#देवभूमि हिमाचल प्रदेशात ९
पुन्हा सर्व ट्राॅलीत बसून हळूहळू खाली आले. रोपवेची मजा काही औरच होती. खाली येईपर्यंत दुपारचे चार वाजले होते. परत गाडीपर्यंत येताना रस्त्यावर कोणी चेरी घेतली. एका कोपर्यात भुट्टा भाजला जात होता तिथे काहींनी निंबू मीठ लावलेल्या भुट्ट्याचा स्वाद घेतला. रस्त्याने तेथील पारंपारिक रंगबिरंगी स्टोन ज्वेलरी विकणारया स्रिया फिरत होत्या. सगळे गाडीत बसून रुमवर आले. फ्रेश होऊन लगेच हडिंबा टेम्पल बघायला जायचे होते. सगळे थकलेले होते तरी भराभर तयार झाले.
गाडीत बसले. गाडी व्यास नदीवरील पुलावरुन खडखड करीत अरुंद रस्त्याने निघाली. आधी वशिष्ठ मुनींचे मंदिरात सगळे गेले. तिथे मंदिराचे दुरुस्तीचे काम सुरु होते. पडदा लावलेल्या ओवरीत आम्ही डोकावून पाहिले तर मंदिराचे मोठमोठे नक्षीदार लाकडी खांब कारागीर तयार करण्यात मग्न झालेले होते. काही पर्यटकांनी त्या नक्षीदार खांबांचेही फोटो मोबाईलमध्ये घेत होते. तेथील गरम पाण्याचे कुंड आम्हाला बाहेरुन बघावे लागले. मंदिराच्या मधल्या चौकातूनच वशिष्ठ मुनींना नमस्कार करुन बाहेर पडले. जवळच रामाचे सुंदर लाकडी नक्षीकाम केलेले पुरातन मंदिर होते. मंदिराच्या ओट्याजवळ काही स्रिया ससे घेऊन 'सशासोबत फोटो काढून घ्यायला सुचवत होते. आमच्यातील लहान मेंबरने सशासोबत फोटो काढून घेतला.
तेथून निघाल्यावर उतारावरच्या रस्त्यावर दुकानांची गर्दी होती. शाली स्टोन ज्वेलरी अॅन्टीक पीस यांची कितीतरी दुकाने होती. एका दुकानात वाघाचे तोंड असलेले पितळी कुलूप पाहिले. चावीही पितळी. आठशे रुपये किंमत होती. एका ठिकाणी गणेश लक्ष्मी एकत्र असलेला छोटा सुंदर दिवा पाहिला. एका ठिकाणी छोट्याशा दुकानात लाकडी किचेन पाहिजे त्या आद्याक्षर रंगवून नक्षी काढून मिळत होती. काही शालीच्या दुकानात शिरले. काहींनी किचेन बनवून घेतले. छोटेखानी रेस्टॉरंटमध्ये पेटपुजा केली. तिथे पार्किंगची सोय नसल्याने ड्रायव्हरने गाडी बरीच दूर खाली गाडी पार्क केली होती. गाडीपर्यंत सगळे पोहचले. गाडी हडिंबा टेम्पलच्या दिशेने निघाली. अरुंद रस्त्यावरुन ट्रॅफिक खूप होती. हळूहळू गाडी सरकत होती. रस्त्याच्या कडेने दुकानांच्या रांगाच रांगा होत्या. एका दुकानाच्या पाटीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. स्वप्नाली जाधव असे मराठमोळे नाव व छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढलेले दर्शनी भागी ठेवलेले ते चित्रकाराचे दुकान होते. एवढ्या लांब दूरवर परप्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र पाहून सुखावल्यासारखे वाटले.
हडिंबा टेम्पलच्या गेटवर पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. गेटच्या बाहेर एक मोठा सजवलेला याक होता. पर्यटक त्यावर बसून फोटो काढून घेत होते. आमच्यातील सर्वात लहान मेंबरनेही ती हौस भागवून घेतली. पुढे हडिंबा मंदिरात जाण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. रांगेत उभे राहून त्या पाचशे सहाशे वर्षापूर्वीच्या लाकडी उतरत्या छपराच्या बौद्ध चिनी शैलीतील मंदिराचे निरीक्षण केले. मोठमोठे लाकडी खांब वापरलेले होते. मोठ्या लाकडी नक्षीदार खिडक्या आतून बंद केलेल्या होत्या. रानटी जनावरांची शिंगे आतून भिंतींवर लावून ठेवलेली होती. दरवाजावर ॐ मणीपद्मणे मंत्र लाकडात कोरलेला होता. (क्रमशः)
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment