गप्पा सुरु करायला काही वेदमंत्र लागत नाही. फक्त विरंगुळ्याचा क्षण आणि कमीत कमी एकतरी सोबती मिळावा की गप्पांना बहर आलाच म्हणून समजा. एकाच छंदाची माणसे एकत्र आल्यावर जशा गप्पा रंगतात तशाच गप्पा निरनिराळ्या ढंगाची माणसं एकत्र आल्यावर रंगतात. सहज कोणीतरी थंडीची रात्री शेकोटी पेटवावी आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु व्हाव्या. जसजशी रात्र चढत जाते तसतशा हात पाय शेकत गप्पां रंगतच जातात. शेकोटी विझू नये आणि गप्पा सरु नये असे होऊन जाते. गप्पांमध्ये भूताखेताच्या गोष्टी निघाल्यावर तर मग विचारुच नका. सगळ्यांना ऐकीव भूतांच्या गोष्टी आठवतच राहतात. चार पिणाऱ्यांची बैठक गप्पांच्या मैफीलीत बदलून जाते. मध्येच कोणालातरी अगदी गलबलून येते. कुणाचे डोळे भरुन येतात. पेगमागून पेग भरले जातात. गप्पांच्या नादात किती पेग घेतले तेही मोजायला विसरुन जातात. अशा गप्पांमधून मैत्र अगदी घट्ट होऊन जाते यात शंकाच नाही.गप्पांच्या ओघात प्रत्येकाला एकमेकांची गुपिते माहित होऊन गेल्याने त्या मैत्रीला वेगळीच खुमारी येत चालते. ती मैत्री साधीसुधी रहात नाही.
मध्यंतरी एक फार सुंदर कथा माझ्या वाचण्यात आली होती. दिवसभर वर्गावर्गावर शिकवून झाल्यावर थकले भागले गुरुजी घरी जायला एसटीत बसतात. त्यांच्या शेजारी नेमकी पीटीचे शिक्षक येऊन बसतात. त्यांनाही घरीच जायचे असते. ते शेजारी बघतात तर खिडकीत बसलेले बहुधा शिक्षक असावे म्हणून अटकळ बांधून त्यांनी ओळख काढत सुरु केली आणि मग दिवसभर पीटी मुळे बोलायला न मिळालेल्या त्या शिक्षकाला किती बोलू आणि किती नाही असे होऊन गेले. तर दिवसभर बोलून बोलून थकलेल्या त्या गुरुजीला नकळत त्या गप्पांमध्ये सामील व्हावेच लागले अगदी प्रवास संपेपर्यंत!
द. मा. मिरासदार यांची भूताचा जन्म ही कथाही अशीच गंमतीदार. अमावस्येच्या एके रात्री गावाकडे निघालेल्याला वाटेत एकजण भेटतो. अनोळखी असला तरी बरे झाले कोणाचीतरी सोबत मिळाली असे त्याला वाटते. चालता चालता त्यांच्या गप्पा रंगतात. वाट सरत राहते. एके ठिकाणी झाडाखाली ते विधीवगैरेसाठी थांबतात. एकजण झाडाच्या आडोशाला जातो. परत येऊन पाहतो तर दुसरा दिसत नाही. खरे तर तोही आडोशाला गेलेला असतो. पण तो दिसला नाही हे पाहून याची बोबडी वळते आणि तो वेगाने धावत सुटतो. जरावेळाने आडोशाला गेलेला हा येऊन पाहतो तर जोडीदार गायब म्हणून त्याचीही बोबडी वळते आणि अशाप्रकारे भूताचा जन्म होतो अशी ही खुमासदार गोष्ट.
बरयाचशा लोककथा , परीकथा ह्या अशा गप्पांमधूनच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. त्यांचा प्रसार रंगरुप शैली बदलून होत आलेला आहे.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment