' दादामामा' म्हटले की बालपण आठवते. तेव्हा घोटकरच्या घरात तळाशी आम्ही रहायचो. समोरच भोईरवाड्याकडे जाणारी बोळ होती. नंतर जवळच लाटेवाड्यात रहायला गेलो. आबा भोईरांकडे आई नेहमी जायची तेव्हा मलाही तिथे घेऊन जायची. मावस नात्याने ती दादामामांना भाऊ म्हणायची आणि सारे त्यांना 'दादा' म्हणायची म्हणून मीही 'दादामामा' म्हणायचो. कुंदा आणि मी एकाच शाळेत श्रीराम विद्यालयात शिकत होतो. तेव्हा मुलींचा वर्ग वेगळा व मुलांचा वर्ग वेगळा होता. शाळा भरायच्या आधी व शाळा सुटायच्या आधी अंकुश उमेश कुंदा या बालमित्रांबरोबर मी भोईरवाड्यातच खेळायचो. आबाजी भोईर तेव्हा दगडी मूर्ती घडवत असायचे. तर दादामामा शाडूच्या मूर्ती करायचे. उमेशही तेव्हा गणेशाच्या मूर्ती करायचा. ऐन पावसाळ्यात हे काम सुरु असायचे. बोळीला लागून एका खोलीत दादामामा रहायचे. शेजारीच एका खोलीत समोर 'विजय नाट्य मंडळ' व त्याखाली एक मोठी तसबीर होती. भिंतीवर नाट्यस्पर्धेत मिळालेली पारितोषिके रांगेत लावून ठेवलेली होती. लपाछपी खेळत खेळत आम्ही मुले गलका करत कितीदा त्या खोलीत जायचो पण दादामामा आमच्यावर एकदाही कधी रागावले नाही. दुपारी जेवणानंतर ते त्या खोलीत वामकुक्षी घेत. त्याचवेळी आम्ही मुले गलका करत त्या खोलीत शिरत तेव्हा ते आम्हाला त्यांच्या पायाची बोटे खेचण्याचे व केसांमधून पांढरा केस शोधण्याचे काम द्यायचे. बदल्यात पाच पाच पैसे द्यायचे. आम्हाला खाऊला पैसे मिळायचे आणि शांतता निर्माण होऊन त्यांची वामकुक्षीही पूर्ण व्हायची. मला आठवते तेव्हा पास झालेली वाड्यातील सगळी मुले आनंदाने निकालपत्रक घेऊन प्रथम त्यांच्याचकडे जायचे. तेव्हा दादामामा प्रत्येकाला पेढे घ्यायला चाराणे द्यायचे. चाराने घेऊन सगळी मुले उड्या मारत भोलाहरच्या दुकानातून पेढे आणून वाटायची.असा दादामामांना आम्हा मुलांचा लळा होता. गणपतीच्या दिवसात सर्वत्र शाडू माती, साचे, रंग असायचे. सुरेश गणपतीचे डोळे रंगवून जीवंत करायचे. तेव्हा आम्ही मुलेही शाडूची माती खेळून पहायचो. तेव्हा एकेक मंडळाच्या गाड्या ट्रक भोईरवाड्यात यायचे. वाजत गाजत एकेक मोठमोठी मूर्ती ढोल ताशात गुलाल उधळत रवाना व्हायची तेव्हाचा आनंद काय वर्णावा. एकेक नारळ फुटायचे तेव्हा तो प्रसाद मिळत रहायचा. गणपतीच्या मिरवणूकीसाठी सगळ्या बालगोपाळांचे लेझीम पथकही दादामामांनी उभारले होते. दांडपट्टा फिरवायलाही आम्ही मुले भोईरवाड्यातच शिकलो. रोज संध्याकाळी बॅन्ड पथकाची तालीम सुरु व्हायची. दादामामा नाटक बसवायचे. त्यांच्या खोलीत अनेकांचा राबता रहायचा. आम्हा मुलांना तेव्हा त्यातले फार काही कळायचे नाही. पण भोईरवाड्याच्या पटांगणात सेट उभे रहायचे. उजव्या बाजूला विहिर. रात्रीची वेळ. दूरवर कुत्र्यांचा आवाज. अचानक एक ज्योत हळूच विहिरीकडे सरकते आहे. हे दृश्य आम्ही मुले अगदी श्वास रोखून पहायचो. दुसऱ्या एका दृश्यात पिंपळाचे झाड. झाडाखाली गौतम बुद्ध हळूहळू प्रकाश पसरत जातो. नाटकांच्या तालमी सुरु झाल्या की आम्ही अगदीच तहानभूक विसरुन त्यात रमून जायचो. लाल कंदिल, काळाच्या पडद्यातून, आमार सोनार बांगला अशी नाटकांची नावे आमच्या कानावर पडत रहायची. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात दादामामांचे नाटक असायचे तेव्हा सेट चढवलेल्या ट्रकमधून ते आम्हा मुलांनाही घेऊन जायचे. एकदा शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नाटक होते. शिवाजीची भूमिका दादामामा करणार होते. पडदा वर गेला आणि दादामामांना स्टेजवरच चक्कर येऊन ते कोसळले. सगळे गोळा झाले. कोणीतरी म्हणाले रंगदेवतेला नारळ फोडायचे राहिले. नारळ फोडल्यावर व रंगदेवतेला हार लावल्यावर दादामामा शुद्धीवर आले व त्यांनी तो प्रयोग पुढे केला.अशा या दादामामांच्या बालपणाशी निगडित सगळ्या आठवणी. नंतर पंचवटी सोडल्यानंतर दादामामांपासून दूर गेलो. जात पडताळणीच्या वेळी दादांचे प्रमाणपत्र घ्यायला मी १९८७मध्ये भोईरवाड्यात त्यांच्याकडे गेलो होतो. दादांचे प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष सावरकरांनी पाहिले. ते दादांचे चहाते होते. दादांचे प्रमाणपत्र पाहून त्यांनी मला बिनदिक्कत पडताळणी प्रमाणपत्र दिले.
दादांसारखा माणूस थोर होता, त्यांचा मोठमोठ्या लोकात दांडगा संपर्क होता. कलासक्त दादांच्या सावलीत आम्ही वाढलो याचा खरोखर अभिमान वाटतो
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment