SarjanSpandan

Search results

Saturday, May 29, 2021

भज्यांचा भुगा

 #भज्यांचा भुगा


        सिद्धेश्वर मंदिराजवळून एकच रस्ता बायपासकडून येतो आणि गावातून पुढे जाऊन पुन्हा हमरस्त्याला जावून मिळतो. पहाटेपासून अंधारात जीप येत राहतात. बसेस येत राहतात. जीप वर रेल्वेच्या मोकळ्या जागेत नंबर लावून लागतात. बसला मात्र रस्त्यावरच कडेने उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. रस्ता एकामागोमाग बसेसने भरुन जातो. मागावून येणाऱ्या बसेसना कुठेतरी दूरवर जाऊन उभे रहावे लागते. बसस्थानक होऊ शकत नसल्याने बसेसना रस्त्यानेच आसरा दिलेला असतो.

              पहाटे निव्वळ बनियन अंडरपँटवर फेरफटका मारणारे सेवानिवृत्त गृहस्थ हमखास दिसतात. थेट हायवे पर्यंत पायी रपेट मारणारेही असतात. रस्ता चिंचोळा त्यामुळे चालणाऱ्यांना हार्न देत बस हळुवारपणे स्पीडब्रेकरमागून स्पीडबेकरवर हिंदकळत कशीबशी रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचत राहते. शालेय गणवेशातील पोरही एका रांगेत कुठून कुठून लांब अंतरावरुन चालत आलेले असतात. या सगळ्यांच्या गर्दीत शहाणीसुरती कुत्री मार्ग काढत चहाच्या स्टाॅलपर्यंत पोहचून आशाळभूत नजरेने बल्बच्या उजेडात उजळलेले चहाचे घुटके घेणारयांचे चेहरे त्यांच्या चहाच्या ग्लासातील वाफा न्याहाळत उभे असतात. काही समजुतदार गायी उगाचच चहाच्या स्टाॅलपुढे मुकाट्याने उभ्या राहून  रवंथ करीत उभ्या असतात. घाईघाईने चहा संपवून लोकल पकडणारयांची लगबग असते.

तशात चहाच्या स्टाॅलच्या ओट्यावर एक आंधळा ट्रॅन्झिस्टरवर गाणे ऐकत बसलेला असतो. ओळखीचे त्याची चेष्टामस्करी करीत असतात.

            चहाच्या स्टाॅलवर पहाटेपासून चहा उकळायला सुरुवात होते. पहिला चहाचा आणि पाण्याचा ग्लास रस्त्याला अर्पण केला की गिर्‍हाईकांना ग्लासमागून ग्लास भरुन देणे सुरु होते.

             चहा तयार होताना भराभर दुधाच्या पिशव्या पातेल्यात रिकाम्या होतात. आल्याचे मोठे तुकडे कुटून त्यात घातले जातात. भराभर मोठ्या पळीने साखर पातेल्यात सारली जाते. उकळता चहा ढवळता ढवळता मध्येच साखरेचे प्रमाण पाहण्यासाठी पळीत चहा घेऊन चाखला जातो.

चहा उकळायला ठेवलेला असताना भराभर बिसलरी बाटल्या फ्रिजच्या मोठ्या कपाटातून काढून पुढे बाजूला मांडल्या जातात. दिवा अगरबत्ती लागते. मोठा ओला धूप पेटवला जातो. बराचवेळ ट्रॅन्झिस्टरवर गाणे ऐकत असलेल्या आंधळ्याला मग प्रेमाने ग्लासभर चहा दिला जातो. दुसर्‍या गॅसची तयारी होते. मोठी कढाई चढवली जाते. चौकोनी तेलाचा डबा सबसब ओतला जातो. तेल गरम होत राहते. मधून मधून त्यात पाण्याचे थेंब उडवून ते पुरेसे तापले की नाही त्याचा अंदाज घेतला जातो.

            बटाटावड्यांची समोशांची आणि भज्यांची तयारी होते. तालावर नाचत उकळत्या कढाईत एकेक वडा सोडताना चुर्र आवाज होत राहतो. मोठ्या झारयाने पंचवीस तीस वडे तळले जातात आणि मोठ्या परातीत ओतले जातात. गावकरी पेपरचे तुकडे करुन एका बाजूला टांगले जातात. दोरयाचे पिंडाळे टांगले जाते. ब्रेडचा भुगा आणि लालतिखट मिक्स करुन भांड्यात ठेवले जाते. झारयावर मिरच्या उकळत्या तेलात तळून त्याला मीठ चोळून ठेवले जाते.

           गिर्‍हाईके येत राहतात. दिवसभर वर्दळ. असेच रुटीन चालत राहते. एवढ्या व्यस्ततेत सकाळी बाजूला ठेवलेल्या मोठ्या परातीत कालचे उरलेले वडे भजी शिळी पाव यांचा भुगा करण्याचे काम होते. काही भाग कावळ्यांना. काही भाग आशाळभूत कुत्र्या मांजरांना तर भज्यांचा निव्वळ भुगा स्टेशनवर रानफळांचे बारिकल्या आंब्यांचे जांभळांचे वाटे घालून दिवसभर बसणारया आदिवासी अंगभर कपडेही नसलेल्या शरीराची नुस्ती मोळी झालेल्या बायकांसाठी दोन रुपयात मोठ्ठा पुडा बांधून देण्यासाठी..!!!

@विलास आनंदा कुडके 

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...