#देवभूमि हिमाचल प्रदेशात ६
अरुंद एकेरी घाट रस्त्यावरुन जाताना एकीकडे उंच महाकाय पर्वत तर दुसरीकडे कठाडे नसलेल्या कडाने नजर चक्रावून जाईल अशी खोल उतरती दरी. ड्रायव्हरच्या निष्णातपणावर एक दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण होईल अशी स्थिती होती. मध्येच आपल्याकडे सिटी बसचे थांबे असतात तसे 'वर्षा शालिका' उभारलेल्या दिसत होत्या. हिमवर्षावात ही सारी सृष्टी न्हाऊन निघत असेल तेव्हा इथले वातावरण कसे होऊन जात असेल या कल्पनेने मन रोमांचित झाले. हिमवर्षावात आडोसा मिळावा म्हणून या वर्षा शालिका इथल्या डोंगर दरयात राहणाऱ्या लोकांना किती आधार ठरत असतील.
देवभूमि हिमाचल प्रदेश परिवहन बसच्या मागे 'नीमका पेड चंदनसे कम नही.. हमारी मनाली लंडनसे कम नही' असे वाचून गंमत वाटत होती. मध्ये मध्ये पाठीवरुन बांबूच्या गोल उंच करंडीतून चिजवस्तू धान वाहणाऱ्या मेहनती स्त्रिया अधिक संख्येने दिसत होत्या. डोक्याला रंगीत स्कार्फ, सलवार कुर्ता असा त्यांचा पेहराव होता.
हळूहळू अंधार पडत चालला. गाडीच्या काचांना हात लावून पाहिले तर काचा गार पडलेल्या होत्या. व्यास नदीच्या काठाने प्रवास सुरु होता. दुरुन पहाडावर घरे करुन राहिलेल्या वस्तीचे रंगबिरंगी वीजेचे दिवे दिसत होते. मनालीला पोहोचेपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले. (क्रमशः)
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment