#आईच्या आठवणी
जसेजसे दिवस उलटत आहे तसतशी आईची आठवण प्रकर्षाने होत आहे. थकून भागून पाठ टेकवली की आईची एकेक आठवण मंद निरंजन तेवावी तशी तेवू लागते. मन भूतकाळाच्या पायऱ्या उतरुन बालपणात जातं. आई तशी फार लवकर गेली. १५ फेब्रुवारी १९७४ रोजी ती गेली तेव्हा मी आठवीत होतो. आई गेल्यावर डोक्यावरले केस काढले गेले तसा वर्गात गेलो तर वर्गातील मुलं हसायला लागली. तेव्हा वर्गशिक्षक म्हणाले अरे त्याची आई गेली आणि तुम्ही हसताय तेव्हा वर्ग शांत झाला. अर्थात ती मुलेही माझ्याच वयाची. त्यावेळी त्यांना एवढे कुठले कळायला. एक प्रसंग आठवतो. तेव्हा पंचवटीत डुकरे पकडायची मोहिम सुरु झाली होती. बंदुका घेऊन गणवेशातील मंडळी डुकरे धरुन धरुन नेत होती. आम्ही लाटेवाड्यात रहायचो. वाड्यात शौचालय नव्हते. सगळी मंडळी डबा घेऊन राजवाड्यातील सार्वजनिक ठिकाणी किंवा नागचौकातील ठिकाणी सकाळी उजाडायच्या आत जाऊन यायची. काही अपवाद होतेच. ते अगदी बारालाही डबा मिरवत मिरवत जायचे. कोणाला त्याचे काही वाटायचे नाही. अलिकडे पंचवटीत फ्लॅट झाले तशी घरात सोय झाली. पण त्या काळात घरोघरी सार्वजनिक ठिकाणी जाण्याची सवय होती. राणाप्रताप चौकात मारुती मंदिराला लागून माईचं वाडगं म्हणून ओळखला जाणारे मोठे मैदान होते. मारुतीमंदिरामागे चारपाच तरी चिंचाची मोठी झाडे होती. एकजण तर एका चिंचेवर फळी अडकवून रहायचा. चिंचेची सावली देखील गर्द असायची आणि जमीनीवर चिंचेचा पाला पसरलेला असायचा. आम्ही मुलं मुलं कधी दगडाने चिंचाही पडायचो. असेच एकदा चिंचा पाडायला आम्ही जमलो असता डुकरे शोधत शोधत एक पथक तिथे आले. त्यांनी आम्हाला विचारले डुकरे पाहिली का रे. तेव्हा आम्ही माईच्या वाडग्यात बेसुमार वाढलेल्या काँग्रेस गवताच्या हलणारया झुडुपांकडे बोट दाखवले. झुडुपं हलत होती आणि तिथे डुकरं असण्याची शंका बळावत होती. पथक पुढे पुढे झुडुपांत शिरुन सरकत गेले. एका ठिकाणी बंदुकीतून नेम धरुन गोळी झाडणार तोच त्या झुडुपांतून माझी आई घाईघाईने डबा घेऊन उठून उभी राहिली आणि तो अनर्थ टळला. गल्लीभर मग चर्चा होत राहिली आई वाचली म्हणून नाहीतर त्या दिवशी काय झाले असते...
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment