*माझी देशभक्ती*
शाळेत असताना ज्या दिवशी कडक इस्त्रीतील गणवेश लागायचा, आदल्या दिवशी तांब्यात विस्तव टाकून स्वतः इस्त्री करावी लागायची तो दिवस म्हणजे १५आॅगस्ट. एरव्ही गबाळे असलेले ध्यान या दिवशी कडक इस्त्रीत पाहून आई कडाकडा बोटं मोडायची.मग मूठभर मांस चढायचं. ऐटीत झेंडावंदनला जाण्यासाठी रांगेत उभे राहण्याची लगबग असायची. त्या दिवशी कार्यक्रम संपल्यावर मोठ्या टपोरया संत्री गोळ्या मिळायच्या. तेही एक आकर्षण होते. २६जानेवारीला पोलीस परेड ग्राऊंडवर सगळी मुले जायची तेव्हा प्रत्येकाला मोठा गोड कडक पाव मिळायचा. किती अप्रूप असायचे. रस्ते त्या दिवशी खास झाडून स्वच्छ केलेले असायचे आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला पांढरी औषधी पावडर रेखलेली असायची. घरातून निघालो की घरोघरी रेडिओवर देशभक्तीपर गाणे गुंजत रहायची तसतसे मनातील देशभक्ती अगदी उचंबळून येत रहायची. झेंडावंदन केले की सरळ सुट्टी मिळायची.
१५आॅगस्ट आणि २६जानेवारी हे वर्षातील दोनच दिवस असे की या दिवशी आपल्या अंगात हटकून देशभक्ती संचारत असते. रस्त्याने पहावे तर कोणी खादीचे जाकीट, खादीचा पांढराशुभ्र नेहरु शर्ट, चुस्त पायजामा आणि गांधी टोपी घालून लगबगीने मिरवत असतो. कोणी तिरंगी बॅच खिशाला लावलेला असतो. कोणी गुल्फीच्या काडीला कागदी तिरंगा लावून विकत असतं. कोणी काय तर कोणी काय. येन केन प्रकरणेन प्रत्येकजण आतली सुप्त देशभक्ती यादिवशी वर उफाळून आणतांना दिसतो.
कोणीही असो शालेय जीवनात या निमित्ताने प्रत्येकात थोडीतरी देशभक्ती रुजलेलीच असते.तसे पाहिले तर शाळेच्या प्रत्येक पाठ्यपुस्तकावर सुरुवातीलाच प्रतिज्ञा असते पण ते पान पटकन पलटून प्रत्येकाने धडे घेतलेले असतात. जसा शाळा सोडल्याचा दाखला घेतला जातो तसे या देशभक्तीच्या वातावरणालाही आपण मुकतो. महाविद्यालयात व त्यानंतर नोकरीधंद्यात केवळ एक सुट्टीचा दिवस यापलिकडे आपण १५आॅगस्ट आणि २६जानेवारी याकडे पहात नाही.
पूर्वी रेडिओ आणि आता दूरदर्शन यावर जेवढी देशभक्तीपर गाणी कानावर पडतील तेवढीच देशभक्ती अशी आपली समजूत झालेली असते. कितवा स्वातंत्र्य दिन किंवा कितवा प्रजासत्ताक दिन असे मोजून आपण फलकावर लिहित असतो आणि हा दिवस चिरायु होवो असा जल्लोश करीत असतो.
खरे तर देशभक्ती इतकीच मर्यादित नसावी.केवळ १५आॅगस्ट आणि २६जानेवारी या दोन दिवशी झेंडावंदन केले की झाले असे नाही. खरे तर आपल्या स्वातंत्र्याचा प्रतीक असलेला हा झेंडा रोज लहरत असतो. त्याला दिमाखात लहरता ठेवण्यासाठी रात्रंदिवस सीमेवर संघर्ष करणारा प्रत्येक सैनिक आपल्या नित्य स्मरणात असला पाहिजे.
देशासाठी आपण प्रत्यक्ष जर काही करु शकत नसू तर अप्रत्यक्षपणे आपण देशासाठी काय करु शकतो याचा विचार करु शकतो. देशासाठी उत्पादनवाढीत आपण प्रामाणिक प्रयत्न करु शकतो. उत्पादनाची,राष्ट्रीय साधनसामग्रीची नासडी न करणे, कर चोरी न करता प्रामाणिकपणे भरणे, राष्ट्रीय आपत्तीत मदतीचा हात पुढे करणे असे कितीतरी मार्गाने आपण खरीखुरी देशभक्ती करु शकतो. केवळ देशभक्तीचे प्रदर्शन करण्यापेक्षा मनापासून देशकार्यासाठी हात पुढे करणे, आपले काम प्रामाणिकपणे करणे, भ्रष्टाचार न करणे आणि तो होऊही न देणे हीच खरी देशभक्ती ठरेल. १५आॅगस्टला यादृष्टीने काहीतरी संकल्प करायला हरकत नाही.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment