#नवीन चष्मा
चष्मा कधी लागला ते आता आठवत नाही. पण तेव्हा प्रचंड डोके दु:खायचे. कारण कळत नव्हते. डाॅक्टरांकडे दाखवले. त्यांनी गोळ्या लिहून दिल्या. गोळ्यांनी फरक नाही पडला तर डोळे तपासून घ्या असा सल्ला दिला. झालं. गोळ्या घेऊनही फरक पडला नाही. मग डोळे दाखवले. मायनस असा काहीसा नंबर होता. चष्मा बनवायला टाकला. तेव्हा मी नुकताच मंत्रालयात रुजू झालेलो होतो. एका सोमवारी मी चष्मा लावून हजर झालो तर सगळे काहीतरी नवीनच पाहतोय अशा नजरेने पाहू लागले. मला सगळ्यांच्या नजरा चुकवता येईना. दिवसभर माझ्या चष्म्याची.. दिसण्याची चर्चा होत राहिली. प्रशासन भवनमधून मंत्रालयात जाताना सिग्नल ओलांडताना मी चष्म्यातून रस्त्याकडे पहात होतो तर सगळे खालीवर दिसत होते आणि मी नक्की रस्त्यावरच पाय टाकतो ना ते चष्म्यातून पायांकडे पाहून खात्री करुन घेत होतो.
बाॅसच्या दालनात मी चष्म्यासह प्रथमच प्रवेश केला तर बाॅसने देखिल क्षणभर चष्म्यातील माझे नवीन ध्यान पाहिले आणि 'चालायचेच' अशा नजरेने कामकाजाच्या सूचना दिल्या. दिवसभर मी कार्यालयातील स्वच्छतागृहात वारंवार जाऊन 'आपण चष्म्यावर कसे दिसतो ते पाहून घेतले' रात्री नवीन चष्म्यासह घरी प्रवेश केला तर घरच्यांनाही तो खूप आवडला. तसे पाहिले तर मी अनेकांना त्यावेळी मी चष्म्यावर पाहिले होते. चष्मा लावलेली मुले मुली अधिक बुद्धीवान आणि हुशार वाटायची. वाटायचे एकसारखे पुस्तकात डोके खुपसून या मंडळींना चष्मा लागला असावा. पहावा तेव्हा त्यांच्या चेहर्यावर अभ्यास आणि अभ्यासच दिसायचा. चष्म्याचा एक फायदा म्हणजे खरे डोळे कसे ते कुणाला कळतच नाही. चष्मा काढून डोळे चोळताना कुणाला पाहिले की चष्म्यातील डोळ्यांपेक्षा नुसते डोळे वेगळेच टोपसलेले भासायचे.
काही व्यक्तिमत्त्वे केवळ चष्म्यावरुन ओळखू यायची. महात्मा गांधीजींचा गोल काचेचा चष्मा. पु ल देशपांडे यांचा काळ्या फ्रेमचा मोठा चौकोनी चष्मा. त्रिं च्य खानोलकरांचा तसाच चष्मा. जी ए कुलकर्णींचा काळ्या काचांचा चष्मा.अॅन्टान चेखव यांचा गळ्यात दोरी असलेला चष्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा चष्मा. खुद्द वडीलांचा साधा तपकीरी रंगाचा गोल भिंगाचा चष्मा जो त्यांनी आयुष्यात बदलला नाही. एक काडी तुटली तर त्या जागी पांढरा दोरा बांधून शेवटपर्यंत तोच चष्मा वापरला. कितीतरी चष्मे एक ओळख बनून गेले. शोर चित्रपटातील राजेश खन्नाचा चष्मा तर एक नवीन फॅशन आणायला कारणीभूत झाला.
चष्मेबद्दूर सिनेमा लागला तेव्हा आम्हाला वाटले काहीतरी चष्मा लावलेल्या बहाद्दरचा सिनेमा असेल पण चष्मेबद्दूर वेगळाच निघाला.
'ए चष्मिष्ट' असे चिडवायला तेव्हा खूप आवडायचे. ज्याला हाक मारली तो मग चष्म्यातून असेकाही रागाने पाहायचा की विचारता सोय नाही. पण स्वतःलाच चष्मा लागल्यावर मग गंभीर चेहरा झाला. चष्म्यामुळे पोक्त अनुभवी नजर आल्यासारखे वाटले. गप्पा गोष्टी विनोद हसणे खिदळणे यावर चष्म्यामुळे दिवसेंदिवस मर्यादा येत गेल्या. वाढत्या वयाची जाणीव रोपट्यासारखी वाढीस लागली आणि पुढे पुढे त्या जाणिवेचा केव्हा वटवृक्ष झाला कळलेच नाही. सोनेरी काड्यांच्या चष्म्याची हौस असलेले आणि डोक्यावर फरची कॅप असलेले काही माणसे तेव्हा पाहिली होती.
अनेकदा आरशात वेगवेगळ्या चष्म्यात स्वतःला पाहण्याचा छंद असलेली माणसे पाहिली. चष्मा म्हणजे नजरिया नवीन सोच असेही परिमाण आहे. तारक मेहता का उलटा चष्मा सारख्या मालिकेतून नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न झाला. जसा चष्मा तसे दिसेल असे म्हटले जाते ते उगाच नाही
अनेक लोकांना आपल्याला चष्मा लागलेला आहे हे दाखवायला आवडत नाही. मग हे लोक हळूच आतल्या खिशातून चोरुन चष्मा काढून नाकावर ठेवून पटकन काम करुन घाईघाईने पुन्हा लगबगीने खिशात ठेवून देताना पाहिले की मोठी गंमत वाटते. लेखापरीक्षकाचा चष्माही असाच गंमतीदार. मोठ्या नाकावर इवलासा अगदी खाली लावलेला छोटा चष्मा लावून ते मोठमोठे रजिस्टर कसे काय तपासता याचेच कौतुक वाटते.
चष्म्याचा आणखी एक फायदा काही लोक घेताना दिसतात. बाॅस जेव्हा झापत असतो तेव्हा बाॅसच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची कुणाची टाप नसते पण चष्मा लावला की जणू तो ढालच आहे असे समजून त्यातून सरळ पाहण्याचे धाडसही काही करु शकतात.
अनेकदा मी घरी चष्मा विसरायचो किंवा ऐनवेळी चष्म्याची काडी तुटायची. अशावेळी मग कार्यालयात दोन दोन चष्मे ठेवत असलेल्या सावंताचा जाड भिंगाचा साधारणतः माझ्या नंबरपेक्षा जास्त नंबरचा चष्मा माझ्या उपयोगी पडायचा. गरजेला उपयोगी पडतो तो मित्र Friend in need is indeed या उक्तीप्रमाणे सावंतांबरोबर त्यांचा चष्माही मला माझा मित्र वाटायचा. उगाच नाही चष्म्याला 'पेरुचाच पापा' मध्ये स्थान मिळालेले आहे.
कधी बाॅस चष्मा विसरुन आले की त्या दिवशी फाईली तिष्ठत टेबलावर साचायच्या आणि मग डोळे मिटून बाॅसला चिंतन करायला अधिक वेळ मिळायचा. त्या दिवशी बाॅसचे दालन वातानुकूलित यंत्र बंद ठेवले तरी थंड राहील असे वातावरण असायचे.
चष्मा हा काही लोकांच्या जीवनशैलीचा भाग झालेला दिसून येतो. भाषण करताना हमखास चष्मा हातात घ्यायची व अधिक जटील विचार मांडायचा असेल तर चष्म्याची काडी तोंडात ठेवायची काहींची अगदी हमखास शैली असते. काही लोक तर कोणाला अधिक समजावायचे असेल तर तावातावाने चष्मा काढून डोळे वटारुन अक्षरशः दुसर्याच्या अंगावर जवळजवळ धावूनच जातात.
बराचवेळ चष्मा लावून लिहितोय. डोळ्यांना विश्रांती दिली पाहिजे म्हणून जरा थांबतो!
नवीन चष्मा आहे. काचा नवीन असल्या तरी नव्या कोऱ्या मुलायम कपड्याने पुन्हा पुन्हा पुसून दाखवून देतो की चष्मा नवीन घेतला आहे. प्रोगेसिव्ह ग्लासचा आहे. म्हणजे लांबचे आणि जवळचे पाहण्यासाठी एकच भिंग. 'नवीन नवीन सराव होईपर्यंत जरा नवीन वाटेल. लांबचे पहा पण जास्त लांबचेही पाहू नका' असा प्रेमळ सल्ला लक्षात ठेवून मी जरा नवीन चष्म्याची सवय करुन घेतो... तोपर्यंत तुम्हीही चष्म्याची विविध रुपे, शैली, रंग यांचा विचार करायला हरकत नाही
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment