#आईच्या आठवणी
आठवणी भरुन आलेल्या आभाळासारख्या असतात. एका आठवणीतून दुसरी दुसरीतून तिसरी तर काहीवेळा मधेच एखादी आठवण डोकावून जाते. लाटेवाड्यात रहात असतानाची आणखी एक आठवण मध्येच आठवली. तेव्हा नगरसूलवरुन सकडे आजी नेहमी घरी यायची. आई तिला मावशी म्हणायची. येताना ती किटलीभरुन काकवी आणायची. तिचे बोलणं नेहमी चिडवून दिल्यासारखे असायचे. ती निघाली की मी तिच्या मागे लागायचो. सकाळी अकरा वाजता नाशिक - नगरसूल गाडी असायची. निघण्यापूर्वी ती जेवून घ्यायची. एकदा मी तिच्या खूप मागे लागलो तेव्हा तिने आईला सांगितले विलासला घेऊन जाते म्हणून. तिच्या बरोबर मी नगरसूलला गेलो. रस्त्यावरच तिचे छोटेसे घर होते. ओटा केलेला. पुढे बाग केलेली. बागेत एका कुंडीत शिवलिंग आणि नंदी होता. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याला हाळी देऊन काय कसे काय म्हणून विचारपूस करायची तिची पद्धत होती. घरात पुढच्या छोट्या खोलीत कोनाड्यात लाल वस्रावर देवाचे टाक होते. पुंजाबा सकडे म्हणजे आजोबा सकाळी गंधगोळी उगाळून देवपूजा करायचे. डोक्यावर आडवी टोपी. धोतर कुर्ता नाहीतर बंडी असा त्यांचा वेष असायचा. देवपूजा झाली की पांढरा गंध कपाळी लावून ते दगडी मूर्ती पाटा वरवंटा घडवायला बसायचे. आजी ऊसाच्या गुरहाळात कामाला जायची. मलाही बरोबर घेऊन जायची. मोठ्या कढाईत हात घालून गरमागरम गूळ खायला द्यायची. घरात काकवी असायची ती भाकरीबरोबर खायला द्यायची. एकदा फाटक उघडून मी खेळायला बाहेर पडलो तर माझ्या पायात मोठा काटा घुसला. माझं रडणं ऐकून आजी धावून आली. घाईघाईने काटा काढून रक्त वहात होते तिथे चूना भरला.
आजी कधी कधी जनार्दन पाटलाच्या वाड्यावरसुद्धा कधी कधी कामाला जायची. दत्तु मामा तेव्हा बहुतेक चौथीला असेल. त्याचे मराठी वाचनमाला पुस्तक चौथे मी हातात घेऊन आजीला खोटे खोटे वाचून दाखवायचो. आजी पाटी पेन्सिल द्यायची तेव्हा त्यावर शिवाजी महाराज, देव, देवीचे चित्र काढून दाखवायचो तेव्हा आजीला मोठे कौतुक वाटायचे. आई नगरसूलला गेली की आजीकडेच रहायची. दोघांच्या गप्पा गोष्टी चालायच्या. मध्येच आजीला मला चिडवून द्यायची लहर यायची. आईला मी ठेवून घेते तू एकटाच नाशिकला परत जा असे म्हटले की मला ते खरेच वाटायचे. मग मी भोकाड पसरुन द्यायचो. मला असे रडवायला तिला खूप आवडायचे. आई नगरसूलला आली की ती हमखास आमरस पुरणपोळीचा बेत करायची. घरची परिस्थिती जेमतेम असूनही लेक घरी आली की ती कुठूनतरी उसनवारी करुन हे सर्व करायची.
आजीच्या घराला लागूनच मारुतीचे मंदिर होते. समोर खंडोबाचे देऊळ. देऊळासमोर चौथऱ्यावर दर शुक्रवारी बाजार भरायचा. त्या बाजारात मी हुंदडत राहायचो. आजी गुडीशेव भेळभत्ता घेऊन द्यायची. कधी कधी काडीला लावलेली गोल गुल्फी घेऊन द्यायची. पावसाळ्यात काही ठिकाणी गढूळ पाणी साचलेले असायचे त्यात आकाश दिसायचे तेव्हा मला आपण त्यात बुडू की काय अशी भिती वाटायची. एकदा पावसाळ्यात बहीण नगरसूलला आल्यावर आम्ही शेतावर मातीत पाय खूपसून खोप करुन खेळत होतो तेव्हा पावसाच्या सरी मातीवर पडून गंध दर्वळला तेव्हा अगदी आनंदून गेलो होतो.
दांडी पौर्णिमेला खंडोबाची मोठी जत्रा भरायची. बारा गाडे ओढले जायचे. तेथील खंडोबाचे दर्शन मात्र आम्हाला दुसर्या दिवशी घ्यावे लागत कारण आमचे कुलदैवत म्हणजे वाकडीचा खंडोबा.
आजी कधी कधी मळ्यात घेऊन जायची तिथे निंबाची बिब्ब्याची घनदाट झाडी होती. आजी बिब्ब्याची गोड फळे वेचून खायला द्यायची.
एकदा मळ्यात आईने आजीची मदतीने कारण केले होते तेव्हा मी बोकड्याचा बळी देताना पाहिले होते. का कुणास ठाऊक ती घटना माझ्या बालमनावर तेव्हा परिणाम करुन गेली. कुठल्याही जीवाची हिंसा वाईटच असे मनावर ठसून गेली. तेव्हा सगळे जेवले पण मी कशालाच शिवलो नाही.
आजी तेव्हा भाकरी करुन जा गोपाबाबाला देऊन ये म्हणायची. असाच एकदा मी गोपाबाबाला भाकरी द्यायला गेलो तेव्हा ते उन्ह खात काठी घेऊन बसलेले होते. गोपाबाबा म्हणजे माझ्या वडीलांचे वडील म्हणजे माझे आजोबा. त्यांची नजर गेलेली होती. त्यांना डोळ्यांनी दिसायचे नाही. घ्या बाबा भाकरी घ्या असे म्हटल्यावर ते काठी उगारुन कोण कोण असे करायला लागले. त्यांच्या काठीचा एक फटका मला बसला तसा मी भाकर त्यांच्याकडे भिरकावून तसाच आजीकडे रडत रडत परत आलो. तेव्हा आजी गोपाबाबांकडे जाऊन म्हणाली तुमचा नातू भाकर देतो ते वळखू आले नाही का. तेव्हा आजोबांना पटले त्यांनी तसेच मला जवळ घेतले व चाचपडून कुठे लागले ते पहायला लागले. गावातील पोरं त्यांची चेष्टा करायचे त्रास द्यायचे त्यामुळे ते नेहमी काठी फिरवत राहायचे. अशा या एकेक आठवणी११/४/२०१८
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment