डोळे उघडे ठेवून पाहिले तर जिकडे तिकडे जो तो गप्पा मारताना दिसेल. गप्पांमध्ये वेळ वायफळ वाया जातो असे भलेही कोणी विकासाची प्रगतीची काळजी करणारा प्राणी काळजी करो पण गप्पा संजीवनी आहे. कुठलेही नाते घट्ट करणारी, जीवन तणावरहित करणारी मनाचे आरोग्य सुधरवणारी व खरया अर्थाने जगण्याचा मूलमंत्र शिकवणारी संजीवनी आहे
या संजीवनीपासून जो वंचित राहिल तो दुर्भागी म्हणावा लागेल. आज समाज माध्यमात वाॅटसअॅप, मेसेंजर, फेसबुक सारखी संवाद माध्यमे उपलब्ध झाली आहे. मित्र संख्याही वाढलेली आहे पण त्यामुळे गप्पा मारण्याच्या खरया आनंदाला आपण मुकलो आहे. बर या समाजमाध्यमांमध्ये केवळ लाईक्स आणि काँमेंटमध्ये व्यस्त व व्यसनाधीन झालेल्या लोकांमध्ये खरया अर्थाने संवाद किती होतो? केवळ गुड मॉर्निंग गुड अफ्टरनून गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट या पलिकडे आणि काही शेअर करण्यापलिकडे आपण जातच नाही.
मोठमोठे साहित्यिक कलावंत गायक संगीतकार यांच्यात गप्पांच्या अक्षरशः मैफिली रंगतात. या गप्पांमधून त्यांचा व्यासंग, साधना, ज्ञान इतके प्रतित होते की ऐकणारा या अमृतवर्षावात अगदी न्हाऊन निघतो. तृप्त होतो. उर्दू अरेबिक फारसी भाषेतील शायरी, गझल यांचा दांडगा व्यासंग असलेले एक मित्र आहे. त्यांच्याकडे सहज जरी गेले तरी ते तासंतास आपल्या गप्पांमध्ये असे रंगवून टाकतात, माहित नसलेल्या एकेक गोष्टी एकेक किस्से सांगतात की वेळेचेही भान उरत नाही. असे मित्र मिळणे म्हणजे भाग्यच असते. नकळत आपल्या जीवनात रंग भरुन टाकतात असे मित्र!
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment