*मैत्री आणि प्रेम....*
‘इक लब्ज मोहब्बत का अदनाई फसाना है, सिमटे तो मोती, फैले तो जमाना है’ असे एका शायराने प्रेमाबद्दल सुंदर लिहिले आहे. एकाशी होते ते प्रेम आणि जगाशी होते ती मैत्री. एकाच प्रेमाची ही दोन रुपं. प्रेम आपल्या आयुष्यात वेगवेगळया वयात, वेगवेगळया रुपात प्रकटत असते. पहिल्यांना जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपल्या रडण्याची वाट पहात असलेल्या आईच्या डोळयातील आनंदाश्रूंच्या रुपाने दुग्ध धारांतून प्रेम भेटते. वाकड्या वाटेवरुन सरळ रस्त्यावर शिस्तीत चालायला लावणाऱ्या बापाच्या धाकात आपल्यादा प्रेम भेटते. ज्यांचे रुप, रंग वगैरे काहीही न पहाता आपले मन जुळते त्या मित्रांच्या/सवंगड्यांच्या रुसव्या फुगव्यात प्रेम भेटते. राखी बांधून घेणाऱ्या भावाच्या मनगटात प्रेम भेटते. कितीतरी अशी नाती.. अनामिकही.. आपल्याला प्रेम भेटतच असते.
प्रेम हा खरेतर एक समुद्र आहे. सर्वत्र जीवनसाखळयांमध्ये प्रेम हीच प्रेरणा आहे. मोराचा पिसारा फुलविणे असेल, सुगरणीचे घरटे बांधणे असेल, एखाद्या पक्षाचे शीळ घालणे असेल. सर्वत्र प्रेम आहे. प्रेमाच्या या समुद्रातील एक थेंबसुद्धा आपण आपल्या आयुष्यात स्वीकारलेला नसतो. आपली संकुचित दृष्टी हा प्रेमाचा असीम समुद्र पाहूच शकत नाही.
जोपर्यंत आपली मैत्री होत नाही, आपण प्रेमात पडत नाही तोपर्यंत मैत्री आणि प्रेम यात पुसटशी सीमारेषा आपण आखून घेत असतो. ‘छे, छे, प्रेमात वगैरे नाही, आम्ही निव्वळ मित्र आहोत आणि केवळ मैत्री आहे’ असे आपण शंकेने पाहणाऱ्याला खुलासे करीत राहतो. पण खरेच या दोन्ही गोष्टी वेगळया आहेत का?
कोणी म्हणते आधी मैत्री होते आणि तीच प्रेमाची सुरुवात असते. म्हणजे मैत्रीचे सुरवंट प्रेमाच्या फुलपाखरांमध्ये रुपांतरित होते. प्रेम तुटू शकते, प्रेमभंग होऊ शकतो पण मैत्री अतूट असते. मैत्री प्रेमाच्याही पलिकडे निरंतर राहते, असे आपल्याला वाटते. प्रेमात माणूस ‘पडतो’ तर मैत्रीत तो ‘उभा’ राहतो. प्रेम ‘शापित' असते. जो प्रेमात पडेल त्याच्या विरोधात सगळी कायनात उभी राहते. चौबाजूने विरोध, संघर्ष, संकटे यांना त्याला/तिला सामोरे जावे लागते. प्रेमाचा सहजासहजी कोणत्याही समाजात स्वीकार होत नाही. प्रचंड विरोध होतो. प्रसंगी प्राणही गमवावे लागतात. याउलट मैत्री एक अलौकिक देणगी ठरते. जो प्रेमात पडला त्याने आपले सुख चैन गमावलेले असतात. वर ज्याच्या प्रेमात पडला त्याचेही रंजोगम परेशानी तो मागून घेतो. या प्रेमाचा शेवटही काय होतो. “एक दुजे के लिए” या चित्रपट आला तो पाहून त्याकाळात कितीतरी प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्या. अलिकडेच “सैराट” सारख्या चित्रपटातूनही प्रेमाची शोकांतिका दाखवण्यात आलेली आहे. प्रेमाचा सुखांत झाल्याचे एकही उदाहरण नाही. प्रेमात शेवटी भंग, ताटातूट किंवा लग्न हे ठरलेलेच. लग्न म्हणजे व्यवहार आणि व्यवहार आला की प्रेम कापरासारखे उडून जाणार हे ठरलेलेच.
आपल्याला आठवेल की लग्न जुळेपर्यंत व लग्न झाल्यानंतर नवखे दिवस इतकेच प्रेमाचे क्षण आपल्या आयुष्यात आलेले असतात. नंतर संसाराचा रहाट गाडग्यात या प्रेमाचा कधी विसर पडतो आपल्याही लक्षात येत नाही. संसाराचा गाडा ओढतांना दोघांना चाकांची भूमिका घ्यावी लागत असेल तर एकमेकांकडे पाहायला आयुष्यभर फुरसतही मिळत नाही.
काहींच्या बाबतीत “चवळीची शेंग” पाहून झालेली प्रेमाची सुरुवात भोपळयात कधी रुपांतरित होते कळतही नाही. रशियात “फुलदाणी”शी झालेले प्रेम, लग्नानंतर त्याचा ‘रांजण’ झाल्यावर त्यात फुलेही उरत नाही. तो आणि ती यांच्यातील प्रेम तेवढे आपण प्रेम मानतो त्यामुळे प्रेम म्हटले की ‘छे छे आपण नाही बुवा’ म्हणून जो तो कानावर हात ठेवत असतो आणि तितकेच कुठे प्रेमाचा झरा, कवडसा मिळतो का त्याचा जगाच्या नजरा चुकवून शोधही घेत असतो. काहीच मिळाले नाही तर कोल्हयासारखा आंबट चेहरा करुन म्हणतो की प्रेमाच्या वाटेला जायला नको!
प्रेमाच्या आपल्या कल्पनाही धुर्कट झालेल्या, नंबर वाढलेल्या चष्म्यासारख्या असतात. खऱ्या प्रेमापेक्षा लोक बेगडी प्रेमात हरवलेले असतात. महागडे भेट देईल ते खरे प्रेम अशी आपली प्रेमाची स्वस्त व्याख्या असते. कोणाकडून आपण अधिकाधिक सुखी होऊ असा शोध या प्रेमाच्या वाटेवर घेत असतो. आपल्या प्रेमाला स्वार्थ चिकटलेला असतो. त्या स्वार्थाची पूर्तता झाली नाही की प्रेमही उरत नाही. पहिले प्रेम, दुसरे प्रेम अशा मालिका मग आपण करीतच राहतो. एवढेही करुन खरे प्रेम आपण मिळवतो का? तर नाही. कारण खरे प्रेम आपण पाहिलेलेच नसते. कल्पना करा स्वत: छिद्रे पडेपर्यंत एकच गंजीफ्रॉक वापरुन मुलाबाळांची हौस पुरवणारा भले कधी I Love You म्हणत नसेल, परिस्थितीमुळे कधी साधी वेणीही घेऊ शकत नसेल, रात्रंदिवस काबाडकष्ट करीत असताना साधी विचारपूसही करु शकत नसेल, जोडीदार येईपर्यंत उपाशी राहणारी ती असेल, पण त्या दोघात प्रेम नाही असे कसे म्हणता येईल.
खऱ्या प्रेमाची ओळख नसल्यानेच “प्रेम भंग” ताटातूट, घटस्फोट होत राहतात. पहिल्या नजरेत होईल ते प्रेम असे नसते. सुखदु:खात एकमेकांसोबत एकमेकांचे होऊन जाणे, एकमेकांना आधार देत संसार करणे हेही प्रेमच म्हणावे लागेल. जोडीदारासाठी आपल्या डोळयात अश्रू जपून ठेवते ते प्रेम. प्रेम म्हणजे काय फक्त त्याचे आणि तिचेच असते का? मुलीला सासरच्या मंडळीबरोबर पाठवणी केल्यानंतर मांडवात एकटाच कोपऱ्यात रडणारा बाप, जेवले असे खोटेच सांगून मुलासाठी टोपल्यात भाकर शिल्लक ठेवणारी आई, हक्काच्या साडीसाठी भावाबरोबर भांडणारी बहीण, शिकवता शिकवता घराचीही चौकशी करणारे गुरुजी, प्रेम कोठे नाही? दोन मित्रांमध्येही असेत ते प्रेमच! प्रेम सर्वव्यापक आहे. आपल्या भोवतालचा निसर्ग, सृष्टी हीही नकळत जीव मात्रावर प्रेमच करीत असते. एक आपणच असे असतो की जीवनाला वैतागतो, हैराण होतो. आपले प्रेम फक्त स्वत:वर, स्वत:च्या गरजांवर असते. निसर्गावर, सृष्टीवर उलट प्रेम करायला आपले हृदय तितके विशालही कधीच नसते.
मित्रप्रेम म्हटले की कृष्ण सुदाम्याचे उदाहरण दिले जाते आणि प्रेमाचे उदाहरण द्यायचे झाले तर राधा कृष्णाचे उदाहरण दिले जाते. एकदा रुख्मिणीने रागाने कृष्णाला उष्ण दूध नेऊन देतांना विचारले “मिही तुमच्यावर प्रेम करते. पण तुम्हाला मेले त्या राधेचेच कौतुक” काय फरक आहे तिच्यात आणि माझ्यात. कृष्ण म्हणाले “तूच जाऊन बघ फरक” तशी रुख्मिणी फणकाऱ्याने राधा जिथे होती तिथे महालात जाते. तिला महालाच्या द्वाराशीच अतिशय सुंदर स्त्री दिसते. रुख्मिणीला वाटते तिच राधा असावी. पण ती निघाली तिची दासी. दासीच जर इतकी सुंदर तर राधा किती सुंदर असेल या विचाराने ती अंत:पुरात राधेपर्यंत पोहोचते. तो तेथील दासींची पळापळ सुरु असते आणि राधेच्या कोमल गळयावर आतून भाजल्यासारखे बाहेर व्रण उमटलेले होते. दासींकडून कळाले की तिने सकाळी उठल्यापासून काहीच घेतलेले नव्हते. तेव्हा रुख्मिणीला आठवले आपण कृष्णाला उष्ण दूध दिले होते. मनोमन तिला ती आणि राधेतील फरक कळतो, अशी ती प्रेमाची कथा. प्रेम अनंत प्रेम कथाही अनंत! आपली प्रेमाची भूक ही खऱ्या प्रेमाची भूक नाहीच. ती आहे आपल्या पंचेंद्रियांची भूक. त्या पलिकडे आपल्या आत्म्याला कधीही भूक लागत नाही. म्हणून आपण खऱ्या प्रेमापासून वंचित राहतो.
रवींद्रनाथ टॅगोर यांची ‘काबुलीवाला’, प्रेमचंद यांची ‘इदगाह’, एच.ई.बेट्स यांची ‘तिच्या हृदयाची हाक’, गाय दी मोपासा यांची ‘चंद्रिका’ यासारख्या साहित्यातून खऱ्या प्रेमाची ओळख अनेक साहित्यिकांनी करुन दिलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी तर आपल्या पसायदानात ‘मैत्र जीवांचे’ मागितले आहे. संत तुकडोजी महाराजांनी ‘मित्रा! कर मैत्री त्यासी जो सत्यविन शब्द न बोले सहजहि कोणासी/ सहनशीलता, सरळ वृत्तिची, वागणूक ज्याची/अपुले दु:ख न वदे कुणाला, चिंता इतरांची/चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदी न कवणासी, दिनचर्या सततची योग्य ती, हाव न मानाची, दिन दिनांची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची’ असा मित्र जोडण्यासाठी सुचविले आहे. मैत्री आणि प्रेमाबद्दल समाज माध्यमांमध्ये अनेक सुविचार मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या वाचनात येतात. त्यामध्ये मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात. प्रेम ही सुंदर भावना आहे कारण ती हृदयातून येते पण मैत्री त्याहून अधिक सुंदर आहे कारण ती हृदयाला आधार देते. एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात. मनावरचं ओझं हलकं करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री!!! असे कितीतरी सुविचार आपले मन सुखावून टाकतात. मन उदात्त सुंदर करीत राहतात. तरीही प्रेमाची आणि मैत्रीची परिपूर्ण व्याख्या अपूर्णच आहे.@विलास कुडके
No comments:
Post a Comment