गप्पा आणि गोष्टींना अंतच नाही. पहावे तिकडे लोक गप्पा झोडत असतात. टाळीवर टाळी देत असतात. पु. भा. भावे यांच्या एका कथेत एक आक्रमक बढाईखोर असतो आणि तो जे सांगेल ते ऐकून घेत असलेला उत्तम श्रोता होता. गप्पा रंगत जातात. तो बढाईने एकेक गोष्ट रंगवून रंगवून सांगत असतो. आपल्या एकेक प्रकरणांबद्दल सांगत रहातो. शेवटी तो श्रोता त्याला पुढ्यातला दारुचा रिकामा ग्लास मारुन फेकतो इतका त्याचा राग ऐकता ऐकता आतल्या आत धुमसत जातो. कारण तो जे प्रकरण रंगवून रंगवून सांगत असतो त्या प्रकरणाचा पती तो श्रोता असतो. गप्पांच्या नादात कधी कधी भानच रहात नाही. अचानक काही भानगडी उजेडात येतात आणि स्फोट होतो. माणसं बदलली, ठिकाणं बदलली की गप्पांचे स्वरुपही बदलून जाते. चार तरुण एकत्र आले की तरुणाईच्या गप्पा रंगतात. नवपरिणित जोडपं असेल तर त्यांच्यातील हितगुज कोणालाच ऐकू येत नाही. ते एवढ्या हळू आवाजात लाजत लाजत असते की जोडीदाराला कसे काय बुवा समजत असेल असा प्रश्न पडतो. काही ठिकाणी आवडत्या व्यक्ती भेटल्या की गुलुगुलु गप्पा सुरु होतात आणि नको ती माणसं भेटली की तोंडाला कुलुप असेही चित्र दिसते. चहाची टपरी हे तर गप्पांचं मस्त ठिकाण. चाय पे चर्चा हा कार्यक्रम आता आला असला तरी चहाच्या टपरीवरील गप्पांना त्याहून अधिक इतिहास आहे. चहाचा एकेक घोट घेत घेत एकेक विषय चघळण्यात जो मजा आहे तो कशात नाही. तरतरी नेमकी चहामुळे येते की गप्पांमुळे यात संभ्रम वाटेल असे असते. बाबू लोक चहाच्या टपरीवर किंवा पानाच्या ठेल्यावर गप्पांमध्ये इतके रंगून जातात की त्यांना साहेबांनी बोलवले म्हणून शिपायाला शोधत यावे लागते कारण त्यावेळी नेमके मोबाइल आऊट ऑफ कव्हरेज एरिया करुन ठेवलेले असतात. किंवा काही महाभाग ऐन भरातल्या गप्पांना मध्येच व्यतय येऊ नये म्हणून चक्क जागेवर फोन चार्जिंगला लावून व शिपायाला त्यावर नजर ठेवायला लावून बाहेर पडलेले असतात. फोन आला तरी जागेवरच वाजत रहातो आणि गप्पांमध्ये अजिबात व्यतय येत नाही
निवृत्त झालेल्या मंडळींचा गप्पा मारायचा एक कट्टा वेगळा असतो. जो शक्यतो गजबजलेल्या जगापासून वेगळा असतो. एकेक आठवणी काढत रोज गप्पा रंगत राहतात. आठवणींनाही अंत नसतो. हा कट्टाच जादूचा. कुठल्या कुठल्या सहसा न आठवणारया आठवणींही गप्पांच्या ओघात येऊन जातात की अरे इतके दिवस ही आठवण आपण कसे विसरुन गेलो होतो असा प्रश्न पडेल. अशा कट्ट्यावरील एकेकजण कमी होतो तेव्हा पाणावल्या डोळ्यांनी गप्पा सुरुच राहतात.
वेगवेगळ्या वयात वेगवेगळे विश्व असते आणि त्यानुसार गप्पा रंगत असतात. अशा गप्पा मारणाऱ्यांमध्ये असाही एकजण असतो ज्याला बाहेर वेगळे सूर ऐकू येत असतात पण तोंडाने मात्र तो ऐकल्यासारखे करुन हुं हुं करत राहतो.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment