#आईच्या आठवणी
आपल्यावरील संस्कार नकळत आपल्या आईकडून आलेले असतात असे मला जाणवते. आईबरोबर लहानपणी किर्तनाला जाऊन तिची धार्मिकता आली. काही नाही पण तिला 'चांदोबा' आणून वाचायची आवड होती. श्रीकृष्णाच्या कितीतरी गोष्टी तिला किर्तनाला जाऊन जाऊन माहित होत्या. मला एक प्रसंग आठवतो. तोपर्यंत मी शाळेत प्रवेश घेतलेला नव्हता. एके दिवशी मला काहीतरी खेळणी घेऊन देण्यासाठी वडील रामसेतू पुलाच्या खाली भरलेल्या खेळणीच्या बाजारात घेऊन गेले. कितीतरी खेळणी होती. खेळणी म्हटली की मला हमखास सितागुंफा रस्त्याच्या उतारावरील लाकडी खेळण्यांची गजबजलेली दुकाने आठवतात. लाकडी टांगे, एसटी, लाकडी रंगीत फळे, कितीतरी. सायंकाळी आईचे बोट धरुन किर्तनाला जातांना माझी नजर त्या खेळण्यांवर खिळून राहायची. आई पुढे चालत राहायची आणि मी मागे वळून वळून रंगबिरंगी खेळण्यांकडे पहात चालायचो. आईने ते ओळखले आणि वडीलांना सांगितले याला एक खेळणे घेऊन द्या. रामसेतू पुलाच्या खाली रांगेत खेळण्याची दुकाने होती. मोटार गाड्या पिपाण्या चेंडू बाहुल्या फिल्म लावून बघायचा छोटा बायोस्कोप. कितीतरी. तेवढ्या खेळण्यात एक खेळणे मला खूप आवडले. एक पट होता. सोंगट्या होत्या. रंगीबिरंगी नोटा होत्या. नवा व्यापार असे त्या खेळाचे नाव होते. आम्ही मुलं मुलं चल्लस सापशिडी खेळायचो. मारुतीच्या देवळात तेव्हा रात्री उशिरापर्यंत सोंगट्या खेळल्या जायचे. हा खेळ नवीन आणि आकर्षक वाटल्याने तो घ्यायला मी वडीलांना सांगितले. वडीलांनी तो केवढ्याला म्हणून विचारुन काही पैसे देऊन विकत घेऊन तो मला घेऊन दिला. मला अतिशय हर्ष झाला. उड्या मारत मारतच मी वडीलांबरोबर घरी आलो आणि आईला तो नवा व्यापार दाखवला. आईने तो खेळ पाहिला आणि तिचे पित्तच खवळले. काय खेळ घेऊन दिला म्हणून ती वडीलांशी जोरजोरात भांडायलाच लागली. मलाही चांगलेच रट्टे ठेवून दिले. तिची समजूत घालायचा वडीलांनी किती प्रयत्न केला पण आईचा पारा वाढतच गेला. मी अगदी भांबावून गेलो. मला काही समजेनासे झाले. काय चुकले तेही कळेनासे झाले. चूक न कळता मार मात्र खूप खाल्ला. आईने तो खेळ घेतला आणि सरळ फाडून तोडून बंबात टाकून पेटवून दिला. मी रडत रडत बंबातून निघणाऱ्या धुराकडे पहातच राहिलो. तो खेळ म्हणजे जुगार आणि आपल्या मुलाने जुगारी व्हावे ही कल्पना तिला तेव्हा सहन झाली नव्हती. त्या कल्पनेनेच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. हा धडा मला आयुष्यभर लक्षात राहिल असा होता. तेव्हापासून मी जुगार पत्ते या खेळांच्या वाटेला गेलोच नाही. हे एकप्रकारचे उपकार म्हणायला हवेत.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment