवळच सरदार चौकातील ग्रंथालयात पहिल्यांदा स्वीकारलेले सदस्यत्व व तेथून लागलेली पुस्तकांची गोडी मला विसरता येणार नाही. बालपणात नाशिकची कक्षा अशी हळूहळू माझ्या दृष्टीने विस्तारत राहिली. 

           वडील तेव्हा रोज म्हणायचे मी 'पल्याड' जावून येतो. तेव्हा अर्थ कळायचा नाही पण आज कळते पल्याड म्हणजे गोदावरी पलिकडे जाणे. गोदावरी ओलांडण्याबाबतही तेव्हा समजूती होत्या. पूर्व बाजूला रहाणारे पूर्व काठावरच श्राद्ध आदी विधी करणार आणि पश्चिमेला राहणारी मंडळी पश्चिमेलाच ते विधी करणार. मला आठवते माझे आते मामा व आत्या गाणगापूरवरुन आले तेव्हा प्रथम गोदावरीच्या पश्चिमेला भाड्याने खोली घेऊन राहिले होते व गोदावरीची विधीवत पूजा करुन मग अलिकडे पूर्वेस राहत्या घरी आले होते.

       मला नंतर कामानिमित्त व शिक्षणानिमित्ताने गोदावरी ओलांडून पलिकडे मेनरोडवर व गंगापूररोडला जावे लागायचे. त्या निमित्ताने माझ्या दृष्टीने नाशिकची कक्षा तेवढी विस्तारली होती. नेताजी भोईर यांची नाटके दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत व्हायची तेव्हा त्यांच्याबरोबर कधीतरी लहानपणी परशुराम सायखेडकर नाट्यगृह व त्यांची नाटके पाहिली ते आठवते. तर कधी गणेश विसर्जन मिरवणूकीत त्यांच्या ट्रकमधून व्हिक्टोरिया पूलावरुन गेल्याचे व गोदावरी ओलांडल्याचे आठवते.नववी दहावीला असताना परशुराम साईखेडकर नाट्यगृहाजवळच सार्वजनिक वाचनालयात मी सदस्य झालो आणि माझ्या वाचनाच्या कक्षा आणखीच रुंदावल्या. 

            कधी संवगड्यांसह  आनंदवल्ली सोमेश्वरला गेल्याचे तर कधी मातीचे गंगापूर धरण, पांडवलेणी, चांभारलेणी पहायला गेल्याचे आठवते. आजीच्या पाठुंगळी बसून वणीच्या सप्तशृंगी देवीच्या गडाच्या तेव्हाच्या निव्वळ उंच दगडांच्या एकेक दमछाक करणार्‍या पायर्‍या चढल्याचे आठवते. आयुष्यातील निम्मी वर्षे अशारितीने नासिकनेच घडवली. ढिगभर जाहिरातींचे कागद खिशात बगलेत कोंबून खाकी शर्ट विजारीतील डोक्यावर हॅट घातलेले व खांद्यावर कर्णा अडकवलेले व विशिष्ट आवाजात मेनरोडला जाहिरात करणारे वडणेरे काका मला अजून आठवतात. 'कुल्फेss' अशी साद देत हातगाडीवर मटक्यातील कुल्फी विकणारा भैय्या माझ्या स्मरणात आहे. धुळवडीला होळी होळीला प्रदक्षिणा घालत नाचणारे वीर आठवतात. रविवार कारंजावरील चांदीचा सुंदर गणपती आठवतो. सोमेश्वरच्या रस्त्यावर पेरुच्या बागा आठवतात. दोन दोन पैशात पेलाभर दूध मुलांना वाटणारे पांजरपोळ आठवते. बाज इनून घ्या बाज अशी उन्हात हाळी देत येणारा म्हातारा आठवतो. ये नागs नरसोबा म्हणून चित्र विकणारी मुले आठवतात.पंचवटीत कोकिळा काशिनाथ गवळी मावशी तपोवनात काळाराम मंदिराबाहेर गोदाकाठी मोठ्या रांगोळ्या घालण्याबद्दल प्रसिद्ध होती. ती आठवते. नासिकच्या कितीतरी आठवणी आहेत. त्यांना नासिकचा एक सुगंध आहे जो सतत दरवळत राहतो. 

         नासिककर म्हटला की कसा सरळ, मनमोकळा, निरागस, भाबडा, काय असेल ते सडेतोड तोंडावर बोलणारा, भांडायला नेहमी तयार असणारा पण दुसर्‍या दिवशी लगेच गोडही होणारा. त्याला कुत्सितपणा, चिकटपणा, चिकित्सकपणा असा माहितच नसतो. टोमणे मारणे देखील त्याच्या स्वभावात येत नाही. शुद्ध मराठीत न बोलता तो रांगड्या भाषेत कडक बोलणार. नासिककर कसा ओळखायचा तर गंमतीने उदाहरण दिले जाते. ते म्हणजे सगळीकडे 'एकोणीस' म्हटले जाते पण 'एकोणाविस' म्हटले की तो हमखास नासिककर असतो. नासिककर' नासिक' म्हणतो तर बाहेरचा 'नाशिक'. 'काय वो नाना' म्हटलं की ओळखावं नासिककर समोर आहे.

       नासिककराचे पहिले प्रेम म्हणजे इथली तर्रीदार तिखटजाळ मिसळ. अशी मिसळ की जिच्यात मूग मटकी शेव पोहे असतील व ती बनपावाबरोबर असेल आणि पाहिजे तितका तिखट तर्रीदार रस्सा मिळेल. इथल्या मिसळमध्ये तुम्हाला कधी कधी साबुदाणा खिचडी पण टाकलेली दिसेल. नाशिकची खास ओळख म्हणजे झणझणीत कोंडाजी चिवडा आणि बुधा हलवाईची शुद्ध तुपातील जिलेबी. नासिककर कधी कधी सायंतारा मध्ये साबुदाणा वडाही आवर्जून खाईल. नासिककराला इथल्या गोड द्राक्षांचाही अभिमान असतो. जगभरात नासिकची द्राक्षे प्रसिद्ध आहेत.

        थंड आरोग्यदायी हवामानाचे हे नासिक शहर एकेकाळी निसर्ग रम्य घनदाट वनराईंनी वेढलेले होते. पेशव्यांचा सरदारवाडा इथे पाहिला की वाटते त्यांनाही इथल्या थंड हवामानाची भुरळ पडलेली होती. गोपिकाबाई सुद्धा नासिकजवळ आनंदवल्ली येथे वाडा बांधून राहिल्या होत्या. आजचे नाशिक पाहिले तर निसर्गरम्य वनराईच्या जागी चौफेर सिमेंट क्रांकिटचे जंगल उभे राहिले आहे. नासिक चौफेर विस्तारत चालले आहे. रस्ते चौपदरी होत आहेत. रहदारी वाढली आहे. उड्डाणपूल उभारले गेले आहेत. तिर्थक्षेत्र म्हणून प्राचीन काळापासून नासिकची ओळख आहेच पण  आता द्राक्ष उत्पादक नासिक  वाईनरी मुळे आपली  नवीन ओळख मिळवू पहात आहे. नाशिकचे यशवंतराव मुक्त विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ, अनेक शैक्षणिक संस्था यांचा नासिककरांना अभिमान वाटतो. नासिककर आलेल्या पाहुण्यांचे नेहमी हसतमुखाने स्वागत करतो. 

       आज या नाशिकचा चौफेर झालेला विस्तार पाहिला की थक्क व्हायला होते. काही भाग काळाच्या ओघात बदलून गेले. आधुनिक झाले. जुन्या नासिकातील वाडे कोसळता कोसळता सावरत अजूनही आपला इतिहास अजून जपून आहेत. पंचवटी कारंजा रविवार कारंजा येथे एकेकाळी खरोखर कारंजे होते आणि तिथून टांगे धावायचे. आज फक्त अशी भागांची नावे राहिली आहेत. नासिक कितीही विस्तारले तरी बालपणात जडणघडणीत जे नासिक मी अनुभवले तेच आजही मनात जपून ठेवलेले आहे. नासिकचे प्राचीनत्व, नासिकचा इतिहास, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, गोदावरी उगम असलेली ब्रम्हगिरी पर्वत, पंचवटी, तपोवन इत्यादी पार्श्वभूमीवर नासिकचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून असलेले महत्त्व आठवून अभिमानाने म्हणावेसे वाटते 'होय, मी नासिककर आहे.' या पुण्यक्षेत्राचे गोदाकाठाचे आपल्यावर अनंत ऋण आहेत. याच भूमीत ऋषितुल्य कवि कुसुमाग्रज लाभले. वसंत कानेटकर सारखे नाटककार लाभले. कवि आनंद लाभले. साहित्याची मोठी परंपरा लाभली. स्वातंत्र्य चळवळीत तेजस्वी विचार देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर या भूमीने दिले. आंबेडकर चळवळीतील दादासाहेब गायकवाड याच भूमीत लाभले. अशा नासिक पुण्यभूमीस शत शत नमन!

*@विलास आनंदा कुडके*

Thursday, June 3, 2021

आईच्या आठवणी 20(11/4/2018)

 #आईच्या आठवणी

           आठवणी भरुन आलेल्या आभाळासारख्या असतात. एका आठवणीतून दुसरी दुसरीतून तिसरी तर काहीवेळा मधेच एखादी आठवण डोकावून जाते. लाटेवाड्यात रहात असतानाची आणखी एक आठवण मध्येच आठवली. तेव्हा नगरसूलवरुन सकडे आजी नेहमी घरी यायची. आई तिला मावशी म्हणायची. येताना ती किटलीभरुन काकवी आणायची. तिचे बोलणं नेहमी चिडवून दिल्यासारखे असायचे. ती निघाली की मी तिच्या मागे लागायचो. सकाळी अकरा वाजता नाशिक - नगरसूल गाडी असायची. निघण्यापूर्वी ती जेवून घ्यायची. एकदा मी तिच्या खूप मागे लागलो तेव्हा तिने आईला सांगितले विलासला घेऊन जाते म्हणून. तिच्या बरोबर मी नगरसूलला गेलो. रस्त्यावरच तिचे छोटेसे घर होते. ओटा केलेला. पुढे बाग केलेली. बागेत एका कुंडीत शिवलिंग आणि नंदी होता. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याला हाळी देऊन काय कसे काय म्हणून विचारपूस करायची तिची पद्धत होती. घरात पुढच्या छोट्या खोलीत कोनाड्यात लाल वस्रावर देवाचे टाक होते. पुंजाबा सकडे म्हणजे आजोबा सकाळी गंधगोळी उगाळून देवपूजा करायचे. डोक्यावर आडवी टोपी. धोतर कुर्ता नाहीतर बंडी असा त्यांचा वेष असायचा. देवपूजा झाली की पांढरा गंध कपाळी लावून ते दगडी मूर्ती पाटा वरवंटा घडवायला बसायचे. आजी ऊसाच्या गुरहाळात कामाला जायची. मलाही बरोबर घेऊन जायची. मोठ्या कढाईत हात घालून गरमागरम गूळ खायला द्यायची. घरात काकवी असायची ती भाकरीबरोबर खायला द्यायची. एकदा फाटक उघडून मी खेळायला बाहेर पडलो तर माझ्या पायात मोठा काटा घुसला. माझं रडणं ऐकून आजी धावून आली. घाईघाईने काटा काढून रक्त वहात होते तिथे चूना भरला.

                      आजी कधी कधी जनार्दन पाटलाच्या वाड्यावरसुद्धा कधी कधी कामाला जायची. दत्तु मामा तेव्हा बहुतेक चौथीला असेल. त्याचे मराठी वाचनमाला पुस्तक चौथे मी हातात घेऊन आजीला खोटे खोटे वाचून दाखवायचो. आजी पाटी पेन्सिल द्यायची तेव्हा त्यावर शिवाजी महाराज, देव, देवीचे चित्र काढून दाखवायचो तेव्हा आजीला मोठे कौतुक वाटायचे. आई नगरसूलला गेली की आजीकडेच रहायची. दोघांच्या गप्पा गोष्टी चालायच्या. मध्येच आजीला मला चिडवून द्यायची लहर यायची. आईला मी ठेवून घेते तू एकटाच नाशिकला परत जा असे म्हटले की मला ते खरेच वाटायचे. मग मी भोकाड पसरुन द्यायचो. मला असे रडवायला तिला खूप आवडायचे. आई नगरसूलला आली की ती हमखास आमरस पुरणपोळीचा बेत करायची. घरची परिस्थिती जेमतेम असूनही लेक घरी आली की ती कुठूनतरी उसनवारी करुन हे सर्व करायची.

            आजीच्या घराला लागूनच मारुतीचे मंदिर होते. समोर खंडोबाचे देऊळ. देऊळासमोर चौथऱ्यावर दर शुक्रवारी बाजार भरायचा. त्या बाजारात मी हुंदडत राहायचो. आजी गुडीशेव भेळभत्ता घेऊन द्यायची. कधी कधी काडीला लावलेली गोल गुल्फी घेऊन द्यायची. पावसाळ्यात काही ठिकाणी गढूळ पाणी साचलेले असायचे त्यात आकाश दिसायचे तेव्हा मला आपण त्यात बुडू की काय अशी भिती वाटायची. एकदा पावसाळ्यात बहीण नगरसूलला आल्यावर आम्ही शेतावर मातीत पाय खूपसून खोप करुन खेळत होतो तेव्हा पावसाच्या सरी मातीवर पडून गंध दर्वळला तेव्हा अगदी आनंदून गेलो होतो.

            दांडी पौर्णिमेला खंडोबाची मोठी जत्रा भरायची. बारा गाडे ओढले जायचे. तेथील खंडोबाचे दर्शन मात्र आम्हाला दुसर्‍या दिवशी घ्यावे लागत कारण आमचे कुलदैवत म्हणजे वाकडीचा खंडोबा.

आजी कधी कधी मळ्यात घेऊन जायची तिथे निंबाची बिब्ब्याची घनदाट झाडी होती. आजी बिब्ब्याची गोड फळे वेचून खायला द्यायची.

          एकदा मळ्यात आईने आजीची मदतीने कारण केले होते तेव्हा मी बोकड्याचा बळी देताना पाहिले होते. का कुणास ठाऊक ती घटना माझ्या बालमनावर तेव्हा परिणाम करुन गेली. कुठल्याही जीवाची हिंसा वाईटच असे मनावर ठसून गेली. तेव्हा सगळे जेवले पण मी कशालाच शिवलो नाही.

         आजी तेव्हा भाकरी करुन जा गोपाबाबाला देऊन ये म्हणायची. असाच एकदा मी गोपाबाबाला भाकरी द्यायला गेलो तेव्हा ते उन्ह खात काठी घेऊन बसलेले होते. गोपाबाबा म्हणजे माझ्या वडीलांचे वडील म्हणजे माझे आजोबा. त्यांची नजर गेलेली होती. त्यांना डोळ्यांनी दिसायचे नाही. घ्या बाबा भाकरी घ्या असे म्हटल्यावर ते काठी उगारुन कोण कोण असे करायला लागले. त्यांच्या काठीचा एक फटका मला बसला तसा मी भाकर त्यांच्याकडे भिरकावून तसाच आजीकडे रडत रडत परत आलो. तेव्हा आजी गोपाबाबांकडे जाऊन म्हणाली तुमचा नातू भाकर देतो ते वळखू आले नाही का. तेव्हा आजोबांना पटले त्यांनी तसेच मला जवळ घेतले व चाचपडून कुठे लागले ते पहायला लागले. गावातील पोरं त्यांची चेष्टा करायचे त्रास द्यायचे त्यामुळे ते नेहमी काठी फिरवत राहायचे. अशा या एकेक आठवणी११/४/२०१८

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 19(9/4/2018)

 #आईच्या आठवणी

          आठवणी पाठलाग करीत असतात. आपण विसरु म्हणता विसरता येत नाही. अशीच एक विलक्षण आठवण. बहुधा ते १९६५ चे वर्ष असावे. अंकुश माझा बालमित्र. त्याच्याकडे मी नेहमी खेळायला जायचो. जत्रेत आई मला कचाकड्याची खेळणी घेऊन द्यायची. पंखा, रेडिओ, मोटारगाडी. ती खेळणी कधी एकदा अंकुशला दाखवतो असे होऊन जायचे. अंकुशला ती खेळणी दाखवली की त्याला आत काय आहे याची उत्सुकता असायची. मग तो पंखा रेडिओ मोटार खोलून पहायचा. आत काहिच नसायचे. घरी गेल्यावर आई बघायची मी खेळणी तोडून आणलेली. मग काय प्रसाद मिळायचाच. पुन्हा नवीन खेळणी घेतली की आधीचे काहीच लक्षात नसायचे. मी ती खेळणी घेऊन पुन्हा अंकुशकडे खेळायला जायचो. तो पुन्हा नेहमीप्रमाणे ती खोलून पहायचा. तेव्हा युद्ध चाललेले होते. शत्रूची विमाने घिरट्या घालायची. विमानांचा आवाज आला की आई मला घरी घेऊन जायची. त्यावेळी आम्ही ओट्यावर बसून याव करु त्याव करु अशी कल्पनेने लढाई रंगवत बसायचो. त्यांच्या घराच्या पलिकडे रस्ता ओलांडला की पलिकडे लहानेंचा वाडा होता. तेथील अंगणात गल करुन आम्ही गोट्या खेळायचो. तिथेच तुतीचे एक झाड होते. त्यावर चढून तुतीची लालचुटुक फळे खायचो. आमच्या आवाजाने झोपमोड झालेले घराबाहेर येऊन आमच्यावर ओरडायचे.

                  तिथेच जवळच एक प्रिंटींग प्रेस होता. तिथली जागा बालवाडी चालवण्यासाठी मालकाने एका शिक्षिकेला दिलेली होती. गल्लीतील मुलं तिथे जायला लागली होती. अंकुशही तिथे जायला लागला. मी खेळायला जायचो तर तो बालवाडीत असायचा. त्याचे पाहून मीही बालवाडीत जायला लागलो. शिक्षिका गोरीपान. लाल साडी असायची. लहान माझी बाहुली. मोठी तिची सावली. नकटे नाक उडविती असे म्हटले की ती नाकाला हात लावून दाखवायची. सगळी मुलं गलका करत ते गाणे पाठोपाठ म्हणायची. एकदा मला घरी जायचे म्हणून मी रडायला लागलो तर त्या शिक्षिकेने मला थांब म्हणून उचलून प्रिंटींग मशीनवर बसवले. त्यामुळे मी आणखीनच रडून आकांत केला.

           वडील तेव्हा मला कधी कधी शाळेत घेऊन जायचे. तिथल्या मुली मला पेरु द्यायच्या. गुरुजींचा मुलगा म्हणून माझे सर्व कौतुक करायचे. अंकुशला मी हे सर्व सांगायचो. मग तोही त्याचे वडील भिकुसा विडीच्या कारखान्यात त्याला कसे घेऊन जातात. तिथे तो किती मजा करतो ते रंगवून सांगायचा. एके दिवशी आम्ही वडिलांच्या शाळेत व नंतर कारखान्यात जायचा बेत आखला. दोघे एकमेकांच्या गळ्यात हात घालून अंदाजाने निघालो. खूप चालूनही वडिलांची शाळा येईना. मग अंकुश म्हणाला विडीच्या कारखान्यात जाऊ. मग मार्ग बदलून आम्ही पुन्हा अंदाजाने चालत राहिलो. पण कसचे काय. कारखानाही येईना. सगळी वेल्डिंगची कारखाने मशीद कोंबड्या गॅरेज असे ठिकाण लागले. घरी परत कसे जायचे तेही कळेना. आम्ही अगदी रडेवेले झालो. जवळ जवळ रडायलाच लागलो. एक मुसलमान म्हातारा होता. त्याने आम्हाला रडताना पाहिले. बच्चे भटक गये है असे तो काहीतरी म्हणाला. किसके बच्चे है असे तो करीत राहिला. आम्हाला काहीच सांगता येईना. त्याने मत रोओ मत रोओ करुन पापडी घेऊन दिली. आम्ही ती रडत रडतच खाल्ली.आम्हाला पापडी खाताना रवी भोईर यांनी सायकलवरुन जाताना पाहिले आणि सायकलवर बसवून घरी पंचवटीत आणले. इकडे तोपर्यंत अंकुशची आई बकुळामावशी व माझी आई यांच्यात कडाक्याचे भांडण झालेले होते. तुझ्याच मुलाने माझ्या मुलाला घेऊन गेला असे त्या दोघी एकमेकांना म्हणत एकदम हातघाईवर आल्या होत्या. बराच वेळ भांडण होऊन जिकडे तिकडे शांतता पसरली होती. आता या मुलांना कोठे शोधायचे असा दोघींनाही प्रश्न पडला होता. आई सायंकाळ झाल्याने स्वयंपाकाला लागली होती. तेवढ्यात रवी मामाने मला सायकलवरुन ओट्यावर उतरवले. मला पाहताच आई दाण दाण करीत आली. माझे बखोटे धरुन कोठे गेला होता तडफडायला म्हणून फडाफडा मारायलाच सुरवात केली. जाशील का परत अंकुशकडे म्हणून मला आणखीनच दणके ठेवायला लागली. पलिकडे बकुळा मावशीने पण माझ्या आईचे पाहून अंकुशलाही तसेच खडसावून कुटायला सुरुवात केली. वडील आले तेव्हा माझी आईच्या तावडीतून सुटका झाली. मोठा बाका प्रसंग होता. आज वाटते मारायला का होईना पण आई असायला हवी होती!9/4/2018

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 18(11/4/2018)

 #आईच्या आठवणी

             चंद कागजके तुकडोंपर बची है मा तेरी यादे.. सहज मी आईच्या तसबीरींचा शोध घेतो तेव्हा एक तिची मैत्रीण तारा मावशीबरोबर नाशिककर फोटो स्टुडिओत जाऊन काढलेली तसबीर, गोदाकिनारी जंबूसरची मलेटे कंपनी व मुठाळांची नलू, १९६९ मध्ये पं जवाहरलाल नेहरुंची रक्षा व फुले हेलिकॉप्टरने गोदावरी पात्रात वरुन टाकण्यात आली त्या गर्दीत असलेली, रामाचा रथ निघाला त्यावेळी गाडगे महाराज पटांगणात भरलेल्या जत्रेत बाबांबरोबर हौसेने काढलेली एवढ्या तसबीरी जपता आल्या. भोईरवाड्यात आजीच्या पुढील खोलीत कृष्ण धवल पणजोबा आजोबा यांच्या सह पोरसवदा एक आईची तसबीर होती पण जशी आजी गेली तशा जुन्या तसबीरी त्यांनी काढून टाकल्या होत्या त्यामुळे ती तसबीर काही मिळू शकली नाही.

         भोईरवाड्यातील आठवण आहे. तेव्हा आई वाळवणं करायला आजीच्या घरी जायची. घराच्या उंबरयावर उभी मोठी फळी ठेवून शेवया काढल्या जायच्या. मोठमोठी पितळी पातेले असायची. कुरडया उडदाचे पापड उडदाचे वडे. मोठी गडबड असायची. एकेक पाट उन्हात नेऊन ठेवायची कामगिरी आम्हा मुलांकडे असायची

        आई आजी मावशा पापड लाटायला बसायचे तेव्हा उडदाच्या लाट्या खायला मिळायच्या. मोठी गंमत वाटायची. वृंदा मावशी हंस अंडरसनच्या सुमती पायगावकरांनी मराठीत लिहिलेल्या परिकथेच्या पुस्तकातील छान छान चित्रे दाखवायची. आजीकडे चांदीचे रुपये होते ते कधी काढून दाखवायची. आजीच्या पुढील खोलीच्या ओट्याखाली कोंबड्यांचे खुराडे होते. कधी कधी आजी त्यातून अंडी काढायला सांगायची. त्यातील एक अंडे हळूच मी लाटेवाड्याजवळील पंजाब्याला नेऊन द्यायचो तेव्हा तो पंजाबी खुशीत चाराणे द्यायचा. त्या पैशात आखरावरील दुकानातून गोळ्या बिस्किटे घेऊन खायचो. ही चोरी आहे असे त्यावेळी कल्पनाही नव्हती. बटाट्यांचे वेफर्स जेव्हा आजीने केले मात्र आईने बटाट्याची भाजी केली तेव्हा मला आईचा खूप राग आला. फुगून मी जेवलोच नाही. एवढी चांगली भाजी झाली तरी मी जेवत का नाही म्हणून आईने मला विचारले तेव्हा म्हटले तू बटाट्याचे वेफर्स का नाही केले. वेफर्स फक्त उपवासाला खायचे असतात. रोज बटाट्याची भाजीच खायची असते असे नानापरीने समजावले पण मी रुसूनच बसलो. मग आईने बाजारातून भरपूर बटाटे आणले आणि वेफर्स केले तेव्हा माझे समाधान झाले

           आई जशी लाटण्याने बडवायची तशी हट्टही पुरवायची. पतंगांच्या दिवसात पतंग फिरकी मांजा घेऊन द्यायची. नागपंचमीला घरात झोके बांधून द्यायची.

        नगरसूलची आजी म्हणायची लेकीला मी किती त्रास देत असतो असं म्हणून मला चिडवून द्यायची व थांब तुझ्या आईला घेऊन जाते म्हणून मला घाबरावयाची.

        तेव्हा बजूदादा भोईर निवडणूकीत उभे राहिले तेव्हा आई प्रचार मिरवणूकीत घेऊन गेली होती. बिल्ले झेंडे वाटणे. मिरवणुकीत नारे देणे यात आई हिरीरीने सामील झाली होती. तो गजबजलेला काळ आठवतो. बजूदादा भोईर तेव्हा दांडपट्टा असे फिरवायचे की पहात रहावे. ते निवडून आले तेव्हा गुलाल उधळत मोठी मिरवणूक निघाली होती. आम्हा मुलांनाही तेव्हा भोईरवाड्यात दांडपट्टा लेझीम शिकवण्यात आले होते.

         नेताजी भोईर तेव्हा भोईरवाड्यात एकेक नाटकांची रंगीत तालीम घ्यायचे. लाल कंदिल, काळाच्या पडद्यातून, आमार सोनार बांगला अशी कितीतरी नाटके आम्ही मुलांनी तेव्हा पाहिली. नेताजी भोईर तेव्हा नाटक बसवायचे आणि स्पर्धेला घेऊन जायचे. स्पर्धेत मिळालेले कप आणि प्रमाणपत्र त्यांनी आपल्या खोलीत लावून ठेवलेले होते. नेताजी भोईरांना आम्ही दादामामा म्हणायचो. पास झालो की त्यांच्याकडे निकालपत्रक घेऊन जायचो तेव्हा ते प्रत्येकाला पेढे आणायला चार चाराणे द्यायचे. दुपारी ते खोलीत झोपायचे तेव्हा त्यांचे पायाची बोटे ओढण्याचे ते प्रत्येकाला पाच पाच पैसे द्यायचे. गणपतीच्या दिवसात भोईरवाड्यात गणपती करायचे. आम्हीही इवलेसे गणपती करुन पहायचो. एकदा दादामामांना शिवाजी महाराजांवरील नाटकाच्या वेळी स्टेजवर चक्कर आली होती. तेव्हा लक्षात आले की नाटक सुरु होण्यापूर्वी रंगदेवतेला नारळ फोडायचे राहून गेले म्हणून हा त्रास झाला. दादामामांचे बँडपथकही होते. तिथे रात्री नेहमी प्रॅक्टिस चालायची ती घरी ऐकू यायची.

           आई देव्हारयात छोटा गणपती बसवायची व गणपतीच्या मागे कागदाची उलगडून बसवायची रंगीबिरंगी महिरप सजवायची. फुलपात्रात किसलेले खोबरे व साखर असा प्रसाद करायची. विसर्जनासाठी गणपतीची मूर्ती ती भोईरवाड्यात देऊन टाकायची. तिथे ती ट्रकवर मोठ्या मूर्तींबरोबर मिरवत मिरवत गोदावरी पात्रात विसर्जित व्हायची. मोठा आनंदाचा तो काळ होता.११/४/२०१८

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 17(10/4/2018)

 #आईच्या आठवणी

       आठवणी व्याकुळही करुन टाकतात. मन आक्रंदायला लागते. डोळे एकसारखे भरुन येतात. काही केल्या पाणी खळत नाही. असाच तो कालावधी होता. गाणगापूरहून आतेमामा, आत्या, सावत्र भाऊ बहीण परतले.

         सुरुवातीला ते गोदावरी ओलांडायची नाही म्हणून मधल्या होळीत बुधा हलवाई आणि गोरख पान गादीच्या गल्लीत भाड्याने खोली घेऊन राहिले. आई डब्यात पीठ घेऊन त्यांना नेऊन द्यायची. बरोबर मीही असायचो. एके दिवशी ते लाटेवाड्यात परतले. आतेमामाने दाढी वाढवलेली होती. आत्या छातीतील कर्करोगाने ग्रासलेली होती. फार मायाळू. मी कधी आईबरोबर गाणगापूरला जायचो तेव्हा ती मायेने इलास हाक मारुन जवळ घेऊन डोक्याला तेल लावून द्यायची. मोठा सावत्र भाऊ मठात तिर्थ द्यायला होता. मठात भक्तांकडून मिळणारे पेढे नारळे घरी घेऊन यायचा. काही भक्त सोन्याची साखळी अंगठी द्यायचे ते त्याच्या गळ्यात बोटात असायचे. सकाळी आंघोळ करुन सोवळे नेसून तो मठात जायचा. मठाच्या देवडीवर पहाटेपासून चौघडा झडायचा.

            दगडी फरशांचे आवार होते. मठासमोर उंच मंडप होता. आत्या कधी कधी सायंकाळी आरतीला त्या मंडपावर चढून जायची व तरातरा खाली उतरायची. तेव्हा ती खाली पडेल की काय म्हणून फार भिती वाटायची. भाऊ मला उंच उचलून झरोक्यातून नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका आणि त्रैमूर्तीचे दर्शन घडवायचा. मठा बाहेर तसबीरींची दुकाने होती. तिथे मी एकेक तसबीर निरखित हरखून जायचो. गुरुचरित्राच्या सुट्ट्या अध्यायांच्या पुस्तकांवर दत्तात्रेय महाराजांची चित्रे मनमोहक असायची. दुपारी सगळे बारा ते साडेबारा या दरम्यान माधुकरी मागायला निघायचे. घरोघर ओट्यावर माधुकरी मागायला आलेल्यांना शेंगदाणे गुळ भाजी पोळी वरण भात असे काही काही पदार्थ माधुकरी म्हणून वाडग्यात वाढायचे. पाच घरी माधुकरी मागितली की मिळेल त्यावर रहायचे असा नियम होता. घरी स्वयंपाक नव्हता. पहाटे उठून सर्व भीमा अमरजा संगमावर आंघोळीला जायचे. तिथे भस्माचा डोंगर होता. आई नेहमी तेथून घरी घेऊन जाण्यासाठी भस्म घ्यायची. वाटेत दत्तात्रेय महाराजांचा विश्रांती कट्टा लागायचा.

         मठात चंदन केसर कापूर यांचा दर्वळ असायचा. दर्शनाला आलेल्या सेवेकरयांच्या प्रदक्षिणा चालू असायच्या. आवारात गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले सेवेकरी असायचे. कधी मठातून दत्तात्रेय महाराजांची पालखी निघायची. मोठे अद्भुत वातावरण होते ते.

        आत्या घरी आली ती अंथरुणाला खिळूनच होती. एके दिवशी मी झोपेत असताना सगळ्यांचे रडण्याचे आवाज ऐकू आले. आत्या गेली होती. तिला हिरवे पातळ हिरवा चुडा तोंडात विडा असे अंगणात सजवून ठेवले तेव्हा सर्व हंबरडा फोडत होते. मला काहीच समजत नव्हते पण मीही गलबलून गेलो होतो. आतेमामा धायमोकलून रडत होते. सर्वच रडत होते. नंतर लक्षात आले की आत्या आता उठणार नाही. तिला चौघांनी खांद्यावर नेले तेव्हा आईने मला जवळ घट्ट धरुन ठेवले होते. मृत्यू म्हणजे काय हे कळत नसलेल्या वयात एवढ्या जवळून पाहिलेला तो पहिलाच मृत्यू होता. 

             आत्या गेल्यानंतर आतेमामा भाऊ बहीण आणि आम्ही एकत्र त्याच घरात राहू लागलो. मधेच कशावरुनतरी बिनसले. आईने सगळी पितळी भांडी कुंडी भोईरवाड्यात आजीच्या घरी नेऊन ठेवली. आम्ही त्या वाड्यातून निघून आजीकडे रहायलो गेलो. आई मग दिवसभर भाड्याची खोली शोधायला बाहेर जायची. चरण पादुका रोडला बोराडे यांच्या सीता स्मृती वाड्यात पहिल्या मजल्यावर एक खोली मिळाली. तीस रुपये महिना भाडे होते. तेथून मी श्रीराम विद्यालयात जायचो.

         एकाएकी आईला पोटात त्रास सुरु झाला. ती म्हणायची कोणीतरी पोटात शिंगं मारतय. अनेक ठिकाणी दाखवून झाले पण त्रास काही कमी होत नव्हता. राणा प्रताप चौकात एक धोबी होता. त्याच्या घरी ती जायची. तो काहीतरी उपचार करायचा पण गुण येत नव्हता. कोणीतरी सांगितले मेनरोडकडे विश्रामबागेत एक नाथपंथी आहे. तिथे गुण येईल. आई मला तिथे घेऊन जायला लागली. केशवपुरी गोसावी संसारी होते. नाशिकरोडला प्रेसमध्ये होते. गोसावी वाडीत त्यांचे घर होते. ते भक्तांसाठी विश्राम बागेत यायचे. छोटीसी खोली होती. धुनीजवळ देव्हारयात सप्तशृंगीची पितळी मूर्ती होती. ते बसायचे तिथे पाठीमागे त्यांच्या गुरुची तसबीर होती. तसबीरीत भगव्या वेशात दाढी वाढवलेले ते नाथपंथी साधू होते. केशवपुरी महाराज ब्रिस्टॉल सिगारेट ओढायचे. येणाऱ्या भक्तांना आयुर्वेदीक औषधे विनामोबदला द्यायचे. सप्तशतीचे पाठ करायचे. तेवढ्याशा खोलीत भिंतीवर सगळ्या देवदेवतांच्या तसबीरी लावून ठेवलेल्या होत्या. त्रिकाळ ते सर्व देवांना धूप अगरबत्ती करायचे. गुरुवारी भक्तांची गाऱ्हाणी ऐकून उपाय सांगायचे. त्यांच्या अंगात भगवे जाकीट आणि धोतर असा वेष असायचा. दाढी केलेली असायची. त्यांच्या कानावर दाट केस होते. त्यांच्या पायावर डोके ठेवायला आई सांगायची. वडीलही बरोबर असायचे. तेही त्यांच्या पायावर डोके ठेवायचे. एके दिवशी त्यांनी आम्हा सर्वांना अनुग्रह दिला. मला गुरुसाठी फळ सोडायला सांगितले तेव्हा मी म्हटले नारळ तेव्हा म्हणाले नारळ नको. मग तुला प्रसाद खाता येणार नाही. कसेबसे सगळी फळे आठवून शेवटी मी रामफळ सोडले. गुरुपौर्णिमेला गोसावी वाडीत त्यांचा मोठा उत्सव असायचा. त्या दिवशी ते सर्व जमलेल्या भक्तांना अध्यात्मिक उपदेश करायचे. मालपुव्याचा प्रसाद द्यायचे. तेव्हा मला गुरु म्हणजे काय ते तितकेसे कळत नव्हते. त्यांनी एकदा विचारले तू गुरु का केला. मी म्हटलं मला ब्रम्ह ज्ञान हवे. आईकडून ऐकलेला शब्द तेव्हा मी उच्चारला तेव्हा ते माझ्या लहान वयाकडे पाहून नुस्तेच हसले होते.

                   आईचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. स्वयंपाकसुध्दा तिला करता यायचा नाही. मला शाळेत जायचे असायचे तेव्हा ती मला ताटात दूध पोहे साखर घालून द्यायची. कधी कधी वडील स्वयंपाक करायचे. नंतर नंतर ती गुडघ्यात डोके खुपसून बसायची. तिला होत असलेल्या त्रासाची कल्पना येत नसायची. चिडचिडेपणाही वाढला होता. एकदा मी स्काॅलरशीपला बसायला फीचे पैसे मागायला लागलो तर ती वैतागली. काही मिळायचे नाही पैसे. निबंधाच्या वह्यांनाही पैसे मिळेना. मला वर्गात तोंड दाखवायची लाज वाटू लागली. एके दिवशी आईचे व वडीलांचे कशावरुनतरी कडाक्याचे भांडण झाले. वडील मला घेऊन घराबाहेर रात्री एक सतरंजीची वळकटी घेऊन बाहेर पडले. जिना उतरुन आम्ही खाली ओट्यावर आलो. शेवग्याचे झाड होते. खरं तर वडीलांना रागाच्या भरात असताना मला घेऊन कुठेतरी दूर जायचे होते.

पण आम्ही रात्रभर डासांचा मारा सहन करीत शेवग्याखाली ओट्यावर सतरंजी अंथरुन आणि तिच थोडी अंगावर ओढून झोपलो पण आई काही जिना उतरुन खाली आली नाही कुठे गेले ते पहायला. आईला वडीलांचा स्वभाव माहित होता. कितीही भांडले तरी ते एकवेळ त्यावेळी घराबाहेर जातील पण घर सोडून जाणार नाही.

माझे सातवीचे वर्ष होते. घर सोडून गेलो तर माझ्या शिक्षणाचे काय असा वडीलांना प्रश्न पडला असावा. सकाळी पुन्हा जिना चढून आम्ही दरवाजा ठोठावला. आईने दरवाजा उघडला. म्हणाली फिटली का हौस. बोराडे आठवतात. पत्नी गेल्यानंतर एकटेच भाड्याने दिलेल्या खोल्यांची देखरेख करीत असायचे. रात्री दहाला लाईट बंद म्हणजे बंद असा त्यांचा दंडक होता. मेन स्वीच दहाला आॅफ करण्यापूर्वी ते सर्वत्र फिरुन जेवणं झाली का असे विचारायचे. त्यांची मुलगी आमच्या शेजारीच रहायची. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. ते काही खायचे झाले की दोन्ही हातांनी लपवून खात. शेजारी एक शिक्षक होते. ते सदाचार चिंतामणी पुस्तक वाचत असायची. मलाही बोलावून वाचून दाखवायचे. अशा एकेक आठवणी.

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 16(10/4/2018)

 #आईच्या आठवणी

            सहानेवर चंदन उगाळावा तशा या आठवणी मनाच्या सहानेवर जो जो उगाळत जाव्या तसतसं मन त्या सुगंधात दर्वळायला लागते. मन प्रफुल्लित होऊन जाते. आई गव्हाळ वर्णाची होती. डोळे तपकिरी सुंदर होते. केसांचा अंबाडा बांधायची. नववारी नेसून अंबाड्यावरुन पदर घ्यायची. घरातील सर्व कामे आटोपली की कधी कधी ती मैत्रिणींबरोबर चित्रमंदिर मधुकर हेमलता टाॅकीजला सिनेमाला जायची. ब्लॅक अँड व्हाईट देवदेवतांचे राजेरजवाडीचे धार्मिक सिनेमे तिला आवडायचे. तेव्हा तिकीट दरही एक रुपया दोन रुपये तीन रुपये असे असायचे. कधी मला सिनेमाला घेऊन जायची तेव्हा सिनेमातील सैन्य घोडे जसे काही आपल्या अंगावर येत आहे का या भितीने मी घाबरुन जायचो आणि आईला अगदी बिलगून बसायचो. मी आईच्या मांडीवर असायचो त्यामुळे माझे तिकीट काढलेले नसायचे. अंधाराचीही मला प्रचंड भिती वाटायची. त्यामुळे मला घरात ठेवून बाहेरुन कडीकुलूप लाऊन आई सिनेमाला जायची. मला स्वयंपाक घरात काहीतरी नादी लावून अलगद जायची. दार उघडायचा मी प्रयत्न करायचो तेव्हा लक्षात यायचे की आई बाहेर गेलेली आहे. मीनाकुमारी आईची आवडती नटी होती. तिचे सिनेमे तिने कितीतरी पाहिले होते. कधी कधी ती म्हणायची तिचे जीवनही एक कादंबरीसारखे आहे.

          ती अशी सिनेमाला गेली की घरात कोंडलेला मी अस्वस्थ होऊन जायचो. स्वयंपाक घरात खांबाला टांगलेल्या ट्रान्झिस्टरकडे कडे पहात रहायचो. तो बंद असायचा. माझा हात पुरु नये म्हणून तो उंचावर टांगलेला असायचा. आईने ट्रान्झिस्टर आणला तेव्हा त्यात गाणारी बाई आत कुठे बसलेली आहे हे मी डोकावून डोकावून पाहिले होते तेव्हा मला अगदी नवल वाटले होते.

            मला आठवते तेव्हा हेमलता टाॅकीजमध्ये जय संतोषी माता सिनेमा लागलेला होता. तुफान गर्दी असायची. गल्लीतील बायका त्या सिनेमाला जायच्या. आई दर शुक्रवारी त्या सिनेमाला मला घेऊन जायची. सोळा शुक्रवारचे व्रत तिने केले होते. त्या दिवशी ती मला बाहेर खेळायलासुध्दा जाऊ द्यायची नाही. बाहेर जाऊन मी कुठेतरी आंबट खाईल अशी तिला भिती वाटत रहायची. सोळा शुक्रवार ती मनोभावे पोथी वाचायची आणि चण्याच्या भाजी पोळीचा संतोषी मातेला नैवेद्य दाखवायची. उद्यापनाला वडीलांच्या शाळेतील सर्व शिक्षक घरी आले होते. कोणी कडीचा डबा. कोणी ग्लास. कोणी ताट असे काही काही दिले होते. मी पंक्तीत वाढायची कामगिरी केली होती तेव्हा सर्वांनी माझ्या इवल्या हातांनी वाढण्याचे कोण कौतुक केले होते. आई नथ घालून सर्वांना जेवणाचा आग्रह करीत होती. पुढील देवघर तेव्हा अगदी गजबजून गेले होते.

         तेव्हा सिनेमाचे मोठमोठे पोस्टर हातगाड्यावर ठेवून रस्त्यावर स्पिकरवर ओरडून सिनेमाची जाहिरात केली जायची. कधी कधी टांग्यावर पोस्टर ठेवून आणि सिनेमाच्या गाण्याची घडी घातलेली रंगीत पुस्तिका फुकट वाटून आणि स्पिकरवर सिनेमातील गाणे वाजवून जाहिरात केली जायची. आम्ही पोरं ती पुस्तिका गलका करुन टांग्याच्या पाठीमागे पळून मिळवायचो.

         पोस्टरवरची चित्रे तेव्हा हाताने रंगवलेली असायची. भोईरवाड्यात मी आजीकडे जायचो तेव्हा तिथे वृंदा मावशीकडे फिल्मी संगित नावाचं गाण्याचे मासिक असायचे. त्यात तेव्हाच्या सिनेमातील सर्व गाणी असायची. आई घेऊन द्यायच्या खेळण्यांमध्ये मग छोटा कचकड्याच्या सिनेमा मला घेऊन द्यायची. तेव्हा मालविय चौकात एका दुकानात पाच पैशाला पाच याप्रमाणे कट केलेल्या फिल्म मिळायच्या. त्या मी आणून छोट्या सिनेमात त्या पहायचो. पहात असताना तेव्हाचे आवडलेले गाणे रिमझिम बरसका सावन होगा ते गुणगुणायचो तेव्हा सिनेमा पाहत असल्यासारखा भास व्हायचा. असे ते रंगीत दिवस होते.10/4 /2018

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 15(8/4/2018)

 #आईच्या आठवणी

            एकाएकी आभाळ भरुन यावे तशा या आठवणी. गेलेले दिवस पुन्हा मनात परतून येतात आणि चिंब चिंब भिजवून टाकतात. अगदी अबोध मन होते तेव्हाच्या आठवणीही तरळून जातात. एक आठवण अजूनही सारखी अस्वस्थ करीत राहते. पंचवटीत तेव्हा घोटकरांच्या घराच्या ओट्यावर वडील मला कुशीत घेऊन झोपायचे. आत खोलीत आई झोपायची. मला लवकर झोप लागत नसायची. मग मी मंद रस्त्यावरील बल्बच्या उजेडात हलणारया निंबाच्या पानांकडे पहात कितीतरी वेळ जागाच रहायचो. एकदा त्या निंबाच्या पानाच्या हालचालीत एक बाई सज्जात हातात ताट घेऊन काहीतरी निवडत असल्यासारखा भास झाला. बल्बचा उजेड त्या पानांवर पडलेला अगदी अद्भुत होता. एकामागून एक चित्र सरकावे तसे मी त्या हलणारया पानांमधून ती बाई अंगण झाडत आहे. पाणी भरुन ठेवत आहे अशा चित्रभासात हरवून गेलो. कदाचित उघड्या डोळ्यांना दिसलेले ते एक स्वप्नही असावे. मला नेहमी प्रश्न पडतो की काहीच कळत नव्हते त्या वयात नेमके ते भास काय असावे कळत नाही.

         समोरच बोळीत उंच पार करुन उंबराचे झाड होते. तिला लागून असलेल्या खोलीत एक फेरीवाला रहायचा. एका काठीला खेळणी चष्मे पिपाण्या भिरभिरे शिट्ट्या लावून तो दिवसभर ती विकायचा. एकदा आम्ही सारया लहान पोरांनी त्याच्या खोलीत डोकावून पाहिले तर कोपर्‍यात खेळण्याची काठी उभी करुन तो परातीत शेव कुरमुरे आणि दोन बुंदीचे लाडू घेऊन सावकाश खात होता. एकटाच होता. घरी दुसरे कोणीही नव्हते. कदाचित तेच त्याचे जेवण असावे. तिथल्या उंबराच्या पारावर आम्ही पोरं किती धुडगूस घालायचो पण तो जराही रागवायचा नाही.

          घोटकरांच्या घरातील तेव्हाची ती खोली अंधारी होती. आत चुलीच्या जाळात स्वयंपाक करीत असलेली आई रस्त्यावरुनही सहज दिसायची. माझ्या पाठीवर एक भाऊ होता मला. त्याला घेऊन आई बाजेवर पहुडलेली असायची आणि मी बाजेला टेकून ताटात वाढून दिलेला दूध भात वेचून वेचून खात असायचो. नंतर तो भाऊ रात्री एकाएकी गेला.

            तेव्हा सार्वजनिक नळावरुन वडील हंडे भरभरुन आणायचे तेव्हा मी झोपेत असायचो. पण त्यांच्या पायांची धाप धाप मला झोपेत ऐकू यायची.त्याच नळावर आम्ही पोरं घसरगुंडी खेळायचो. जवळच शामराव यांचे घर होते. ते सायंकाळी दारु पिऊनच घरी यायचे आणि ओसरीवर बराचवेळ एकटेच कोणालातरी शिव्या देत रहायचे. 

            सकाळीच एक नाथपंथी अल्लख निरंजन म्हणत यायचा. त्याच्या कमरेला सोडलेल्या एका घुंगराचा हेलकाव्याने निघणारा नाद अजून माझ्या स्मरणात आहे.

           बहुधा तेव्हा कुंभमेळा असावा. तेव्हा एक साधू घरी आला होता. वडिलांच्या भालप्रदेशावरील रेषा पाहून त्याने वडिल खूप भाग्यशाली असल्याचे उद्गार काढले होते असे मला आठवते. घराच्या पाठीमागे तारा मावशी माझ्या आईची जिवलग मैत्रीण रहायची. ती नेहमी घरी जिलेबी तळायची व मला हाक मारुन जिलेब्या खायला द्यायची. एकदा वडीलांनी माझ्यासाठी जव जवान ड्रेस आणला होता. तो घालून मी ओट्यावर कितीतरी वेळ स्टाईलमध्ये हुंदडत राहिलो. गल्लीत घरोघरी जाऊन मिरवून आलो होतो मला आठवते.

           समोरच्या बोळीत छत्रे कंपनी रहायची . चेहऱ्यावर रबराचा मास्क चढवून भो करुन ते मला एकसारखे गंमतीने घाबरवत रहायचे. एकदा तर दक्षिणेकडून उगवलेल्या लालसर चंद्राकडे बोट दाखवून तो बघ आला तुला खायला म्हणून घाबरवले तेव्हा मी धूम ठोकून आईकडे आलो होतो तेव्हा आईने त्यांना चांगलेच दटावले होते. त्याच घरात नगरसूलच्या सकडे आजीने मला बाहेरील मोरीत पायांवर पालथे पाडून तेल लावून चोळून चोळून आंघोळ घातलेली होती. कितीतरी आठवणी मनात गर्दी करतात.8/4/2018

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 14(8/4/2018)

 #आईच्या आठवणी

      आईची आठवण काढता काढता आपल्या आयुष्याचा पट उलगडत चाललाय. खूप दिवसात न उघडलेला फोटो अल्बम चाळायला घ्यावा तसे झाले आहे. एकेक फोटो पाहताना जसे एकेक घटना आठवत जावी तसे होत आहे. आई दिवाळीला मला घेऊन नंदूरबारला जायची. तेथे एका वाड्यात भाड्याच्या खोलीत वारी आजी शरद मुरलीधर व शिवाजी मामा रहायचे. शिवाजी मामा तेव्हा बहुतेक चौथीला होता. सकाळी सायकलवर घरोघरी पाव विकायचा. वारी आजी धुणीभांडीची कामे करायची. घरी येताना पदराखाली झाकून मालकिनीने दिलेले वरण भात भाजी पोळी आणायची. आई सांगायची. आजी ज्या घराण्यात दिली ते श्रीमंत घराणे होते. नारायण लक्ष्मणराव शेळके म्हणजे माझे आजोबा त्यांना सगळे अप्पा म्हणायचे. अप्पा गेल्यानंतर तेथे शेतीत शेण उचलायचे काम आजीला अपमानास्पद वाटल्याने ती मुलांना घेऊन नंदूरबारला पळून आली होती.

           नंदूरबारला भाड्याची छोटी खोली होती. उन्हाळ्यात एके रात्री सगळे गरम होते म्हणून दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. शरदमामा उंबरयावर उशी ठेवून झोपला होता. सगळे गाढ झोपेत असताना कधी चोर घरात शिरले आणि त्यांनी अलगद घरातले सगळे सामान लंपास केले कोणाला कळले सुद्धा नाही. सकाळी सगळे उठून पाहतो तर पिण्याच्या पाणाचा माठ सुद्धा नाही. प्रातर्विधीला जायला डबा नाही. आंघोळीला पातेले नाही. घराच्या ओट्याखाली पाण्याचा नळ होता. तिथेच मग सगळ्यांनी हातपाय तोंड धुतले. नव्याने मग एकेक वस्तु आणून वारी आजीने पुन्हा छोटासा संसार उभारला. दिवाळीच्या दिवसात आजी रहायची त्या गल्लीत सर्वत्र शेणाचा सडा सारवण असायचे त्यामुळे वातावरणात तोच दर्वळ असायचा. आजी व आई धुणे धुवायला तापी नदीच्या काठी जायचे. तिथल्या एका खडकावर मी नदीच्या लाटा पहात उभा रहायचो तर असा भास व्हायचा की मी उभा असलेला खडक पाण्यातून लाटा कापत पुढे पुढे चालला आहे. मोठी मौज वाटायची. तिथेच एक मारुतीचे मंदिर होते. गल्लीत फटाके फुटत रहायचे आणि रस्ता कपट्यांनी भरलेला असायचा व जळालेल्या दारुचा वास येत रहायचा. मुरलीधर मामा मला बाजारातून बंदूक आणि टिकल्यांची पाकिटे घेऊन द्यायचा.

               आजी रहायची त्याच्या शेजारीच वयस्क आजोबा होते. ते टॅक्सी चालवायचे. मी हळूच डोकावून ते काय करतात ते पहायचो तर ते चहाच्या कपात लालसर तपकीरी पेय पित बसायचे. त्यांचे डोळे तारवटलेले लाल झालेले असायचे. मला का कोणास ठाऊक पण त्यांची भिती वाटायची. आईपण दम द्यायची तिथे जाऊ नको म्हणून पण मी आईचा डोळा चुकवून हळूच तिथे डोकवत रहायचो. त्या आजोबांनी मला डोकावताना बघितले व प्यायचे थांबवून आत ये म्हणाले. काय आहे चहा आहे का म्हणून मी जिज्ञासेपोटी कपाकडे बोट दाखवून विचारले तर ते हसत म्हणाले की तुला प्यायचे का. मी मान हलवली. त्यांनी दुसऱ्या कपात बाटलीतून काहीतरी ओतले. तेवढ्यात आईची हाक आली 'विलास' मी तिथूनच ओ दिली. नंतर लक्षात आले की आपल्याला इथे यायला आईने सांगितले नव्हते. आता आईचा मार बसून माझी लटलट सुरु झाली. आईच्या हाका सुरुच होत्या. मी कसाबसा घाईघाईने तिथून जायला लागलो तर माझा तोल जाऊन मी खाली नळ होता त्या दगडी चौकात जाऊन पडलो. डोक्याला नळ लागून चांगली खोक पडली. रक्त यायला लागले. तेवढ्यातही आईने चांगलेच कुथलून काढले. एक दिवस सुखाचे खाऊ देत नाही. काहीतरी रोज डोक्याला ताप करुन ठेवतो. सांगितले होते ना जाऊ नको तिथे. का गेलास तिथे म्हणून ती मला दणक्यावर दणके ठेवत होते. मामा कंपनी धावून आली. आजोबाही बाहेर येऊन त्यांनी आईला विनवले. माझे रडणे सुरुच होते. कसेबसे खोक पडली तिथे आजीने हळद दाबली. मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता. आज अगदी जसाच्या तसा आठवतो.8/4/2018

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 13(7/4/2018)

 #आईच्या आठवणी

             आठवणी एवढ्या सुंदर आणि सुगंधी असू शकतात हे मला आज इतक्या वर्षांनी उमगले. १९६७ ते १९७४ चा तो कालखंड एकेक गंमती जमतीने भरलेला होता. सुरवातीला घोटकरांच्या घरात मग आतेमामा आत्याला घेऊन गाणगापूरला गेले तेव्हा लाटेवाड्यातील त्यांचे घर ते गाणगापूरहून परत येईपर्यंत रहायले दिले होते. पुढील खोलीत त्यांचेच देवघर होते. आई सकाळ संध्याकाळ तेथे दिवा लावायची. दत्ताची नृसिंह सरस्वती यांची मोठी तसबीर व पुढे चंदनी पादुका मोठा शंख आणि घंटी असा कोपर्‍यात देव्हारा होता.

             याखेरीज एकमुखी दत्ताच्या किंवा देवमामलेदार यशवंतराव यांच्या यात्रेत मातीची रंगीत दत्ताची मूर्ती आई घेऊन द्यायची तिची खोटी खोटी पुजा मी वेगळ्याच खणात खिडकीजवळ मांडायचो. ते वेगळेच. सगळे घरच दत्तभक्तीत होते. 

           आईने मधल्या अंधारया खोलीत वर उंचावरल्या कोनाड्यात आपले देव ठेवलेले होते. तिथे ती सकाळ संध्याकाळ तुपाची निरंजनी लावायची. मला देव काही दिसायचे नाही पण निरंजनाचा उजेड तेवढा दिसायचा. आई दोन्हीकडे हात जोडायला सांगायची. सायंकाळी ती नेहमी कुठलेतरी गाणे गुणगुणत रहायची.

           पुढील देवघर आणि मधली अंधारी खोली यांच्यात एक जिना होता. त्या पायर्‍यांवरुन मी खेळून आलो की दबकत दबकत वर येऊन बाबा आले आहे की नाही याचा अंदाज घ्यायचो. बाबांचा बराच वेळ आवाज आला नाही की तसाच खाली उतरुन पुन्हा अंगणातील गोल दगडावर बसून सायंकाळी बाबांची वाट पहात वर आकाशाकडे नजर लावून बसत असत. पावसाळ्यात आकाशाचे बदलते रंग पाहता पाहता त्या रंगात मी हरवून जायचो. ढगांवर पडलेल्या मावळत्या किरणांनी जणूकाही एक रस्ता आणि त्यावरुन बाबा पिशवी घेऊन येत आहेत असा मला भास व्हायचा.

         बाबा घरात आल्याशिवाय मी घरात जात नसे कारण ते घरात असले की आईला मला मारता यायचे नाही. तरी देखील मारलेच तर बाबा विनवायचे पमा नको मारत जाऊ पोराला.

         आई मला मारायचे म्हणून मारत नव्हती. एकूण सगळ्या परिस्थितीचा संताप ती माझ्यावर काढायची. नंतर तिचा तिलाच पश्चाताप व्हायचा आणि मग ती जवळ घेऊन कुरवाळत रहायची. कोणी म्हणायचे तिला गरका येतो. पण तसे नव्हते. स्वतःचं घर असावे असे तिला नेहमी वाटायचे. एक महंत उत्तर प्रदेशात जायला निघाला तेव्हा त्याने त्याची पंचवटीतील गजानन चौकातील जागा विकायला काढली होती. अवघ्या ३०० रुपयात. आईने पोटाला चिमटे काढून थोडे थोडे करुन तेवढे पैसे गुपचूप गाडग्यात वडीलांच्या नकळत जमवलेही होते. आईने ती जागा घ्यायचा विषय बाबांकडे काढला तेव्हा वडिलांना त्या बचतीबद्दल कळले.

         नेमके त्याचवेळी आत्याने बाबांकडे हट्ट धरला एक सायकल घेऊन द्या. आतेमामा तेव्हा बांधकामाच्या कामासाठी काम मिळेल तिथे जायचे. त्यांना कामावर जाण्यासाठी सायकल लागत होती. झालं बाबांनी आईकडून ३०० रुपये घेऊन बहिणीकरिता आतेमामाला सायकल घेऊन दिली आणि ती जागा हातची गेली. आतेमामा नेहमी म्हणायचे मास्तर मागच्या बाजूला खोल्या बांधायच्या आहेत त्यातली एक खोली तुम्हाला. वडीलही त्या भरवशावर तिथेच लाटेवाड्यात राहिले पण ते बांधकामही झाले नाही आणि खोली मिळणे तर दूरच. 

पण ते घर आजही माझ्या मनात आहे. एकदा मी दुपारी झोपेतून उठलो तर खिडकीत संध्याप्रकाश दाटलेला. मला वाटले सकाळ झाली म्हणून मी शाळेत जायचे म्हणून तयारी करायला लागलो तर आई म्हणे आता कुठे शाळा आहे. शाळा उद्या आहे. आणि खरेच थोड्यावेळाने अंधारले व रात्र झाली.

          स्वयंपाक घरात बारदान व फळ्यांचे पार्टीशन होते. पलिकडे कंदिलाच्या उजेडात सायंकाळी इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, देवाचे घर बाई उंचावरी अशी कविता ऐकू यायची.

           लाटेवाड्याला उत्तरेकडे एक चिंचोळी बोळ होती. त्या बोळीतून भोईरवाड्याकडे जाणे येणे व्हायचे. एकदा तर गंमतच झाली. येण्याजाण्याच्या वाटेवर एक बकरी रवंथ करीत बसली होती. मी लहान. पलिकडे कसे जायचे या विवंचनेत पडलो. तिच्यावरुन टांग टाकून जायला लागलो तर ती धडपडत उभी राहिली आणि मी पडलो दातावर. पुढचा दात खालच्या ओठातच शिरला. मग रडारड. हळद जखमेत भरणे असे सगळे झाले. तिथेच रखमा व त्याची मंडळी रहायची. दोघेही विठ्ठल भक्त. घरची गरिबी. दिवाळीला विठ्ठलाच्या फोटोपुढे फक्त एक पणती लावायचे. रखमा मग कोरे धोतर कुर्ता घालून वर टोपी चढवून बुक्का कपाळी लावून सकाळीच घरोघरी जाऊन काय कसे काय चालले विचारायचा. तिथे दिलेला बशीभर फराळ तारीफ करीत चाखायचा. अशा रितीने त्यांची दिवाळी व्हायची. त्यावेळी उन्हाळ्यात घरोघरी सातुचे पीठ गुळात मिसळून चाटून खायचे. असे सगळे आठवते.७/४/२०१८

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 12(6/4/2018)

 #आईच्या आठवणी 

            मला लहानपणापासून खिडकीचे आकर्षण आहे. लाटेवाड्यात माझे बरेचसे बालपण पहिल्या मजल्यावरील आतेमामाच्या घरात गेले. पुढे उतरत्या कौलारु छताखाली छोटे स्वयंपाक घर. मध्ये अंधारी आयताकार खोली. जिना. पलिकडे देवघर. स्वयंपाक घरात छोटी गजांची खिडकी होती आणि उभे राहता येईल अशी भिंतीच्या जाडीइतकी जागाही होती. या खिडकीचे वैशिष्ट्य म्हणजे या खिडकीत मी शिरुन गजांना घट्ट धरले की आईला बाहेर खेचताही यायचे नाही. या खिडकीतून सकाळी मस्त उन्हाची तिरीप आत यायची आणि कोपर्‍यात ठेवलेल्या पितळी पंचपात्रीवर पडायची. त्या उजेडात सारवलेल्या जमीनीवर बसायला व मराठी वाचनमाला पुस्तक पहिले यातील रंगीत धडे कविता चाळताना मी रंगून जायचो. आई मला त्यातील एकेक धडा कविता वाचून दाखवायची. वडिल शाळेत गेले की मी खिडकीत उभा राहून उन्हाच्या सरकत्या सावल्या निरखित त्यांची वाट पहात बसायचो. खाली गोठा होता. गाईगुरांच्या गळ्यातील घंट्यांची नाजूक किणकिण ऐकत बसायचो. समोरच पिंपळाचे झाड होते. त्याच्या पानांची सळसळ ऐकत बसायचो. पिंपळाखाली कधी कधी सारे सवंगडी गोळ्या बिस्किटे भुगा करुन खोटे खोटे जेवण करायचो. नागपंचमीला त्याच पिंपळाला मोठ्ठा झोका बांधला जायचा आणि आळीपाळीने झोके खेळले जायचे. मला मात्र त्या उंचावर बांधलेल्या झोक्याची खूप भिती वाटायची. मग आई देवघरात छोटा सायकलच्या ट्युबचा नाहीतर दोरीचा छोटा झोका बांधून द्यायची.

          खिडकीत बसले की आत समोरच  आई सकाळी छोट्या ओट्यावर स्वयंपाक करीत असलेली दिसायची. मधूनच चुलीतून धूर उठला की फुंकणीतून आईचा फूँ फूँ आवाज ऐकू यायचा. पुढे दुसरी तिसरीला गेल्यावर कित्तावही, बोरु आणि दौत घरी आली. एकेक अक्षर गिरवून काढायला वडील शिकवायचे. एकदा काय झाले आईने छानपैकी घर सारवलेले होते. ती कुठेतरी बाजारात गेली होती. वडील शाळेत गेलेले होते. मी खिडकीशी बसून मराठी वाचनमाला पुस्तक पहिले चाळत बसलो होतो. माझा चुकून धक्का दौतीला लागला आणि सारवलेल्या जमीनीवर शाई सांडली. मोठा ठळक निळा डाग पडला. काय करावे सुचेनासे झाले. आईचा मार खावा लागेल या विचारानं माझ्या पोटात गोळा आला. अचानक माझे लक्ष स्वयंपाक घरात मांडणीतील पितळी भांड्यांच्या रांगेत 'गृहलक्ष्मी' या कपबशांच्या घराला लटकवलेल्या उलथनीकडे गेली. ती उलथनी काढून ते शाईचे डाग घासून काढले.डाग दिसेनासे झाले पण सारवलेल्या जमीनीवर उलथनी घासण्याच्या खुणा तशाच होत्या. आई बाजारातून आली. मी त्या खराब झालेल्या जागेवरच फतकल मारुन बसून राहिलो. पोरगं जागचं उठत का नाही म्हणून आईला शंका आली. उलथनीही जागेवर दिसत नव्हती. अरे इथे उलथनी होती, कुठे गेली म्हणून मला विचारले तर मी एक नाही आणि दोन नाही. शेवटी तो प्रकार आईच्या लक्षात आलाच. मग काय तिचे आवडते शस्त्र म्हणजे लाटणे. त्या लाटण्यानेच तिने माझा खरपूस समाचार घेतला.तेव्हापासून माझा आणि लाटण्याचा घनिष्ठ संबंध निर्माण झाला. कधी कधी तर आईने मारुन फेकलेल्या लाटण्याला मला चुकविण्याचा प्रसंग यायचा. मग तर आई भयंकर चिडायची आणि लाथाबुक्क्यांनी आणखी मारायची. पुढील स्वयंपाक घर आणि मधली अंधारी खोली यांच्यात एकच बल्ब होता. अंधारया खोलीत मधल्या दाराजवळ कोनाड्यात देव होते. तिथे आई संध्याकाळी निरंजन लावायची आणि काहीतरी गुणगुणत रचून ठेवलेल्या लाकडांतून लाकडे निवडून स्वयंपाकाला लागायची.आंब्यांच्या हंगामात वडील भरपूर रसाचे आंबे घरी आणायचे. मग आई खिडकीशी एकेक आंबा मोठ्या पातेल्यात पिळून रस करायची. त्यावेळी एकूणएक साल व कोय मला चाखायला मिळायची.

            मधल्या अंधारया खोलीत दाराजवळ उंचावर एक कोनाडे होते. वडिलांनी त्यात खूप पुस्तके ठेवलेली होती. मला त्यावेळी वाचता येत नसले तरी पुस्तकांतील रंगीबिरंगी चित्रे पहायला मला फार आवडायचे. मग मांडणीतून एकेक डबा काढून डब्यावर डबा रचून त्यावर चढून मी एकेक पुस्तक काढून पाहायचो. पण त्या पुस्तकांमध्ये चित्रे नसायची. नंतर वडिलांकडून कळले की त्यात परशुरामाच्या लावण्या अशी काही काही पुस्तके होती. गल्लीत एका टपरीवर गोष्टींची पुस्तके पाच पैसे देऊन वाचायला मिळायची. हिमगौरी आणि सात बुटके, बुटका जादुगर अशी छोटी छोटी गोष्टींची पुस्तके मी खाऊच्या पैशातून आणून वाचायचो. पहिली दुसरीला आम्हाला पुस्तकात काळी पांढरी चित्रे असायची. फक्त पहिलीच्या पुस्तकात रंगीबिरंगी चित्रे होती. वाघसिंह सर्व प्राणी एकत्र जमलेली असे एक रंगीत चित्र होते. तिसरीला गेलो तेव्हा बालभारतीची रंगीत पुस्तके आली तेव्हा आम्ही एकमेकांच्या पुस्तकातील एकसारखी रंगीत चित्रे पहात बसायचो.

        तेव्हाचे ते विश्वच वेगळे होते. त्या विश्वात आईचा धाक होता. वडीलांची शाळेतून येण्याची वाट पाहणे होते. सवंगड्यांबरोबर खेळणे हुदडणे होते.. अतिशय गोड असा तो काळ होता.६/४/२०१८

@विलास आनंदा कुडके 

Wednesday, June 2, 2021

आईच्या आठवणी 11(29/3/2018)

 #आईच्या आठवणी

   जेव्हा खूप एकाकी वाटते तेव्हा आईच्या कुशीतील दिवस आठवतात. आयुष्यात कोणी कौतुक केले नाही तरी केसांवरुन मायेने कौतुकाने फिरवलेला हात. गालावरुन हात फिरवून काडकन मोडलेली बोटं. रडून आकांत केला तरी अंग घासून रगडून घातलेली आंघोळ. सारं सारं आठवतं आणि अनामिक हुरहुर लागून राहते. एवढं मायेचं नंतर दुसरे कोणी भेटले तरी आईची सर येत नाही. एखाद्या सुरेल तानेत हरवून जावं तसं आईच्या आठवणीत हरवून जायला होते. आई फार शिकलेली नव्हती. नंदुरबार जिल्ह्यातील ब्राम्हणगाव तालुक्यातील भागापूर नावाचं छोटं गाव. त्या गावात चौथीपर्यंत ती शिकली. लहानपणी तिला देवी निघाल्या होत्या तेव्हा अप्पांनी तिला खांद्यावर बसवून रातोरात लागोलाग तालुक्याच्या गावी उपचारासाठी नेले होते. असे ती दुपारी कामे आटपून चिमाबाईशी गप्पा मारतांना मी ऐकले होते. अशा त्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला बसल्या की मी त्यांच्यात जमीनीवर लोळत पडलेला असायचा आणि त्या गप्पा जरी त्यातले काही कळत नसायचे तरी त्या ऐकायला जाम भारी वाटायचे. भागापूरच्या एकेक गोष्टी निघायच्या. मामांच्या ८१ एकर जमीनीवर केळीच्या कशा बागा आहेत. ट्रकच्या ट्रक भरुन केळी इंदोरपर्यंत कशा जातात. खेडचे आजोबा दिवाण होते. अशा कितीतरी गोष्टी मी लोळत लोळत तेव्हा ऐकलेल्या. त्या गोष्टींचा वातावरणात मी हरवून जायचो. सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहायचे. आईला काळाराम मंदिरात किर्तनाला जायला आवडायचे. बरोबर मलाही घेऊन जायची. सिन्नरकर बुवा अगदी तल्लीन होऊन हरीकथा रंगवायचे पण मला बसल्या बसल्या डुलक्या यायच्या आणि मृदंगाच्या तालावर हरीनामाचा गजर सुरु झाला की मी दचकून जागा व्हायचो. श्रावणात दिघेंकडे नवनाथ पोथी असायची. तेव्हा आई मला पोथीला घेऊन जायची. गल्लीतील बायका म्हातारया खडीसाखर फुल घेऊन पोथीला यायच्या. बल्बच्या उजेडात उदबत्तीचा वास दर्वळायचा. दिघे काका पोथीचे एकेक पान हातात घेऊन ओवी वाचून त्यातील गोष्ट विस्ताराने सांगायचे. मला तेव्हा त्यातले काहीच कळत नसायचे मी सगळे माना डोलवताय तिकडे आळीपाळीने पहात रहायचो आणि आई मला हात जोडायला सांगायची (क्रमशः)29/03/2020


@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी10

 सण म्हटला की माझं मन दरवेळी बालपणात जातं. भल्या पहाटे उठून आई घर सारवायची. त्या गंधाने घर जागं व्हायचं.दारापुढे सुंदर रांगोळी रेखाटली जायची. कोनाड्यातल्या देवांची पूजा करुन तुपाची निरंजनी फुलायची. आई जांभळी पैठणी नेसायची. नाकात नथ घालायची. पै पै करुन हौसेने केलेला हार घालायची. चकचकीत जोडवी घालायची. चुलीला हळदीकुंकू वाहून स्वयंपाकाची लगबग सुरु व्हायची. लाकुडफाट्यातून दोन तीन लाकडं आणून चुल पेटायची. मध्येच फुंकणीने हवा घातल्याचा आवाज यायचा. पितळी फुलांच्या सागवानी पाटावर आईची बैठक असायची. पुरणपोळ्या लाटतांना पोळपोट लाटण्याचा हलका आवाज.. आईच्या हातातील पितळी पाटल्यांचा आवाज ऐकू यायचा. कुरडया तळतांना तेलाचा तडतड आवाज ऐकू यायचा आणि एक वेगळाच हर्षवणारा वास स्वयंपाक घरात दर्वाळायला लागायचा. आज सण आहे अशी नकळत जाणिव त्या वातावरणात व्हायला लागायची. बालमन हुरळून जायचे. उड्या माराव्याशा वाटू लागायचे. उगाचच हुंदडत या खिडकीतून त्या खिडकीत रहायचे. गुढीसाठी साखरेचा रंगीत हार आई पुड्यातून बाहेर काढायची तेव्हा अवर्णननीय हर्ष व्हायचा. आई दरवेळी दोन साखरेचे हार आणि दोन कडे घ्यायची. एक हार माझ्या गळ्यात घालून कडं हातात घालून म्हणायची 'जा खेळायला'. मग मी गल्लीत दाखवायला उगाचच मिरवूनही यायचो. तोपर्यंत आईने सगळा स्वयंपाक केलेला असायचा. त्या वासाने आख्खे घर दर्वाळायला लागायचे. एकप्रकारे घरसुध्दा सणाने आनंदून जायचे. सणासुदीच्या दिवशी आई जराही मारायची नाही. काळतोंड्या म्हणायची नाही. मी जराही हिरमुसणार नाही याची ती किती काळजी घ्यायची ही आणखी एक सुखाची गोष्ट होती. आज हे सारे आठवते. #@विलास कुडके

आईच्या आठवणी9(6/4/2018)

 #आईच्या आठवणी

            आईची आठवण काढता काढता बालपण आठवले. मन पुन्हा त्या पान्ह्यात लहान होऊन गेले. आठवणींनाही अमृताची चव आली. अवघी व्याकुळता शीतल झाली. मोगरा फुलला अशी अवस्था झाली. मन विचार करते इतके दिवस कुठे होत्या या आठवणी. कदाचित आईच एकेक आठवणींचे रुप घेऊन परत आली.

        एके दिवशी शिवाजी मामा म्हणाला आपण रामकुंडावर आंघोळीला जाऊ. मी म्हटले मला पोहता येत नाही. मामा म्हणे तू काठावरच आंघोळ कर. झालं गेलो गंगेवर. मामा रामकुंडात मस्त पोहला. मी ते पोहणं पाहत राहिलो. मामाची आंघोळ झाली. मी काठावर कपडे काढून आंघोळ करायला लागलो. मामा कपडे बदलत असेल असे वाटते न वाटते तोच मला मामाने मला पाठीमागून धक्का दिला. मी रामकुंडात पडलो. नाकातोंडात पाणी जायले लागले. मामानेही पाठोपाठ पाण्यात उडी मारली आणि मला धरुन पाण्यात हातपाय मारायला सांगितले. हातपाय मारता मारता मला पोहता यायला लागल्यावर किती आनंद झाला म्हणून सांगू. मी घरी येऊन आईला सांगितले तर आईने पुन्हा मामावर डोळे वटारले. मी घाबरुन गेलो की आता काही खरे नाही. पुन्हा दोघांनाही मार बसतो की काय. पण तसे झाले नाही. रविवार होता. वडील घरी होते. शिवाजी मामा त्यांना दाजी म्हणायचा. सुट्टी असली की मार खायलाही सुट्टीच असायची. वडील आम्हाला सुट्टीच्या दिवशी गंगेवर न्हाव्याकडे कटींग करायला घेऊन जायचे. न्हावी एकसारखा मुंडी दाबून खाली खाली करत केस कापायचा. मागून मानेशी वस्तरा फिरतांना गुदगुल्या व्हायच्या आणि डोके हलायचे तेव्हा न्हावी पुन्हा डोके दाबून ठेवायचा व म्हणायचा हलू नको. घरी आल्यावर आई कापलेले केस हातात धरुन म्हणायची बरोबर कापले नाही अजून बारीक का नाही केले. 

शिवाजी मामा आणि मी बरोबरच खेळायला भोईरवाड्यात जायचो. शिवाजी मामा तिथे आपल्या बोलण्याने इतके आवडते झाले की मला कोणी खेळायलाच घेईना. तसे मी आईला सांगितले तर आई कोपिष्ट. तिने शिवाजी मामाला चांगलेच झोडून काढले. मलाच त्यावेळी खजिल झाल्यासारखे वाटले. उगाच आईला सांगितले असे झाले. शिवाजी मामाने बिचारयाने तो मार निमुटपणे खाऊन घेतला. बहिणीला जराही उलटून न बोलता. नंतर आईलाच पश्चात्ताप झाला. एवढ्या लांबून घरी आणलेल्या लहान भावाला उगाच मारले असे तिला झाले. रागाच्या भरात ती मारायची पण नंतर स्वतःशीच हळहळत बसायची. दुसऱ्या दिवशी मला वाटले शिवाजी मामा माझ्यावर फुगून बसेल. पण तो आदल्या दिवशीचा मार विसरुनही गेला. माझा हात धरुन पुन्हा भोईरवाड्यात मला खेळायला घेऊन गेला.

शिवाजी मामा रस्त्यावर फिरुन शेण गोळा करुन घरी आईला सारवायला आणून द्यायचा. घरातील कामेही करायचा. मी आपला आयतोबा कामाला हात लावायचो नाही. एक सारखा खेळतच असायचो. असे ते न विसरता येण्यासारखे दिवस होते.

@विलास आनंदा कुडके 


     

आईच्या आठवणी8(5/4/2018)

 #आईच्या आठवणी

          आई पहिली गुजरातमध्ये जंबुसरला विठ्ठलराव मलेटे यांना दिली होती. अगदी कमी वयात लग्न झालेले होते. श्रीमंत घराणे होते. झुमकावाले यांचे जंबुसरला मार्केटमध्ये खेळण्यांचे दुकान होते. मलेटेंच्या घरी कागदी खोक्यांचा उद्योग होता. विठ्ठलराव अचानक छातीत कळ येऊन रक्ताची वांती होऊन एकाएकी गेले. आणि आई विधवा झाली. पुन्हा नंदुरबारला आईकडे आली. आजीची एक बहिण पंचवटीत आबा भोईरांकडे दिलेली होती. एक बहिण नगरसूलला पुंजाबा सकडे यांना दिलेली होती. वडिल व्हर्नाक्युलर फायनल झाल्यावर नाशिक मध्ये शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. नगरसुलच्या आजीने पुढाकार घेऊन आई आणि वडीलांचे लग्न जुळवले. आईचे हे दुसरे लग्न. आधीचे घर अगदी श्रीमंत तर वडिलांची परिस्थिती अतिशय गरीबीची. तेव्हा खासगी संस्थेत शिक्षकांना अतिशय कमी पगार होता. दोघांच्या वयातही खूप अंतर होते. वडीलांची जन्मतारीख १५/४/१९१७ तर आईच २९/११/१९३३. आई अगदी मुलगीशी पण अंगाने दंडम होती 

                  तिथल्या घरात डबे भरुन प्लॅस्टिक बारीक माकडे घोडे हत्ती असायचे. त्याच कारखान्यात ते काका जायचे. आम्हा लहान मुलांना ती लहान माकडे हत्ती घोडे खेळायला मिळाले की कोण आनंद व्हायचा. खेळता खेळता आमच्यात मग भांडणेही व्हायची. एकदा तर माझ्याच वयाच्या दिनेशने भांडता भांडता माझ्या खांद्याला चावाच घेतला होता. तेव्हा मी शरद मामाच्या घरी मामीकडे रडत गेलो होतो. मामीने मग जवळ घेऊन हळद लावली होती. लग्नानंतर शरदमामा वेगळा रहायला लागला होता. पाटीत चणे घेऊन शरदमामा दिवसभर गल्लोगल्ली विकायचा. त्यावरच त्यांची गुजराण होती.

    नंतर मुरलीधर मामाचे लग्न जुळले. त्या मामाच्या लग्नात मामाबरोबर घोड्यावर बसायचा मी आईकडे हट्ट धरुन रडून आकांत केला होता. शेवटी मला मामाने मला घोड्यावर घेतले तेव्हा माझे रडणे थांबले होते. आज या घटनेचे हसू येते.

      अरुण नावाचा पहिल्या घरातील माझा मोठा भाऊ होता. मला आठवते डोक्यावर हॅट घालुन तो कधी कधी आईला भेटायला जंबुसरवरुन यायचा. त्याचे नंतर निधन झाले. जंबुसरला रघुनाथराव जाधवांना आईची लहान बहिण यमुना दिलेली होती. त्यांचे नाझ सिनेमाजवळ गल्लीत एक मजली घर होते. तुरीचे शेत होते. आई वरचेवर मी लहान असताना मला जंबुसरला घेऊन जायची. मोठे अद्भुत वाटायचे. मावशी पहिल्या मजल्यावर रहायची. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी तळमजल्यावरुन शिडी केलेली होती आणि वर झाकणासारखा दरवाजा होता. रात्री झोपताना तो झाकणासारखा दरवाजा खाली टाकला की खाली जाता यायचे नाही. पहिल्या मजल्यावर माळापण होता आणि वर पत्रे. तिथे पत्र्यावर मोठमोठी माकडे यायची. दिनेश उर्मिला मावस भाऊ बहीण आम्ही माळ्यावर खेळायचो. उर्मिलाला काका बोका म्हणायचे. मावशी मांडणीत डब्यात कुरमुरे भरुन ठेवायची. सकाळी कुरमुरे आणि गुळ असा खाऊ काढून आम्हाला द्यायची. दिनेश 'अण्णा एक चवकडी देवाना' असे काकांकडे हट्ट धरायचा. शरदमामा मुरलीधर मामा शिवाजी मामा आणि वारी आजी तळमजल्यावर रहायचे. एकदा नाझ सिनेमात काका आम्हाला गोपी सिनेमा पहायला घेऊन गेले होते. मी मामाच्या खांद्यावर होतो. सगळा सिनेमा होईपर्यंत मी खांद्यावरच झोपलेलो होतो. फक्त सुखके सब साथी या गाण्याने मला जाग आली होती एवढे आठवते.

      तेव्हा लग्नकार्यात आठवते.लग्नात मोहनथाळ करायचे आणि मला सगळे ती गोड बर्फी द्यायचे. वर 'गोडघाशा' ही म्हणायची. पंक्तीत मी गोडशिवाय दुसरे काहीच खायचो नाही. त्या लहानग्या वयात काकाच्या घरापासून मलेटेंच्या घरापर्यंत मी रस्त्याच्या कडेच्या खुणा लक्षात ठेवून एकटाच जायचो तर तिथे सगळे चकीत व्हायचे व मला उचलून कडेवर घ्यायचे. इकडे आई मला शोधून हैराण व्हायची पण शेवटी शोधूनच काढायची. जंबुसरला खिरण्या फार मस्त यायच्या. त्या मला फार आवडायच्या. असे ते सगळे गोड दिवस होते.

           नाझ सिनेमाजवळील ती गल्ली. सिमेंटचा छोटा मातीत बुडालेला रस्ता. रस्त्याच्या कडेने दाटीवाटीने असलेली घरे. रस्त्यावर फिरणाऱ्या कोंबड्या. बांधून ठेवलेल्या बकरयांचे म्या म्या आवाज. रस्त्यावर सकाळी तोंड धुण्याचे आवाज. जवळच रघुनाथरावांच्या भावाचे घर. तिथे मी जायचो तर ओसरीवर मोठ्ठा झोपाळा होता. त्यावर चढवून द्या म्हणून मी रडून हट्ट करायचो.

       शिवाजी मामाला खूप गोष्टी माहित होत्या. राक्षसांच्या एकेक गोष्टी सांगायचा तेव्हा मी अक्षरशः घाबरुन जायचो. आणखी एक गोष्ट सांग म्हणून मी शिवाजी मामाकडे लकडा लावायचो तेव्हा तो एकेक गोष्ट जुळवून जुळवून सांगायचा आणि मी त्या गोष्टींच्या अद्भुत दुनियेत रंगून जायचो. घरी जेवायला जायचेही आम्हाला मग भान नसायचे. आजीच्या घरी मागील खोलीत पाण्याचा रांजण होता. पाणी पिऊन आमच्या गोष्टी पुन्हा रंगायच्या. 

      मला आठवते. माझ्याच वयाच्या शिवाजी मामाला आई जंबुसरवरुन बरोबर घेऊन घरी आली. शिवाजी मामाने नंदूरबार मध्ये सकाळी पावाच्या लाद्या घेऊन घरोघरी पाव विकून घरी लहान वयात हातभार लावलेला होता. आम्ही समवयस्क. त्यामुळे सारखेच हट्टी. दोघांनाही समज कुठे. नंदूरबारला एकदा मुरलीधर मामा आम्हाला दोघांना बाजारात फिरायला घेऊन गेला. एका ठिकाणी गरमागरम पापडी तळून काढत होते. आम्ही मुरलीधर मामाकडे पापडीसाठी हट्ट केला. दोघांनाही मामाने पापडी घेऊन दिली. शिवाजी मामाने तिथेच पुडा फोडून पापडी खायला सुरुवात केली तर मुरलीधर मामाला खूप राग आला. मी खाऊ घरी खाऊ या विचाराने पुडा उघडला नव्हता. शिक जरा. असे रस्त्यात खातात का असे म्हणून मामा शिवाजी मामावर खूप रागावले.


@विलास आनंदा कुडके 

        

आईच्या आठवणी7(3/4/2018)

 #आईच्या आठवणी

        आज आई नसली तरी तिच्या आठवणी आणि त्यात सारे बालपण आहे. बकुळीच्या फुलांप्रमाणे या आठवणींना दर्वळ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हाच दर्वळ पुरणार आहे. खूप लहान असताना मी शंभराची नोट प्रथमच पाहिली. लांब. एका बाजूला पांढरा उभा भाग. निळसर हिरवी. गांधीछाप. घोटकरांच्या घरात तळमजल्यावर छोट्या खोलीत आम्ही तेव्हा भाड्याने रहायचो. खोलीला लागूनच बाहेर मोरी होती. छान ओटा होता. खोलीत एक बाज होती. भिंतीच्या कोनाड्यात पत्र्याच्या पेटीत आईने डब्यांमध्ये मला त्यावेळी आलेले चांदीचे बाजूबंद. तांब्याचे वाळे. कमरेची चांदीची साखळी ठेवलेली होती. बाबा म्हणजे माझे वडील शाळेत शिक्षक. लहानपणी आंब्याच्या झाडावरुन पडल्याने त्यांचा डावा हात अधू झालेला होता. पडले तेव्हा गावठी पध्दतीने मोडका हात बांधताना हरभरे भरल्याने हाताचा पुढील पंजा तिरकाच राहिला. अपंगांना तेव्हा नोकरीत घेत नसायचे पण तेव्हा कसेबसे ५० रुपये पगारावर ते शिक्षक म्हणून खासगी संस्थेत लागले. पगाराचे पैसेही आई त्याच पत्र्याच्या पेटीत ठेवायची. तर एके दिवशी आईने पेटी उघडली तेव्हा मी तिच्या मागेच आई काय करते ते कुतुहलाने उभा राहून पहात होतो. मुलांच्या नजरेस पैसे पडू देऊ नये असा कटाक्ष तेव्हा असायचा. तरी आईला १०० रुपयांची नोट काढतांना मी पाहिले तेव्हा ती मागे वळून माझ्यावर खूप रागावली. जा खेळ जा बाहेर म्हणून मला बाहेर तंगाडले.

         एकदा भागापूरवरुन ब्रिजलाल मामा आला. पायजमा कुर्ता. किरकोळ अंगकाठी. हसताना सगळे दात दिसतील असा. विस्कटलेल्या केसांचा. त्यावेळी आईने मोठ्या कौतुकाने मला आलेले चांदीचे दागिने पत्र्याच्या पेटीतून एकेक काढून त्या मामाला दाखवले. मामा चांगला आठवडाभर राहिला. नाशिकमध्ये आले की सगळे गोदाकाठी फिरायला जायचे. एके दिवशी मामा बाहेर गेलेला होता. आईने नेहमीप्रमाणे जर्मलच्या पातेल्यात धुणे आणि धुपाटणे घेऊन ती खोलीला कुलूप लावून गंगेवर गेली. मला भोईरवाड्यात खेळायला जा म्हणून तेव्हा सांगितले होते. अर्ध्या रस्त्यात तिला काय आठवले कुणास ठाऊक ती धुणे घेऊन परत आली. कुलूप उघडून खोलीत पहाते तर काय ब्रिजलाल मामा तिची पत्र्याची पेटी उघडून चांदीचे दागिने आणि पैसे पायजाम्याच्या खिशात कोंबत होता. आईने त्याचा हात तसाच पिरगाळला आणि दोन चार लाफा ठेवून दिल्या तसा ब्रिजलाल मामा गयावया करुन रडत रडत आईच्या हातापाया पडू लागला. पण आई खूप संतापली. बहिणीच्या घरी चोरी करतो का काळतोंड्या म्हणून तिने मामाला चांगलेच तुडवले. पुन्हा असे करणार नाही असे मामाने सांगितले पण चल निघ परत घरात पाय ठेवायचा नाही म्हणून मामाला हाकलून दिले. मामा खोलीच्या बोळीकडील भिंतीवरुन चढून आत खुंटीच्या सहाय्याने खोलीत उतरला होता. आई जर अर्ध्या वाटेवरुन घरी परत आली नसती तर मामाने चांदीचे दागिने व पैसे घेऊन पोबारा केला असता आणि दागिने विकून साळसूदपणे पुन्हा परत आला असता. चोरीचा तपासही मग लागला नसता.

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी6(2/4/2018)

#आईच्या आठवणी

       काळाच्या ओघात आपण किती पुढे आलेलो असतो. एकेक गोष्ट जशी निसटत गेलेली आठवते. कोणी म्हणतं कशाला पाहिजे आता आठवणी. जे गेले ते काय परत येणार तर नाही. पण जेव्हा जिव्हाळाचा ओलावा कुठे दिसेनासा होतो. गरजेपुरती कोरडी नाती उरतात. प्रत्येक गोष्टीचा व्यवहार होऊन जातो. देणे घेणे मोजून मापून होते. मनाजोगते झाले नाही की सहज कुठलेही नाते संपून जाते. सगळे मिळूनही रसच मिळत नाही. सगळ्या गुंत्यात राहूनही एकटेपण शिल्लकच राहते. अशावेळी निसटलेल्या क्षणांच्या आठवणी मनावर शांत शिडकावा करतात

           गाय दी मोपासा यांची नेकलेस कथा वाचता वाचता अचानक मला आईच्या नेकलेसची आठवण झाली. आईला त्या काळात एखादा नेकलेस असावा अशी फार मोठी मनीषा होती. तेव्हा सोनेही आजच्या इतके महाग नव्हते. सोन्याची हौस असलेली आई स्वयंपाक घरात पाण्याची भांडी ठेवायच्या ठिकाणी कोणाला दिसणार नाही अशा रीतीने ठेवलेल्या गाडग्यात घरखर्चासाठी मिळालेल्या तुटपुंज्या पैशातून बचत करुन पितळी पै एकेक करुन साठवायची. नागचौकात एक सोनाराचे दुकान होते. तिथे मैत्रिणीला घेऊन साठवलेल्या पितळी पयांतून तिने पाटल्या करुन घेतल्या होत्या. त्या हुबेहुब सोन्याच्या वाटायच्या. बचत करायच्या सवयीतून तिने कितीतरी वर्षांनी सराफ बाजारात जाऊन अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस बनवून घेतला. नेकलेस घरी आणल्यावर तो तिला कधी एकदा सगळ्यांना दाखवते असे झाले. भोईरवाड्यात आजीला नेकलेस दाखवला तेव्हा आजी खूप खुश झाली. या लेकीचे तिला खूप कौतुक वाटले. मावशांनीही तो नेकलेस पाहिला. सगळ्यांचेच डोळे तो नेकलेस पाहून चमकले. आई मग अभिमानाने सगळ्यांमध्ये खुशीत वावरत राहिलीगाय दी मोपासा यांची नेकलेस कथा वाचता वाचता अचानक मला आईच्या नेकलेसची आठवण झाली. आईला त्या काळात एखादा नेकलेस असावा अशी फार मोठी मनीषा होती. तेव्हा सोनेही आजच्या इतके महाग नव्हते. सोन्याची हौस असलेली आई स्वयंपाक घरात पाण्याची भांडी ठेवायच्या ठिकाणी कोणाला दिसणार नाही अशा रीतीने ठेवलेल्या गाडग्यात घरखर्चासाठी मिळालेल्या तुटपुंज्या पैशातून बचत करुन पितळी पै एकेक करुन साठवायची. नागचौकात एक सोनाराचे दुकान होते. तिथे मैत्रिणीला घेऊन साठवलेल्या पितळी पयांतून तिने पाटल्या करुन घेतल्या होत्या. त्या हुबेहुब सोन्याच्या वाटायच्या. बचत करायच्या सवयीतून तिने कितीतरी वर्षांनी सराफ बाजारात जाऊन अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस बनवून घेतला. नेकलेस घरी आणल्यावर तो तिला कधी एकदा सगळ्यांना दाखवते असे झाले. भोईरवाड्यात आजीला नेकलेस दाखवला तेव्हा आजी खूप खुश झाली. या लेकीचे तिला खूप कौतुक वाटले. मावशांनीही तो नेकलेस पाहिला. सगळ्यांचेच डोळे तो नेकलेस पाहून चमकले. आई मग अभिमानाने सगळ्यांमध्ये खुशीत वावरत राहिली

       आईला तेव्हा लग्न जुळविण्याची खूप हौस. भागापूरच्या एका चुलत भावासाठी तिने नाशिकमधील एक मावसबहीण पाहिली. सगळा पुढाकार घेतला. लग्न जमले. बस्त्यासाठी भागापूरवरुन तिची मामा कंपनी आली. सराफ बाजारात सगळे बस्त्यासाठी गेले. भरपूर खरेदी झाली आणि दुकानदाराला द्यायला ७०० रुपये कमी पडले. पैसे कसे उभे करायचे प्रश्न पडला. एका मामाची नजर आईच्या नेकलेसवर गेली. नेकलेस गहाण ठेवून ७०० रुपये चुकते करुन बस्ता पूर्ण करता येईल. भागापूरला गेले की ७०० रुपये पाठवून देऊ असे सांगून मामाकंपनींनी आईला नेकलेस गहाण ठेवायला भागच पाडले. हो ना करता आईने गळ्यातला नेकलेस काढून जिथे घडवला होता तिथे गहाण ठेवला आणि बस्त्यासाठी कमी पडलेले ७०० रुपये उभे करुन दिले. मामांच्या ८१ एकर जमीनीत केळीच्या बागा होत्या. त्यामुळे आपले पैसे मिळतील तेव्हा दागिना सोडवून घेऊ या विचाराने आई तेव्हा नेकलेस गहाण ठेवायला तयार झाली होती. लग्न झालं. पण ज्याचं लग्न जमवलं तो दारुच्या व्यसनात पार कामातून गेला. पुढे तिची मावस बहीण भागापूरवरुन दोन मुलींना घेऊन नाशिकला आली. मामा कंपनी आज पैसे पाठवतो उद्या पैसे पाठवतो असे करीत करीत त्यांनी शेवटपर्यंत त्यांनी पैसे परत पाठवलेच नाही. ही गोष्ट आईच्या फार जिव्हारी लागली. त्यातच तिला कर्करोगाने ग्रासले. त्यातच ती गेली. तेव्हा परिस्थिती अशी होती की वडीलांनाही तो दागिना सोडविता आला नाही. अशी ही आईने हौसेने केलेल्या नेकलेसची गोष्ट आठवली की डोळे पाणवत राहतात.

       जंबुसरची मावशी नाशिकला आली. तिलाही तो नेकलेस इतका आवडला की जंबूसरला गेली की पैसे पाठवीन पण हा नेकलेस मला दे असा तगादा तिने आईकडे लावला. पण आईने स्वतः करिता इतक्या वर्षांनी पै पै साठवून मोठ्या कष्टाने केलेला पहिलाच दागिना काय असा कोणाला देऊन टाकण्यासाठी थोडाच बनवला होता. बरं परत असा दागिना करायला किती काळ लागला असता. आईने नेकलेस दिला नाही म्हणून मावशी रागारागाने जंबुसरला निघून गेली. माझ्या घरी बहुबधं आहे असे ती म्हणतच गेली. त्यानंतर दोघी बहिणी कितीतरी वर्षे पुन्हा भेटल्या नाही की बोलल्या नाही.

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 5(31/3/2018)

 #आईच्या आठवणी

       आईबरोबर कुठे बाहेरगावी जायचं म्हणजे मोठी मौज असायची. आई कधी भागापूरला आजोळी तर कधी नंदूरबारला तिच्या आईकडे मला घेऊन जायची. कधी गुजरातमध्ये जंबूसरला तिच्या बहिणीकडेही घेऊन जायची. प्रवासाला निघायचे म्हणजे ती भरपूर गुळाच्या दशम्या करायची आणि वर शेंगदाण्याची चटणी. पाण्याचा पितळी फिरकीचा तांब्या असायचा. एसटीत मला मांडीवर घेऊन बसली की मी खिडकीतून बाहेर खाली पहायचो तर मला गाडी कशीकाय धावते याचा प्रश्न पडायचा कारण चाक कुठेच दिसायचे नाही. रेल्वेचे डबे तेव्हा गेरु रंगाचे असायचे आणि कोळशाचे शिट्ट्या मारणारे इंजिन असायचे. मी लहान असल्याने आई माझे तिकीट काढायची नाही तर मला बर्थवर घेऊन अशी झोपायची की येणाऱ्या जाणाऱ्याला मी अजिबात दिसायचो नाही. एकदा असेच नंदूरबारहून सुरतकडे रेल्वेने ती मला घेऊन निघाली. बरोबर मामा कंपनीही होती. आई मला नेहमीप्रमाणे घेऊन बर्थवर झोपली होती. गाडीत तिकीट चेकर आला त्याने सर्वांची तिकीटे चेक केले. बर्थवर झोपलेल्या आईचे तिकीट विचारले ते मामाने काढून दाखवले. तिकीट चेकर पुढे जाणार तोच मी कुतुहलाने उठून वाकून पाहायला लागलो 'काय ग पमा' म्हणालो. सारे माझ्या आईला पमा पमबाई म्हणायचे. तिचे नाव लक्ष्मीबाई होते पण तिच्या प्रेमळ स्वभावामुळे सर्व तिला प्रमिला म्हणायचे. सर्वांबरोबर मीही तिला पमा हाक मारायचो. आई म्हणून हाक मारावी म्हणून समजावून सांगितले तरी माझ्या तोंडात पमाच बसलेले. तर तिकीट चेकरने मला पाहिले. मला बोलताही येते हेही पाहिले आणि मग माझे तिकीट कुठे म्हणून विचारले. आईने सांगितले तो अडीच वर्षाचा आहे. पण तिकीट चेकरने काही ऐकले नाही. दंडाची पावती फाडावी लागली.आणखी एक प्रसंग आठवतो. गुजरात मध्ये जंबूसरला जायचे तर आईने बलसाड गाडी पकडली होती. बरोबर वडीलही होते. बलसाडला उतरल्यावर पुढे पुन्हा तिकीट काढायचे होते. वडीलांना तेथील गर्दीत ते काही जमतच नव्हते तर आईने तेवढ्या गर्दीत शिरुन भांडून गुजरातीत बोलून तिकीटे काढून आणली. आईबरोबर आजोळी गेलो की तिथे घरोघरी माझे मोठे कौतुक व्हायचे. माझ्या तोंडून 'बरका' हा शब्द ऐकला की मामा आजोबा कंपनी खुश व्हायची. काळ्या मामा. भुरया मामा मला अजून आठवतात. त्यांचे घराच्या ओसरीवर किरणामालाचे छोटसे दुकान होते आणि ब्राह्मणगाववरुन ते किरणामाल आणून ठेवायचे. गोळ्या बिस्कीटांच्या बरण्या ठेवलेल्या असायच्या त्यातून ते कितीतरी गोळ्या बिस्किटे मला द्यायचे. भागापूर सारख्या छोट्या गावात ते दुकान फार चालायचे. पाच पैशाच्या चहाच्या पॅकेटच्या माळा टांगलेल्या असायच्या. परत निघतांना माझ्या हातावर कोणी पितळी दहा वीस पैसे ठेवायचे ते मी गोल पत्र्याच्या डबीत ठेवून द्यायचो आणि खूप खाऊ घेऊ असे बेत आखायचो पण गाडीत बसले की आई ती डबी मी हरवेन म्हणून घेऊन टाकायची. अशा कितीतरी आठवणी.

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी4(30/3/2018)

 #आईच्या आठवणी

     आपल्यावरील संस्कार नकळत आपल्या आईकडून आलेले असतात असे मला जाणवते. आईबरोबर लहानपणी किर्तनाला जाऊन तिची धार्मिकता आली. काही नाही पण तिला 'चांदोबा' आणून वाचायची आवड होती. श्रीकृष्णाच्या कितीतरी गोष्टी तिला किर्तनाला जाऊन जाऊन माहित होत्या. मला एक प्रसंग आठवतो. तोपर्यंत मी शाळेत प्रवेश घेतलेला नव्हता. एके दिवशी मला काहीतरी खेळणी घेऊन देण्यासाठी वडील रामसेतू पुलाच्या खाली भरलेल्या खेळणीच्या बाजारात घेऊन गेले. कितीतरी खेळणी होती. खेळणी म्हटली की मला हमखास सितागुंफा रस्त्याच्या उतारावरील लाकडी खेळण्यांची गजबजलेली दुकाने आठवतात. लाकडी टांगे, एसटी, लाकडी रंगीत फळे, कितीतरी. सायंकाळी आईचे बोट धरुन किर्तनाला जातांना माझी नजर त्या खेळण्यांवर खिळून राहायची. आई पुढे चालत राहायची आणि मी मागे वळून वळून रंगबिरंगी खेळण्यांकडे पहात चालायचो. आईने ते ओळखले आणि वडीलांना सांगितले याला एक खेळणे घेऊन द्या. रामसेतू पुलाच्या खाली रांगेत खेळण्याची दुकाने होती. मोटार गाड्या पिपाण्या चेंडू बाहुल्या फिल्म लावून बघायचा छोटा बायोस्कोप. कितीतरी. तेवढ्या खेळण्यात एक खेळणे मला खूप आवडले. एक पट होता. सोंगट्या होत्या. रंगीबिरंगी नोटा होत्या. नवा व्यापार असे त्या खेळाचे नाव होते. आम्ही मुलं मुलं चल्लस सापशिडी खेळायचो. मारुतीच्या देवळात तेव्हा रात्री उशिरापर्यंत सोंगट्या खेळल्या जायचे. हा खेळ नवीन आणि आकर्षक वाटल्याने तो घ्यायला मी वडीलांना सांगितले. वडीलांनी तो केवढ्याला म्हणून विचारुन काही पैसे देऊन विकत घेऊन तो मला घेऊन दिला. मला अतिशय हर्ष झाला. उड्या मारत मारतच मी वडीलांबरोबर घरी आलो आणि आईला तो नवा व्यापार दाखवला. आईने तो खेळ पाहिला आणि तिचे पित्तच खवळले. काय खेळ घेऊन दिला म्हणून ती वडीलांशी जोरजोरात भांडायलाच लागली. मलाही चांगलेच रट्टे ठेवून दिले. तिची समजूत घालायचा वडीलांनी किती प्रयत्न केला पण आईचा पारा वाढतच गेला. मी अगदी भांबावून गेलो. मला काही समजेनासे झाले. काय चुकले तेही कळेनासे झाले. चूक न कळता मार मात्र खूप खाल्ला. आईने तो खेळ घेतला आणि सरळ फाडून तोडून बंबात टाकून पेटवून दिला. मी रडत रडत बंबातून निघणाऱ्या धुराकडे पहातच राहिलो. तो खेळ म्हणजे जुगार आणि आपल्या मुलाने जुगारी व्हावे ही कल्पना तिला तेव्हा सहन झाली नव्हती. त्या कल्पनेनेच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. हा धडा मला आयुष्यभर लक्षात राहिल असा होता. तेव्हापासून मी जुगार पत्ते या खेळांच्या वाटेला गेलोच नाही. हे एकप्रकारचे उपकार म्हणायला हवेत.

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी3(28/3/2018)

 #आईच्या आठवणी

       जसेजसे दिवस उलटत आहे तसतशी आईची आठवण प्रकर्षाने होत आहे. थकून भागून पाठ टेकवली की आईची एकेक आठवण मंद निरंजन तेवावी तशी तेवू लागते. मन भूतकाळाच्या पायऱ्या उतरुन बालपणात जातं. आई तशी फार लवकर गेली. १५ फेब्रुवारी १९७४ रोजी ती गेली तेव्हा मी आठवीत होतो. आई गेल्यावर डोक्यावरले केस काढले गेले तसा वर्गात गेलो तर वर्गातील मुलं हसायला लागली. तेव्हा वर्गशिक्षक म्हणाले अरे त्याची आई गेली आणि तुम्ही हसताय तेव्हा वर्ग शांत झाला. अर्थात ती मुलेही माझ्याच वयाची. त्यावेळी त्यांना एवढे कुठले कळायला. एक प्रसंग आठवतो. तेव्हा पंचवटीत डुकरे पकडायची मोहिम सुरु झाली होती. बंदुका घेऊन गणवेशातील मंडळी डुकरे धरुन धरुन नेत होती. आम्ही लाटेवाड्यात रहायचो. वाड्यात शौचालय नव्हते. सगळी मंडळी डबा घेऊन राजवाड्यातील सार्वजनिक ठिकाणी किंवा नागचौकातील ठिकाणी सकाळी उजाडायच्या आत जाऊन यायची. काही अपवाद होतेच. ते अगदी बारालाही डबा मिरवत मिरवत जायचे. कोणाला त्याचे काही वाटायचे नाही. अलिकडे पंचवटीत फ्लॅट झाले तशी घरात सोय झाली. पण त्या काळात घरोघरी सार्वजनिक ठिकाणी जाण्याची सवय होती. राणाप्रताप चौकात मारुती मंदिराला लागून माईचं वाडगं म्हणून ओळखला जाणारे मोठे मैदान होते. मारुतीमंदिरामागे चारपाच तरी चिंचाची मोठी झाडे होती. एकजण तर एका चिंचेवर फळी अडकवून रहायचा. चिंचेची सावली देखील गर्द असायची आणि जमीनीवर चिंचेचा पाला पसरलेला असायचा. आम्ही मुलं मुलं कधी दगडाने चिंचाही पडायचो. असेच एकदा चिंचा पाडायला आम्ही जमलो असता डुकरे शोधत शोधत एक पथक तिथे आले. त्यांनी आम्हाला विचारले डुकरे पाहिली का रे. तेव्हा आम्ही माईच्या वाडग्यात बेसुमार वाढलेल्या काँग्रेस गवताच्या हलणारया झुडुपांकडे बोट दाखवले. झुडुपं हलत होती आणि तिथे डुकरं असण्याची शंका बळावत होती. पथक पुढे पुढे झुडुपांत शिरुन सरकत गेले. एका ठिकाणी बंदुकीतून नेम धरुन गोळी झाडणार तोच त्या झुडुपांतून माझी आई घाईघाईने डबा घेऊन उठून उभी राहिली आणि तो अनर्थ टळला. गल्लीभर मग चर्चा होत राहिली आई वाचली म्हणून नाहीतर त्या दिवशी काय झाले असते...

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी2(27/3/2018)

 #आईच्या आठवणी

       मला आठवते मी खूप लहान असेन. आईच्या सारखे मागे मागे असायचो. मला सोडून आईने काहीच करु नये असे वाटायचे. आईला कामही करता यायचे नाही. रडून रडून आईचा मी अगदी पिच्छा पुरवायचो मग ती वैतागून अस्सा काही रट्टा ठेवून द्यायची की मी मुसमुसत आईशी बोलायचेच नाही असे ठरवून खिडकीत जाऊन बसायचो. आई मग कामात लागे. कामाच्या नादात ती मला विसरुनही जायची. बरे कामेही खूप असायची. सकाळी खाली उतरुन सार्वजनिक नळावरुन हंडे कळशा भरुन आणायच्या असे. तांब्याचा बंब पेटवून पाणी गरम करायचे असे. दारावर आलेल्या मोळीवालीकडून लाकडाची मोळी घेणे. ती मधल्या अंधारया खोलीत बल्ब लावून रचून घेणे. सकाळची झाडझूड. दार लावून आंघोळ. नववारी नेसणे. घडीच्या आरसापेटीपुढे बसून केसांचा अंबाडा घालणे. कुंकू रेखणे. जर्मलच्या पातेल्यात धुणे आणि धोपाटणे घेऊन घरात मला ठेवून बाहेरुन कडी लावून 'आले बरका.. घरातच खेळ' सांगून गंगेवर (गोदाकाठी) धुणे धुवायला जाणे. बाजारातून पिशवीत गहू आणणे. निवडणे. कितीतरी कामे. एकदा मी असाच रुसून खिडकीत बसून राहिलो. बघत राहिलो. आई कधी कामातून माझ्याकडे बघते व समजूत काढते. पण कसचे काय. अगदी अंधार पडला तरी आईचा माझ्याकडे बघण्याचा पत्ताच नाही. दिवसभर आई कामात होती. घामाने तिचा चेहरा भरला होता. मी तिच्यावर रागावलो आहे हे तिच्या गावीही नव्हते. संध्याकाळी घासलेटची चिमणी पेटवून तिने चुलीजवळ ठेवली आणि मग तिचे माझ्याकडे लक्ष गेले. पण मी आपले लक्षच नाही या आविर्भावात खिडकीतून बाहेरच पहात राहिलो. 'अरे सकाळपासून पाहते खिडकीत गाडलाय. खेळायला जायचं नाही का' आईने आवाज दिला पण मी ऐकले नाही ऐकले केले. तसे आईने बाहेर खेचले. तोपर्यंत माझा चेहरा अगदी रडकुंडीला आलेला. तिला काय वाटले कुणास ठाऊक. तुला खाऊ खायचा का. खाऊ म्हटल्यावर माझा राग कुठल्याकुठे पळून गेला. मग आईने भरकन बाजार करुन आणलेल्या पिशव्या उचकून खाऊचा पुडा काढला. भेळभत्ता पाहून क्षणात आनंदी होऊन गेलो. रागाच्या भरात दिवसभरात काही खाल्ले नाही हेही विसरुन गेलो.

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी1(16/2/2018)

 काही आठवणी मनात अगदी घट्ट रुजलेल्या असतात. मनाचा एक हळवा कोपरा अशा आठवणींनी व्यापलेला असतो. खूप एकटे वाटते तेव्हा हळूच एकेक आठवण डोकवत राहते आणि नकळत पापणी भिजवित राहते. १५ फेब्रुवारी १९७४ रोजी आई गेली. बरोबर ४४ वर्षे झाली. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. काही कळण्याचे ते वय नव्हते. बाबा तेव्हा गोराराम गल्लीतील बाल शिक्षण मंदिर या शाळेत मुख्याध्यापक होते. शेवटच्या दिवसात आई कर्करोगाने शालिमार जवळील शासकीय रुग्णालयात दाखल होती. परिस्थिती गरीबीची. अवघा ५० रुपये पगार होता बाबांना. तेव्हा आम्ही चरण पादुका मंदिराजवळ सितास्मृती या बोराडे यांच्या वाड्यात भाड्याने राहायचो. त्या आधी लाटेवाड्यात राहायचो. ही आठवण तिथलीच. वडील गाणगापूरला बहिणीला पगारातून मनीआॅर्डरने पैसे पाठवायचे त्यामुळे घरी खर्चासाठी अगदी कमी पैसे उरायचे. पण आई तेव्हा तुटपुंज्या पैशात संसार चालवायची. घरखर्चावरुन घरात नेहमी खटके उडायचे. मोठा सावत्र भाऊ व बहिण तेव्हा गाणगापूरला बहिणीकडे ठेवल्याने वडीलांना दरमहा मनीआॅर्डरने पैसे पाठवावे लागायचे. घरात भांडण झाले की बाबा घराबाहेर निघून जायचे आणि मग आईचा नुस्ता संताप होत राहायचा. त्या संतापाचा फटका मला हमखास बसायचा. लाथाबुक्क्यांनी लाटण्याने आई मला झोडपून काढायची. वडील मग बरयाच वेळाने आले की माझी अवस्था पाहून आईला गयावया करुन मारत जाऊ नको म्हणून हातापाया पडायचे. मला त्यावेळी समजायचेच नाही की आपल्याला आई नेमके का मारत आहे. मी त्या काळात मग दिवसभर भोईर वाडा नाहीतर मारुती मंदिरात राहायचो. घरी वडील शाळेतून परतायच्या वेळी हळूच दबकत दबकत अंधारया पायऱ्या पायांचा आवाज न करता कानोसा घेत घेत परतत असे. दिवसभर मग खाणे नाही की पिणे नाही. भोईर वाड्यात आजीने काही दिले तर तेवढे किंवा काहीच न खाता तेथील गार फरशीवर कोपर्‍यात झोपून जाई. मोठा कठीण काळ होता तो. आईच्या माराचा अगदी धसकाच घेतला होता मी. लाटेवाड्यात पहिल्या मजल्यावर आम्ही राहायचो. त्या घराच्या खिडकीतून आतला बल्बच्या उजेडात बाबा दिसतात की नाही याचा मी दुरुन अंदाज घेऊन मग घरी जायचो. एकदा असेच आई आणि बाबांमध्ये घरखर्चावरुन जोरदार भांडण झाले. वडीलांची शाळेत जायची वेळ झाल्याने ते तसेच जेवण न करता गेले. बरोबर मीही उपाशीच त्यांच्याबरोबर शाळेत गेलो. तिथे वर्गातील मुलींनी कौतुकाने मला त्यांच्या जवळील पेरु खाऊ दिला. दुपारी मधल्या सुट्टीत वडील मला सुंदर नारायण मंदिराजवळ त्यांच्या विद्यार्थ्याच्या हाॅटेलात घेऊन गेले आणि भजी खाऊ घातली. स्वत: मात्र उपाशीच राहिले. दुपारी वर्ग भरल्यावर बघतो तर काय आई बाबांसाठी डबा घेऊन आलेली. ते पाहून बाबांना अगदी भरुन आले. तोपर्यंत आईसुद्धा जेवलेली नव्हती. ते दोघे मग त्या डब्यात जेवली. मलाही घास भरवले. कितीही भांडणं होवो पण आई आणि बाबा एकमेकांशिवाय जेवायची नाही. बाबांचा आईवर भारी जीव होता. शेवटच्या दिवसात आई रुग्णालयात होती तेव्हा बाबा घरातील सर्व आवरुन रुग्णालयात आईसाठी फळे घेऊन जायचे मग शाळेतही जायचे. आई गेली तेव्हा ते आपली पमा गेली रे असे म्हणत अक्षरशः हंबरडा फोडत घरी आले. आईला टॅक्सीने घरी आणले तेव्हा त्यांच्या मदतीला जोडीला कोणीही नव्हते. अगदी तारांबळ झाली होती त्यांची. आज हे सगळं आठवलं की डोळे भरुन येतात. आई सारखी मारायची म्हणून तेव्हा माझं बालमन म्हणत होते की बरे झाले गेली. पण जसजसे दिवस उलटत गेले तसतसे आईच्या आठवणींनी मन व्याकुळ होत राहिले. मारायला का होईना पण आई रहायला हवी होती असे दिवसेंदिवस वाटत राहिले. बाबांनी नंतर आईविना मला फुलासारखे जपले. माझे सगळे हट्ट पुरवले. आईची मायाही त्यांनीच दिली. माझ्यातील हळवेपण कदाचित या दिवसांमुळे आलेले असावे मला आजही जाणवत राहते.16/02/2018

@विलास आनंदा कुडके 

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...