SarjanSpandan

Search results

Saturday, May 29, 2021

उशीराचं शहाणपण



उशीराच कळलं की जिथे तिथे उशीर होणंच फायद्याचं असतं. लहानपणी ठीक होतं शाळेत उशीरा गेलं की छडी मिळायची. उशीरा उठलं की पांघरुनं ओढली जायची मग हटकून लवकर उठण्याची सवय लागली. लवकर शाळेत जाणं अंगवळणी पडून गेलं. अगदी कालपरवापर्यंत उशीर असा मला ठाऊकच नव्हता. पण त्यामुळे आपले काय काय नुकसान होत गेलं ते आता इतक्या उशीरानं कळतय. अक्कलदाढ म्हणूनच कदाचित उशीरा येत असावी. काही लोकांना तर ही दाढ कधी येते आणि कधी पडून जाते पत्ताच लागत नाही. मीपण जरा उशीराच दाढ चाचपून पाहिली. नशीब ती जागेवरच होती. 

    बरयाचशा गोष्टी उशीरा होणं चांगले असते. उदाहरणार्थ शिक्षण नोकरी लग्न. डोक्यावर पांढरया केसांचा थर साचेपर्यंत शिकतच राहणे केव्हाही चांगले. चष्म्यातून विद्वत्तापूर्ण डोळ्यातील चमक अशी एकाएकी येत नसते. नोकरीचेही तसेच. उशीरा नोकरी मिळाली की तिचे महत्व समजते. तिला चिकटून रहावेसे वाटते. धरसोडपणा रहात नाही. आहे त्या पगारात घर चालविण्याचे कौशल्य प्राप्त होते. उधळेपणा कमी होतो. शिवाय ती अधिक कुशलतेने सांभाळता येते. लवकर मिळणाऱ्या नोकरीत एकतर आपण पुरेसे अनुभवी नसतो. सारख्या चुका होत राहतात. आत्मविश्वासाची पातळी वाढलेली नसते किंबहुना धोक्याची पातळीही गाठलेली नसते. खरं म्हणजे आपल्या उंडारण्याचे मौजमजा करण्याचे धिंगामस्ती करण्याचे मित्रमैत्रिणींबरोबर हुंदडत फिरण्याचे लाईन मारीत हिंडण्याचे पोरी पटवण्याचे गटांगळ्या खाण्याचे वय असते. लग्नाचेही तसेच. उशीरा लग्न जमणे केव्हाही चांगले. अनेक स्थळं त्यानिमित्ताने हिंडून पाहता येतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा पाहुणचार झोडता येतो. अनेकांना टांगणीवर ठेवून स्थळं पाहण्याचा सपाटाच लावता येतो. बरं पाहिलेल्या स्थळांच्या संख्येवरुन जो तो एक वेगळ्याच अदबीने पाहायला लागतो ते निराळेच. मुलाच्या अपेक्षा तरी काय अशी जिकडे तिकडे चर्चा अगदी शिगेला पोहोचते. हे स्थळ हातचे जाऊ नये म्हणून जिकडे तिकडे स्पर्धा सुरु होते. आपला भावही वधारत राहतो. मोठी सुखद बाब आहे ही. नाहीतर एकच स्थळ पाहून पहिल्याच नजरेत प्रेम होऊन चट मागणी चट ब्याह करणारयांना नंतर पश्चाताप होतो की अरेरे ती मस्त होती ही त्याहून सरस होती वगैरे वगैरे. फार लवकर गळ्यात जबाबदारी येऊन पडणे तर अतिशय भयंकर वाईट. जबाबदारी घेण्यासाठी आख्खं आयुष्य पडलेलं असतांना मौजमजा गमतीजमती करायच्या सोडून लवकर लग्न करणं म्हणजे आपल्याच हाताने ओझं डोक्यावर चढवून घेण्यासारखे. असं करणं मुळीच शहाणपणाचे ठरत नाही. 

        दैनंदिन जीवनात आपण पाहतो. जिकडे तिकडे उशीर अगदी लोकांच्या अंगवळणी पडला आहे. साधं बाजारात भाजी घ्यायला जायचं तर तासभर नट्टापट्टा केल्याशिवाय निघणं होत नाही. पदर बरोबर आहे ना हे तर वेगवेगळ्या कोनातून पाहण्यात  इतका वेळ जातो की तिकडे भुकेल्यांना हा वेळ अगदी खायला उठतो. एवढेच कशाला समजा आपण सकाळी 'सार्वजनिक' ठिकाणी गेलो तर ज्याने तातडीची जागा अडवून ठेवलेली असते तो अधिक उशीर करण्याचा आनंद अगदी कुथून कुथून घेतांना दिसतो. वाट पाहणारयाला अधिक वाट पाहायला लावणे यासारखा आनंद नाही महाराजा. एखाद्या कचेरीत आपल्या कामासाठी जावं तर तिथेही सगळे जणू उशीरा येण्याच्या स्पर्धेत भाग घेतल्यासारखे अगदी कार्यालय सुटायच्या वेळेपर्यंत उशीरा येतांना दिसतात. चुकून कोणाच्या आधी पोहचलो तर न जाणो भुर्दंड भरावा लागेल असे सगळ्यांचे चेहरयावरील भाव असतात. चुकून कोणाच्या आधी लवकर पोहचता कामा नये अशी खबरदारी घेतांना त्यांना पाहिले की कार्यालय सुरु होण्याच्या आधी रांग लावायला जाणं मूर्खपणाचे ठरते. कार्यालयात सर्वात उशीरा पोहचणारयाच्या चेहर्‍यावर विजयी मुद्रा पहावी. शिवाय त्याचे इतके कौतुक होते की विचारता सोय नाही. वाटेतील तुडूंब रहदारी, नेहमीप्रमाणे गाड्या उशीरानं धावणे, वाटेतच घरचं काम आठवणे, घरी काहीतरी विसरणं, टीव्हीवर मॅच सुरु असणं, अमुक अमुक आज कार्यालयात येणारच नाही असे कळणे असे सारे समजून घेता घेता तो मुळात कार्यालयात कसा काय येऊ शकला याचा अचंबा करीत किती उशीरापर्यंत बाकीचे कामाला हातच लावत नाही. बरं आपलं काम लवकर व्हावं असं त्यांच्यापैकी कुणाला चुकूनही वाटणार नाही. एक आठवड्याने या. पंधरा दिवसांनी या. महिन्याने या. हे ठरलेलेच असते. नशीब वर्षाने या असं कोणी म्हणत नाही. बरं लोकांनाही हेलपाटे मारल्याशिवाय भाऊसाहेब तात्यासाहेब केल्याशिवाय अन्न गोड लागत नाही. काम वेळेवर करणे म्हणजे अगदी कमीपणाचे लक्षण आहे. अगदी ज्याचे काम असते त्यालाही ते सुखासुखी झाल्याचे खपत नाही. चिरीमिरीशिवाय काम होणे म्हणजे धडधडीत अपमान झाल्यासारखे वाटते. काम जितके उशीरा होईल तितके चारचौघात फुगवून सांगता येते. फुशारकी मारता येते. मिशीला पिळ देऊन बढाई मारता येते. काम लवकर झाले वेळेवर झाले तर मग भाऊसाहेब तात्यासाहेब कोण म्हणणार. सांगा. बँकेतही तिच तरहा. कॅशियरकडे रांगेतील प्रत्येकजण आतुरतेने पाहत असतो आणि तो जणू समोर अजिबात रांग नाही असे समजून समोर मुळीच न पाहता एकेक नोटेला वर खाली उजेडात धरुन निरखित चारवेळा त्याच त्या नोटा मोजण्याचा वर मशीनमधूनही दोन तिन वेळा त्याच नोटा मोजण्याचा तल्लीन होऊन यथेच्छ आनंद घेताना दिसतो. रांग सुध्दा सरकत आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा गतीने पुढे सरकत असते. 

        आतापर्यंत आपल्या लक्षात आले असेलच उशीर किती अविभाज्य भाग झाला आहे आपल्या जीवनाचा म्हणून. पाऊस सुध्दा उशीरा आला की आपल्याला आनंद होतो. न पडणारया पावसापेक्षा उशीरा आलेला पाऊस केव्हाही चांगला नाहीका. Better late than nothing असं म्हणतात ते काही उगाच नाही. आपण नेहमी बघतो एखादा लाभ मिळायचा असेल तर त्यात हटकून उशीरच लावायची एक यशस्वी योजना असते. अशा लाभासाठी तुमची उत्सुकता वाढवणे, सहनशीलता अधिक ताणणे, लाभ किती मौल्यवान आहे हे ठसवणे असे सारे असते. जास्तीत जास्त उशीरा लाभ तुमच्या पदरात कसा पडेल हे पाहण्यासाठीच जणू ते पगार घेत असतात. 

        आता आठवले. लग्नसमारंभात मी पत्रिकेत दिलेला मुहूर्त पाहून त्याच्या आधी पोहचे पण तिथे त्यावेळी प्रवेशदाराशी केवळ कुत्रं झोपलेले असायचे. प्रवेशदाराशी गुलाबाची काटेविरहीत फुलं घेऊन सुहासिनी उभ्या आहेत. स्वागत करताय. कोणीतरी आपल्याला हात धरुन बसायला पुढे नेत आहे हे निव्वळ स्वप्नरंजन ठरे. नवरा नवरी वरहाड आंघोळीत गुंतलेले पाहून मग उगाचच बाहेर फेरफटका मारायला लागे. अशा समारंभात जो तो उशीर करण्यातच गुंतलेला आहे हे पाहून आपल्याला अगदी लाजल्यासारखे होऊन जाते. अशा उशीरापर्यंत लागणारया लग्नांना आणखी उशीरा आलेल्यांचे काय जंगी स्वागत होते ते मी अनेकदा चरफडत डोळ्यांनी पाहिलेले आहे. इतकेच नाही तर त्यांची बहुमुल्य उपस्थिती लाभल्याबद्दल अगदी मंगलाष्टक थांबवून मध्येच ध्वनिक्षेपकावर घोषणा होतानांही मी पाहिले आहे. मंगलाष्टकावरुन आठवले या मंगलाष्टकात मध्येच वेगळीच गाणी म्हणून बासरी वाजवून मुहूर्त कसा उशीरापर्यंत लांबवता येईल याचा प्रयत्न होतो. तिकडे जेवणाची टेबले मांडून ठेवलेली असतात आणि इकडे मंगलाष्टक प्रदीर्घ काळ सुरु राहते अगदी हातातल्या अक्षदा खुपवेळ हातात सांभाळणे असह्य होऊन जाते. नवरदेवाने शेवंतीमध्ये आधीच मनसोक्त उशीर लावलेला असतो आणि नंतर मंगलाष्टक लांबत चालते. आताशा कुठे मी अशा समारंभांना उशीरा जायला शिकलो आहे. 

        घरातही कोणी काही मागितले आणि आपण ते जराही उशीर न करता आणून दिले की त्याची गोडीच राहत नाही बघा. दुसरी मग तिसरी चौथी भराभर मागण्या वाढत राहतात म्हणून शक्यतो मागणी पूर्ण करायला खूप उशीर लावणे गरजेचे असते. मागणी 'सरसकट' मान्य केली की तुम्ही आडवे झालेच समजा. आधी खूप आढेवेढे घ्यावे. वेळकाढूपणा करावा. पाहू बघू करावे. प्रसंगी पैसे काय झाडाला लागतात का सुनवावे. खडखडाट दाखवावा. खिसे उलटे करुन दाखवावे. हट्ट शिगेला पोहचला की मागणी तत्वत:मान्य करुन टाकायची पण मग अटीपण घालून घ्यायच्या तेव्हा कुठे आपले म्हणजे मागणी मान्य करणाऱ्याचे महत्त्व अबाधित राहील नाहीतर डोक्यावर एक केस कोणी शिल्लक ठेवणार नाही. हे सर्व कळण्यासाठी उशीरा का होईना पण उशीराचं महत्त्व समजण्यास सुरुवात करा! 

@#विलास कुडके

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...