नाक आणि ओठ यांच्या मध्ये सुरुवातीला लाजत लाजत फुटणारी मिसरुड पुढे करारीबाण्याची मिशी कधी होत जाते आपल्याला कळतही नाही. तरुणवयात काळ्या मिशीकडे न्हावी व्यतिरिक्त कोणीही फारसे लक्ष देत नाही हे मी स्वानुभवावरुन सांगतो. नियमितपणे दाढी कटींगला गेले की न्हावीच त्याला आवडेल तो आकार मिशीला देत राहतो आणि आपण आरशात नाक ओठ वेडेवाकडे करुन मिशीला ठीक आहे म्हणून पावती देत राहतो. मिसरुड फुटण्याआधीपासून मिशीचे बालसुलभ आकर्षण आपल्याला असते. पुस्तकातील स्त्रियांच्या चित्रांना आयुष्यात प्रत्येकाने कधी ना कधी मिशी लावून पाहिलेली असतेच. मुलीसुद्धा वेणीची कड नाक आणि ओठ यांच्यात ठेवून आपल्याला मिशी कशी दिसते हे कधी ना कधी पहातच असते. आपली उलिशिक मिशीसुद्धा त्यांना आवडतच असते. आपण आपल्या आईबापाचे मुलगाच आहोत अशी सुप्त सुखावणारी भावना यामागे दडलेली असते. मात्र मिशी उलिशिकच असावी. जास्त केस उगवले की मात्र ते चिंतेचे कारण बनून जाते.
शालेय विद्यार्थीदशेत छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप सिंह, टिपू सुलतान, चेंगिज खान, तानाजी मालुसरे, हिटलर हे सर्व त्यांच्या मिशांमुळे आपल्या मनावर अधिक ठसतात. मिशी म्हणजे व्यक्तिमत्त्वाची ओळखच जणू. अब्राहम लिंकनना एका लहान मुलीने पत्र पाठवून कळवले होते की दाढीमध्ये ते खूप छान दिसतील आणि त्यांनी दाढी वाढवून पाहिली व तिच त्यांची ओळख झाली.
चार्ली चॅप्लीनच्या हिटलर कट मिशीनेच त्यांच्या मुक अभिनयात महत्वाची विनोदी भूमिका पार पाडलेली आहे. हिटलरच्या मिशीने भाषणात प्रभाव आणला. दुर्दम्य व्यक्तिमत्त्वाचे लोकमान्य टिळक यांची प्रांजळ मुत्सद्दी मिशी मनात एक वेगळाच आदर दुणावत राहते. चिं वि जोशी यांनी साहित्य सृष्टीत अजरामर करुन ठेवलेली पात्र चिमणभाऊ त्यांच्या मिशीमुळे मनात घर करुन आहेत. अशोक नायगावकर यांची पांढरीशुभ्र भरघोस मिशी त्यांच्या मिश्किल चेहऱ्यावर किती शोभून दिसते.
जगात माणसांचे दोनच प्रकार आहेत. एक मिशा ठेवणारे व एक सफाचट देवानंद असणारे. मिशा ठेवणारे सांगतात बाप जिवंत असेपर्यंत मिशी काढता कामा नये. मिशी हे पुरुषार्थाचे पराक्रमाचे द्योतक आहे. नाहीतर अर्धी मिशी उतरवून देईन असा सहज पण लावला जातो ते उगाच नाही. मोहिमेवर निघतांना मिशीला पिळ देवून निघत. मिशी नसली की नाच्या म्हणूनही हिणवले जाते. इतकी समाजमनावर मिशीची घट्ट पकड आहे. मध्यंतरी बाजीराव किंवा सिंघम सारख्या मिशा वाढवण्याची फॅशनच आली होती. अलिकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी मिशा वाढवून आणि दोन भिवयांमध्ये केशरी चंद्रकोर रेखण्याची तरुणांमध्ये आवड असल्याचे दिसून येते
पूर्वीच्या तमाशापटात हमखास बायल्या नाच्या असायचा. त्याला मिशी नसायची. पूर्वीच्या नाटकात स्री पात्र पुरुषच रंगवायचे. काहीतर मिशी उतरवणार नाही या अटीवर स्त्रियांच्या भूमिका करायला तयार व्हायचे. विशेष म्हणजे त्यांना मिशांमध्ये पाहून प्रेक्षकांनाही काहीच वाटायचे नाही. मिशा काढून बालगंधर्वांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या मनावर राज्य करुन आहेत.
मुच्छे हो तो नथ्थुलाल जैसे' असे फिल्मी डायलॉग सर्वांना आठवत असतील. इंटरवलनंतर हिरोचे मिशीमधील नवीन रुप पुढील कथानकाची उत्सुकता वाढवितांना आपण चित्रपटात पाहिली असेल.
पहिला पांढरा केस आपल्याला प्रथमतः कोठे भेटत असेल तर मिशीमध्येच.मग आपण अनावर रागावून तो मिशीवरील कलंक उपटून फेकून देतो. मिशीमध्ये अनाहूत आगंतुक पांढरा पाहुणा आपल्याला बिल्कुल खपत नाही.
पुढे पुढे मिशी पांढरी होत गेली तरी अमिताभ बच्चनसारखी स्टाईल मारत तिला जपूनच ठेवतो. डोक्यावरील केस गेलेल्यांचा तर नातवावर असावा तसा जीव आपल्या मिशीवर असतो.
काही वेळा न्हावी चुकून मिशी भादरुन टाकतो तेव्हा चारचौघात तोंड लपवून वावरायची वेळ येते. बरयाच लोकांना ओळखच पटत नाही. 'अरे तू होय.. कधीपासून मिशी काढली. जाम भारी दिसतोय' असे म्हटले की हटकून आपण आरशात मिशी हरवलेला चेहरा निरखित राहतो. पण पटत नाही. शेवटी थोडे थोडे खुंट दिसू लागतात तेव्हा कुठे जीवात जीव येतो.
जिथे केवळ मिशीवर मुलगा पसंत होतो तिथे 'तुमची मिशी हीच माझी खुशी' असे म्हणणारया अर्धांगिनीची खुशी पर्यायाने मिशी आयुष्यभर सांभाळावी लागते.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment