SarjanSpandan

Search results

Friday, May 28, 2021

सुविचार



          दिवसाची सुरुवात एकतरी सुविचाराने होतेच होते. वाॅटसअॅप उघडले की भराभर सुविचार आपल्या दृष्टीक्षेपाच्या अंगणात येऊन पडतात. नकळत नजरेला अशा सुविचारांची भुरळ पडते. गेली कित्येक वर्षे सुविचारांची गाठ होत गेली. कोणत्या सुविचारांनी आपलं मन बदलत गेलं. कोणत्या सुविचारांचा आपल्यावर पगडा बसला याचा आपण कधीतरी विचार करतो. सुविचार येतच राहतात प्रवासी पक्षांसारखे. काहीवेळा ते इतके भरमसाठ येतात की त्यांनी व्यापलेली जागा रिकामी करण्यासाठी त्यांना स्मृतीपटलावरुन पुसत बसावे लागते आणि आपली पाटी पुन्हा कोरी ठेवावी लागते आणि तसे करणेही एक सुविचार ठरतो.

      सुविचारांची ही सवय जणूकाही आपल्या अंगवळणीच पडून गेलेली असते. आपल्याला आलेले सुविचार आपल्याकडून नकळत दुसर्‍याकडे पुढे पाठवले जातात. तिथून ते तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे असे जगभर पसरतात. बरं असे सुविचार कोणाचे असतात त्याचा पत्ताही लागत नाही. एखादी म्हण तयार व्हावी तसे सुविचार तयार होतच राहतात आणि ते एखाद्या सुगंधासारखे दाहीदिशांना पसरतच राहतात. जगात इतके सुविचार आहेत की प्रश्न पडतो की इतके विचारी लोक असूनही जगात अविचारांचे थैमान का आहे?

     तयार सुविचारांचा तर अगदी सुकाळ आहे. त्यामुळे कोणी नव्याने स्वतंत्र वेगळा विचार करण्याच्या फंदात अजिबात पडतच नाही. जगात कितीतरी विचारवंत होऊन गेले. जगाने शहाणे व्हावे या अपेक्षेने कितीतरी विचारवंतांनी आपल्या सुपीक बुद्धीतून सुविचारांचे भरघोस पिक घेतले याला गणणाच नाही. पण लोक अलिप्त कमळाच्या पाकळीसारखे नाहीतर निर्लेप तव्यासारखे असतात. ते जराही सुविचार मनाला लावून घेत नाहीत.

    कोणी फलकावर सुविचार लिहून आपल्या विद्वत्तेचे, रसिकतेचे, सुंदरतेचे प्रदर्शन करील. कोणी मेजावरील काचेखाली सुविचार असा सजवून ठेवील की त्याच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची त्यावर दृष्टी पडून जे नाही ते मत होईल. काही एखाद्या सुविचारालाच आपले ब्रिदवाक्य बनवेल. कितीतरी प्रकार. आजवर जगात एखादा सुविचार कोणीतरी अंमलात आणला आहे असे एकही उदाहरण नाही. अर्थात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यासारखी उदाहरणे जगाच्या पाठीवर विरळीच असतील. कदाचित सुविचार आणि आचार यांची काहीतरी फारकत असावी. ते एकत्र नांदतांना कोठेही दिसतच नाही.

      माणसाला सुविचार आवडतात. वि. स. खांडेकरांच्या कथा कादंबर्‍या लघुनिबंधातून सुंदर वाक्ये, विचार (जीवनात न उतरवता) वहीत उतरवून त्यांचा संग्रह करणारी अनेक आहेत. दिवसरात्र सदाचार चिंतनीचे पारायणे करणारे कितीतरी आहेत. एखाद्याच्या वाढदिवसाला सुविचारांचे पुस्तक आवर्जून भेट देणारे आहेत. कथा किर्तनातून सुविचारांचे डोसच्या डोस पाजणारे कितीतरी आहेत. पण तेच विचार आचारण्याची वेळ आली की आपण कोणी साधूसंत वा देव नाही असा हटकून साक्षात्कार होतच असतो.

      सुविचारांचा फायदा म्हणाल तर नुसत्या नजरक्षेपाने अंतस्थ मनाला विलक्षण शांतीपूर्ण सुखद संवेदना व आनंद लाभतो. विवेकाचा दीप प्रज्वलित होतो. मन सृजनशील होते. सुविचार उतरवतांना माणूस ते इतक्या आवडीने समरसून उतरवतो (ते जीवनात उतरवण्याचे बंधन नसते) की त्याचे अक्षर अगदी मोत्यासारखे सुंदर होऊन जाते.

       सुविचारांचे आकर्षण कोणालाही असते. मोठमोठ्या व्यावसायिक कंपन्या आपल्या दैनंदिनी वा दिनदर्शिका यावर सुविचार छापते. अर्थात त्याकडे वापरणाऱ्यांचे लक्ष जातेच असे नाही तरी त्यामुळे ती पाने देखणी होतात यात शंकाच नाही.

     सुविचार कोणी आचरणात आणो वा ना आणो त्यांना मरण नाही. सुविचार कोणाचा आहे तेही न पाहता तो एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे बिनदिक्कत जातांना दिसतात.

     क्षणभर असे सुविचार वाचताना ते कसे सुचले असतील आणि आपल्याला असे सुविचार का सुचत नाही असेही आपल्याला क्षणभर वाटते पण आपण ते एवढे मनाला लावून घेत नाही. पुढील क्षणी आपण नव्या सुविचाराकडे वळतो आणि आधीचा सुविचार आपल्या गावीही रहात नाही.

       सुविचारांबाबत विचार करावा तितका थोडा आहे. उगाचच त्यात वेळ का घालवावा असा सुविचार करुन आलेले सुविचार दुसर्‍याकडे पाठवून मोकळे व्हावे यातच खरे शहाणपण आहे. नाही का?

@विलास आनंदा कुडके

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...