SarjanSpandan

Search results

Friday, May 28, 2021

फावला वेळ



             पोटासाठी आखलेल्या परिपाठीमध्ये प्रत्येकालाच फावल्या वेळेचे चांदणे घटकाभर का होईना पण लाभतच असते. व्यस्त दिनक्रमात लाभलेला फावला वेळ आपण कसा घालवतो. क्षणभर संगीत लहरीत आपण हरवून जातो. मोबाईल मधील खेळांमध्ये स्वतःला गुंतून घेतो. कुठलातरी पक्षी निरव शांततेत रव करीत असतो ते ऐकत बसतो किंवा खिडकीतून शांततेची नि:शब्द एकतान धुन ऐकत बसतो.

          फावल्या वेळेचा क्षण ताजेतवाने टवटवीत करुन टाकायला पुरेसा ठरतो. या क्षणी पुन्हा परिपाठीचा, विवंचनांचा, समस्यांचाच जेव्हा मन विचार करते तेव्हा आपण परिपाठीमध्ये किती यांत्रिक निरस झालेले आहोत.. किती व्यस्ततेचे गुलाम झालो ते लक्षात येते. तुरुंगाच्या भिंती आणि गज यातून मुक्त झालेला कैदी जसा त्याच त्या वातावरणात वावरतो तशी आपली अवस्था होऊन जाते.

फावला क्षण हा एकप्रकारे मुक्ततेचाच क्षण असतो. अशावेळी स्वतःकडे जरा पाहिले पाहिजे. मनाभोवती आलेली मरगळ झटकून, साचलेली चिंतेची कोळिष्टके फटकून नवपालवी अनुभवली पाहिजे.

        फावल्या वेळेत बागेतील फुलझाडांच्या फुलांशी हितगुज केले पाहिजे. मूळांशी प्रेमाने पाणी सिंचले पाहिजे. आभाळाच्या बदलत्या रुपाकडे पाहिले पाहिजे. परिसरातील झाडांच्या पानाफुलातील सूक्ष्म हालचाली टिपल्या पाहिजे.

         फावल्या वेळेत नवजात शिशू बालके यांचे निरागस नितळ भाव आणि हालचाली टिपल्या पाहिजे व त्यांच्याबरोबर घटकाभर का होईना पण लहान झाले पाहिजे.

            डोळे मिटून आतला आवाज ऐकला पाहिजे. स्मरणरंजन करणारे क्षण आठवतील त्यात हरखून जावे. कधीतरी फोटोंचे अल्बम चाळावे. आवडत्या पुस्तकांची पाने चाळून पहावी.

       फावल्या वेळात अनवट वाटेवरुन स्वच्छंद भटकून यावे. हरवत चाललेल्या सुरावटींमध्ये भिजत रहावे. स्वत:तील सर्जनशीलतेला समरसून भेटत रहावे. कितीतरी कलावंतांच्या कृती आपल्या नजरेतून अस्पर्शित राहतात त्यांचा शोध घ्यावा. साहित्यातील कितीतरी सौंदर्यस्थळे अज्ञात राहतात त्यांचा धांदोळा घ्यावा.

              सज्जात टांगलेला झोपाळा किंवा खुर्ची यात घटकाभर बसून हिंदोळा अनुभवावा. कितीतरी राहून गेलेल्या गोष्टी फावल्या वेळेत करता येण्यासारख्या आहेत. दुरावलेले आंतरिक संवाद, जिव्हाळा, मैत्री अशा कितीतरी गोष्टींच्या तारा पुन्हा जुळवता येण्यासारख्या असतात. स्वतःची वेगळीच ओळख करुन घेण्यासाठी फावला वेळ म्हणजे वरदान आहे. हे वरदान व्यर्थ न व्हावे. या फावल्या वेळेत कोणाला एखादी कविताही भेटेल. सौंदर्याचा साक्षात्कार होईल. अलौकिक अनुभूती येईल.@विलास आनंदा कुडके 

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...