दात असतात पण आपल्याला आरशात पाहिल्याशिवाय दिसत नाही. आपण हसलो की लोक म्हणतात 'काय दात काढतो?' पण पु. लं सारखे दात दिसल्याशिवाय हसणेही खरे वाटत नाही. लोक हसायला लागली की आपण म्हणतो 'हसू देत. हसतील त्याचे दात दिसतील'.दात आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहेत हे आपण रोजचा आहार करताना पार विसरुन गेलेलो असतो. एखादा बुलडोझर चालवावा तसे आपण दात चालवून भक्ष्य अभक्ष्य सगळेच स्वाहा करीत सुटतो. मला आठवते कधीतरी एकदा मेनरोडला एका मिठाईच्या दुकानात सगळ्या कंपनीबरोबर मी गेलो होतो. समोसे मागवले. समोसे चांगले तगडे होते. पण आपणही कमी नाही म्हणून पुढील दातांनी बलप्रयोग करायला गेलो आणि काय तो समोसा मला नुसताच भारीच नाही तर चांगला महागात पडला. कारण तेव्हापासून खिळखिळा झालेला दर्शनी दाखवायचा दात सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले आणि एके दिवशी मला गाफील ठेवून तो केव्हा निसटून गेला मलाच कळले नाही. खायचे दात वेगळे असतात हे तेव्हा मला तो समोसा खाताना अजिबात लक्षात आले नव्हते. लोक जसे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात चमकते ठेवतात तसे मला जमलेच नाही. त्यामुळे दर्शनी एक दात गमावलेला कुणाच्या अधिक लक्षात येऊ नये म्हणून मी कितीही मजली हसावेसे वाटले तरी गालातल्या गालातच हसतो. ओठ न उघडताही मला हसता येते हे मी जास्तीत जास्त लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी कोणी दात काढून सात मजली हसत असेल तर मी त्याचे कौतुकच करतो आणि मनातल्या मनात हेवाही करतो.
दात जसे आपल्या आहारात आहेत. तसेच ते आपल्या भाषेतही आहेत. 'काय दात काढतो' 'त्याचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत' 'हसतील त्याचे दात दिसतील' 'दात घशात घालीन' 'दात धरणे' 'दात न दाढा अन म्हणे सागुती वाढा' 'दात आहे तर चने नाही, चने आहेत तर दात नाही' 'दात ओठ खाणे' असे कितीतरी उदाहरणे आहेत. बोलताना काही शब्द दात लावल्याशिवाय ओठातून बाहेर पडतच नाही. वधू वर परिक्षेत पुसटसे दिसणारे दातही मोठी भूमिका बजावत असतात.' जरा हसा 'अशी फोटोग्राफर सूचना देतो तेव्हा असे पुसटसे दात दिसणे त्याला अभिप्रेत असते.
जन्मल्यानंतर दूधाचे दात येतात त्यांचे केवढे कौतुक होते. बारीकशा दात कण्या दाखवत बाळ हसते तेव्हा आईचा उर किती भरुन येत असतो. ते दूधाचे दात पडून दुसरे दात यायला सुरुवात होते तेव्हा जीभ सांभाळण्याबद्दल धाक भरला जातो. अशा दातांवरुन बिल्कुल जीभ फिरवायची नाही नाहीतर वेडे वाकडे दात येतील असा दम द्यावा लागतो. बरे असे दात पडले तर मात्र पुन्हा दात येणार नाही अशी भिती तेव्हापासूनच घालावी लागते. लहान वय अल्लड असते. अशावेळी दातांना खूपच जपावे लागते. एकदा लहानपणी मी बसलेल्या बकरीवरुन टांग टाकण्याच्या प्रयत्नात असा धपकलो की माझा खालचा ओठ वरच्या ओठात शिरला. नशीब तेव्हा तो दात पडला नाही. त्यानंतर आईचा बसलेला मार एकवेळ मला परवडला. आणखी आठवते तेव्हा गल्लीत दंतवैद्य होता. तेव्हा आजच्या इतके विज्ञान प्रगत नव्हते. तो दंतवैद्य तेव्हा बहुधा दात उपटित असावा असा अंदाज आम्ही मुले तेव्हा बांधायचो आणि धूम ठोकायचो. दिवाळी अंकात दंतवैद्य आणि पेशंट यांच्यावर हमखास कार्टून यायची त्यामुळे तेव्हा पासून दंतवैद्याविषयी मनात जशी भिती बसून गेलेली होती. अनेक दंतकथाही तेव्हा कानावरुन गेलेल्या होत्या. पडलेला दात घरातून बाहेर फेकायचा असतो.
मौसमी चटर्जीसारखे ३३दात म्हणे शुभ असतात. गल्लीत पहिल्यांदा लाल खोक्यात 'कोलगेट' आले तेव्हा तोपर्यंत चुलीतील राखुंड्याने दात घासणारया आम्हा मुलांना कोण कौतुक वाटले होते. काही घरी तेव्हा बिटको काळी दंतमंजन लावायचे पण ती कोळशापासून बनवत असतील म्हणून आम्ही पोरं तिला नाक मुरडायचो. नंतर लाल दंत मंजन आलं.
आज तर कितीतरी टूथपेष्ट आणि टूथब्रश बाजारात आलेले आहेत. तितक्याच त्यांच्या जाहिरातीही. 'मसुडेकी जान तो दातोंकी शान' 'विको वज्रदंती' पासून तर जवळ येणाऱ्या जोडप्यांसाठी 'क्लोज अप' पर्यंत. वर्तमानपत्रांचे जसे वेगवेगळे वर्ग असतात तसे या पेस्ट आणि ब्रशचे वर्ग असतात. निंबाची काडी चावून दात साफ करणाऱ्यांचा वर्ग आणखी वेगळाच आहे.आपले खाणे दुसर्याला दाखवू नका. कोणती टूथपेष्ट वापरायची यावर घरगुती खटल्याची जाहिरात. एवढे सगळे प्रकार आहेत पण दात किडायचे ते किडतातच. आणि मग जीवनभर ज्याने आपल्याला साथसंगत केली व जो आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग झालेला असतो. ज्याने बत्तीसवेळा घास चावून खाण्याचा आपण उपदेश घेतलेला असतो. त्या दाताला जड अंतःकरणाने डॉक्टरच्या हवाली करावे लागते. निरोप द्यावा लागतो. थंडी इतकी पडली की पाण्याच्या ग्लासात काढून ठेवलेल्या कवळ्या कडकड वाजायला लागल्या असा विनोद एखादा सोन्याचांदीचा दात दाखवत एखादा मित्र सहज सांगून जातो. तोंडाचे बोळके ओठांची रवंथ करत पडून गेलेल्या दातांच्या आठवणी चघळतच राहते. आता विज्ञानाने कवळी ऐवजी सगळे दात इंप्लान्ट करायचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. दात इतका हसत खेळत काढला जातो की दात काढल्यावर भूल उतरेपर्यंत एवढा विनोदी लेख कोणीही लिहून जाईल जसा मी आता लिहिला आहे.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment