#देवभूमि हिमाचल प्रदेशात ४
पंजाबी गाण्यांच्या धूनमध्ये आमची गाडी बोगद्यातून वेगात जावू लागली तेव्हा एकदम आल्हाददायक अनुभव आला. आतमध्ये अगदी थंड वातावरण. मोठा रुंद रस्ता. खिडकीच्या काचेतून बाहेर पाहिले तर वर दिवे भराभर मागे पळत होते. गाडी अगदी स्मूथली पळत होती. कितीतरी वेळ गाडी बोगद्यातून पळतच होती. मागे पुढे वाहनेही अशीच वेगात पळत होती. बोगद्यातून पलिकडे पुन्हा पुढील घाटरस्ता दिसू लागला. महाकाय पर्वत आणि नजर पोहचत नाही इतक्या खोल खोल दरया. उंच उंच सूचीपर्णी वृक्ष, देवदार, पाईन, उतरंडीवर उतरत गेलेली शेते, उंच डोंगरावर घरे, मेंढ्यांचा कळप, मध्येच पाठीवर धानाचा गठ्ठा वाहणारी सलवार कुर्त्यातील स्त्री लक्ष वेधून घेत होते. कठडा नसलेल्या अरुंद रस्त्यावर समोरुन येणाऱ्या वाहनाला जागा करुन देण्यासाठी ड्रायव्हर गाडी हळूच गाडी बाजूला लावून कसरत करायचा तेव्हा हृदयाचा ठोका चुकायचा.
'देवभूमि हिमाचल' असे दर्शनी भागावर असलेल्या हिमाचल प्रदेश परिवहन बसेससुद्धा त्या अरुंद रस्त्यांवरुन लिलया धावताना बघताना त्यांच्या वाहनचालकांचे मोठे कौतुक वाटले. 'कृप्या अंतर रखो' 'उचित दूरी रखो' असे त्या बसेसच्या मागे सूचना पाहून थोडी गंमतही वाटली.तेथील सर्व वाहनचालक एकमेकांना अॅडजेस्ट करीत एकमेकांना सांभाळत गाड्या चालवत राहतात. डोंगरसुद्धा जणूकाही या गाड्यांवर माया करीत रहातो असा भास होतो. एवढ्या दुर्गम भागात रस्ता करुन ठेवलेल्या अज्ञात लोकांचे ऋण जाणवत रहाते. प्रदीर्घ घाटरस्त्याने वळणावर वळणे घेत आमची गाडी महाकाय पर्वत चढून जातच होती.
समतल भाग पहायची सवय असलेली आमची नजर कुठे समतल भाग आहे का ते शोधीत होती पण तसे कुठेही नव्हते. मध्ये मध्ये डोंगरातच वर जाणारया पाऊलवाटा दिसत होत्या. डोंगरावरच छोट्या छोट्या वस्त्या होत्या पण त्या दिसत नव्हत्या. कसे रहात असतील इथली लोक. खडतर जीवन जाणवले.
निसर्गत:काटक वृत्ती अंगी बाणवलेला इथला माणूस कष्टाळू आहे. तेवढ्या अवघड रस्त्यांच्या वळणावर किंवा कडेला काळसर बारीक तोंडाच्या आखूड शिंगाच्या गाई रवंथ करतानाही दिसत होत्या. उगाच गाड्यांना आडवे जाण्याची किंवा मार्गच अडवून ठेवण्याचा बेशिस्तपणा त्यांच्यात मुळीच नव्हता. मी फुलझाडे शोधत होतो पण बारीक पांढरया फुलांच्या वेलींशिवाय काही दिसत नव्हते. दरयांमधून वर उंच उगवून आलेल्या झाडांवर माकडांची कुटूंबे अवचित नजरेस पडत होती.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment