माझ्याबद्दल..
सारे जग कोरोनाग्रस्त झाले असताना मला माझेच पडले आहे. टि. व्ही. वर सांगतात की घरी राहून तुम्ही देशाची सेवा करीत आहात. घरातच रहा तेव्हा मी घरातल्या घरात आरशात या थोर देशभक्ताचा म्हणजे माझा दाढीमिशा वाढलेला चेहरा निट निरखून पाहतो. कितीतरी दिवसात पोशाख चढवलेला नाही. बाबा आमटेंचा आदर्श घेतल्यासारखे वाटून माझे मलाच कौतुक वाटत आहे. सतत घरात राहिल्याने माझी मलाच चांगलीच ओळख होत आहे. आयते बसून खाणे जीवावर येत आहे म्हणून घरातील सगळ्या कामांना हात लावता लावता मी अगदी सराईत झालो असून त्याही कामात माझा हात धरणारे आता घरात कोणी कोणी म्हणजे कोणीच राहिलेले नाही. अर्थात सामाजिक सुरक्षा अंतर पाळायचे असल्याने कोणी हातही धरणार नाही. इतके असून याबाबतीत माझे कोणीच कौतुक कसे करत नाही असेही कधी कधी वाटते. पण हा सध्याचा काळ आणीबाणीचा आहे, कौतुक करण्याचा नाही असे मनातल्या मनात स्वतःच स्वत:ची समजूत घालून घेत आहे. घरातल्या सगळ्यांनाही माझा अतिशय जवळून परिचय झाला आहे आणि मला त्यांचा. माझी बाहेरची सगळी आण बाण आणि शाण मी घरात राहून राहून अगदी विसरुन गेलो आहे. टि. व्ही वर इतर कार्यक्रमात लक्ष लागत नाही. सारखे हे न्यूज चॅनल बघ. ते न्यूज चॅनेल बघ. एकेक बातमीने माझे उर धपापत असताना मधे मधे येणार्या जाहिरातींनी मी बुचकळ्यात पडत आहे. एकीकडे माणसे मेल्याच्या बातम्या व ब्रेक मध्ये कसल्या कसल्या जाहिराती. बाहेर जायची पंचायत आणि एकेक तोंडाला पाणी सोडण्यारया जाहिराती. मोठी दोलायमान अवस्था झाली आहे माझी. पण सध्या काहीच सांगायची सोय नाही. माझे मन कुठे कुठे फिरुन येते. पण बाहेर अजिबात पडायचे नाही. एक सारखे घरात राहून माझे सगळे प्रकार करुन झाले. मार्निंग वाॅकला पर्याय म्हणून मी जागच्या जागी वाॅकरवर चालून चालून कंटाळलो. घरातील सगळी पुस्तके वाचून झाल्याने पुन्हा पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली. तशीही माझी स्मरणशक्ती कमी आहे त्यामुळे कितीही वेळा एखादे पुस्तक वाचले तर मला दरवेळी ते नवीन उत्कंठावर्धक वाटू लागते. काही गझलकारांचे शेरही असेच. दरवेळी वाचल्यावर जणूकाही पहिल्यांदा वाचले या आविर्भावात मोठ्याने दाद देतो. त्याचा घरातील लोकांना त्रास होतो. तोच तो संग्रह वाचून दाद देण्याची काही आवश्यकता आहे का असे त्यांचे दरवेळी मत पडते. काही दिवस झोपण्याचा मनसोक्त आनंद घेऊन पाहिला पण अलिकडे एकेक बातमीने माझी झोपच उडत चालण्याने तेही सुख राहिले नाही. माळ्यावरचा कॅरम बुद्धीबळ पत्ते काढून सगळे खेळ करुन झाले. वाळवणाच्या कामात हातभार लावून झाला. आता काय करावे हा माझ्यापुढे जटील प्रश्न आहे. त्यात लाॅकडाऊनचा कालावधी वाढवताय अशा बातमीने तर माझ्या पोटात गोळाच उठला आहे. त्यात माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमीच खातो असे जाहिरातीत म्हणणारया सचिनचा मला हेवा वाटू लागला आहे. कितीतरी दिवसात नाही खाल्ला वडापाव.. समोसा.. मिसळ. जीभेने नुस्त्या आठवणीवर किती दिवस फक्त तोंडाला सुटलेले पाणी निमूट आत गिळायचे. बाहेर काही सांगायची सोय नसल्याने जमेल तेवढे माझ्याबद्दल लिहून काढले आहे पण प्लीज आणखी कुठे सांगू नका. नाहीतर माझ्या इज्जतीचा फालुदा. लाॅकडाऊन संपले तरी मला बाहेर तोंड दाखवायला पडायची चोरी होईल.
(तळटिप-हा काल्पनिक निबंध आहे. खरे मानून कृपया वाचू नये ही नम्र विनंती)
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment