SarjanSpandan

Search results

Friday, May 28, 2021

सुट्ट्या


          

            आपले भाग्य थोर की आपण भरपूर सुट्ट्या मिळणाऱ्या देशात जन्माला आलो. सुट्ट्या मग त्या उन्हाळ्यातील असो की दिवाळीच्या. एक आनंदाची पर्वणीच असते. सुट्ट्या लागल्या की आनंदाचे अगदी उधाण येते. मनाला अगदी उकळ्या फुटतात. या सुट्ट्यांमध्ये काय करु नि काय नको असे होऊन जाते. लग्नसराई सुरु होते. मंगलमय वातावरण होऊन जाते. पाहुण्यांची वर्दळ सुरु होते. त्यांची सरबराई उठबैस. कोणी माहेरी येते. कोणी माहेरी जाते. आईस्क्रीम सरबत खरबूज टरबूज कलिंगडे यांची अगदी रेलचेल होते. ठिकठिकाणी खेळाचे बेत आखले जातात. क्रिकेटचे सामने रंगतात. कोणी गोष्टींच्या पुस्तकांमध्ये हरवून जाते. कोणी गप्पांमध्ये रंगून जाते.

          कोणाला मामाच्या गावाची आजोळची ओढ लागते. बसस्टँड गजबजून जातो. लोखंडी पेट्या बाचके बोचके सांभाळत खिडक्यांमधून टोप्या रुमाल पिशव्या टाकून जागा धरल्या जातात. काही बसच्या मागून काही ड्रायव्हरच्या बाजूने बसमध्ये शिरकाव करतात. पोरांना हमखास खिडकी पाहिजे असते.

           रसाची गुरहाळे घुंगरुच्या आवाजात चालू राहतात. लग्नाचे बस्ते फाडायला दुकानांवर झुंबड उडून जाते. थम्सअप लिम्का गोल्डस्पाॅटच्या बाटल्या भराभर खाली होत राहतात. मानापानावरुन पागोटे टोप्या हलत राहतात.

           रंगीबिरंगी ड्रेसात पोरं अगदी टुणकन उड्या मारीत राहतात. काही पोरं जुनी पुस्तके पाव किंमतीत घेणारे ग्राहक शोधत राहतात आणि पुढील इयत्तेचे पाव किंमतीत कोणी विकतय का याचा शोध घेत राहतात. काही गेल्या वर्षाच्या वह्यांची कोरी पाने एकत्र करुन नवीन वह्या शिवण्यात मग्न होतात. काही रानमेवा गोळा करीत राहतात. तूतीच्या झाडांवर चढून लालचुटुक फळं चाखत राहतात.

          उन्हाळ्याच्या सुट्टीची जशी मौज असते त्यापेक्षा अधिक मौज दिवाळीच्या सुट्ट्यांची असते. आकाश कंदील करायचे असतात. किल्ले करुन गाडगे बसवून फटाके फोडायची सोय करायची असते. फराळाचा घमघमाट हुंगायचा असतो. विषयवार दिवाळीचा मिळालेला अभ्यास पूर्ण करायचा असतो. त्यात चित्रकलेचा अभ्यास अतिशय आवडीचा. रंग मांडून तासंतास चित्र काढण्यात दंग व्हायचे.

            काही घरी सुट्ट्यात पर्यटन करण्याचे नियोजन आधीच तयार असते. दोन तीन महिने आधी तिकीट बुकींग होऊन जाते. काही एकत्र एका ठिकाणी पर्यटनास जातात तर काही घरात एक जण उत्तरेला गेला तर दुसरा दक्षिणेला जाऊन येतो आणि भारतभर फिरल्याचा आनंद लुटतो.

           सुट्टीप्रेमी जसे असतात तसे सुट्टीमध्ये काम करणारेही असतात. सुट्ट्यांमध्ये कोठेही जाता नाही आले तरी प्रवासवर्णनाची पुस्तके ग्रंथालयातून आणून आणून वाचत राहतात आणि मनातल्या मनात देश विदेशास गेल्यासारखा आनंद मिळवतातच

@विलास आनंदा कुडके 

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...