आळशी माणसाचं तोंड पाहू नये म्हणतात. न का पाहिना. आपल्यालाही हात पाय ताणून लोळण्यात कोणी व्यत्यय आणलेला अजिबात खपत नाही. किती सुख दडलय आळशीपणात ते स्वतः आळशी झाल्याशिवाय कळणार नाही. मस्तपैकी हातपाय न हालवता दिवसरात्र नुस्त लोळत पडायचं. आणखी काही लागत नाही आळशी बनण्यासाठी. एकदा का तुम्ही आळशी झाला की मग घरातले बाहेरचे तुम्हाला एक काम सांगतील तर शपथ. एक नंबरचा आळशी आहे.जरा इकडचा तांब्या तिकडे करायला नको. सदानकदा लोळत पडलेला असतो. गिळायला बी जागेवरच लागतं. खायला काळ आणि भुईला भार. नोकरीधंदा नको. कामधंदा नको. किती किती ऐकून घ्यावे लागते आळशी माणसाला. पण आळशीपणाचं सुख भोगायचं असेल तर एवढे ऐकून घेण्यापेक्षा सरळ कानाडोळा करावा. कानात चांगला मोठ्ठा कापूस किंवा हेडफोन घालून ठेवावा आणि मस्त पैकी फेसबुक वाॅटसअॅपवर नजर टाकत लोळत रहावं. वर मस्त पैकी पंखा लावून द्यावा. ए सी असेल तर उत्तमच.
काळजी चिंता न करता सुखात जगायचे असेल तर आळशीपणाशिवाय पर्याय नाही. कष्ट करुन कोणाचे भले झाले तर आपले होईल. अहो मानपोट एक करुन वर्षभर इमानेइतबारे कष्ट घेऊन अभ्यास करणारया पोरांचे मार्क पहा आणि वेळेवर आपल्या वतीने दुसर्याच मुलाला बसवून देणारे, काॅपी पुरवणारयांशी संधान साधणारे, प्रश्नपत्रिका फोडणारयांवर अवलंबून राहणारे किंवा विद्यार्थ्यांचे पेपर लिहिणारे गुरुजण ज्यांना लाभले त्यांचे गुण पहा. तिच पोरं खुशाल राजकारणात टेचात नाव कमवतात आणि कष्टसाध्य पोरं एवढे घासून दोन पैशाची बारा तास राब राब मरण्याची नोकरी गुलामी करुन आयुष्याची वाट लावून घेतात. कुठले सुख येते हो त्यांच्या पदरात. कष्ट करत करतच शेवटी मरतात ना. एवढे कोणी सांगितले. मस्त पैकी आळशी बनावं. आयतं खावं. बापाच्या जीवावर उडावं. मौजमजा करुन घ्यावी. आपण काही कुणाची नोकरी गुलामी करायला आलेलो नाही. धंद्यात उगाच मगजमारी करायलाही आलो नाही. कष्ट तर मुळीच करायला आलो नाही. बापजाद्यांनी मस कष्ट उपसली त्यांचे काय झाले शेवटी. मातीच ना. म्हणून आपल्याला कष्टांचा लई राग आहे पहिल्यापासून. शाळेतबी मास्तरला गरज होती म्हणून ढकलत आणले वरपर्यंत. पण आपल्याला असल्या शिक्षणाची बी गरज नाही. आळशी माणसाला देव काही उपाशी ठेवत नाही. तो तर खाटल्यावर आणून देतोच ना. उलट हातपाय हलवणारयाची तो किती परीक्षा पाहतो. दोन घास सुद्धा लवकर वेळेवर कधी पोटात घालत नाही कष्ट करणारयांच्या.
आळस हा माणसाचा शत्रू म्हणणारयांची खरे तर किव येते. आळस हा माणसाचा किती मित्र आहे ते एकदा आळशी माणूस उपभोगत असलेले सुख पाहिल्याशिवाय कळणार नाही. जे राजे ऐषोआरामात राहिले ते खंडणी देऊन सुखात राहिले. ज्यांनी विजयासाठी मोहिमा आखल्या त्यांचे आयुष्य धामधुमीत प्रसंगी स्वतःचा जीव गमावण्यात गेले. त्यांचे नाव झाले नाही असे नाही पण नुसते नाव होऊन काय उपयोग. जिवंतपणी तर हालच ना!
लोक सकाळची सुखाची साखरझोप मोडून काय तर म्हणे घाम बाहेर काढण्यासाठी जातात. दैववशात प्रत्येकाच्या नशीबात साखरझोप असताना ती ठोकरुन डोळ्यांवर धडधडीत अन्याय करीत आणि घरातल्याही लोकांची झोपमोड करीत बाहेर रपेटला जाण्याची आवश्यकता काय आहे. चार गोधड्या अंगावर घेतल्या की पाहिजे तितका अंगातील घाम बाहेर येतो. पण आळशी माणसाचं ऐकेल कोण!
आळशी माणसांनीच कामाचं महत्त्व आणि ते करण्याचा रेट वाढवलाय हे विसरुन चालणार नाही. नाहीतर कामाला या जगात काही किंमत राहिली असती का?
मला ते लोक फार आवडतात जे घरातील प्रत्येक गोष्टीला एक नोकर ठेवतात. धुणे, भांडी स्वयंपाक, फरशी पुसणे, पुस्तक बदलून आणणे, कार चालवणे, बागेत फुलझाडे लावणे, पेपर वाचवून घेणे वगैरे वगैरे कारण तेवढ्या लोकांना रोजीरोटीला लावल्याचे व आपले धन सत्कर्मी लावल्याचे प्रचंड आत्मिक समाधान त्यातून मिळते. शिवाय आपला दर्जाही कसा उंचावल्यासारखा वाटत राहतो. कल्पना करा कारचा दरवाजा उघडायला, जेवण वाढायला, हात धुवायला, ओले तोंड पुसून द्यायला, कोट चढवायला, बटने लावून द्यायला तत्पर नोकर अवतीभवती असल्यावर तुम्हाला स्वर्गातसुद्धा जायची गरज नाही. भू वरच्या काश्मीर सारख्या स्वर्गातसुद्धा जायची गरज नाही.
या भूतलावर आळशी लोकांची संख्या तुम्हाला जास्त आढळून येईल. ती सर्व कष्ट करणारया ना ना शोध लावणारया लोकांकरिता स्वतःहून एक पाऊल माघार घेऊन संधी उपलब्ध करुन देत आहे याबद्दल खरं तर आळशी लोकांचे जगाने कृतज्ञ राहिले पाहिजे. सरकारने सुद्धा आळशी लोकांसाठी वेगवेगळ्या ऐषोआरामाच्या फुकटच्या शिवाय घरपोच वर माफीच्या योजना काढल्या पाहिजे कारण आळशी माणूस मनात आणले तर मतदान केंद्रापर्यंत जाण्यापेक्षा, कोणाला आपले मत देऊन निवडून आणण्यापेक्षा ऐसपैस लोळत पडणेच केव्हाही पसंत करील हे विसरता कामा नये!
आळसच माणसाला खरोखर रिलॅक्स करतो. त्याला कधीच झटकू नये. उलट त्याला पांघरुन माणूस उत्तुंग भरारीची सुंदर स्वप्ने पाहू शकतो
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment