: #देवभूमि हिमाचल प्रदेशात ८
पहाटे पाच वाजताच जाग आली. खिडकीचे पडदे दूर सारुन बघितले तर लवकर उजाडलेले. गिरीशिखरांवर बर्फ साठलेले. झाडावर एक चिमणी. थंड वातावरणात ती फांदीच्या टोकावर स्तब्ध.सुंदर दृश्य होते. खाली वाकून पाहिले तर मोठ्या हौदात सफेद बेडशिटस उशीच्या खोळी पडदे धुण्याचे काम मोठ्या प्रमाणात चाललेले होते. दोन झाडांना तारा बांधलेल्या. धुतलेले कपडे वाळत टाकले जात होते. एक कुटुंब या कामात गुंतलेले होते. ज्यांचे आवरुन झाले ते भराभर गॅलरीत सेल्फी काढायला पळाले.
तीन दिवस या काॅटेजमध्ये मुक्काम ठरलेला होता. जणू हाॅलिडे होममध्ये रहायला आल्यासारखे वाटत होते. काॅटेज दोन मजली टुमदार होते. मजल्यावर चारीबाजूने गॅलरी होती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून ज्याने त्याने फोटो काढण्याची काढून घेण्याची हौस पूर्ण करुन घेतली. काॅटेजच्या अंगणात सफरचंदाची झाडे होती. नुकतीच हिरवी लहान लहान फळे लगडून आलेली होती. कुंपणाच्या भिंतीत नाजूक दरवाजा होता. तिथे गुलाबाच्या झाडाला टपोरे लाल लाल गुलाब फुललेले होते. त्या परिसरात फोटो काढून झाले. काही हौशी मंडळी मागील बाजूस जिना उतरुन गेली. तिथे आणखी वेगवेगळी फळझाडे होती. तिथेही वेगवेगळ्या कोनातून फोटो काढले गेले.
ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला लावून ठेवली होती. तो गाडीतच झोपला होता. शाळेत जायला निघालेली मुले पायऱ्या पायर्यांनी उतरुन खाली जात होती.
आज सेलांग व्हॅलीला जायचे ठरले होते. सगळे नाष्टा वगैरे करुन तयार होऊन गाडीजवळ जमा झाले. ड्रायव्हरही स्नान वगैरे आटोपून केव्हाच तयार झालेला होता.
सगळे गाडीत बसले. गाडी पुन्हा साचलेल्या पाण्यातून वळणे घेत एकेरी पुलावरुन सेलांग व्हॅलीच्या दिशेने निघाली. पुन्हा पंजाबी गाणी सुरु झाली.
सेलांग व्हॅली आली तशी सगळे गाडीतून उतरले. वेगवेगळ्या दराच्या ग्लायडींगसाठी तिकीटांचे बुथ होते. वेगवेगळ्या उंचीवरुन ग्लायडींगसाठी वेगवेगळे दर होते. आपल्या आवडीप्रमाणे तिकीटे घेऊन एकेक जण उंच चढ चढून गेला.
कितीतरी लोक ग्लायडिंगचा आनंद लुटत होते. मैदानावर उतरत होते. त्यांच्या पाठीशी गार्ड काहींना उतरवत होता. तर मैदानावर पडलेले महाकाय पॅराशूट गोळा करण्याचे काम चारपाच जण करत होते. मैदानाच्या एका बाजूला रोप वे होता. तिथेही लोक तिकीट काढून रांगेत उभे रहात होते.
उंचावरुन लक्षात येत नव्हते की आपलाच मेंबर ग्लायडिंग करुन खाली येतो. कितीतरी वेळ आपला मेंबर समजून दुसर्याचेच खाली उतरण्याचे फोटो काढले गेले. अगदी खाली आल्यावर लक्षात यायचे की आपले मेंबर अजून आलेच नाही. वेगात खाली येताना मैदानावर उतरताना जबरदस्त स्ट्रोक अनुभवाला येत होता. चेहर्यावरुन किती चित्तथरारक अनुभव येत असेल त्याची कल्पना येत होती
सर्वात लहान मेंबरनेही ग्लायडिंगचा अनुभव घेतला. लहान मुलांसाठी चारपाच लोक दोरया हातात घेऊन खाली उतारावरुन पळत येतात.
ग्लायडींग झाल्यावर काही मेंबर जवळच रिव्हर शाफ्टींगसाठी गेले. तोपर्यंत काही मेंबर ग्लायडिंगची दृश्ये पहात थांबून राहिले. काही स्त्रिया फोटोंचे अल्बम घेऊन गर्दीमधून फिरत होत्या. तेथील पारंपारिक वेषात सजवून आपापल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घ्यायला देत होत्या. मोबदल्यात थोडेबहुत पैसे मिळवत होत्या.
रिव्हर शाफ्टींग करुन मंडळी आल्यावर रोप वे कडे सगळ्यांनी मोर्चा वळवला. तिकीटे काढून सगळे रांगेत उभे राहिले. वर गेलेली ट्राॅली खाली आली की ६ - ६ लोक ट्राॅलीत बसत होते. ट्राॅली हळूहळू वर उंचावर जात होती. एक ट्राॅली वर जात असतात दुसरी ट्राॅली खाली येत होती. आम्ही ज्या ट्राॅलीत बसलो होतो त्यात एक नवीनच लग्न झालेले जोडपे बसलेले होते. काहीतरी कारणावरुन त्यांच्यात बिनसलेले होते. 'देख मै सब फोटो डीलिट कर देता हूँ' अशी धमकी दिल्यावर तिनेही जा मै बात नही करुंगी म्हणून तोंड फिरवले होते. आम्ही उंचावर जाण्याचा अनुभव घेत होतो. वर गेल्यावर तिथेही लोक फोटो काढत होते. छोट्या रेस्टॉरंटमध्ये फास्ट फुड खात होते. पारंपरिक वेषभुषेत फोटो काढत होते. (क्रमशः)
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment