SarjanSpandan

Search results

Friday, May 28, 2021

प्रवासी पक्षी


      मागे वळून पाहताना किती पायर्‍या चढून वर आलो.. किती अंतर चालून आलो ते पाहिलं की जसं गरगरायला होतं तसं आज मागील अपडाऊन मधील प्रवासात व्यतित केलेले एकेक दिवस आठवले की होतय. 

      विणीच्या हंगामात एका खंडातून दुसर्‍या खंडात प्रचंड अंतर समुद्रावरुन अतिशय उंचावरुन वेगवान गतीने पार करुन प्रवास करीत स्थलांतर करणारे प्रवासी पक्षी यावेळी मला आठवतात. अपडाऊनही असेच. अनेक प्रवासी या पक्ष्यांसारखेच नित्य प्रवास करीत असतात. अंतर कमी अधिक असते पण प्रवासातील अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच असतात. मात्र दरवेळी नवीन अनुभव येत जातो आणि त्यातून या प्रवासाची अलिखित नियमावली तयार होत जाते. ही नियमावली पाळणाऱ्यांचा मग कंपू तयार होत जातो. हा कंपू नंतर एक कुटुंबासारखा बनत जातो. एकमेकांच्या दु:खात सहभागी होणं. हास्यविनोद गप्पा एकमेकांची खेचणे चेष्टा मस्करी यात प्रवासातील सारे अंतर विरुन जाते. वेगवेगळ्या स्थानकांवरुन मग या कंपूतील लोक येत राहतात आणि आपले ठिकाण येताच उतरुन जातात. रोजच्या या प्रवासात मग प्रत्येकजण आपली जागा ठरवून घेतो . ठरलेल्या जागेवरुन आठवले माझा लोकलप्रवासाचा पहिलाच दिवस. मी नाशिकवरुन कसारयाला पोहोचलो. एका डब्यात एक खिडकीजवळची जागा धरुन बसलो. पहाटे लवकर उठून आल्याने बसल्या जागी मला डुलकी लागली. हळू हळू डबा भरत गेला. लोकल सुटायच्यावेळी एक असामी खांद्यावरची बॅग घेऊन आली. पाहतो तो काय आपल्या जागेवर कोण झोपलंय अशा नजरेने पाहत त्याने मला झोपेतून न उठवता माझ्या शेजारी बसला. मी पोरसवदा आणि तो वयस्क. मला जरा जाग आल्यावर त्याने माझी विचारपूस केली. त्याने नंतर आपण नेहमी खिडकीत बसतो. तू इकडे बसत जा असे सुचविले. नंतर मग तोच माझी जागा ठेऊ लागला. मोठा गंमत्या माणूस तो. अॅनाउन्समेंट असायची 'यह गाडी कल्याणके बाद डोंबिवली... इ. पे ठेहरेगी' तर हा म्हणायचा कुठेही थांबो आम्हाला काय करायचे कुर्ल्याला थांबली म्हणजे झाले. समोरच्या खिडकीत एक नेहमी झोपायचा तर हा त्याच्या शर्टाची सर्व बटणं काढून ठेवायचा. कोणी म्हटलं सुट्टीच्या दिवशी घरी येतो तर हा बजवायचा 'यायचं असेल तर सकाळी १० च्या आत या. का तर म्हणे १० नंतर मी कोणाला ओळखणार नाही कारण मी त्यावेळी चंद्रावर गेलेलो असतो. तर असा हा माणूस. नंतर मात्र मित्रच झाला. काही दारात उभं राहणं पसंत करतात तर काही मुसंडी मारुन थेट आतल्या कंपार्टमेंटमध्ये खिडकीशी जाऊन पोहचता. एक वयस्क गृहस्थ नमस्काराचा हात पुढे करीत करीत बरोबर खिडकीपर्यंत पोहोचायचे. तर एका वयस्क माणसासाठी 'अरे छोटे बच्चेको आगे आन दो भाई' असं म्हणत बाकीचेच जागा करुन द्यायचे.एक माणूसतर आपल्या अगडबंब आकारानेच जागा करत करत खिडकीपर्यंत पोहचायचा. डोंबिवली स्थानकावर चढणार्‍या उतरणार्‍यांच्या प्रचंड गर्दीततर एका बुटक्या माणसालातर अक्षरश: दारातील उभे असलेली माणसं उचलून घ्यायची. या स्थानकावर चढणं उतरणं एवढे सोपे नाही.  जो या स्थानकात सर्वात आधी चढून दाखविल व सर्वात शेवटी उतरुन दाखविल त्याच्याशीच मी लग्न करीन असा पण केल्याचे ऐकीवात आहे. (क्रमशः) (विलास कुडके) 19/12 /2016

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...