SarjanSpandan

Search results

Friday, May 28, 2021

काम टाळण्याची कला



         'काम करुन आजवर कोणीही मेले नाही पण उगाच रिस्क का घ्या' हा सुविचार सातत्याने कामात मग्न माणसाच्या मागे पाहून एकदा मला अगदी दचकायला झाले. बरे ते इतक्या कामात मग्न होते की त्यांना 'असा सुविचार का लिहिण्यात आला?' असे विचारुन कामात व्यत्यय आणणेही योग्य नव्हते. याच्या उलट एकेठिकाणी' मी रिकामा बसलो याचा अर्थ मला काही काम नाही असे समजू नका, मी कामे संपवून आरामात बसलो आहे' असे पोस्टर मागे लावून जेव्हा पहावे तेव्हा आरामात बसलेल्या एकाकडे पाहून मला अगदी त्याचा हेवाही वाटला होता. पण क्षणभरच. कारण कामाशिवाय बसणे हे मुळात रक्तातच असावे लागते. एक काम संपले की लगेच दुसरया कामाकडे वळायचे हे अगदी स्वभावात ठसून गेलेले असते. नोकरीला लागल्यावर प्रामाणिकपणे काम करणे, नवीन कामाची माहिती करुन घेऊन ते सफाईदारपणे करणे अशी नवख्यांची सर्व साधारण समजूत असते. पण जसजशी काम टाळणारयांची त्यांना हवा लागत जाते तसतसे ते काम टाळण्याच्या कामात पारंगत होत जातात.           प्रामाणिकपणे काम करणाऱ्याकडे काम टाळणारे लोक विचित्र नजरेनेच पाहतात. कारण मग तुलनेत असे काम करणारे उजवे किंवा सरस ठरुन आपणमात्र नालायक कुचकामी ठरण्याची दाट शक्यता असते. अशा काम करणाऱ्यांना काम टाळणारयांपेक्षा कमी मित्र असतात. कारण असे मित्र गप्पा मारायला, वेळ घालायला अगदीच कुचकामी असतात. अशा माणसांना केवळ काम प्रिय असल्याने गप्पा मारण्याच्या उदात्त हेतूने किंवा कुचाळक्या करायला जाण्याच्या उद्देशाने जाणाऱ्यांचा अगदी भ्रमनिरासच होत असतो. कामाच्या वेळी गप्पा मारु नये अशी भंपक कल्पना या काम करणाऱ्या लोकांची असते.

     काम टाळणे ही खरे तर एक कला आहे. पासष्ट कलांपेक्षा अगदी वेगळी. खरयाखुरया शहाण्या माणसाखेरीज काम टाळणे हे येरागबाळ्याचे काम नाही. एका गाढवाने असाच काम टाळण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तो त्याच्या कसा अंगलट आला होता ती गोष्ट सर्वांनाच परिचित आहे. ते बिचारे वर्षानुवर्षे पाठीवर ओझे वहात होते. एके दिवशी त्याच्या गाढवपणावर एकाने चांगली कानउघाडणी केली. 'मरायचे आहे का? जास्त काम करशील तर मरशील. मालकाला तुझे काही पडले नाही. त्याला फक्त काम प्यारे आहे. तु थकला तुझ्याच्याने काम झाले नाही तर तो खुशाल तुला टाकून दुसरे गाढव घेऊन येईल.' मग काय करु? त्याने उपाय विचारला तेव्हा त्याला कानमंत्र मिळाला. 'वाटेत नदी लागली की हळूच पाण्यात डुबकी घेऊन ओझे कमी करायचे. बस. 'त्याने तसे करायचा प्रयत्न केला पण झाले भलतेच. अंगावरचा कापूस पाण्यात वाहून जाण्याऐवजी भिजून आणखी वजनदार झाला. कापूस वाया गेला म्हणून मालकाने जोरदार रट्टे ठेवून दिले ते वेगळेच.

कानमंत्र असा विफल झाल्याचे सांगायला गेल्यावर 'तू त्याच लायकीचा आहे. केव्हा कसे काम टाळायचे, केव्हा काम केल्यासारखे दाखवायचे आणि केव्हा काम बेमालूमपणे टाळायचे हे कळले पाहिजे. नाहीतर मग खुशाल काम करण्याचा गाढवपणा खुशाल करावा.' असा शब्दांचा खरपूस मार बसला.

      सर्वत्र काम टाळणारे असताना प्रामाणिकपणे काम करणे अतिशय मूर्खपणाचे आहे असे ठाम मत काम टाळणारयांचे असते. काम करणाऱ्यालाच काम सांगितले जाते. एक काम संपले की दुसरे काम सांगायची मग मालिकाच सुरु होते. वर आराम हराम आहे असे ऐकवले जाते. इतकेच नव्हे तर असे ऐकवून सांगणारे कामे देऊन खुशाल आराम करायला निघून जातात.काही लोक तर असे असतात की स्वत:ला एक काम धड येणार नाही पण इतरांकडून मात्र काम वाजवून घेण्यात अगदी पटाईत. 

     काही कामे तर अशी असतात की ती आली की तिचा शिक्का असलेल्यांचीच हटकून आठवण होते. अशी कामे वारंवार आली की मग अशा काम करणाऱ्यांना रजा घेण्याचीही पंचायत होऊन बसते.

     काम टाळता आले पाहिजे. काम करायचे म्हणजे धुळीत माखण्याची तयारी ठेवावी लागते. घामात चेहरा डबडबवण्याची तयारी ठेवावी लागते. एवढ्यावरच भागत नाही. झाले का काम, कुठवर आले काम, असा एकसारखा धोशा पाठीमागे लागतो शिवाय आपल्या कडून नक्की काम होईल की नाही असे सारखे सारखे शंकेने पाहणेही सुरु होते. काम सोपवल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत देखील कोणाला दम नसतो. घडीघडी कामातील प्रगती सांगत रहावी लागते. काही ठिकाणी तर कामापेक्षा कामाचा अहवाल सादर करण्याचे काम अधिक आणि तापदायक असते. बरे काम करुन कोणालाही नाव ना उपकार असतो. गरज सरो आणि वैद्य मरो अशी स्थिती असते. काम करुन आजवर कोणालाही ताम्रपट मिळालेला नाही.

        काम केल्याचे कौतुक दूरच छोटी चूक झाली तरी बडगा उगारला जातो. तेव्हा प्रामाणिकपणे काम करायचे की काम टाळण्यात पटाईत व्हायचे ते ज्याने त्याने विचार केला पाहिजे. काम टाळायचे म्हणजे सुरवातीलाच आढेवेढे घेता आले पाहिजे. काम कठीण आहे, जमणार नाही असे छातीठोकपणे आधीच सांगता आले पाहिजे. 'करतो' किंवा 'करुन पाहतो' म्हणून तुम्ही कामाला हात घातला की मेलेच समजा. अगदीच काम टाळणे शक्य नसते तेव्हा भरपूर चूका करीत काम करणे तुमच्या अगदी हातात असते. कामात इतक्या चूका करा की काय बिशाद कोणी तुम्हाला पुन्हा काम सांगेल. कोठून तुम्हाला काम सांगितले असा पश्चात्ताप झाला पाहिजे. काम करताना आपले डोके वापरणे अगदीच धोकेदायक असते. कोणी 'सांगकाम्या' म्हटले तरी चालेल. 'काही कामाचा नाही' असे म्हटले तर फारच उत्तम. असे शेरे मिळायला लागले की खुशाल समजा की तुम्ही काम टाळण्यात अगदी पारंगत झाले म्हणून. काम अंगाला लागू न देणे ही एक कुशलता आहे. एक असाच कर्मचारी होता. त्याला कितीतरी जणांनी कामे सांगण्याचा प्रयत्न केला पण सगळे अयशस्वी झाले. कारण त्याला सांगितलेल्या कामात वाढवा होऊन कपाळी हात मारुन घेण्याची वेळ आली. सगळ्यांनीच अगदी हात टेकले. कामाच्या बाबतीत कुचकामी ठरलेला तो त्याला अनेक विशेषणे 'मूर्ख, नालायक, गाढव वगैरे वगैरे त्यांने आनंदाने ऐकून एके दिवशी तो निवृत्त झाला. रीतसर निवृत्तीवेतनाचे कागदपत्रे सादर करायला तो आला तेव्हा त्याच्या मूर्खपणावर गाढवपणावर सगळे खदाखदा हसले. त्यावर त्याने मुत्सद्दीपणे ओठ मुडपून मंद स्मित करीत सांगितले की खरे मूर्ख गाढव तुम्ही आहेत कारण मी मानसशास्त्राचा द्वीपदवीधर आहे आणि येत असूनही मी काम न करता निवृत्तीवेतन घेणार आहे '

       सब घोडे बारा टक्के असतात. काम केले काय आणि नाही केले काय काही फरक पडत नसतो. काम करायचे नाही मात्र ते केल्यासारखे दाखवत राहणारा सुद्धा एक वर्ग आहे. बाॅम्बे टू गोवा मध्ये गाडीला धक्का मारणारयांमध्ये केश्तो मुखर्जी झोपेच्या तालात फक्त हात लावत चालतो तसा कामाला हात लावत चालणे या वर्गात चालते. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी खेट्या घालाव्या लागतात आणि काम होईल की नाही अशी सारखी धास्ती असते.

       काम करणाऱ्यांच्या तुलनेत काम टाळणारे बहुसंख्य आहेत आणि तेच अधिक सुखी आहेत. कामात कष्ट करण्यापेक्षा काम टाळून मौजमजेत सुखी होणेच जो तो पसंत करीत असतो. इंग्रजीत एक गोष्ट ऐकली होती.  Somebody, Everybody, Anybody आणि Nobody असे चार भाऊ होते. Everybody ला वाटायचे की एखादे काम Anybody करु शकेल. तेव्हा आपण का करावे. Somebody ते करीलच पण शेवटी ते Nobody करतो.

         काम करण्यापेक्षा काम टाळण्याचेच प्रकार जास्त आहेत. काम टाळण्यातील विविधता पाहिली तर थक्क व्हायला होते. करतो करतो पाहतो पाहतो बघतो बघतो म्हणत म्हणत कामाला हातही न लावणारे आहेत. कसं काय करायचं कसं काय करायचं असे विचारण्यात वेळ घालवणारे खूप आहेत. उशीरा कामावर जाऊन लवकर पळून माफक काम करणारेही आहेत. हे काम आपले नाही असे तोंडावर सांगणारे आहेत. आपले काम इतरांनी केले पाहिजे अशी अपेक्षा ठेवणारे खूप आहेत.

       काम करणे हे मूळात माणसाच्या स्वभावात नाही. कडू औषध घ्यावे तसे नाईलाजाने पोटासाठी माणसाला काम करावे लागते. कामात स्वतःला झोकून देणारे, कामात स्वतःला गाडून घेणारे, कामात स्वतःला वाहून घेणारे संख्येने कमी असले तरी त्यांच्यावर भागत असल्याने काम टाळणे केव्हाही श्रेयस्कर आहे असे मानून आजवर काम टाळणारे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देत आलेले आहे. कामाच्या बाबतीत वेडे बनून पेढे खाणेच शहाणपणाचे नाही का?

-विलास आनंदा कुडके

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...