प्रत्येकाच्याच आयुष्यात केव्हा ना केव्हा उगवणारा.. कोणाच्या आयुष्यात लवकर तर कोणाच्या आयुष्यात उशीरा पण हमखास डोकवणारा पांढरा केस असतो. कोणी त्याचे स्वागत करत नाही. अनपेक्षित असतो. कोणाला तो नकोसाही असतो. पण तो येतोच. नको नको म्हटलं तरी येतोच. येताना तो वाढत्या वयाची चाहूल घेऊन येतो. पांढरा रंग शरणागतीचे प्रतिक आहे. तो नकळत शरणागतीचा संदेश घेऊन येतो. बेलगाम उशृंखल मनाला एक लगाम घेऊन येतो.
असा पांढरा केस येण्यापेक्षा अकाली काळे केस उडून गेलेले परवडले असे वाटून गेल्यास नवल नाही. तसं पाहिलं तर पांढरा रंग शुद्ध सात्विकतेचेही प्रतिक असते पण तरीही मन पांढरा केस स्वीकारत नाही. तो येतो ते आपल्या नकळत कुठेतरी. अचानक काळे केस सावरता सावरता तो आपले डोके वर काढतो आणि आपल्या काळजात धस्स होऊन जाते. घाईघाईने आपण त्याला उपटून फेकून देतो आणि पुन्हा काळ्या केसांना कुरवाळत रम्य स्वप्नांमध्ये रममाण होऊन जातो. पण तो जणू नांदी असतो एकेक केस स्फटीकवत पांढरे करुन टाकण्याची. एक केस उपटला तरी दुसरा
त्याची जागा घेतो. हळूहळू तो आपले भाईबंद घेऊन एकेक जागा बळकावत राहतो. आपण वरुन मेंदी अस्त्र, रंगास्र सोडत रहातो तरी तोही हट्टास पेटलेला असतो. कोणत्याही अस्राला न जुमानता आपल्या पांढरया रंगाचा प्रभाव जराही कमी करीत नाही.
सर्व अस्र नाकाम झाल्यावर नाईलाजास्तव मग पोक्त व्हावेच लागते. जबाबदारीचे ओझे मग ज्याला त्याला दाखवत राहण्याशिवाय मग आपल्यापुढे पर्याय रहात नाही. ज्या गोष्टी आपण काळे केस म्हणून मनमुराद केलेल्या असतात त्या पुढे पुढे दुसर्याने केलेल्या आपल्याला खटकायला लागतात. आपण राग राग करायला लागतो. उपदेशाचे डोस पाजायला लागतो आणि मनातल्या मनात पांढरया केसांवर चरफडत राहतो.मग पांढरे केस रेशमी वाटेनासे होतात. पांढरया बटेचे कौतुक रहात नाही. पांढरया केसांच्या सावलीत संध्याकाळ करुन घेण्याची कोणाची इच्छा उरत नाही.
काळ्या केसातील एकेक छब्या पुन्हा पुन्हा निरखत बसण्याचा त्याला छंद जडतो. पांढरया केसात तो कोणाला आपली छबी घेऊच देत नाही.
असे जरी असले तरी पांढरया केसांनी काही व्यक्तिमत्त्व अधिक उजळलेलीही उदाहरणे आहेच.
आयुष्यात ज्यांनी कधी काळ्या केसांचे साधे कोडकौतुक केले नाही त्यांच्या लेखी केस काळे काय आणि पांढरे काय. आपल्या कर्तृत्वाला ध्येयाला महत्त्वाकांक्षेला ज्यांनी आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान दिले त्यांच्या आयुष्यात डोकवलेल्या पांढरया केसांचा त्यांनी जरासुद्धा बाऊ केला नाही. उलट पांढरया केसांचा पट्टा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदरणीय भागच बनून गेला.
काळे काय किंवा पांढरे काय खरे सौंदर्य हे केवळ या रंगांवरच अवलंबून आहे का. वरलिया रंगांचे सौंदर्य नश्वर आहे. अंतरंगी फुलत जाणारे सौंदर्यच शाश्वत आहे हे कळण्यासाठी या रंगांपलिकडे पाहण्याची दृष्टी यावी लागते.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment