SarjanSpandan

Search results

Saturday, May 29, 2021

गणपती बाप्पा मोरया

 *गणपती बाप्पा मोरया*


विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत आहे. गेल्या सहा महिन्यात कोरोनामुळे आपले आयुष्य अगदी बदलून गेले आहे. मास्क लावल्याशिवाय वावरणे मुश्कील झाले आहे. सॅनिटाईझर आवश्यक झाले आहे. वैयक्तिक अंतर राखणे आवश्यक झाले आहे. पहिले तीन महिने तर आपण अक्षरशः घरातच कोंडून होतो. आता आता आपण हळूहळू सावध फिरु लागलो आहोत. संसर्गाची भिती सतत मनात असते. साबणाने सतत हात धुवत असतो. अशा कोरोनामय वातावरणात यावर्षी आपल्या बाप्पाचे आगमन होत आहे. इतर कोणत्याही पाहुण्याला आपल्या घरात अजिबात प्रवेश नाही. पण हा पाहुणा दरवर्षीप्रमाणे हक्काने आपल्या घरी येत आहे. या बाप्पाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पहात असतो. घरोघरी त्यासाठी कोपरांकोपरा स्वच्छ करुन लख्ख केला जातो. कोकणात तर घरं सारवली जातात. भिंती रंगवल्या जातात. अंगण सारवले जाते. गणपतीचा सण अगदी दिवाळीसारखा. यावर्षी गणेशोत्सव साजरा करायचा तर आहे पण या उत्साहावर मर्यादा आलेल्या आहेत. घरातील मूर्ती २ फूट आणि मंडळाची ४ फूट उंची असावी. मंडळांना नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. गणेश आगमन व विसर्जनाची मिरवणूक यावर्षी असणार नाही. घरातल्या गणपतीचे घरच्याघरी विसर्जन करावे अशा सूचना देण्यात येत आहेत.

        मंडळाचे गणपती बसवताना आताच्या कोरोनाग्रस्त वातावरणात समाजाचे आरोग्याच्या दृष्टीने प्रबोधन होईल असे देखावे ठेवले पाहिजे. मंडपात प्रवेश करणार्‍याला सॅनिटाईझरची सोय पुरविली पाहिजे. मास्क असल्याशिवाय मंडपात प्रवेश नसावा. शिस्तीत अंतर राखूनच रांगेत दर्शनाची व्यवस्था असावी. प्रसाद आणि फुले यांचासुद्धा मोह टाळला पाहिजे. मोठे मंडळ असतील त्यांनी भक्तांसाठी फेसबुकवर लाईव्ह दर्शन व आरती ठेवली तर गर्दी कमी व्हायला मदत होऊ शकेल. 

     खरे तर हे पार्थिव गणेश व्रत आहे. सार्वजनिक मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी आपण त्याची कमतरता घरातील गणपती मध्ये हौसमौज भागवून अवश्य पूर्ण करु शकतो. कोणी दीड, कोणी पाच तर कोणी दहा दिवस गणपती घरात बसवतो तेव्हा मनसोक्त सजावट करता येईल. आपल्या सजावटीचे मनमोहक फोटो मित्र नातेवाईंकासाठी फेसबुकवर वाॅटसअॅपवर टाकता येतील. या दिवसात घरातील धातूच्या गणेश मूर्तीवर जमेल तितके गणेश अथर्वशीर्षाचे अभिषेक आवर्तने करावी. ॐ गं गणपतये नम:या सारख्या गणेश मंत्राचा जप आणि दूर्वांकूर वाहावेत. घरातही मास्क लावून, सुरक्षित अंतर राखून व सॅनिटाईझर आणि साबण यांचा वापर करुन आपण आपल्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊया! सकल मानव जातीवर आलेले हे कोरोनाचे विघ्न लवकरात लवकर दूर होवो अशी आपण सगळेच बाप्पाचरणी प्रार्थना करुया!!! गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया!!!

@विलास आनंदा कुडके 

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...