जन्मापासून आजवर सगळे आयुष्य एका शहरातून दुसर्या शहरात जरी गेले तरी माझ्या मनात एक गाव अजूनही घर करुन आहे. त्या गावच्या आमराईत आंब्याच्या झाडावरुन पडण्याचे निमित्त होऊन शेतीकामासाठी कुचकामी ठरुन गावाबाहेर वडील पडले. ते नगरसूल. येवला तालुक्यातील छोटेसे गाव. त्या गावी आईबरोबर वडीलांबरोबर मी लहानपणी कितीतरी वेळा गेलो असेल. त्यांच्या बरोबर तेथील गल्लीतून फिरलो असेल. त्या गल्लीत एका छोट्या बोळीवजा घरात सगळा चेहरा सुरकत्यांनी भरुन गेलेली आजी व डोळ्यांना अजिबात दिसत नसलेले माझे आजोबा मी पाहिलेले होते. आजोबा सकाळी उन्ह खायला ओट्यावर बसले की लहान पोरं त्यांची मस्करी करायचे त्यामुळे ते एक काठी जवळ ठेवायचे. मी तेव्हा आईबरोबर गावी आलो तेव्हा रस्त्यावरच असलेल्या सकडे आजींच्या घरी मुक्काम होता. सकडे आजीने एकदा माझ्या आजोबांना देण्यासाठी माझ्याकडे भाकर दिली होती. ती मी उन्ह खात बसलेल्या आजोबांना 'बाबा, भाकर घ्या' म्हणून द्यायला लागलो तर त्यांनी मला काठीचा रट्टाच ठेवून दिला. मी रडत घरी गेलो तर सकडे आजी त्यांच्याकडे जाऊन नातवाला का मारलं म्हणून विचारले तेव्हा ते चुकचुकत हळहळले आणि जवळ घेऊन माझा मुका घेतला.
सकडे आजी माझ्या आईला लेकच म्हणायची. दांडी पौर्णिमेला म्हणजे माघ पौर्णिमेला नगरसूल गावात खंडेरावांची मोठी यात्रा भरत. बारा गाडे ओढण्याचा मोठा कार्यक्रम या दिवशी असतो. आमचा वाकडीचा खंडेराव असल्याने गावातील खंडेरावांचे दर्शन तेव्हा दुसर्या दिवशी घेण्याची प्रथा होती. तर या दांडी पौर्णिमेच्या निमित्ताने सकडे आजी आईला दरवर्षी बोलवत असे.कधी कधी आंब्यांच्या दिवसात ती आईला बोलवत असे. आईबरोबर मीही मग हमखास जात असे.आंब्याच्या दिवसात मग सकडे आजी हमखास आमरसपुरीचे जेवण ठेवत असे. काही चुलत्यांकडे घरी आंब्याच्या पाट्याच्या पाट्या भरलेल्या असायच्या. लंगडा केसरी अशी काही काही आंब्यांची नावे वडीलांच्या तोंडून तेव्हा ऐकलेली होती. गावात तेव्हा सर्वत्र आंब्यांचा अगदी घमघमाट भरुन राहिलेला असायचा त्यामुळे गावातील वातावरण लहानग्या वयात अगदी अद्भुत वाटायचे. सकडे आजींचे घर रस्त्यावरच ओट्यावर होते. घराच्या ओट्यापुढे छोटीशी बाग होती. बागेत शंकराची पिंड होती. गावात जाणाऱ्या येणाऱ्यांची सकडे आजी चौकशी करायची. जनार्दन पाटलाकडे कामाला जायची. काही दिवस गुळाच्या गुरहाळात पण जायची. तेव्हा मला गुरहाळाच्या मोठ्या कढाईतून गरमागरम ताजा गूळ काढून खायला द्यायची. आजी तशी गमतीदार होती. आईला म्हणजे तिच्या लेकीला मी खूप त्रास देतो म्हणून मुद्दाम माझ्यावर खार खायचे नाटक करायची. मुद्दाम आडवं तिडवं बोलायची. ती माझी गंमत करतय हे तेव्हा मला कळायचेच नाही. मग मीही रागाने तिच्यावर फुगून बसायचो. तिच्या पोटात मायाही होती. एकदा माझ्या पायात बाभळीचा काटा भरला होता तेव्हा याच सकडे आजीने घाईघाईने मला कडेवर उचलून घेत काटा काढून रक्त निघालेल्या जागी चूना भरलेला होता.मला आठवते एकदा आजीबरोबर आई बाबा आणि मी मांगिरबाबाचं कारण करण्यासाठी डुबीकडील घनदाट मळ्यात जिथे मोहाची खूप झाडे होती तिथे गेलो होतो. तेव्हा बोकडाचा बळी दिला होता. रक्ताने माखलेली हिरवळ माती माझ्या मनात अगदी खोलवर रुजून राहिलेली होती. तोच प्रसंग '' नैवेद्य '' नावाची कविता झाली व त्या कवितेलाच नाशिक येथे १९९१मध्ये सार्वजनिक वाचनालयात झालेल्या साहित्य मेळाव्यात मा. कुसुमाग्रज यांच्या उपस्थितीत दत्ता सराफ यांच्या हस्ते मला कवी गोविंद प्रथम पुरस्कार मिळाला होता आणि ती कविता तेव्हा 'अवसर' पुस्तिकेत छापूनही आलेली होती.
सकडे आजोबा दगडी पाटे वरंवटे मूर्ती घडवायचे. डोक्यावर आडवी गांधी टोपी. कूर्ता पायजमा आणि कपाळी गंध लावलेले असायचे. घराच्या कोनाड्यात देव होते. त्यांची गंध उगाळून पूजा चालायची तेव्हा ते तोंडाने काहीतरी छान गुणगुणायचे. दत्तु हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता जो नंतर क्षयरोगाने गेला. पाठोपाठ सकडे आजोबा गेले त्यामुळे सकडे आजीच्या डोक्यावर नंतर परिणाम झाला. दत्तु तेव्हा चौथीला होता. त्याचे मराठी वाचनमालेचे पुस्तक तेव्हा मी चाळत बसायचो. पाटीवर शिवाजी महाराज देव यांची पेन्सिलने चित्रे काढायचो. सकडे आजी कौतुकाने चित्र काढलेली पाटी शेजारी पाजारी दाखवायची.
सकडे आजीच्या घरातून समोर खडकाळ ओढा दिसायचा. उजव्या बाजूला बजरंगबलीची मूर्ती आणि दूर रस्ता वळे त्या कोपर्यावर खंडोबाचे देऊळ व त्या पुढे मार्केटचे चौथारे दिसत. शुक्रवारी गावचा बाजार तिथेच भरत असे. माझ्यासाठी तेथील आकर्षण म्हणजे भेळभत्त्याचे गुडीशेवची दुकाने असायची. कधी कधी गुल्फीवाला यायचा. तिथेही मी घुटमळायचो.गावात पाऊस म्हणजे अगदी तुरळक. आली सर तर आली. मातीला सुगंध यायचा. एकदा मी आणि माझी मोठी बहिण उषा आम्ही मळ्यात गेलो तेव्हा अशीच एक पाऊसाची सर आली तेव्हा आम्ही मातीत पाय खुपसून खोपा करण्यामध्ये दंग झालो होतो. पाऊस आला की गावात खड्यांमध्ये गढूळ पाणी साचलेले दिसायचे. त्यात वरचे आभाळ असे दिसायचे की खूप खोल असल्याचा भास होऊन छाती दडपायची. कुठूनतरी आजीचे लक्ष गेले की ती दूरुनच पाण्यात खेळू नका म्हणून ओरडायची. पाऊस असा त्यामुळे वरच्या पाण्यावरील साधीच बाजरी मका अशी पीक असायची. गावातील बहुतेक लोक दगडाच्या खाणीत मजुरी करायला जायचे. काहींच्या घरी शिलाई मशीन होते. त्यावर कशीबशी गुजरान व्हायची.
गावाची मला इतकी ओढ होती की सकडे आजी घरी आली की मी ती निघाली की तिच्या मागेच लागे. तिच्या बरोबर जाण्यासाठी अगदी रडून हटून बसत असे. सकडे आजी येताना नेहमी किटलीभर काकवी आणायची. पोळीबरोबर ती काकवी अगदी गोड लागायची.
गावातील सगळी घरे मातीची. दगुनाना गावात रहात तर मुरलीधर नाना मळ्यात रहात. दगुनाना नेहमी कासरं घेऊन शेतकामाला जाताना दिसायचे.कधी कधी दगडांच्या खाणीत कामाला जात. चुलतभाऊ अशोक तेव्हा अकरावी मॅट्रिकला होता. मला पुढे विज्ञान शिकायचे म्हणून त्यांनी मला त्यांचे 'विज्ञान परिचय' हे पुस्तक वाचायला दिले होते तेव्हा त्यात मी किती रंगून गेलो होतो.दोन्ही काकू मायाळू होत्या.
वडील मला मळ्यात मुरलीधर नानाकडे घेऊन जायचे तेव्हा ते शेतातच खोपटे करुन रहायचे. चुलतभाऊ तेव्हा अगदी लहान होते . वडील तेथील आमराईत घेऊन जायचे. आत्याने लावलेला आंबा दाखवायचे.
गावातून तेव्हा पूर्वी एकच एसटी नांदगावपर्यंत जायची आणि तिच पुन्हा परतायची. आता गावातून एसटी जात नाही. ती बाहेरुन जाते. गावाच्या वेशीवर ऐतिहासिक बुरुजांचे अवशेष शिल्लक आहेत. अशी आख्यायिका सांगतात की ही नहुष राजाची नगरी होती. नगरीतील प्रजेसह स्वर्गात जाण्याचा राजाला वर मिळाला होता. सगळे त्याप्रमाणे जायलाही निघतात पण मागे वळून पहायचे नाही ही अट होती. ती राजाने मोडल्यामुळे सगळी नगरी पालथी झाली. यामुळेच उत्खननात मडकी भांडी पालथीच सापडतात असे सांगितले जाते.
गावातच पूर्वी तमाशे पाहिलेले आठवतात. गावापासून दूर राहण्यात कितीतरी वर्षे उलटली पण आजही गावी गेले की भराभर हे सर्व आठवत राहते. आज गावाचा चेहरामोहरा कितीतरी बदलून गेला आहे. सिमेंट काँक्रिटची घरे दुकाने वाढली आहे. पूर्वीच्या कोरडवाहू जमीनीत आता पाटाच्या पाण्यामुळे चांगली पीकं घेतली जात आहे. लहानपणी पाहिलेली गावातील माणसं आज जरी नसली तरी त्यांच्या आठवणी वेशीवर गल्लीत रस्त्यावर झाडांच्या सावलीत येतच राहतात.एकेकाळचा ओढा आता एकदम कोरडेठाक पडला असला तरी टॅन्करने तिथे पाणी आणून विधी केले जात असतात...गावाजवळच दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक आहे. तेथून शिर्डी औरंगाबाद तिरुपतीला जाणाऱ्या गाडय़ा थांबतात त्यामुळे प्रवासी वाहतूक करण्याचा चांगला रोजगार मिळायला लागला हीच काय ती दिलासादायक गोष्ट आहे. पूर्वी लावलेली आंब्याची झाडे, तेव्हाची गुरहाळे राहिली नसली तरी मनात ती आमराई आणि ताज्या गरमागरम गुळाची व काकवीची अवीट गोडी अद्याप आहे. कधीतरी अंगणात टिपूर चांदणे पहात ओट्यावर आजोबांच्या कुशीतील दिवस आठवतात आणि अनामिक हुरहुर दाटत राहते..
- विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment