काही आठवणी मनात अगदी घट्ट रुजलेल्या असतात. मनाचा एक हळवा कोपरा अशा आठवणींनी व्यापलेला असतो. खूप एकटे वाटते तेव्हा हळूच एकेक आठवण डोकवत राहते आणि नकळत पापणी भिजवित राहते. १५ फेब्रुवारी १९७४ रोजी आई गेली. बरोबर ४४ वर्षे झाली. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. काही कळण्याचे ते वय नव्हते. बाबा तेव्हा गोराराम गल्लीतील बाल शिक्षण मंदिर या शाळेत मुख्याध्यापक होते. शेवटच्या दिवसात आई कर्करोगाने शालिमार जवळील शासकीय रुग्णालयात दाखल होती. परिस्थिती गरीबीची. अवघा ५० रुपये पगार होता बाबांना. तेव्हा आम्ही चरण पादुका मंदिराजवळ सितास्मृती या बोराडे यांच्या वाड्यात भाड्याने राहायचो. त्या आधी लाटेवाड्यात राहायचो. ही आठवण तिथलीच. वडील गाणगापूरला बहिणीला पगारातून मनीआॅर्डरने पैसे पाठवायचे त्यामुळे घरी खर्चासाठी अगदी कमी पैसे उरायचे. पण आई तेव्हा तुटपुंज्या पैशात संसार चालवायची. घरखर्चावरुन घरात नेहमी खटके उडायचे. मोठा सावत्र भाऊ व बहिण तेव्हा गाणगापूरला बहिणीकडे ठेवल्याने वडीलांना दरमहा मनीआॅर्डरने पैसे पाठवावे लागायचे. घरात भांडण झाले की बाबा घराबाहेर निघून जायचे आणि मग आईचा नुस्ता संताप होत राहायचा. त्या संतापाचा फटका मला हमखास बसायचा. लाथाबुक्क्यांनी लाटण्याने आई मला झोडपून काढायची. वडील मग बरयाच वेळाने आले की माझी अवस्था पाहून आईला गयावया करुन मारत जाऊ नको म्हणून हातापाया पडायचे. मला त्यावेळी समजायचेच नाही की आपल्याला आई नेमके का मारत आहे. मी त्या काळात मग दिवसभर भोईर वाडा नाहीतर मारुती मंदिरात राहायचो. घरी वडील शाळेतून परतायच्या वेळी हळूच दबकत दबकत अंधारया पायऱ्या पायांचा आवाज न करता कानोसा घेत घेत परतत असे. दिवसभर मग खाणे नाही की पिणे नाही. भोईर वाड्यात आजीने काही दिले तर तेवढे किंवा काहीच न खाता तेथील गार फरशीवर कोपर्यात झोपून जाई. मोठा कठीण काळ होता तो. आईच्या माराचा अगदी धसकाच घेतला होता मी. लाटेवाड्यात पहिल्या मजल्यावर आम्ही राहायचो. त्या घराच्या खिडकीतून आतला बल्बच्या उजेडात बाबा दिसतात की नाही याचा मी दुरुन अंदाज घेऊन मग घरी जायचो. एकदा असेच आई आणि बाबांमध्ये घरखर्चावरुन जोरदार भांडण झाले. वडीलांची शाळेत जायची वेळ झाल्याने ते तसेच जेवण न करता गेले. बरोबर मीही उपाशीच त्यांच्याबरोबर शाळेत गेलो. तिथे वर्गातील मुलींनी कौतुकाने मला त्यांच्या जवळील पेरु खाऊ दिला. दुपारी मधल्या सुट्टीत वडील मला सुंदर नारायण मंदिराजवळ त्यांच्या विद्यार्थ्याच्या हाॅटेलात घेऊन गेले आणि भजी खाऊ घातली. स्वत: मात्र उपाशीच राहिले. दुपारी वर्ग भरल्यावर बघतो तर काय आई बाबांसाठी डबा घेऊन आलेली. ते पाहून बाबांना अगदी भरुन आले. तोपर्यंत आईसुद्धा जेवलेली नव्हती. ते दोघे मग त्या डब्यात जेवली. मलाही घास भरवले. कितीही भांडणं होवो पण आई आणि बाबा एकमेकांशिवाय जेवायची नाही. बाबांचा आईवर भारी जीव होता. शेवटच्या दिवसात आई रुग्णालयात होती तेव्हा बाबा घरातील सर्व आवरुन रुग्णालयात आईसाठी फळे घेऊन जायचे मग शाळेतही जायचे. आई गेली तेव्हा ते आपली पमा गेली रे असे म्हणत अक्षरशः हंबरडा फोडत घरी आले. आईला टॅक्सीने घरी आणले तेव्हा त्यांच्या मदतीला जोडीला कोणीही नव्हते. अगदी तारांबळ झाली होती त्यांची. आज हे सगळं आठवलं की डोळे भरुन येतात. आई सारखी मारायची म्हणून तेव्हा माझं बालमन म्हणत होते की बरे झाले गेली. पण जसजसे दिवस उलटत गेले तसतसे आईच्या आठवणींनी मन व्याकुळ होत राहिले. मारायला का होईना पण आई रहायला हवी होती असे दिवसेंदिवस वाटत राहिले. बाबांनी नंतर आईविना मला फुलासारखे जपले. माझे सगळे हट्ट पुरवले. आईची मायाही त्यांनीच दिली. माझ्यातील हळवेपण कदाचित या दिवसांमुळे आलेले असावे मला आजही जाणवत राहते.16/02/2018
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment