#अक्षय तृतीया अर्थात आखाजीचा सण
वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीया.या दिवसाला आखा तीज पण म्हटले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक.दसरा, गुढी पाडवा व अक्षय तृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त तर दिवाळीचा पाडवा अर्थात कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. खान्देशात या सणाला आखाजी म्हटले जाते. या दिवशी आपल्या तसेच जैन धर्मात व्रत केले जाते. या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशीच अन्नपूर्णा देवी, नर नारायण, परशुराम, बसवेश्वर व हयग्रीव यांची जयंती आहे. भगवान व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना याच दिवशी प्रारंभ केला व त्यांचे लेखनिक म्हणून गणपती होते. याच दिवशी उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडण्यात येते. ते दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी बंद होत असते. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरण दर्शन होते. वर्षभर नंतर ते वस्रांनी झाकलेलेच असतात. या दिवशी गंगास्नान केले तर पापमुक्ती होते. कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही. देव, पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते. याच दिवशी गंगेचे पृथ्वीवर स्वर्गातून अवतरण झाले. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरु झाले. असे या दिवसाचे माहात्म्य सांगितले जाते.
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून काही ठिकाणी बलरामाची पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीच्या मशागतीचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. देशावर मात्र ही प्रथा नाही. या शुभ मुहूर्तावर आळी करुन लावलेल्या फळबागा भरघोस फलोत्पादन देतात. आयुर्वेदातील औषधी वनस्पती देखील याच मुहूर्तावर रोवतात.
हिंदू संस्कृतीत या दिवशी जवळच्या नदीत, गंगेत किंवा समुद्रात स्नान करावे, सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ, वस्र ब्राह्मणांना दक्षिणादान द्यावे, ब्राह्मणांना भोजन द्यावे असे सांगितले आहे. या दिवशी सातूचे ग्रहण महत्वाचे मानले जाते. या दिवशी नवीन वस्र, शस्र, दागिने यांची खरेदी केली जाते. नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तूंची खरेदी, मोठे आर्थिक व्यवहार या साठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो.
उत्तरभारतात या दिवशी पूजा प्रार्थना केली जाते. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. गंगास्नान, तीर्थयात्रा, यज्ञ, अन्न व धन दान, ब्राह्मणाला सातू समिधा दिली जाते.
ओरिसामध्ये शेतकरी वर्गात या दिवसाचे अधिक महत्त्व आहे. लक्ष्मीची पूजा करुन नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला तेथे 'मुठी चूहाणा' म्हणतात. या दिवशी पालेभाज्या व मांसाहार वर्ज्य असते. जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.
दक्षिण भारतात महाविष्णू, लक्ष्मी व कुबेर यांचे या दिवशी पूजन केले जाते. मंदिरात देवदर्शन व अन्नदान केले जाते.
पश्चिम बंगालमध्ये व्यापारी वर्गात या दिवसाचे महत्त्व आहे. हालकटा नावाने गणपती लक्ष्मी यांची पूजा केली जाते. व्यापारी लोक याच दिवशी नव्या हिशेबाच्या वह्या वापरायला सुरुवात करतात.
चैत्र महिन्यात चैत्र गौरीची स्थापना व पूजा करतात. हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना बोलावून मोगर्याची फुले /गजरा, आंब्याची डाळ (भिजवलेले हरभरे), पन्हे देतात. हळदीकुंकवाच्या समारंभाचा गौरी उत्सवाचा अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचाही दिवस म्हणून पाळला जातो. पितरांचे स्मरण करुन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. मातीचे मडके आणून त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, कैरीचे पन्हे /चिंचोणी, पापड, कुरड्या इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणांना दान करतात. यामुळे पितरांचा संतोष होतो असे मानतात. या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय्य मिळते.
खान्देशात या सणाला आखाजीचा सण म्हणतात. सर्व सणांमध्ये या सणाला जास्त महत्त्व आहे. शेतकऱ्यांसाठी आखाजी म्हणजे नववर्षाची सुरुवात. शेतीच्या हंगामाच्या नियोजनाची तसेच भविष्यातील संकल्पांची नांदी म्हणजे अक्षय्य तृतीया. शेतात काम करणारे सालदार शेतमजुरांसाठी वर्षभराच्या मजुरीची बेगमी याच दिवशी होते.
आखाजीच्या घरोघरी अक्षय्य घट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते.त्याच्यावर छोटे मातीचेच भांडे ठेवून त्यावरती खरबुज आणि दोन सांजोर्या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडे पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नवीन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राध्द तर्पण विधी होतो.
सकाळी उंबरठ्याचे औक्षण करुन पूर्वजांचे स्मरण करुन कुंकवाचे एकेक बोट उंबर्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारुन पितरांना आमंत्रण दिले जाते.
दुपारी चुलीवर /गॅसवर 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई यांचा नैवेद्य असतो.
दान जप स्नान आदींचे फल या दिवशी अनंत असते. या दिवशी सोने जडजवाहीर खरेदी केले तर त्यात वाढ होत राहते. याच दिवशी माठातील थंड पाणी पिण्यास व आंबे खाण्यास सुरुवात करतात. या दिवशी आंबे माठ रांजण गरीबांना दान करतात. पाणपोया सुरु करतात. या दिवशी कर्ज काढत नाही. पितरांच्या नांवाने आगारी करतात.
आखाजी म्हणजे सासुरवाशी लेकींसाठी माहेरचा विसावा. हा सण रणरणत्या उन्हाळ्यात येतो. शेतजमीन मशागत होऊन पडलेली असते. शेतीची सर्व कामे झालेली असतात. शेतकरी नवीन हंगामासाठी पावसाकडे तसाच सासरी गेलेल्या लेकीच्या माहेरच्या आगमनासाठी तिच्या सासरकडे आतुरतेने डोळे लावून बसलेला असतो. या सणासाठी त्याची लेक माहेरी येणार असते. शाळकरी मुलांना सुट्ट्या असतात. शेतीची कामे पूर्ण झालेली असतात. आखाजी आणि दिवाळी म्हणजे सासुरवाशिनींच्या मैत्रिणीच. सासरी नांदणारी लेक माहेराशी या सणांमुळेच नाळ जुळवून असते. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून दोनदाच माहेरी जायला मिळते. दिवाळी आणि आखाजी. सासुरवाशिन ही गौराई तर जावाई शंकर.
उना आखजीना सण गौरताबाई
भाऊ बहिनले लेवाले गौरताबाई...
चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय
वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय
तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय
पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय
बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय
कन्हेरानं झाड
माहेरी या सासुरवाशिनींचं किती कोडकौतुक. आमरस, खापरावरची पुरणपोळी, गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या.. आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.
आथानी कैरी तथानी कैरी
कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फुटना
झुय झुय पानी व्हायं वं
झुय झुय पानी व्हाय
तठे कसाना बाजार वं
झुय झुय पानी व्हाय
तठे बांगड्यास्ना बाजार वं
माय माले बांगड्या ली ठेव जो
ली ठेवजो
बंधुना हातमा दी ठेव जो
ली ठेव जो
बंधु मना सोन्याना सोन्याना
पलंग पाडू मोत्याना
आथानी कैरी तथानी कैरी
कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फुटना
झुय झुय पानी व्हायं वं
झोके घेत मुली गाण्यातून आपल्याला सासरी कसं सुख आहे. नवरा किती काळजी घेतो हे गाण्यातून सांगतात
वाटवर हिरकनी खंदी वं माय
संकर राजानी खंदी वं माय
वाटवर जाई कोनी लाई वं माय
संकर राजानी लाई वं माय
जाईले पानी कोनी घालं वं माय
संकर राजानी घालं वं माय
जाईले फुल कोणी आनं वं माय
संकर रानाजी आनं वं माय
गौराईना गयामां माय कोणी घाली वं माय
संकर राजानी घाली वं माय
इथे एकादी हळूच एखाद्या सखीच्या कानात कुजबुजेल आणि सासरची व्यथा मांडेल
गौराई नारय तोडी लयनी वं माय
तोडी लयनी
इकाले गयी तं देड पैसा वं माय
देड पैसा
सासुनी सांग्या मीठ मिरच्या वं माय मीठ मिरच्या
सासरनी सांगी तंबाखु वं माय तंबाखु
देटनी सांगा झिंगी भवरा वं माय झिंगी भवरा
ननिन्दनी सांगा ऐन दोरा वं माय ऐन दोरा
पतीनी सांगा पान पुडा वं माय पान पुडा
या संसाराले हात जोडा वं माय हात जोडा
आखाजीचे दिवस निघून जातात. सासरी परतायची वेळ येते. गौराईचा नवरा तिला घ्यायला सासुरवाडीला येतो. माहेरचा पाहुणचार घेऊन गौराई सासरी निघते. नवर्याच्या रथाबद्दल सांगतांना कौतुकाने म्हणते
गडगड रथ चाले रामाचा
नि बहुत लावण्ण्याचा
सोळा साखळ्या रथाला
नि बावन्न खिडक्या त्याला
बायनी लावली खारीक
बापसे बारीक
बायनी लावली सुपारी
बापसे बेपारी
गौराईला सासरी धाडण्याकरिता एकच लगबग सुरु होते. आईबाबांची लेकीला माहेराहुन देण्यासाठी पापड, कुरड्या, शेवया, लोणचं अशा सामानाची बांधाबांध होते. इकडे आपली गौराई हुशार. ती शिंप्याकडून साड्या, सोनाराकडून हार व वाण्याकडून नारळ घेऊन येते.
काया घोडा नी काय मन्ही गौराई
इन्हा प्रताप चालस ठाई ठाई
प्रताप कोन्या वाडी गेला
प्रताप शिंपी वाडी गेला
शिंपी उठला घाई घाई
साड्या काढल्या नवलाई
सोनार उठला घाई घाई
नवसर हार लयी येई
वाणी उठला घाई घाई
नारय लयी पयी पयी
सासरी जातांना निरोप घेतांना गौराईच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरारतं. आता भेट दिवाळीनंतरच म्हणजे ६ महिन्यांनी. दाटून आलेला कंठ आणि भरल्या आवाजात ती आईला म्हणते, '' धाकट्या भावाला घ्यायला नको पाठवु गं. घनदाट आंबराईत त्याचा जीव घाबरतो म्हणून मोठ्या भावाला मला घ्यायला पाठव. ''
आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन
भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन
धाकला मुराई नको धाडजो
माय बाई आंबानी आमराई
राघो मैनानी जीव भ्याई
अशी पारंपारिक गाणी गायली जात. आखाजीच्या दुसर्या दिवशी गौराईचे विसर्जन असते. सहसा नदीवर हे विसर्जन असते. काही ठिकाणी तर दोन गावांच्या स्त्रिया एकमेकींना यथेच्छ शिव्या देतात. पूर्वी दगडफेकही करायचे. पुरुष मुले यांना आखाजी म्हणजे हक्काचा पत्ते खेळण्याचा दिवस असे.
'आखाजीचा आखाजीचा
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी..
बांधला छान झोका जी
माझा झोका माझा झोका
चालला भिरभिरी जी
माझा झोका माझा झोका
खेयतो वार्यावरी जी' असे बहिणाबाईंनी सुद्धा गाणं म्हटलेले आहे.
तर अशी ही आखाजी परंपरेने चालत आलेली. लाॅकडाऊनमुळे या वर्षी आखाजी घरगुती पद्धतीनेच साजरी करावी लागणार आहे व या प्रथा परंपरा यांचे कायम स्मरण ठेवावे लागणार आहे. @विलास आनंदा कुडके
(लेखातील गाणी Ethnology of Jalgaon District या श्रीमती शुभांगी पवार व डी. ए. पाटील यांनी संपादित केलेल्या ग्रंथातील असून त्यांचे ऋणनिर्देश करतो. तसेच या लेखातील गौराईचे छायाचित्राबद्दल श्री सुभाषभाऊ शिंदे यांचे आभार)
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment