जगन्नाथाचा रथ अनेक हातांनी ओढला जातो. कोण कसा ओढतोय हे कुणालाही कळत नाही पण रथ मात्र ओढला जातो. अनेक कार्पोरेट कंपन्यांचा संस्थांचा कार्यालयांचा कारभार हा या जगन्नाथाच्या रथासारखाच असतो. अनेक कार्पोरेट कंपन्या प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहचण्यास तेथील कार्यसंस्कृती कारणीभूत ठरते. गुगलसारख्या कंपनीमधील कार्यसंस्कृतीबद्दल आंतरजालावर अनुभव कथन वाचण्यासारखे व मनन करण्यासारखे आहे. कार्यसंस्कृतीवर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत तीही वाचण्याजोगी आहेत.
आज कार्यालय म्हटले की हटकून काम न करणारे, कामासाठी हेलपाटे मारायला लावणारे, काम टाळणारे, कामात विलंब लावणारे, कामासाठी चिरीमिरी मागणारे, कामांमध्ये ठराविक लोकांना झुकते माप देणारे अशा वेगवेगळ्या समजुती लोकांमध्ये रुजल्या आहेत. अशा समजुती रुजायला कर्मचारी जसे जबाबदार आहेत तसेच कार्यसंस्कृतीचा अभाव आणि वरपासून खालपर्यंत वर्षानुवर्षे झिरपत आलेली प्रचंड अनास्था कारणीभूत आहे.
लोकांचा कार्यालयांवरील विश्वास उडालेला आहे तो विश्वास संपादन करण्यासाठी आवश्यक कार्यसंस्कृती अद्याप रुजलेली दिसत नाही. तसा प्रयत्नही होताना दिसत नाही.
कार्यालयांमधून लोकांना आजही प्रचंड प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या नकारात्मकतेला तोंड द्यावे लागत आहे. कामासाठी जावे तर नकारघंटाच ऐकावयास येते.
कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या किंवा टाळण्याच्या पारंपारिक पद्धतीने कामांचे नुकसान होतांना दिसते.एकदा का नोकरी मिळाली की केवळ हजेरी लावणे आणि पगार घेणे एवढ्यासाठी कर्मचारी कामावर जात राहतो. दिलेले काम आत्मियतेने जबाबदारीने केले पाहिजे. त्यासाठी आखलेल्या नियमांचा अभ्यास करुन वेळेत केले पाहिजे आणि केलेल्या कामांमधून समाधान मिळविले पाहिजे ही मानसिकता फार अभावाने आढळते. कर्मचारी म्हणजे केवळ काम टाळणारा, सांगकाम्या किंवा कामच न करणारा असे चित्र चिंताजनक आहे.
कामाचा वेळ कामासाठी खर्च न करता दुसर्याच उद्योगात खर्च करणे, निव्वळ कालापव्यय करणे, कामावर गैरहजर राहणे, कामावर वेळेवर उपस्थित न राहणे, कामाच्या वेळेत गप्पा टप्पा हाणत बसणे, लाव्यालाव्या करीत बसणे, बाॅसच्या कानाशी लागणे, कंपुगिरी करणे यासारख्या प्रकारांमुळे कामांवर विपरीत परिणाम होतांना दिसतो.
कार्यालयात बाॅस आणि कर्मचारी, कर्मचारी आणि कर्मचारी तसेच कर्मचारी आणि लोक यांच्यातील परस्पर संबंधही एकूण कामांवर परिणाम करतात. हे संबंध जितके सलोख्याचे सौहार्दाचे विश्वासाचे व मानवी असतील तितके त्या कार्यालयाचे काम आपली प्रत गुणवत्ता उंचवतांना दिसेल.
बाॅस आणि कर्मचारी हे एका पातळीवर येऊन जेव्हा परस्परांच्या मतांचा विचारांचा आदर करुन कामाची गुणवत्ता प्रत सुधारण्याबाबत एकत्र विचार करतील तेव्हा खरया अर्थाने कार्यसंस्कृती प्रस्थापित व्हायला सुरुवात होईल असे प्रांजळपणे वाटते.
आज चित्र काय दिसते. बाॅस कर्मचाऱ्यांना खडसावत असतो, एकसारखा झापत असतो, याचा परिणाम कर्मचारी केवळ यांत्रिक होऊन जातो. कामावरील त्याची आस्था लोप पावते आणि केवळ बाॅसला खुश करीत राहणे यादृष्टीने त्याची कार्यशैली बनून जाते. कामांवरील या छुप्या तणावांचा परिणाम कर्मचाऱ्यांना विविध व्याधी जडण्यात झाला नाही तर नवलच.
अलिकडे बायोमेट्रिक हजेरी, सेवा हमी कायदा, झिरो पेंडन्सी सारख्या माध्यमातून कार्यसंस्कृतीचा कार्यालयांमधून उगम साधला जात आहे. स्वच्छता अभियान राबविले जात आहे. अनेक कार्यालये जुनाट पारंपारिक रुप टाकून कार्पोरेट लुक धारण करीत आहेत. आयओसो नामांकनासाठी आवश्यक बदल करीत आहेत. बरेचशा गोष्टी आॅनलाईन उपलब्ध होत आहेत. याचबरोबर कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. कर्मचारी कल्याणाचा अधिक विचार व्हावयास हवा. कामापेक्षा कामांच्या अहवालांचे लेखीकामाचे ओझे कमी झाले तर तेवढा वेळ कामे निकाली काढण्यासाठी उपयोगात येऊ शकतो.
तो दिवस दूर नाही जिथे कार्यसंस्कृतीसाठी वरपासून खालपर्यंत सर्वच जागरुक प्रयत्नशील होतील व कार्यालयांच्या किंवा जिथे जिथे काम केले जात आहे तेथील कामांविषयी लोक आश्वस्त होतील.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment