गप्पा मारण्यासारखा आनंद जगात दुसरा नाही. आपल्याला बोलता येते याचा शोध लागतो तेव्हा आपण अखंड बडबड करायला सुरुवात केलेली असते. आपली बडबड जो ऐकून घेईल तो आपला पहिला मित्र बनून जातो. 'अरे ऐकना, त्याचे असे झाले' या संबोधनाचा वापर सुरु होतो आणि मैत्री घट्ट होत जाते. लिओ टाॅलस्टाॅयने आपल्या लहानपणच्या आठवणी तिन खंडात लिहून ठेवल्या आहेत. बालवयात मोठ्यांच्या गप्पा ते अतिशय आवडीने ऐकत रहायचे. या गप्पांमधूनच त्यांना शाळेत न शिकविले जाणाऱ्या कितीतरी गोष्टी नकळत कळाल्या होत्या.
बटाटे सोलणारे मळ्यात काम करणाऱ्या मजुरांच्या गप्पा काम करता करता अगदी रंगात येई. खूप उच्च दर्जाची चर्चा जरी नसली तरी दैनंदिन जीवनातील कितीतरी साधे साधे विषय त्या गप्पांमध्ये लहानग्या लिओला कळत होते. लहान बछडे झाल्याची कोणीतरी आनंद वार्ता सांगायचा.
पैशात बचत करुन बाजारातून घरच्यांसाठी कपडे घेतले याची गोष्ट असायची. कितीतरी गोष्टी. लहानग्या लिओचे मनोविश्व या गोष्टींनी समृद्ध झाले.
'कितीतरी दिवसात नाही गेलो चांदण्यात' या धर्तीवर कितीतरी दिवसात गप्पा मारल्या नाहीत अशी आज प्रकर्षाने जाणीव होत आहे. पोट माणसाच्या जवळ असले तरी ते माणसाला दाहीदिशांनी पळायला लावते. पोटामागे मग हळूहळू प्रसिद्धीमागे यशामागे धावतच राहतो. धावण्याच्या या चुरशीत तो नेमका गप्पा मारण्याचा आनंद हरवून बसतो. गप्पा मारणे म्हणजे वायफळ वेळ दवडणे अशी त्याची समजूत होऊन बसते.
कामधंद्यानिमित्त अनेकांशी तो गप्पा मारतोही. नाही असे नाही. पण कुठेतरी त्या गप्पांमध्ये औपचारिकता कृत्रिमता वरवरपणा असतो आणि त्यामागे फायद्याचे गणित असते.
खरया गप्पा म्हणजे निरुद्देश आदिअंत नसलेल्या एकमेकांना टाळी देत डोळा मारत चेष्टा करत रंगत जाणारया गप्पा. अशा गप्पा आपण किती मारल्या असतील. अशा गप्पा मारायच्या तर तेवढे आत्मियतेचे जिव्हाळ्याचे अनुबंध असलेले मित्र सवंगडी दोस्त भेटायला हवेत. कुटूंबातही तसे भाऊ बहिण वडीलधारी आजी आजोबा यांचे कौटुंबिक वातावरण लाभायला हवेत. एकलकोंड्या माणसाला हे सर्व लाभत नाही म्हणून त्याचा स्वभाव तिरसट तुसडा होऊन जातो. काही जबाबदारीच्या ओझ्याखाली इतके दबून जातात की त्यांना गप्पा मारण्यासाठी तोंड उघडायलाही उसंत मिळत नाही. लग्नानंतर बरेच जण मित्रमंडळीतून बाद होतात आणि गप्पांची चैन त्यांना परवडत नाही.
सहज समुद्र किनारी जोडीजोडींने एकमेकांच्या कुशीत तासंतास गप्पात रंगलेली जोडपी पाहिल्यावर आपल्याला सहज प्रश्न पडत असेल की ते एकमेकांशी काय बोलत असतील. त्यातील जेव्हा काही लग्न करुन संसार थाटतात तेव्हा मात्र एवढय़ा गप्पा त्यांच्यात पुढे पुढे होत नाही.. शेवटी हे प्रमाण अगदी शुन्यावर येऊन ठेपते.
कानात हेडफोन लावून अगदी रहदारीचे रस्ते वाहने चुकवत अखंड गप्पात रंगलेले काही महाभाग मी पाहिले आहे. किंवा कानाशी मोबाईल लावून चालता चालता गप्पा मारत चाललेले आपल्याच तंद्रीत रहाणारेही मी पाहिले आहे.
अशा आॅनलाईन गप्पा मारणारया लोकांचा मला नेहमीच हेवा वाटत आला आहे. कामामध्येही मोबाईलवर कोणी कोणाशी गप्पा मारताना दिसले की मला हेवा वाटत राहतो.
काम असेल तर साधारण फोन लावले जातात किंवा येतात यात काही विशेष नाही. पण आवर्जून आठवण आली म्हणून आपण किती जणांशी संवाद साधतो हा खर तर प्रश्नच आहे. व पु काळेंची एक फॅन्टसी असलेली कथा वाचनात आली होती. संवाद हरवलेल्या माणसाशी सुखदु:खाच्या मनमोकळ्या गप्पा मारायच्या आणि त्याचे मन हलके करायचे. नेमके हेच आज होत नाही. माणसं अशा संवादाला दुरावलेली आहेत. संवादाअभावी आतल्याआत कुढताय आणि व्याधिग्रस्त निराश होत आहेत. व्यसनांच्या आहारी जात आहे. संवाद साधायला जवळचे मित्र नाही, जोडीदार नाही अशा नि:संवाद एकाकीपणाच्या विलक्षण पोकळीत आज जो तो कसाबसा बेचव आळणी जीवन जगतोय.
- @विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment