बरेच दिवसात रसिकतेची पातळी मोजली नव्हती त्यामुळे आपल्यात रसिकता शिल्लक आहे किंवा नाही या शंकेने मला ग्रासून टाकले. बा. सी. मर्ढेकर म्हणतात त्याप्रमाणे 'कितीतरी दिवसात नाही गेलो चांदण्यात' सारखी खिन्न अवस्था झाली. डेलिसोप मालिकांनी एकेकाळी पाहिलेल्या नाटकांची मोहिनी कमी करुन टाकली. सहकुटुंब एखादे नाटक पहायला जाणे ही कल्पना आजकाल अव्यवहार्य वाटू लागली आहे. लग्नसमारंभात डीजे वाजवल्याशिवाय आणि परिसरातील तमाम लोकांची बळजबरीने झोपमोड केल्याशिवाय चैन वाटेनाशी झाली आहे. लग्न समारंभात जुनी गाणी आता वाजवणे म्हणजे वरहाडमंडळीची नाहक नाराजी ओढावून घेण्यासारखे झाले आहे.
मिरवणूकीतही डीजेचा धुडगूस घातल्याशिवाय आणि प्रखर लाईटझोत वेगवेगळ्या रंगात सोडल्याशिवाय गंमत येत नाही अशी जाम पक्की भावना झाली आहे. त्या कैफात सर्वांगात झिंग भरुन घेतल्याशिवाय सगळे अपूर्ण असल्यासारखे वाटत रहाते.
वाॅटसअॅप फेसबुक चालवल्याशिवाय दिवस जात नाही आणि रात्र तर त्याहून जाईनाशी झाली आहे. वाचन फक्त वर्तमान पत्र चाळण्यापुरते मर्यादित झाले आहे. पुस्तक वाचायचे म्हटले की हमखास जांभाई येते आणि डोळे भारावून जातात. मग अशी पुस्तके दिवाणखान्यात झकास मांडून फक्त त्यांच्याकडे पाहुण्यांसह डोळे भरुन पाहिले तरी किती आत्मिक की बित्मिक म्हणतात तो आनंद होत राहतो.
उत्स्फूर्त दाद हा प्रकारच मी विसरत चाललो आहे. आवडत्या व्यक्तीने किंवा ग्रुपच्या मित्र मैत्रीणीने साधे 'फुस्स' असे स्टेटस वाॅटसअॅपवर किंवा फेसबुकवर टाकले की त्यावरील लाईक्स आधी मोजून त्यात आणखी लाईक्सची भर घालत रहातो. बाकीचा भारंभार कचरा असेल असे ठामपणे गृहीत धरुन बिनदिक्कत न वाचता भराभर पोस्ट स्क्रोल करीत चालतो. अर्थात एवढे सारे वाचत बसायला आपल्याकडे वेळ आणि रस दोन्हीही नसतात.नेट पॅक मात्र पेट्रोल डिझेल भरावे तसे नियमित भरीत रहातो.
डोक्याला ताण येईल किंवा वास्तवाचे चटके बसतील असल्या नसत्या विचारमंथनात मन अलिकडे गुंतत नाही. वायफळ चर्चेच्या गुरहाळात जर वेळ छान मस्त जात असेल तर इतर डोक्याला ताण का घ्यावे
तरीपण रसिकतेची पातळी टिकवून ठेवावीच लागते. निदान समाजात वावरायचे असते. लोक 'अरसिक' म्हणून ठप्पा मारायला टपलेलेच असतात. सगळ्या गोष्टी कशा मॅचिंग मॅचिंग असायला पाहिजे. कोणी बावळटात काढता कामा नये. कपाट भरत आले तरी कपड्यांची एकेक भर घालत जावे लागते. नुस्त्या कर्णभुषणांच्या जोड्याच्या संग्रहाने तसेच चपलाजोड्यांनी कपाटेच्या कपाटे भरली गेली आहे
रसिकतेचा अंशही शिल्लक राहिलेला नाही असे कोरडे भावनाशून्य आयुष्य चालले आहे. खूप खोल खोदूनही पाणी लागणार नाही अशी मनाची ओलावाशून्य दशा झाली आहे.
कवितेच्या ओळी किंवा गझलचे शेर काळजावर तरंग उठवत नाही. अगदी गद्य आयुष्य झाले आहे. रसिकतेची पातळी वाढावी तरी कशी. नाना व्याधींना ताणतणावांना सांभाळण्यात आणि गोळ्यांच्या वेळा पाळण्यात दिवस चालले आहे.
कच्ची कैरी, गारशेल चिंचा आताशा मनाला मोहवत नाही. सकाळचे कोवळे उन्ह आणि आमराईतील मस्त हवा यांची ओढ राहिली नाही. एयरकंडीशन शिवाय आपली बात नाही. बुट चमकवण्यात आणि नेकटाय आवळण्यात आपले बहुतांश लक्ष खर्ची पडत आहे. रसिकतेची पातळी अशी का खालावत गेली असेल असा प्रश्न पडतो पण उपाय गवसत नाही.
मन असे दाद का देईनासे झाले. रसिकतेची पातळी वाढविणारया गोळ्या कुठे मिळत असेल, रसिकता वाढावी यासाठी कुठले अॅप असेल तर गुगल सर्च करुन पहावे म्हणतो. बरं भोवतालही तसाच. कुणाच्या हातात पुस्तक नाही. गप्पांची रंगत जाणारी मैफील नाही. वैचारिक साहित्यिक जाणिवा उंचावणारी व्याख्याने नाहीत. जिकडे तिकडे पैशाचा चुराडा करुन उभारलेले अनावश्यक होर्डिग्ज आणि ध्वजांची गर्दी.कान किटवणारे कर्कश्श ध्वनीप्रदूषण आणि डीजेंचा धुडगूस.. मन अस्वस्थ होत आहे.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment