जगात दोनच प्रकारचे लोक आहेत. एक गप्प बसणारे आणि दुसरे गप्पा मारणारे. गप्प बसायला काही विद्वत्ता लागत नाही पण बरेच विद्वान लोक तुम्हाला गंभीर चेहर्याने ओठ मुडपून गप्प आपल्याच विचारात किंवा शुन्यात हरवलेले दिसतात. यांच्या कानावर जरा जरी गप्पांचे आवाज आले तरी यांची मुद्रा त्रासिक होते आणि त्रागा करीत हे उद्गारतात 'काय मासळीबाजार भरलाय' 'काही कामधंदे आहेत की नाही'
असे गप्पांचे वावडे असलेले विद्वान लांबून जरी येताना दिसले तरी हसते खेळते लोक चिडीचूप होऊन जातात. असे लोक कामात असतील तर आसपास कोणी चुकूनही गप्पा मारु नये किंवा हसण्याचा प्रयत्नही करु नये कारण त्यांचा तो जळजळीत कटाक्ष तुमच्यावर पडला तर तुमच्यातील मनमोकळेपणा खेळकरपणा जळून खाक होईल. ते असे काही फटकारतील की त्यांनी उच्चारलेले शब्द चाबूक वाटू लागतील.
गप्पांचे हसण्याचे उसळते आवाज आले की दाणकन घंटी वाजवून शिपायाला बाहेर काय चाललंय म्हणून जगातला कुठलाही साहेब भडकल्या शिवाय रहात नाही.
कामाच्या ठिकाणी टाचणी पडली तरी तिचा आवाज यावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते. कोणी सात मजली हसले तरी कान उघडणी केली जाते. कामाच्या ठिकाणी काम सोडून कोणी गप्पात रंगले तर ते कर्तव्यपरायणेत येत नाही असे मानले जाते. मग अशावेळी चहापान आणि जेवण अशा निमित्ताने गप्पा रंगतच राहतात. गप्पा मारणे हा माणसाचा मूळ स्वभाव आहे आणि त्यावर कोणी मर्यादा आणली, ओरडले किंवा या मूळ स्वभावाला मुरड घालायची वेळ आली तर माणसं आतल्याआत चरफडत राहतात आणि त्याचा पुन्हा परिणाम कामावरच होतो. काम कसेबसे करुन मोकळे व्हावे ही भावना कामाची गुणवत्ता ढासळण्यास कारणीभूत होते हे कोणाच्याही लक्षातच येत नाही.
मूळात काम हे काम वाटले तर कंटाळवाणे होते. गप्पा मारत संगीत ऐकत काम गुणवत्तेने पूर्ण कमी वेळात पूर्ण करता येते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वासच बसणार नाही.
एक अधिकारी आठवतात. त्यांच्याकडे काम घेऊन गेले की ते आलेल्या माणसाला जवळ बसवून घ्यायचे आणि त्याच्याशी गप्पा मारायला लागायचे. त्याने कामाची आठवण करुन दिली की ते 'काम काय होईल रे' असे उद्गारायचे. आपल्या घरापासून कुटुंबापासून दूर लांब शहरात कामासाठी आलेल्या या अधिकाऱ्याला कोणीतरी आंतरिक संवाद साधावा, कोणीतरी बोलावे असे वाटणे साहजिकच होते.
आज जिकडे तिकडे कामाचे गंभीर वातावरण तयार झालेले दिसते. रुग्णालयात जसे आजारी वातावरण तरंगत असते तसे. कोणालाही कामाशिवाय बोलायला जणू बंदीच असल्यासारखे. कोणाला भेटायचे असेल तर नाव आणि काय काम आहे त्याची चिठ्ठी आधी पाठवावी लागते. वेळ घेतल्याशिवाय परवानगी घेतल्याशिवाय कोणाला भेटताच येत नाही.
कोणी आलं तर काय काम आहे या नजरेने पाहिले जाते. कामाशिवाय कोणी भेटायला येऊ शकत नाही अशी बंधने घालून घेतलेली असतात. बंद दाराच्या दालनात वातानुकूलित वातावरणात बसणे जो तो पसंत करीत असतो. क्वचितच काही ठिकाणी 'मांजरासारखे डोकावून पाहू नये' 'परवानगीची आवश्यकता नाही. सरळ आत यावे आणि मोकळी दिसेल त्या खुर्चीत बसावे' असे मुक्तद्वार आढळते. तेथे मग सर्व तरहेच्या माणसांचा राबताच असतो.
गप्पा मारणे ही खरं तर कलाच आहे. सारख्याला वारखे मिळाले की गप्पांना अगदी रंग चढत जातो. सगळ्या भिंती गळून पडतात आणि गप्पात सहभागी सर्व तणाव विसरुन मन मोकळे करण्यात हरवून जातात. गप्पांना कुठलेही नियम मर्यादा मग उरत नाही. उंच कड्यावरुन मुक्तपणे निर्झर खळाळून वहावे तसे मग प्रत्येकजण गप्पात हरवून जातो.
गप्पा मारायला जागेचे बंधनही नसते. अगदी गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलच्या दाराच्या पॅसेजमध्येही गप्पा रंगतात. वेगवेगळ्या स्वभावाची तरहेवाईक माणसं एकत्र आली की त्यांच्या गप्पा अगदी ऐकण्यासारखा असतात. या रोजच्या गप्पा काही ठरवून होत नसतात. एखाद्याला वाटेल रोज हे एवढे काय बोलत असतील पण नाही. एकमेकांची चेष्टा करीत खोडी काढत एकमेकांना चिडवून देत एकमेकावर कुरघोडी करीत या गप्पा होतच राहतात. या गप्पांना अंत असा नाही. फक्त आपापले स्टेशन आले की उतरुन जायचे एवढेच काय ते अर्धविराम. गप्पांना पूर्णविराम असा नसतोच. गप्पांना विषयाचे बंधन वा सोयरसुतकही नसते. काहीवेळा 'गाडीत महिला आहे' असे ओरडून सांगायची वेळ येते.
गुलूगुलू गप्पांमध्ये तेवढे इतरांना संधी नसते. पण 'कार्यक्रमासाठी बसलेल्या चार यारांमध्ये गप्पा एकेक पेगाबरोबर चखणा तोंडात टाकत ज्या रंगत जातात त्याला तोडच नाही. अगदी डोळे भरुन येतील अशा एकेक आठवणी या गप्पांमधून होतात. वेळेकाळाचे भान विसरुन होणाऱ्या या गप्पांची रंगतच न्यारी. मैत्री घट्ट व्हायची असेल तर अशा समरसून गप्पा होणे आवश्यकच असते.
सगळ्यांनाच गप्पा मारायला जमते असे नाही. रंगलेल्या गप्पातही काही नुस्तीच ऐकत राहणारी मंडळी असतात. ती फक्त मधून मधून मान डोलावत असतात. हसत असतात. मधूनच कोणाला डोळा मारुन टाळीही देत असतात. काही लोक मात्र गप्पिष्ट असतात. त्यांना कधीही पहावे ते कोणाशीतरी गप्पाच मारताना दिसतात. बरे त्यांच्याकडे एकेक विषय एकेक किस्से एकेक जोक असे असतात की जातील तिकडे त्यांचे स्वागत होते आणि तिथले वातावरण ते रंगतदार करुन टाकतात. अशा लोकांची बोलण्याची सांगण्याची पद्धत अशी असते की कोणालाही त्यांचा हेवा वाटावा. सहज आपलेसे करण्याचा अलौकिक गुण अशा लोकांमध्ये असतो.
@#विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment