#लक्ष्मण धर्मा
रेल्वेमध्ये काम करणाऱ्यांची नावे दोन अक्षरी नोंदवलेली असतात. आडनाव नसतेच. लक्ष्मण धर्मा रेल्वेमध्ये पेंटर होते. लाईनीतील पाईंटस् रंगवायचे काम. रंगाशी आणि ब्रशशी नाते. वृत्तीतही रंग भरलेले. शिक्षण फारसे झालेले नाही. रजेचे अर्ज दुसर्याकडून भरुन घेणार. कामाला कधीही दांडी नाही. हॅण्डबॅग घेऊन रोज लोकलला हजर. नेहमीची बोगी. नेहमीची खिडकी.
गाडी निघालेल्या दिशेला तोंड करुन बसल्यावर ते म्हणायचे आपले लक्ष कामावर लागते आणि येताना घराच्या दिशेने बसले की घराकडे.
त्यांची पहिली ओळख झाली तो प्रसंग मोठा गंमतीदार होता. मी नुकताच नोकरीला लागलेलो होतो. सुट्टीनंतर दुसर्या दिवशी नाशिकवरुन लोकलने जाण्यासाठी कसारयाला आलो आणि खिडकीची जागा पाहून बसलो. खूप पहाटे उठून आल्यामुळे मला लागली झोप.
लोकलमध्ये जागा ठरलेल्या असतात हे कुठे माहिती असायला. लोकल सुटायच्या वेळी हॅण्डबॅग घेऊन लक्ष्मण धर्मा आले. पाहतो तो काय आपल्या जागेवर नाशिकवाला म्हणजे मी झोपलेला. ते माझ्या बाजूला बसले. माझी झोप पूर्ण होऊ दिली. तोपर्यंत ते माझी झोपमोड न करता बाजूलाच बसून राहिले. मला जाग आल्यावर चौकशी केली. कुठे असतो वगैरे. मग गप्पांमधून माझ्या लक्षात आले की ती खिडकीची जागा त्यांची नेहमीची जागा आहे म्हणून. त्यांनी सांगितले येत जा याच बोगीत. खिडकीची जागा ठेवून शेजारी बसत जा. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मी लोकलमध्ये कधीही झोपेच्या आधीन झालेले पाहिले नाही. येताना १२० - ३०० चे किवामचे पान खाऊन यायचे. मधे मधे ते अंमळशा डोळे मिटायचे तेव्हा गंमतीने म्हणायचे मी घरी गेलो होतो. हेमा मालिनी पीठ मळत होती. बायकोला ते हेमा मालिनी म्हणायचे. स्मिता तळवलकर ही त्यांची आवडती हिराॅईन. पेपरात तिचा फोटो पाहिला की त्यांची कळी खुलायची. विचारायचे 'कोणाच्या नशीबात अशा असतात नाहीतर आमची हेमा मालिनी. लक्ष्मणराव घरात आहे का विचारले तर शेणाचा हात वर करुन हाये हाये म्हणणार'
लोकलमध्ये बहुतेकजण झोपाळू होते. एकजण तर बॅग वर ठेवली की बसून लगेच छातीशी डोके वाकवून झोपी जायचा आणि बरोबर कुर्ला आला की डोळे उघडून बॅग घेऊन उतरुन जायचा. कोणाशी बोलणे नाही की चालणे नाही.ते तोबरा भरुन झोपी गेले की लोकलमध्ये कितीही कोलाहल होवो, कुर्ला आल्याशिवाय जागच नाही. त्यांच्या समोरच्या खिडकीत शंकरची जागा असायची. ते एमटीएनएलमध्ये होते. आता सेवानिवृत्त झाले. बसल्या बसल्या ते पेंगायला लागायचे आणि त्यांचे थोडेसे टक्कल असलेले डोके वर्तुळाकार जागीच फिरत राहायचे. लक्ष्मण धर्मा मग गप्प बसायचे नाही. ते शंकरच्या शर्टाच्या सगळ्या गुंड्या खोलून ठेवायचे आणि मागच्या खिशातून कंगवा काढून शंकरचे केस विंचरुन कपाळावर सगळे झाल्याची थाप मारायचे. हे सगळे होत असताना खसखस पिकलेली असायची. शंकर मग आपले घारे डोळे उघडून सगळ्या गुंड्या लावून परत पेंगायला लागायचे. काही वेळा पेंग येत असूनही ते बळेबळेच जागे रहायचा प्रयत्न करायचे तेव्हा त्यांना झोप झोप असा आग्रह लक्ष्मण धर्मा करायचे.
लक्ष्मण धर्मा अगदी टापटीप असायचे. इन केलेला शर्ट. केसांचा कोंबडा काढलेला. बॅगेतून नॅपकीन काढून स्वारी खिडकीत बसलेली असायची. एखादे स्टेशन यायला लागले की ते हमखास चष्म्याची काच पुसून ठेवायचे. स्टेशन आले की बाहेर बघण्यात त्यांना फार रस. बरं नुस्तेच पाहणे असे नाही तर काय पाहिले ते रसभरीत वर्णनही करुनही सांगायचे आणि मग बाकीची मंडळीही खिडकीतून वाकून वाकून पहायचे. असे रंगतदार व्यक्तिमत्त्व
लक्ष्मण धर्मा यांचा विक पॉइंट म्हणजे बाटली पण रोज नाही. फक्त सुट्टीच्या दिवशी. घरी सुट्टीच्या दिवशी कोणी येणार असेल तर ते बजावून सांगायचे 'यायचे तर सकाळी दहाच्या आत नंतर मी कोणाला ओळखणार नाही. ३१ डिसेंबर यायचा असला गाडीतील एकजण हमखास चार पाच बाटल्या लक्ष्मण धर्मा यांना द्यायचा मग त्यातले सर्व कुठे बसायचे याची जंगी पार्टी आखायचे. कोणी कुठे यायचे. काय काय घेऊन यायचे ठरायचे. लक्ष्मण धर्मा यांना ३१ डिसेंबर पर्यंत दम निघायचा नाही. मिळालेल्या भारी बाटल्यांमधून एकेक बाटलीचा कार्यक्रम ते घरी गुपचूप उरकून घ्यायचे आणि त्या बाटलीत दुसरी आणून भरुन ठेवायचे. कार्यक्रमाला जमलेल्या सगळ्यांना चव लगेच कळायची पण कोणी बोलायचे नाही. एकदा तर सर्वांना त्यांनी असेच एका ठिकाणी जमायला सांगितले आणि बहाद्दर स्वतः आलेच नाही. सगळे चांगले बेत रंगवत राहिले आणि लक्ष्मण धर्मा एकेक पेगमध्ये घरी अगदी तल्लीन होऊन गेले. दुसऱ्या दिवशी मग त्यांना सगळ्यांना बोलावल्याचे आठवले तर स्वखर्चाने बाटल्या आणून पुन्हा कार्यक्रम केला.
पगार झाला की लोकलमध्ये जो तो पे स्लिप घेऊन यायचा. पे स्लिप मग आख्ख्या डब्यात फिरत राहायची. ज्यांना वाचता येत नाही ते दुसरयांकडून वाचून घ्यायचे. लक्ष्मण धर्मा कधीच पे स्लिप घ्यायचे पण नाही आणि गाडीतही कधी आणायचे नाही. काय पगारात नोटांचा बंडल मिळेल तो मोजूनही न घेता तसाच घरी द्यायचे. सरकारी पैसा कमी दिला तर कधीतरी मिळेल आणि जास्त दिला तर कधीतरी कापून घेतील अशी त्यांची ठाम श्रध्दा असायची.
रोज ते खिडकीतून चालू लोकलमधून येणारे जाणारे रंगवायचे पाँईट सिग्नल हेरुन ठेवायचे. ओळीत रेल्वे रुळांच्या कडेने पाँईट सिग्नल रंगवत यायचे. कुठल्याही मुकादमची गरज नसायची. आपले काम स्वतःच ठरवून इमानेइतबारे करायचे इतकेच त्यांना ठाऊक होते. कधी रजा नाही. कधी दांडी नाही. अगदी लग्नकार्यांना सुध्दा ते घरवाली किंवा मुलांना पाठवून द्यायचे. कामावर खाडा असा त्यांना संपूर्ण सेवेत असा माहितच नव्हता.
लक्ष्मण धर्मा आता रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झाले. इतकी वर्षे लोकलने जाऊन सेवा केली आता त्या लोकलकडे पाहणे नको म्हणून ते सकाळी ओसरीवर लोकलकडे पाठ करुन उन्ह खात बसतात. कधी कधी झऱ्यावर गोधडी वजडी करायला जातात. म्हणजे गोधड्या झऱ्यावर जावून धुवायच्या आणि माशांचा बेत करायचा.
अशी माणसे लोकलमध्ये रोजच्या प्रवासात सहप्रवासी म्हणून लाभले तर लांबचा प्रवास देखील हसत खेळत गमती जमतीत कधी संपला हे सुद्धा समजत नाही. लोकलमध्ये सर्व तरहेची माणसे भेटतात पण लक्ष्मण धर्मा सारखी माणसे फार विरळी.
नकळत वर्षानुवर्षे एकत्र प्रवास करताना आपल्या आयुष्याचा एक भागच बनून जातात अशी माणसे!!!
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment