SarjanSpandan

Search results

Saturday, May 29, 2021

रिकामे क्षण

 #रिकामे क्षण


शाळेत असताना एक प्रश्न हमखास असायचा. 'गाळलेल्या जागा भरा'. पहिल्यांदा असा प्रश्न आला तेव्हा प्रश्नच पडला होता की या रिकाम्या जागी काय लिहावे. मग मागचा पुढचा संदर्भ जोडून गाळलेल्या जागी काय असावे याचा अंदाज घेण्यात कितीतरी क्षण जायचे. नेमके आपण लिहिलेले त्या जागेसाठी चपखल समर्पक नसायचे आणि मग उत्तर चुकायचे

        कशीबशी भरायची म्हणून बरेचदा आपण ठोकून दिलेले उत्तर चुकीचे असायचे आणि एखादे उत्तर अनपेक्षितपणे बरोबर निघायचे आणि त्याचे गुण मिळून जायचे. आयुष्यात पुढे पुढे असे लेखी प्रश्न येत नसले तरी अलिखित असे कितीतरी क्षण असे येत जातात की ते नेमके कसे भरावे असे प्रश्नच प्रश्न पडत जातात.

        आज पहाटे नेहमीप्रमाणे मी आपल्या ठरलेल्या जागी नेहमीच्या बसची वाट पहात उभा होतो. बस नेहमीची असली तरी भरवशाची नव्हती. ठरलेली वेळ पाळायची की नाही याबद्दल ती स्वायत्त होती. कितीवेळा ती आली आली असताना भलतीच गाडी जवळ येऊन निघून जायची आणि मग पुन्हा ताटकळणे सुरु व्हायचे. त्यात पावसाची पिरपिर.

           वाट पाहाण्याचे क्षण म्हटले की प्रचंड अस्वस्थ करणारे क्षण असतात. हे क्षण रिकामेच असतात. या क्षणांमध्ये काय करावे असे होऊन जाते. या क्षणांना काहीवेळा रिकामेच जाऊ देण्याशिवाय पर्यायही नसतो. मग उगाचच आपण छत्री असेल तर फिरवून बघतो. छत्रीवरील ओले थेंब झटकून पाहतो. कितीतरी गोष्टी आपण आपल्याही नकळत करतो. पण काही केल्या असे रिकामे क्षण संपत नाही. वाट पाहणे संपत नाही.

       बराच वेळ वाट पाहून झाल्यावर एकजण तेथे बसची वाट पाहण्यासाठी आला. बस येत नाही असे पाहून काहीतरी बोलावे म्हणून त्याने वेगवेगळे विषय काढले. रस्त्यांची स्थिती. थांबलेला विकास. निवडून येणारया नगरसेवकांच्या तरहा. कोणत्या गोष्टी विकासासाठी करता येणे शक्य आहे. मंदिराचे अपूर्ण थांबलेले बांधकाम.

       मग हळूच त्याने आपल्या अमेरिकेत असलेल्या मित्राची गोष्ट सांगितली. शहरीही नाही आणि ग्रामीणही नाही अशा मध्यम वस्तीत त्याला कंपनीने रहायला बंगला दिला होता आणि तो कारने कंपनीत जायचा. तो कामासाठी गेला की त्याची पत्नी घरी एकटीच. बरे तेथील वस्तीतील बंगले म्हणजे एक बंगला इथे असेल तर दुसरा बंगला दोन अडीच किलोमीटरवर. घरी पत्नीला प्रश्न पडायचा की नवरा कामावर गेल्यावर रिकामे क्षण कसे घालवावे. टिव्ही कितीवेळ पाहणार. मोबाईलवर किती वेळ राहणार. कुणाशी बोलावे तर शेजार पाजार नाही. कंटाळून शेवटी तो मित्र अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून भारतात आला.

        असे कितीतरी रिकामे क्षण आपल्या वाट्याला येतच असतात. मग ते रोजच्या प्रवासात असतील. रुग्णालयात असतील. बेरोजगार असताना असतील. निकालाची वाट पाहताना असतील. मुलाखतीला आपला क्रम येण्यापूर्वी असतील. या रिकाम्या क्षणांना कोणी वाचन करुन, बागकाम करुन, छंद जोपासून, नामस्मरण करुन, गप्पा मारुन भरण्याचा प्रयत्न करीत असतात.

     महात्मा गांधी विषयी सांगतात ते प्रार्तविधीच्या वेळी दैनिके चाळून काढायचे. वर्धा येथील आश्रमात हे पहावयास मिळाले. ते रेल्वे प्रवासात त्यांना आलेल्या पत्रांना उत्तरे लिहून काढायचे. रिकाम्या क्षणात चिंतनासाठी फार छान संधी मिळते. बरेच लोक रिकाम्या क्षणात डुलक्या काढून ताजेतवाने होतात. माझ्या सारख्याला प्रवासात खिडकी मिळाली तर कविताही सुचत जातात. बरयाच आठवणींची गर्दी या रिकाम्या क्षणात होत असते. रिकामे क्षण सोनेरी होतील असे भरुन काढणे शेवटी आपल्याच हातात असते!

@विलास आनंदा कुडके 

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...