खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी कसारा लोकलने मुंबईला येणेजाणे करायचो. टिटवाळ्यावरुन एक मध्यम अंगकाठीचे, विरळ श्वेत केसांचे बुध्दीमान गृहस्थ चढायचे. खांद्यावर शबनम बॅग आणि हातात 'नवशक्ति' वर्तमानपत्र असे. एकेदिवशी त्यांनी त्यांच्या शबनममधून एक हिंदुत्वावरील एक जाड पुस्तक काढले आणि म्हणाले'विलास, तू हे वाचच. दुर्मीळ पुस्तक आहे.मी ५प्रती आणल्या आहेत' त्यांचे बोलणे संपते ना संपते तोच माझ्या शेजारी बसलेले एक रेल्वे कामगार म्हणाले की 'दुर्मीळ आहे तर मग ५प्रती कशा काय मिळाल्या?' प्रश्न अगदी बरोबर होता. त्यावर हशाही पिकली मात्र या प्रश्नाला त्या सद्गृहस्थांनी दिलेले उत्तर विचार करण्यासारखे होते. ते म्हणाले' अरे हे पुस्तक स्वातंत्र्य लढ्याच्या वेळचे आहे. कितीतरी वर्षे ते मिळत नव्हते. ते इतक्या वर्षांनी पुन्हा छापले आहे. याच्या प्रती हातोहात संपून चालल्या आहेत. पुन्हा ते दुर्मीळ होण्याआधी मी त्याच्या ५प्रती घेतल्या.' आज इतक्या वर्षांनी हा प्रसंग मला आठवतो. पुस्तकाचे शीर्षक आठवत नाही पण' दुर्मीळ 'हा शब्द मात्र मला प्रकर्षाने आठवला.
एखादी गोष्ट मिळत असते तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत अजिबात नसते. शालेय वयात असताना तेव्हाची पाठ्यपुस्तके तेव्हा बिनधास्त पावकिंमतीत विकून टाकली त्याची हळहळ आज वाटते. अभ्यासक्रम बदलत चाललेला. कालची पुस्तके आज नाही. आजची पुस्तके उद्या राहणार नाहीत.
आज अशी पुस्तके आठवतात जी कुठेही मिळत नाहीत . चांदोबा मासिकाचे प्रकाशन बंद झाल्यावर लोक त्या मासिकाच्या जुन्या अंकांच्या शोधात निघाले.
'बालभारती' ला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने एक चित्रफीत पाहण्यात आली त्यामध्ये आजोबा आपल्या नातीला त्यांच्या काळातील पाठ्यपुस्तके दाखवायला बालभारती मध्ये घेऊन जातात असे दाखवले आहे. बालभारतीची तेव्हाची पुस्तके आता डिजिटलायझेशनकरुन सर्वांना आॅनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. 'किशोर' चे नोव्हेंबर १९७१पासूनचे अंकही असेच उपलब्ध झालेले आहेत. अशा पुस्तकातील लेख धडे कविता पुन्हा पहावेसे व त्यात रमावेसे वाटते.
अशी जुनी पुस्तके चाळतांना मन नकळत त्या काळात जाते. त्यावेळच्या कोरया पुस्तकांचा वास आठवतो.काही पुस्तके दीनानाथ दलाल यासारख्या चित्रकारांनी रंगवलेल्या त्यांच्या मुखपृष्ठांमुळे लक्षात राहिलेली असतात. कृष्णधवल रंगात आजीचे घड्याळ कवितेचे चित्र, चिंगीचा पराक्रम धड्यातील पदराआड मिशी असलेल्या बाईचे चित्र, वीर बापू गायधनी धड्यातील पेटत्या वाड्याच्या ज्वाळा. कितीतरी.पण ही पुस्तके आज मिळत नाही. दुर्मीळ आहेत.
मग कोठेतरी वाचनात येते शांताबाई शेळके यांनी अशी पुस्तके जपून ठेवलेली होती. तेव्हा त्यांच्याविषयी आपले मन आदराने भरुन येते.
कोणीतरी छांदिष्ट 'आठवणीतील कविता' गोळा करुन त्याचे ४भाग प्रसिद्ध करतो.
ग्रेस यांचा' सायंकाळच्या कविता 'हा संग्रह, ना. धों. महानोर यांचा 'रानातल्या कविता' हा संग्रह प्रसिद्ध झाला. तेव्हाची पहिली आवृत्ती आपल्याकडे आहे असे आज अभिमानाने सांगितले जाते. तर काही कवींकडे त्यांच्या कवितासंग्रहाची प्रत उपलब्ध नाही असे सांगायची वेळ येते अशीही उदाहरणे आहेत. अशोक नायगावकर यांचा वाटेवरील कविता हा संग्रह मी किती शोधला पण मला मिळाला नाही.
सुमती पायगावकर यांनी हंस अंडरसनच्या परिकथा मराठीत अनुवादीत केल्या होत्या. त्या १०भागात प्रसिद्ध झालेल्या होत्या. ते भाग आज दुर्मीळ आहेत.
अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
बरीचशी दुर्मीळ पुस्तके ग्रंथालयातच पहावयास मिळतात मात्र ती ग्रंथालयाबाहेर दिली जात नाही. जितके जुने पुस्तक तितकी त्याचे मुल्य वाढतच जाते. दर्शनी किंमत भलेही कमी असेल पण जितके पुस्तकाचे दुर्लभत्व अधिक तितके त्याचे मुल्य अधिक.
विदेशात Rare books ग्रुपवर उत्कृष्ट बांधणीतील जुने ग्रंथ पुस्तके यांची माहिती येत असते. अशा ग्रंथांना 'दर्दी' मंडळी लाखो डाॅलर्स मोजायला तयार असतात. दुर्मीळ पुस्तके संग्रहात ठेवणे प्रतिष्ठेचे आणि श्रीमंतीचे लक्षण झालेले आहे. मराठी पुस्तकांच्या बाबतीत आपल्याकडे असे बोली लावण्याचे चित्र दिसत नाही. एखादे पुस्तक दुर्मीळ झाल्यावर आपल्याला हवेहवेसे वाटू लागते. तोपर्यंत आपण त्या पुस्तकाकडे ढुंकूनही पहात नाही हे चित्र मात्र जिकडे तिकडे पहावयास मिळते हे मात्र खरे.
सांगली मध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या पुरात कित्येक दुर्मीळ ग्रंथ हस्तलिखिते लगदा झाली. कित्येक आक्रमणात ग्रंथालये अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडली. कित्येक ग्रंथ लुटून नेली गेली तर बरीचशी ग्रंथ संपदा दडवली गेली. निळवंतीच्या शोधात वेड्या झालेल्यांच्या दंतकथा कानी येतात. दुर्मीळ ग्रंथांच्या गोष्टींना अंत नाही
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment