#देवभूमि हिमाचल प्रदेशात ५
घाट संपता संपत नव्हता. रस्त्याच्या कडेने उंच उंच वृक्षांची दाटी.. खोल दरयांमध्ये झाडेच झाडे.. एका वळणावर 'ग्रीन व्हॅली' लागली. असे म्हणतात की तिथे दिवसासुद्धा विजेरी लागते. वाटेत एक नदी सारखे सोबत करीत असल्याचे दिसले. ड्रायव्हरला नदीचे नाव विचारले तर त्यांने पंजाबी ढंगात 'बियास' सांगितले. बियास म्हणजेच व्यास नदी हे लक्षात आल्यावर जाणवले याच परिसरात ऋषिमुनी राहून गेले आहेत. मनालीचे नाव मनू ऋषिंवरुन पडले आहे. रस्त्यात एक पाटी मार्कंडेय ऋषिंच्या मंदिराकडील रस्ता दर्शवित होता. मनातल्या मनात त्या दिशेला नकळत हात जोडले गेले. व्यास नदी खळाळून वहात होती. नदीच्या पात्रात पांढरे शुभ्र दगड पाण्याच्या प्रवाहाने गोल गरगरीत झालेले दिसत होते. स्फटिकासारखा नितळ पाण्याचा प्रवाह होता.
ड्रायव्हरने सांगितले 'नदीका पाणी बहोत ठंडा होता है. मधून मधून रिव्हर शाफ्टींग करणारया पिवळ्या लाल रंगातील प्लॅस्टिक नावा दिसत होत्या आणि त्यातून हुर्रे करीत लाईफ जॅकेट घालून जल्लोष करणारे आनंदी उल्हासित चेहरे दिसत होते.
आपल्याकडे जशी कुरीयर सेवा असते तिथे मालाची एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेण्याची व्यवस्था होती. महाकाय पर्वतरांगांतून रस्त्याच्या कडेने तारेवरुन पाळणे सरकत होते. पाळण्यात सामान दिसत होते. काही ठिकाणी रिव्हर क्राॅसिंगचे थरारक प्रात्यक्षिक चालले होते. नदीवर या डोंगरापासून समोरच्या डोंगरापर्यंत तारेला पुली होती. आणि त्या पुलाच्या सहाय्याने सरकत सरकत व्यास नदीचा खळाळता प्रवाह ओलांडून पलिकडे जायचे असे ते रोमांचक प्रात्यक्षिक होते. मनातील भय नष्ट करुन आत्मविश्वास मिळवायचा.. साहसाचे थ्रिल अनुभवायचे तर अशा खेळांचे पर्यटकांना आकर्षण न वाटले तर नवल होईल.
महाकाय पर्वतातून गरुडासारखे उंचावर विहरत असलेले ग्लायडर्स पाहून तर त्यांना एवढ्या उंचावर कसे वाटत असेल या कल्पनेने रोमांच उभे राहिले. डोंगर कड्यावरुन ग्लायडींग पॅराशूट घेऊन दरीत उडी मारुन तरंगत दरीवरुन पक्ष्यासारखे उडत रहायचे भारी रोमांचक.. जेम्स बाँडच्या चित्रपटातील चित्तथरारक दृश्ये आठवतात. श्वास रोखून हे सारे नुस्ते पाहतांनाही हरखून जायला होते.(क्रमशः)
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment