फजितीचे क्षण
काही क्षण फजितीचे असतात. असे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी आलेलेच असतात. त्या क्षणापुरते आपल्याला वाटते आपली फजिती झालेली कोणीही पाहू नये. फजिती होत असतांनाचा क्षण युगासारखा वाटायला लागतो. कधी एकदाचा तो क्षण संपावा आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकावा असे होऊन जाते. असे क्षण आपण आयुष्यातून घाईघाईने पुसून टाकू पाहतो. आजवर लिहिल्या गेलेल्या आत्मचरित्रात कोणीही फजितीचे क्षण उल्लेखिलेले आढळत नाही. काही अपवाद असतीलही पण अशी आत्मचरित्रे अद्यापही वाचनात आलेली नाहीत.
प्रत्येक जण आपले व्यक्त्तिमत्व अगदी रांगत असल्यापासून विकसित करीत असतो. आपलं रुपडं सजवित असतो. कोणावरही छाप पडेल अशी देहबोली, शैली आपण आत्मसात करीत असतो. आपल्याला पाहून कोणीही आकर्षित व्हावे, राजस, राजबिंडे, देखणे म्हणावे म्हणून सारी आपली धडपड असते. आवडत्या हिरोचे राहणीमानाचे आपण अनुकरण करतो. काही स्वत:च इतरांचे आदर्श बनू ठरू पाहतात. अशावेळी फजितीचे क्षण म्हणजे दुधात खडा! अशा फजितीच्या क्षणी त्रिफळा उडते तेव्हा आपला झालेला अवतार पाहण्यासारखा असतो पण आपण स्वत:ही आरशात तो कधी पहाण्याचे टाळतो. कोणीजर चुकून पाहिले तर जणू काही त्याने पाहिलेच नाही अशी मनाची खोटी समजूत करुन घेतो.
कल्पना करा एखाद्या खास कार्यक्रमासाठी महागड्या सौंदर्यप्रसाधनगृहात नखशिखांत शृंगारलेली ललना ऐनवेळी तिच्या पायातील त्राणीचा अंगठा नाहीतर बंध तुटला तर कोण घोर प्रसंग उभा राहिल. अशा साजशृंगारलेल्या अवस्थेत दुरुस्तीच्या दुकानापुढे उभे राहायचे म्हणजे किती नामुष्कीचा प्रसंग. शत्रूस्त्रीवर सुद्धा असा प्रसंग नको यायला किंवा धरणीमाय पोटात घेईल तर बरे होईल असे तिला क्षणभर वाटल्याशिवाय राहणार नाही. बरं ती तुटकी पादत्राणी तशीच सोडून जावे तर कोमल पावले भूमीवर ठेवावी कशी? अशा पेचात ती बिचारी सापडते. बरे अशा ललनांकडे दुर्लक्ष कोण करणार आणि ही फजिती लपवणार तरी कोणाकोणापासून. मरुन मेल्यासारखी अवस्था म्हणतात ती हीच असते.
असाच जीवघेणा क्षण धो धो पावसात अजिबात उघडत नसलेल्या छत्रीमुळे येतो. ऐरवी पाऊस नसताना किती छान उघडत होती आणि आताच हिला काय झाले म्हणून आपली किती झटापट होत रहाते. बरं अशा न उघडलेल्या छत्रीला त्यावेळी फेकताही येत नाही. वेडी आशा वेडी म्हणजे किती वेडी असते ते आपल्या अशी छत्री उघडण्याच्या निष्फळ प्रयत्नांवरुन आणि पूर्ण भिजलेल्या कपड्यांवरुन कोणाच्याही लक्षात येते. अशावेळी येणारा जाणारा जणुकाही आपल्याचकडे पाहून हसतोय असा भास होत राहतो आणि आपण त्याच्याकडे आपले जळजळते कटाक्ष टाकत राहतो.
ऐन पावसात वाऱ्याने छत्री उलटी होणे, काडी न काडी मोकळी होणे ही तर फटफजिती झाली. माणूस केळाच्या सालीवरुन पडला तर साधीच फजिती होते. किमान हसणारा माणूस हसू दाबून मदतीचा एक हात तरी पुढे करुन पडलेल्याला उठवतो आणि केळीचे साल टाकणाऱ्याचा उद्धार करीत शिव्याही घालू लागतो. फार पूर्वी अहो तुमचे पोस्ट ऑफिस उघडे आहे असे सांगून न कळत फजिती करायचा आणि आपला चेहरा गोरा करुन टाकायचा. अशावेळी थँक्सही म्हणायचे अगदी जीवावर येते. बरं, सांगणाऱ्याचा चेहरा न बोलता सांगत असतो की किती अजागळ! एक घडलेला प्रसंग. कार्यालय सुटल्यावर मागे बॅग अडकावून निघालेल्या एका सहकाऱ्याला एका सहकारिणीने मागून आवाज दिला सर तुमची चैन उघडी आहे . तिला बॅगची चैन अभिप्रेत होती. पण सहकारी बिचकले आणि कमाल आहे मागून पुढची चैन कशी दिसेल? असे म्हणून घाईघाईने पँटची चैन चाचपडून पाहली. चैन तर बरोबर आहे, यांना नेमकी कोणती चैन उघडी दिसली, या विचारात त्यांची अगदी घालमेल झाली. पुढे खुलासा झाला ती गोष्ट वेगळी. परंतु त्यावेळी त्यांची जी फजिती झाली ती विचारता सोय नाही. आजकाल ऐनवेळी न खुलणाऱ्या किंवा अजिबात न लागणाऱ्या चैनींमुळे फार मोठा घोटाळा होतो. जड बॅगेचा पट्टा तुटण्यासारखी फजितीच नाही. वरची गुंडीही गळ्यापर्यंत लावण्याची सवय असलेल्याला ऐनवेळी वरची गुंडी तुटल्यावर छातीवरचे केस वाऱ्यावर भुरभुरत उघडे ठेवताना ज्या मरणप्राय यातना होतात त्या तुम्हा आम्हा गुंड्या उघड्या ठेवणाऱ्यांना कळायच्या नाहीत. एवढेच कशाला रस्त्याने मिशी पिळत जायची सवय असलेल्याची मिशी चुकून भादरली गेली तर काय जीवघेणा अपमानास्पद, लांछनास्पद प्रसंग उभा राहतो त्याची तुम्हाला कल्पना येणार नाही. हवी तशी मिशा उगवायला वेळ लागतो, मेहनत लागते, तेवढे दिवस तोंडाला रुमाल बांधूनही वावरता येत नाही. फारच कठीण अवस्था असते. अशा छोट्यामोठ्या फजितीच्या क्षणांना आपण पावलंपावलं जपतच राहतो. रात्रंदिवस घोकंपट्टी करुन परीक्षेला जावं आणि येत असूनही वेळेवर उत्तरच न सुचणे किंवा मोठ्या तावातावाने भाषण करायला ध्वनीक्षेपक घेऊन उभे रहावे आणि ऐनवेळी काय बोलावे हेच न सुचणे... किती किती फजितीचे क्षण सांगावे. मोठ्या प्रेमाने मोठ्या हॉटेलात कोणाला घेऊन जावे आणि पैशाचे पाकीट एटीएम कार्डसकट कोणी मारावे यासारखा दैवदुर्विलास नाही!
राष्ट्रीय कार्यक्रमाला कांजी लावून कडक इस्तरीत पांढरेशुभ्र होऊन जावे आणि खिशातील कलमानेच घात करावा, ही फजिती कोणती म्हणावी? किती वेळ शाईचा डाग हाताच्या पंजाने लपवून ठेवणार! बरं एवढ्याशा कारणावरुन कार्यक्रम सोडूनही जाता येत नाही.
एखाद्याने मोठ्या त्वेषाने दातओंठ खावून यावे आणि त्यातच त्याचा पुढचा दात निखळून पडावा, असेही अप्रिय प्रसंग घडतात. दाढ उठलेल्या माणसाला नेमके हसवणारे इतके लोक येऊन भेटतात आणि हसायला भाग पाडतात की विचारु नका! त्यामुळे त्याची अक्षरश: हसून हसून पुरेवाट होते.
फजिती ज्याची होते त्याला धड हसताही येत नाही आणि रडताही येत नाही. रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून काही पँटी घेतेवेळी बरोबर येतात आणि वापरायला सुरु केली त्याच दिवशी त्यांची नको तिथे शिलाई उसवल्यावर दे माय धरणी ठाय असे होऊन जाते. म्हणूनच आपण खात्रीशीर न उसवणारी शिलाई मारणाऱ्याकडूनच कपडे शिवत राहतो. बोटाने शिलाई उसवली तर जात नाही ना ते दहावेळा पाहतो. शिलाई उसवणे हे तर फजितीचे हमखास कारण. पूर्वी लोक टोपीमध्ये आतून सुई टोचून ठेवायचे. ती अनेकोपयोगी असायची म्हणजे पायात काटा घुसला, शिलाई उसवली, माळ ओवायची असेल किंवा संरक्षक छोटे शस्त्र म्हणूनही उपयोगी पडायची.
शाळेत असतांना काही इब्लीस पोरं गुरुजी वर्गात यायच्या आधी त्यांच्या खुर्चीवर खाजकुहली पसरून ठेवायचे आणि मग गंभीर चेहऱ्याने शिकवता-शिकवता गुरुजींच्या ज्या हालचाली सुरु व्हायच्या त्या पाहून वर्ग खुसूखुसू न कळत हसत राहायचा. असली फजिती मात्र व्हायला नको आणि ती कोणी करायलाही नको. प्रवासात देखील मित्रमंडळींमध्ये गप्पांमध्ये रंगलेल्या एखाद्या मित्राला मागून शेपटी लावण्याचे प्रकार होतात किंवा मी गाढव आहे असे लेबल चिकटवले जाते आणि मग त्याच्याशी गंभीर चेहऱ्याने गप्पा मारल्या जातात. आजुबाजूचे लोक मात्र लोटपोट होऊन हसत असतात. अशावेळी हसण्याचे कारण कळाल्यावर जी फजिती होते ती कोणालाही विसरता न येणारी असते.
चारचौघात जशी फजिती होत असेत तशी ती घरात काहीवेळा होत असते. म्हणतात ना शिंक्यावर झेप घ्यायच्या प्रयत्नात शिंकेच तुटावे आणि ज्याच्यासाठी जीव चालला होता, सगळा आटापीटा होता ते दही दूध सहज अंगावर अभिषेक होऊन मिळावे आणि हा आनंद म्हणायचा की दु:ख ते समजत नसताना अंगावरचेही घाईघाईने चाटून पुसून घ्यायची वेळ यावी आणि तोंडात ना ओठात पडता वाढून गेलेल्याकडे पाहून हळहळत बसावे तसे सगळे असते.
घरोघरी गॅसच्या शेगड्या तसे घरोघरी अडगळ, पसारा हा ठरलेलाच असतो. त्यात घरात वावरणारे आताशा भ्रमणध्वनीत व्यस्त असल्याने घरातील पसारा पूर्वीच्या मानाने खूप वाढला आहे आणि आवरणारे हात शोधावे लागत आहेत. पूर्वी हौसेने घर आवरले जायचे पण आज हौस जिरेल एवढा पसारा वाढला आहे कारण जीवनावश्यक गरजांबरोबर इतरही गरजाही वाढल्या आहेत. हे सर्वांना कळते पण जरा कुठे आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो की आपण तिथला पसारा पाहून डोळे विस्फारतो. तेच जर आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपल्या पायाखालची फरशीच सरकते. पसारा आणि तोही पाहुणे यायच्या आत आवरतांना आपली भंबेरीच उडते. भंबेरीवरुन एक गोष्ट आठवली. शाळा तपासायला दिपोटी अचानक आल्यावर आपल्याच नादात संजिवनी मळणाऱ्या गुरुजींची बोबडी वळली. त्यांनी घाईघाईने संजिवनी टेबलाच्या ड्रावरमध्ये आणि टेबलावरची शाईची दौत खिडकीतून बाहेर फेकली, असा फजितीचा क्षण!
असेच एक विभागीय प्रमुख अधिकारी होते. त्यांच्याकडे अचानक विभागप्रमुख चक्क जिन्सची पॅन्ट आणि टी-शर्टवर एकट्याने भेट दिली. शिपायाने त्यांना अजिबात ओळखले नाही. त्यांना सरळ बाकड्यावर बसायला सांगून साहेब बिझी आहे असे सुनावले. झाले. विभागप्रमुख बराचवेळ बाकड्यावर साहेब कधी मोकळे होतात त्याची वाट पहात गाणे गुणगुणत बसले. त्यावरही शिपायांनी त्यांना शांतता पाळायला सांगितली. शेवटी त्यांनी विचारले, तुमचे साहेब कितीवेळ बिझी असतात आणि तडक दालनाचा दरवाजा उघडून शिपाई अरे अरे म्हणेपर्यंत आत शिरले तर विभागीय प्रमुख अधिकारी धुम्रपानात धुरांच्या वलयात पुढील पदोन्नतीचे स्वप्न पाहण्यात तल्लीन झालेले! काय रे विड्या ओढतोस का? या प्रश्नाने स्वप्नभंग झाला आणि डोळ्यासमोर साक्षात मृत्यू दिसावा अशा मुद्रेने क्षणात ते अधिकारी गलितगात्र झाले. हातातले सिगारेट केव्हा गळून पडले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. विभागप्रमुख निघून गेल्यानंतर जवळजवळ तासाभराने त्यांना आपण कोठे आहोत त्याची जाणीव झाली आणि मग या फजितीला कारणीभूत ठरलेल्या शिपायाला त्यांनी किती झापले असेल ते विचारायलाच नको!
@ विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment