#मैत्रीची पालवी
आजकाल कुणालाही मित्र बनविणे किती सोपे झालेले आहे. विविध समाज माध्यमांनी मैत्रीसाठी असंख्य दारे उघडून दिली आहेत.
एक काळ असा होता की गल्लीत एकत्र खेळायला अध्ययन करायला जमलेल्यांमध्ये मैत्रीचे धागे हळूहळू गुंफले जायचे. समान शीलेसु समान व्यापारेसु मैत्री आपोआप जुळली जाते. कृष्ण सुदामा हे मैत्रीचे आदर्श उदाहरण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असते. लहानपणी काहीजणांनी 'राजा और रंक' चित्रपट पाहिलेला असतो. मैत्रीसाठी पद प्रतिष्ठा संपत्ती गरीबी काहीही आडवे येत नाही. दोन मनांची तार जुळली की मैत्रीची पालवी कुणाच्याही मनात फुटतेच. इतर कोणत्याही नात्याचे नाव देता येणार नाही असे सुगंधी नाते म्हणजे मैत्री. ज्ञानेश्वर माऊलींनी 'मैत्र जीवांचे' ही विश्वव्यापक संकल्पना दिली आहे. मैत्री केवळ माणसामाणसातीलच नव्हे तर चराचर सृष्टीतील जीवांमध्ये मैत्र व्हावे इतकी व्यापक अपेक्षा ज्ञानेश्वर माऊलींनी प्रकट केलेली आहे. यामध्ये मग प्राणी वृक्ष देखील आहेत.
मित्रत्व ही प्रत्येकाचीच मानसिक गरज आहे. मित्र नाही असा माणूस जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. काहीतर अजातशत्रू असतात आजच्या इतकी प्रगत समाजमाध्यमे उपलब्ध नसतांना मैत्री जुळण्याचे किंवा जुळवण्याचे अवसर अतिशय मर्यादित होते. घराचा परिसर, गल्ली, शाळा, महाविद्यालय, नोकरी, व्यवसाय अशा क्रमाने प्रत्यक्ष संपर्कात येईल त्याचे आचार विचार आवडी निवडी छंद इत्यादीमुळे मैत्री व्हायची.
जसजसे आयुष्य पुढे जात रहाते तसतसे प्रत्येक टप्प्यावर भेटलेले मित्र हळूहळू मागे पडत जातात. मला माझ्या शाळकरी वयात भेटलेले दोन मित्र नेहमी आठवतात. एक मित्र वर्गात येताना घरुन शिळ्या भाकरीचे कुटके खिशात भरुन आणायचा आणि शिक्षक शिकवत असताना तो एकेक कुटका लपवून लपवून चोरुन खात असायचा. त्याला भूक बिल्कुल आवरायची नाही त्यामुळे त्याची आई त्याला खिशात भाकरीचे कुटके भरुन द्यायची. डबा वगैरे लाड तेव्हा नसायचे त्यामुळे मीही भूक लागली की तेव्हा त्याच्याबरोबर भाकरीचे कुटके खाण्याच्या कार्यक्रमात सामिल असायचो. दुसर्या मित्राबरोबर शाळेतून घरी येताना खूप पाऊस लागला तेव्हा भिजू नये म्हणून अंगातला शर्ट काढून एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून येतायेता टांग्याखाली सापडलो होतो. तेव्हा हरवेल म्हणून छत्रीही दिली जायची नाही.
पुढे वर्गातील हुशार मुलाशी मैत्री जुळवावी अशा हेतूने अनेक मित्र मिळाले. अनेकांशी मैत्री जुळवली. मुलांना मैत्रिणी आणि मैत्रिणींना मित्र असे प्रकार तेव्हा नव्हते. सर्वत्र त्यासाठी बंधने होती.
महाविद्यालयात असताना एका वर्गात असल्यामुळे जुळलेल्या मित्रांमध्ये एक मित्र वाचनाचे वेड असलेला मित्र होता. एक गुलाम अलीच्या गझल्स, मोहम्मद रफीची गाणी म्हणायचा. एका मित्राचे सौंदर्य प्रसाधनाचे दुकान होते. त्याने महाविद्यालयात आपली ल्युना पार्क करताना एका मुलीची सायकल लावताना चेष्टा केली. सुरुवातीला संतापलेल्या मुलीशी नंतर चांगलीच मैत्री झाली. हाच मित्र अमरनाथला गेला असता श्वासाचा त्रास होऊन तिथे दगावला आणि चटका लावून गेला.(क्रमशः)
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment