#अलविदा सुशांत सिंह राजपूत
बाॅलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि सर्व चित्रपटसृष्टी हलली आहे. हळहळली आहे. करियरच्या अल्पावधीत एम. एस. धोनी दि अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ छिछोरे सारख्या चित्रपटातून भूमिका करुन प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सुशांतसिंह सारख्या अभिनेत्याने असे पाऊल का उचलले असेल. असे काय घडले की तो आतून एकदम तुटून गेला.त्याने आत्महत्या नेमकी का केली? त्याला नेमके कोणत्या गोष्टींची चिंता होती? त्याला कोणत्या कारणाने नैराश्य आले? हे सर्व प्रश्नच आहेत. गेले वर्षभर तो मानसिक तणावात नैराश्याच्या गर्तेत होता.
दि ३जून, २०२०ला त्याने इन्टाग्रामवर पोस्ट टाकली होती
Blurred past evaporating from teardrops
Unending dreams carving an arc of smile
And a fleeting life negotiating between the two. माँ
(अंधुक झालेला भूतकाळ अश्रुवाटे ओघळत आहे
न संपणारी स्वप्नं हास्याची लकेर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे
पण क्षणभंगुर आयुष्य या दोघांशी वाटाघाटी करतोय, आई)
अशी आईची आठवण काढत सुशांतने टाकलेली ही पोस्ट शेवटची ठरली.त्याच्या १६व्या वर्षीच २००२मध्ये त्याच्या आईचे निधन झालेले होते. त्याचा त्याच्या मनावर परिणाम झालेला होता. आईच्या आठवणीत तो अगदी हळवा होता. त्याची बहिण मितू सिंह राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे.
सुशांत सिंहचा जन्म बिहारमध्ये पटना येथे २१जानेवारी,१९८६रोजी झाला.बिहारमधील सेंट कटेन्स हायस्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले. कुलची हंसराज माॅडेल स्कूल, दिल्ली येथे त्याने उच्च शिक्षण घेतले. तो अतिशय हुशार विद्यार्थी होता. फिजिक्स आॅलिंपिएड वीनर होता. दिल्ली काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेत सातव्या क्रमांकावर आलेला होता. बी. ई. मॅकेनिकल इंजिनिअरींगमध्ये त्याने काॅलेजला प्रवेश घेतलेला होता. काॅलेजमध्ये असताना त्याने नाटकांमध्ये भागही घेतलेला होता. इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण अर्धवट सोडून त्याने अभिनयाची वाट धरली होती.
स्टार प्लस वरील किस देश में है मेरा दिल या मालिकेतून २००८मध्ये त्याने दूरदर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तीन वर्षे झी टी. व्ही वर पवित्र रिश्ता मध्ये त्याने मानवची भूमिका साकारली.२०१०मध्ये जरा नचके दिखा व २०११मध्ये झलक दिखला जा यामध्येही त्याने दूरदर्शनवर काम केले. २०१३मध्ये काय पो छे या चित्रपटातून त्याने बाॅलीवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर अॅवार्ड फाॅर बेस्ट मेल डेब्युट करिता नामांकनही मिळालेले होते.
२०१३मध्येच शुद्ध देसी रोमान्स नंतर २०१४मध्ये आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला पी. के. या चित्रपटात सुशांत सिंह याने सहायक कलाकाराची भूमिका केलेली होती. २०१५मध्ये डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी, २०१६मध्ये एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी, २०१७मध्ये रबजा, २०१८मध्ये चंदा मामा दूर के व केदारनाथ या चित्रपटात त्याने काम केले होते आणि प्रचंड प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेली होती. पण सुशांत सिंह राजपूत सारख्या अभिनेत्यावर बाॅलीवूडमधील गटबाजीमुळे बहिष्कृत व्हायची पाळी आली. महेश भट यांना त्याची अवस्था परवीन बाबी सारखी झाल्यासारखी दिसून आली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ड्राईव्ह हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. दिल बेचारा या चित्रपटाचे शूटिंग लाॅकडाऊनमुळे थांबले होते.
सुशांत सिंह राजपूतला आर्थिक विवंचना नव्हती. तो चांगला अभिनेता, उत्कृष्ट डान्सर व टी. व्ही होस्ट होता. एका सिनेमासाठी तो ५ते ७कोटी, एका जाहिरातीसाठी १कोटी इतके मानधन घेत असे. त्याची संपत्ती जवळजवळ ९०ते १००कोटी आहे. त्याच्या डुप्लेक्स बंगल्याचे भाडेच महिन्याला ४.५लाख इतके होते. त्याला अद्यावत कार आणि बाईक्सचे वेड होते. मसेराटी क्वाट्रोपोर्टो ही कार तर १.५कोटीची आहे. लँड रोवर, रेंजर रोव्हर एस. यु. व्ही , बी. एम डब्ल्यू या कार, के १००आर ही बाईक तर २५लाखाची आहे. त्याने घराची अंतर्गत सजावट ऐतिहासिक चित्रांनी करुन घेतलेली होती. जास्तीत जास्त वेळ तो घरातच घालवी. त्याच्या घरात पाॅवरफूल टेलिस्कोप बसवलेला होता व तासनतास तो आभाळातील तारे, ग्रह पहायचा व त्यांचा अभ्यास करायचा. २०१८मध्ये त्याने चंद्रावर जमीनही घेतली होती. १४सप्टेंबर,२०१९ला त्याने आपल्या ५०स्वप्नांची बकेटलिष्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. विमान उडविणे, आयर्नमॅन ट्रायथलाॅनसाठी तयारी करणे, डाव्या हाताने क्रिकेट खेळणे, मोर्स कोड लिहिणे, मुलांना अवकाशाविषयी शिक्षणात मदत करणे, टेनिसमध्ये चॅम्पियनबरोबर खेळणे, फोर क्लेप पुश अप्स करणे, एक आठवडाभर चंद्र, मंगळ, बुध आणि शनी या ग्रहांना त्यांच्या कक्षेत भ्रमण करतांना माॅनिटर करणे, ब्लू होल मध्ये उडी मारणे, डबल सिट एक्सपेरिमेंटला एकदा करुन पहाणे, एक हजार झाडे लावणे, दिल्ली काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग च्या होस्टेलवर एक संध्याकाळ घालवणे, १००मुलांना इस्रो /नासा मध्ये कार्यशाळेसाठी पाठविणे, कैलास पर्वतावर ध्यान करणे, चॅम्पियनबरोबर पोकर खेळणे, पुस्तक लिहिणे, सर्न ची प्रयोगशाळा बघायला जाणे, ध्रुवीय प्रकाशाला पाहून चित्र काढणे, नासाची आणखी एक कार्यशाळेत उपस्थित राहणे, सहा महिन्यात सिक्स पॅक एब्ज करणे, सेनोटेसमध्ये पोहणे, अंधांना कोडिंग शिकवणे, जंगलात एक आठवडा काढणे, वैदिक ज्योतिषशास्त्र समजून घेणे, डिस्नीलँड पहाणे, ली गो ची लॅब पहाणे, एक घोडा पाळणे, दहा प्रकारचे नृत्य प्रकार शिकणे, फ्री एज्युकेशन करिता काम करणे, एंड्रोमेडा गॅलेक्सीला एका विशाल टेलिस्कोपने पाहून अभ्यास करणे, क्रिया योग शिकणे, अंटार्टिकाला फिरायला जाणे, महिला स्वरक्षण प्रशिक्षणास मदत करणे, जिवंत ज्वालामुखीचे कॅमेरयाने चित्रण करणे, शेती करणे शिकणे, मुलांना नृत्य शिकविणे, दोन्ही हातांनी सारखीच निशानबाजी करणे शिकणे, रेसनिक हेलिडे चे प्रसिद्ध भौतिकीचे पुस्तक पूर्ण वाचणे, पाॅलिनेसिचन एस्ट्रोनाॅमी समजून घेणे, आपल्या ५०प्रसिद्ध गाण्यांना गिटारवर वाजवणे शिकणे, चँपियनबरोबर बुद्धीबळ खेळणे, लँम्बर्गिनी कार खरेदी करणे, व्हिएन्ना मधील सेंट स्टीफन कँथ्रडेलला जाणे,व्हिजिबल साऊंड व वायब्रेशन चे प्रयोग करणे,मुलांना इंडियन डिफेन्स फोर्सेस करता तयार करणे, स्वामी विवेकानंदांवर एक अनुबोधपट तयार करणे, सर्फ बोर्डावर लाटांबरोबर खेळणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर काम करणे, ब्राझिलचा डांस व मार्शल आर्ट शिकणे, रेल्वेत बसून संपूर्ण युरोप फिरणे ही ती स्वप्नांची यादी. स्वप्नांच्या या यादीवरुनच सुशांत सिंह राजपूत या तरुणाची आकांक्षा महत्वकांक्षा त्याची विविध क्षेत्रातील झेप अभ्यास चिकाटी गुणविशेष यांचे दर्शन होते. टीव्ही क्षेत्रातून आलेल्या या हरहुन्नरी कलावंताला बाॅलीवूड नंतर हाॅलिवूडपर्यंत जायचे होते. पण बाॅलीवूडमधील गटबाजी वाळित टाकणे यासारख्या अनुभवातून हा कलावंत एकाकी एकटा पडत गेला. एका सहअभिनेत्रीसोबत तो काही वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये होते मात्र दोन वर्षापूर्वी ते विभक्त झाले होते. त्याची मैत्रिण व तो नवीन फ्लॅट शोधत होते. त्याला नैराश्याच्या गर्तेत खोल खोल रुतावे लागले. इतके की शेवटी त्याला आवाज ऐकू यायचे. गेल्या सहा महिन्यांपासून तो डिप्रेशनवर उपचार घेत होता. या नैराश्यातूनच या कलावंताने दि. १४जून,२०००ला आपली जीवनयात्रा संपविली. या हरहुन्नरी दुर्दैवी कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली!
या निमित्ताने एकच सांगावेसे वाटते सुशांत सिंह राजपूत सारखे कित्येक जण आज डिप्रेशन मध्ये असतील. कुणी नोकरीमुळे, कुणी व्यवसायामुळे किंवा कुणी वैयक्तिक कारणांमुळे.. आपला एखादा मित्रही या आजाराशी झगडत असेल. त्रास, अडचणी कुणाला चुकल्या आहेत .. घरच्यांशी बोला, मित्रांसोबत आपले प्रॉब्लेम शेअर करा.. एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी एखाद्याच्या खांद्यावर रडून मोकळं व्हा..
कधीही वाटलं तर जवळच्या मित्रांना फोन करा, हक्काने बोला.. तुमच्या अडचणी सोडवणे शक्य नसले तरीही बोला, मोकळं व्हा..
आजूबाजूच्या वातावरणाकडे पाहता, निराशा फार वाढत आहे.या नैराश्यातून बाहेर येण्याचा, त्यातून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करुया. मोठ्या धैर्याने या अवस्थेला तोंड देऊया. कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये. 🙏. * 👏🏻*
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment