#देवभूमि हिमाचल प्रदेशात ७
मनालीत प्रवेश करताना मोठमोठी पाॅश हाॅटेल्स लागली. दाराशी ग्राहकांच्या स्वागताला दारवान सज्ज होते. काचेचे मोठे दरवाजे. आत झुंबर टांगलेले. झगमगाट. एका हाॅटेलचे नाव 'नदी के किनारे' असे पाहून व्यास नदीची आठवण झाली. पहाडावर वसलेले हे शहर. रस्त्यावर फूटपाथ हा प्रकारच नव्हता. लोक पायऱ्यांनी जिकडेतिकडे ये जा करीत होते. गाडी पुढे पुढे जात होती. आपले रुम नेमके कोठे बुक आहेत याची उत्सुकता वाढत होती.
आमच्यातील सर्वात लहान मेंबरला खोकल्याने हैराण केले तसे सर्व मेडीकल स्टोअर कुठे दिसते का ते पाहू लागले. गाडी मध्ये थांबवायची सोय नव्हती. कारण मागे पुढे ट्रॅफिक होती आणि गाडी हळूहळू पुढे सरकत होती. साडू भाऊ गाडीतून उतरले व मेडीकल स्टोअर शोधू लागले. तोपर्यंत गाडी व्यास नदीवरील पुलावरुन पुढील रोहतक मार्गाला लागली होती. साडू भाऊ आता मागून गाडी शोधत कसे येतील याचीच सर्वांना चिंता लागून राहिली होती. पुलावरुन पुढे गेले की आडवा रस्ता लागत होता. ट्रॅफिक खूप होती. ट्रॅफिक हवालदार, लेडीज पोलिस ती गर्दी नियंत्रित करीत होती. बराच वेळ झाला तरी साडू भाऊ मागून येताना दिसत नव्हते. तोपर्यंत बरेच अंतर कापून झाले होते. पुढे गाडी बाजूला घ्यायला जरा जागा दिसली तेथे ड्रायव्हरने गाडी बाजूला लावली. साडू भाऊंना फोन लावला. जवळच्या हाॅटेलची खूण सांगितली. तोपर्यंत ते गाडीजवळ येऊन पोहचले होते. त्यांनी औषध आणले तोपर्यंत खोकला कुठल्याकुठे पळून गेलेला होता. त्यावर सगळे मनसोक्त हसले
. गाडी निघाली. मनालीपासून २-२.५ किलोमीटर पुढे आल्यावर ड्रायव्हरने आमचे रुम ज्या काॅटेजमध्ये बुक केलेले होते त्याच्या मालकाला फोन करुन कसे यायचे ते आपल्या पंजाबी ढंगात विचारले.
अंदाजाने गाडी पुढे नेत नेत एका पुलाशी नेली. व्यास नदीवरील तो छोटेखानी पूल होता. पुलाच्या तोंडाशी ॐ मणि पद्मणे हा मंत्र असलेल्या रंगबिरंगी पताका फडकत होत्या. पुलावरही त्याच पताका होत्या. पुलावरील वाहतूक एकेरी होती. पलिकडे कोणते वाहन नाहीना ते पाहून मग ड्रायव्हरने गाडी पुलावरुन पलिकडे नेली. गाडीच्या वजनाने पुल हलला होता. पुढे वळण घेऊन गाडी साचलेल्या पाण्यातून न्यावी लागली. डोंगरातून आलेले ते पाणी होते. शेवटी एका ठिकाणी गाडी थांबली. बोळीतून पुढे ते काॅटेज होते. सर्व सामान उतरवून रुमपर्यंत जिन्याने चढून आम्ही पोहचलो. तीन कुटुंब तीन रुममध्ये विसावली. जेवणाची सोय विचारली तेव्हा काॅटेजच्या मालकाने तेवढ्या रात्री बाहेर जाऊन जेवण आणून दिले. मालक म्हणजे पोरगेलासा तरुण होता तो. हाॅटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. नोकरी शोधत होता. दोन तीन ठिकाणी मुलाखतीला जाऊन आल्याचे आणि लग्न ठरल्याचे त्याने सांगितले. जेवण करुन सर्व निद्राधीन झाले. सकाळी लवकर उठायचे होते (क्रमशः)
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment