आयुष्यभर ज्या दैवताने पाठ राखली ते म्हणजे हनुमान. त्या दैवताला जन्मोत्सवानिमित्ताने कोटी कोटी साष्टांग दंडवत..
अगदी कालपर्यंत हनुमान जयंती म्हटले जायचे पण या चिरंजीव दैवताची जयंती नव्हे तर जन्मोत्सव म्हणावे लागेल. खरा उत्साह या दिवशी असतो. ते लहानगे दिवस आठवतात. सुतळीला पताके चिकटवून रात्रभर पंचवटीतील घराजवळील मारुती मंदिराचे छत गल्लीतील पोरं उत्साहात सजवायची. मारुतीला नव्याने शेंदूर लावायची. चंदेरी चमकीच्या रंगात भुवई व डोळे रेखाटायची. सूर्योदयापूर्वी आंघोळ करुन मंदिराकडे नारळ फोडण्यासाठी जो तो लगबग करायचा. त्यांच्या लागोपाठ दर्शन व घंटानाद यांनी मंदिर कसे चैतन्यमय होऊन जायचे. तो उत्साह काही औरच असायचा.ते मंदिर म्हणजे आम्हा पोरांचे लपाछपी खेळण्याचे खास ठिकाणही होते. मारुती मागे लपायची गंमतही औरच होती. मंदिर दिवसभर गजबजलेले तर असायचेच पण रात्रीही किमान 10-11पर्यंत तेथे गल्लीतील पंचमंडळी आणि इतर वयस्कर मंडळी महाभारतकालीन द्युतपट मांडून डाव टाकित राहायचे आणि पौ बारा म्हणत नारद गारद करायचे. मंदिरात आतल्या बाजूला पश्चिमेला उंचावर एक छोट्या कोनाडावजा खिडकी होती. आईच्या माराच्या भीतीने कितीदा तरी मी त्या खिडकीत चढून बसायचो. तिथे बसल्यावर अगदी सुरक्षित झाल्यासारखे वाटायचे. त्या खिडकीतून उतरताना अंदाजाने खुंटीवर पाय देऊन अलगद लोंबकळत उतरण्याचा देखील त्या बालवयात मला बर्यापैकी सरावही झालेला होता. बालवयात पहिला पाठिराखा सखा मिळाला तो हनुमान असे मला आज वाटते.
हनुमान नंतर काळाराम मंदिरातील सभागृहात श्रीरामापुढे अखंड हात जोडून उभ्याने भेटला. कळायला लागले तेव्हा कळले की तो दास मारुती आहे. पंचवटीतील भोईरवाड्यात आजीच्या घरी आतल्या खोलीच्या दारावर गदा घेतलेल्या वीर मारुतीचा फोटो होता. बहुतेक राजा रवी वर्मा यांनी तो रेखाटलेला असावा. शाळेत हनुमान जयंती साजरी करायला फोटो घेऊन या म्हणून शिक्षकांनी सांगितल्यावर मी आजीकडे हा फोटो मागीतला होता. पण माझी उंची आणि फोटोचे वजन मला झेपेल की नाही याचा विचार करुन तेव्हा आजीला माझी मागणी पूर्ण करता आली नव्हती.
नंदूरबार येथे आई मला आजींकडे घेऊन गेली तेव्हा तिथे तापी नदीकडे जातानाही मला शेंदूरचर्चित मोठे हनुमान भेटले. जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे हनुमान भेटले. नगरसूलला तर सकडे आजीच्या घराजवळच मारुतीचे मंदिर होते आणि विशेष म्हणजे त्याच्यापुढे दगडी वानर बसवून ठेवलेले होते. नगरसूलला नाशिक - नांदगाव एस टी गावातून जिथे थांबायची त्या स्थानकावर हनुमानाचे मंदिर मला आठवते. गावाच्या वेशीवर. जवळच नारदी नदी. तिथे दशक्रिया करुन लोक मारुतीच्या दर्शनाला यायची. तिथेच मंदिरात टावेलटोपीचा कार्यक्रम व्हायचा.
तर अशा या आठवणी. सेवेत रहावे तर हनुमानासारखे दास होऊन या सूत्राने माझी आयुष्यभर साथ केली. या सूत्राने आयुष्यातील अनेक चढउतारात साथ दिली. हनुमान जन्मोत्सवानिमित्त या दैवताप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. जय श्रीराम.. जय हनुमान..
@विलास आनंदा कुडके
जय हनुमान.
ReplyDeleteखुप छान बालपणीचा हनुमान जयंती उत्सव डोळयासमोर उभा केलात.
आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद
Delete