नुकतेच लग्न झालेले. कितीतरी दिवस मी लग्नाच्या सफारीत होतो. तिनेपण डोक्यावरुन पदर घ्यावा असा आग्रही होतो. जोडीने फिरायला जाणे व्हायचे. दोघांच्या चालीत फरक पडायचा. बरेच पुढे गेल्यावर मी मागे वळून पाहायचो. ती मागोमाग येत असायची पण सारखे अंतर पडत राहायचे. जोडीने चालण्याचा सराव नव्हता. रस्त्याने आम्ही चालायला लागलो की सगळ्यांना तो कुतुहलाचा विषय व्हायचा. लोकांच्या नजरेत आमची जोडी कशी दिसत असेल कुणास ठाऊक. पण दोघेही बुजरे. खाली मान घालून चालत असू.
कोणीतरी सांगितले नाशिककर फोटो स्टुडिओत जाऊन फोटो काढून या. तसे आम्ही फोटो काढण्याचा बेत आखला. मी पुन्हा लग्नाच्या सफारीत सजलो. तिनेही छानपैकी मंगळसूत्र, कानातले डूल, डोक्यावरुन पदर घेता येईल अशी पैठणी नेसली. सकाळच्या वेळी फोटो चांगला निघतो म्हणून सकाळीच निघालो. नाशिककर फोटो स्टुडिओत पूर्वी आई आणि तिची मैत्रीण तारा यांनी फोटो काढलेला होता. स्टुडिओत पोहचलो. सांगितले फोटो काढायचा आहे. नाशिककर म्हातारे ग्रृहस्थ. त्यांनी प्रकाशझोताच्या छत्र्या दोन्ही बाजूला लावल्या. एक लाकडी बाक होते त्यावर बसवले. मला तिच्या खांद्यावर हात ठेवून बसायला सांगितले ते बरयाच वेळ जमेनाच. त्यांनी हातानेच ठीक ठाक बसवल्यानंतर विचारले रेडी का. मी कसेबसे मान हलवून सांगितले हो. त्यावर ते म्हणाले जरा हसा. पण हसता कुठे येते. बळेच हसून हसून तोंड दुखून आले तरी नाशिककरांचे समाधान होईना. मग त्यांनी हसून दाखवले आणि म्हणाले असे हसा. मग मी तसे हसायचे प्रयत्न करुन विचारले बसका. बरयाचवेळाने त्यांना हवे तसे हसण्यात मी यशस्वी ठरलो. मग ते कॅमेराच्या पाठीमागे काळ्या कपड्यात गडप झाले. तेथूनच त्यांनी रेडी..रेडी असे चारपाच वेळा तरी विचारले. स्माईल प्लीज केले. ते क्लिक करेपर्यंत चेहरा तसाच ठेवायचा म्हणजे मोठे दिव्य वाटत राहिले. शेवटी एकदाचे क्लिक केले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. झाला बुवा एकदाचा जोडीचा फोटो काढून या आनंदात फोटो न्यायला कधी येऊ म्हणून विचारले. पंधरा दिवसांनी या म्हणून त्यांनी सांगितले. अॅडव्हान्स म्हणून काही पैसे जमा करुन आम्ही घरी परतलो. फोटोच्या निगेटिव्ह अंधारात क्लिपला लावून ठेवणे. त्या धुणे. मग फोटो काढणे अशा सगळ्या प्रक्रियेत पंधरा दिवस लागणार होते. मी लायब्ररीत जाऊन फोटो कसे काढतात यावर पुस्तकच घेऊन आलो. सगळ्या प्रक्रियांचे एक कुतुहल होते.. शेवटी जोडीचा फोटो तयार झाला. तो घरी आणला. वर्तमानपत्रात पॅकिंग करुन दिलेला होता त्यामुळे फोटो कसा आला असेल ती घरी येईपर्यंत उत्सुकता होती. घरी आल्या आल्या घाईघाईने पॅकिंग उघडून पाहिले तर फोटो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये अगदी भारदस्त आलेला... आज आपण किती सहज आणि क्षणात फोटो काढतो. सोशल मीडियावर सहज शेअरही करतो पण १९८२ मधील हा जोडीने फोटो काढण्याचा क्षण एक दिव्य पार पाडावे असा होता. काळाच्या ओघात तेव्हाचा तो जोडीचा फोटो पुसट होत गेला पण आठवण मात्र आजही ताजी आहे@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment