वाढदिवस
कोणे एके काळी घरात कोणालाही वाढदिवसाचा अगदी पत्ताही नव्हता. शाळेच्या दाखल्यावरुन जन्म तारीख माहित झालेली होती पण त्या दिवशी वाढदिवस साजरा करायचा असतो हे घरात मलाच काय माझ्या आईबाबांनाही ठाऊक नव्हते. त्यांनाच काय तेव्हा कोणालाच वाढदिवस साजरे करायचे असतात हे माहित नव्हते. दरवर्षी पासनापास झाले की वरच्या वर्गात जाताना आपले वय एक वर्षाने वाढले असे जाणवायचे. लहानपणी तर कितीतरी वर्षे अडीच वर्षे इतकेच वय होते. शेवटी कंडक्टर ऐकानसा झाला तेव्हा कुठे वय वाढायला सुरुवात झाली. अर्ध्या चड्डीने देखील दहावीपर्यंत पाहिजे तसे वय वाढूच दिले नाही. बराचदा 'तू अजून लहान आहे' असे ऐकावे लागायचे. तर मधूनच 'एवढा मोठा घोड्या झाला' असा टोमणा कोणीतरी रागाच्या भरात मारायचा. किंवा हमखास 'नुस्ता एरंडासारखा वाढलाय' असे म्हणायचे. अर्थात तोपर्यंत एरंडच पाहिलेले नव्हते त्यामुळे आपण नेमके किती वाढलो याचा अंदाजच यायचा नाही. अर्ध्या चड्डीमुळे एक फायदा निश्चित व्हायचा आणि तो म्हणजे आई तिची मैत्रीण सिनेमाला गेली की माझे अर्धे तिकीट काढायची व तिच्या मांडीवर बसून मला सिनेमे पाहता यायचे.
शाळेत घालताना तेवढे किती वय झालेले आहे ते आईला बोटावर मोजायची पाळी आली. नंतर दहावीत शाळा सोडल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेताना व प्रत्येक वर्षी प्रवेशपत्र भरताना चालू तारखेतून जन्मतारीख वजा करुन वय भरायची तेवढी वेळ आली.
त्या आधी कोणीही नुसते कितवीला आहे असे विचारल्यावर मी जी इयत्ता सांगायचो त्यावरुन माझ्या वयाचा आपोआप अंदाज बांधायचे. दहावी झाल्यावर पहिले सत्र कसेबसे केल्यावर लगेच दुकानात लागलो त्यामुळे सोळावं सतरावं कधी लागलं सरलं कळलेच नाही. पुढेही कितीतरी वर्षे वाढत्या वयाचा आणि वाढदिवसाचा कधी संबंध आला नाही. महाविद्यालयात गेल्यावर मात्र मित्रमैत्रिणींचे जन्म दिवस डायरीत टिपून ठेवायची सवय लागली. तीनचारजण मग एकत्र ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या घरी शुभेच्छा द्यायला जाणे होऊ लागले. अर्थात तेथेही वाढदिवस साजरा करणे वगैरे प्रकार नसायचा.
कधीतरी सिनेमाचं गाणं ऐकलं 'बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जिओ हजारो साल ये मेरी आरजू, हॅप्पी बर्थ डे टू यू' सिनेमात बर्थ डे साजरे करण्याचे पाहूनही तेव्हा कोणी तसे वाढदिवस घरी साजरे करायचे असतात हे लक्षातच घेत नसत . 'तुम्हे और क्या दू मै दिलके सिवा, तुमको हमारी उमर लग जाए' असे जन्मतारखेला शुभेच्छा देणे फक्त व्हायचे. नंतर नंतर शुभेच्छा पत्र देणे वगैरे सुरु झाले. अर्थात मला त्याकाळात आवर्जून कोणी शुभेच्छा, शुभेच्छा पत्र वा गुच्छ दिल्याचे आठवत नाही. केक कापून वाढदिवस साजरा करायची पद्धत आपली नाही तर पाश्चिमात्यांची आहे अशी तेव्हा जिकडे तिकडे ठाम समजूत होती. नंतर नंतर मात्र सोसायटीत इतरांचे पाहून घरोघरी आपल्या मुलांसाठी छोटासा केक आणून त्यावर वयाच्या संख्येएवढ्या मेणबत्त्या पेटवून आणि मुलाच्या हातात सुरी देवून सोसायटील लहान पोराटोरांच्या उपस्थितीत घरात फुग्गे फुगवून पताका लावून त्याला कौतुकाने मेणबत्त्या फुंकून विझवायला सांगून वाढदिवस साजरे होऊ लागले. त्या निमित्ताने नवा ड्रेस मुलांना मिळू लागला. त्याच्या हातून घरी शाळेत चाॅकलेट वाटायची प्रथा सुरु झाली.
वाढदिवसाला हमखास फोटोग्राफर बोलावून फोटो काढून घ्यायचीही हौस भागवली जाऊ लागली. काही ठिकाणी औक्षण व केक कापणे किंवा नुसतेच औक्षण किंवा नुसतेच केक कापणे असे विविध प्रकार सुरु झाले.
खरया अर्थाने जेव्हा स्मार्ट फोन आले, वाॅटसअॅप फेसबुक सारखे समाजमाध्यमे आली तेव्हा वाढदिवसांची कक्षा इतकी रुंदावली की घरातील लोकांबरोबर बाहेरील मित्र मैत्रिणी परिवाराकडून शुभेच्छांचा अक्षरशः धो धो पाऊस सुरु झाला. समाज माध्यमांवर हवे तेवढी फुले, गुच्छ, रंगीत संगीत करामती करुन शुभेच्छा मजकूर पाठवण्याची सोय झाल्याने तसेच आज कोणाचा वाढदिवस आहे ही आयतीच सोय उपलब्ध असल्याने वाढदिवस आॅनलाईन साजरे करणे किती सोपे झाले आहे . फेसबुकवर तर आपल्या मित्रमैत्रिणीबद्दल मिश्किल मजकूर टाकून अगदी लाडीक शिव्या घालून आपली किती घनिष्ठ मैत्री आहे हे विनाखर्च दाखवणं सोप्पं झालं आहे. खंडीभर हिरव्या शुभेच्छा. ट्रकभरुन शुभेच्छा. रग्गड शुभेच्छा. खाणारा पिणारा असेल तर त्याधर्तीच्या सामिष मादक शुभेच्छा असे कितीतरी शुभेच्छांचे प्रकार पहावयास मिळू लागल्या आहेत. त्यामुळे ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या बरोबर सगळ्यांचीच हमखास करमणूक होऊ लागली आहे. किंबहुना ज्याचा वाढदिवस आहे त्याची विनोदी पद्धतीने खेचाखेची करण्याची चुरसच सुरु होते आणि अशारितीने आॅनलाईन वाढदिवस मस्त ढंगदार साजरा होतो. देव उपाध्ये सारखे रसिक गझलकारांच्या वाढदिवसाला त्याच्या एकेक शेराचे रसग्रहणात्मक विश्लेषण करुन खरया अर्थाने वाढदिवस साजरा करतात.
वाढदिवस साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या तरहा वेगवेगळ्या असतात. काही आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे, अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य पुस्तके वाटून, वृक्षारोपण करुन नाना तरहेने वाढदिवस साजरे केले जातात. वाचन प्रेरणा दिनी गुच्छाऐवजी वाढदिवसाला पुस्तक द्यावे असा संदेश सुद्धा पसरवला जात आहे. तसेही वाढदिवसाला गोळा होणाऱ्या गुलाबांचे कोणी गुलकंद करत नाही. फुलेही दुसर्या दिवशी कचरयात फेकली जातात. केक तोंडाला चोपडून नासाडी करण्यापेक्षा, अचकट विचकट डान्स करण्यापेक्षा, फुलांचे गुच्छ देण्यापेक्षा अशा विविध उपक्रमातून पुस्तके देऊन वाढदिवस साजरा करण्याकडे कल वाढत चालला आहे.
वाढदिवस म्हणजे जितका साजरा करण्याचा असतो तितकाच तो आत्मचिंतनाचाही असतो. या निमित्ताने सशाचे सिंहावलोकन करीत रहावे लागते. आयुष्यातील यशाची कमान चढत्या क्रमाने चढतच जात असताना उतरण सुरु होते तेव्हा सावध व्हावे लागते. एकसष्टी साजरी होते तेव्हा बुद्धी नाठी होण्याचा दाट धोका ओळखावा लागतो. सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करताना प्रदीर्घ आयुष्य लाभल्याबद्दल कृतकृत्य झाल्यासारखे व नातू पणतूंच्या गोतावळ्यात नजर कान क्षीण झाले तरी हरखून गेल्यासारखे वाटते. काही स्वत:ला मावळते उन्ह समजून सायंकाळीन वयात उगाचच उदास होतात. पण खरे तर वयाचे लाभलेले एकेक वर्ष एकेक दिवस एकेक क्षण देणगी समजून साजरा करायला हवा..
- विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment